डॉ. उज्ज्वला दळवी

वैद्यक शिकू इच्छिणाऱ्या कुणालाही त्या नव्या ज्ञानाची वाट बंद होता नये. पर्यायी वैद्यक शिकणाऱ्यांनाही नव्या शास्त्राचं ज्ञान मिळायला हवं..

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

‘‘झाली का अ‍ॅडमिशन? छान छान! अरेच्चा! होमिओपॅथी घ्यावं लागलं का? अरेरे! थोडा अभ्यास जास्त केला असतास तर एमबीबीएसला मिळाली असती ना रे!’’  जानेवारी महिना आला की व्यावसायिक प्रवेशपरीक्षांचे वेध लागतात. वैद्यकशाखांत प्रवेश मिळावा म्हणून लाखो मुलं जिवापाड मेहनत घेतात, पण प्रवेश मात्र काही हजार विद्यार्थ्यांनाच मिळतो. संपूर्ण भारतात मिळून एमबीबीएसच्या जागा लाखाच्या आतच आहेत- त्याहीपैकी ४८ हजारांहून अधिक खासगी महाविद्यालयांत. पण २०१४ सालापासून सुरू झालेल्या ‘आयुष’ विद्यापीठांच्या जागा ५२ हजारांच्या आसपास आहेत. तेवढेच अधिक डॉक्टर्स तयार व्हावेत, ते खेडोपाडी पोहोचावेत आणि तिथल्या लोकांना वैद्यकीय सेवा मिळावी हे सरकारचं  त्यामागचं उद्दिष्ट आहे. मुलांनाही त्याचा दिलासा वाटतो. अनेकांचं डॉक्टर व्हायचं स्वप्न त्यामुळे साकार होतं. 

‘आयुष’ विद्यापीठांत आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध या पूर्वापार चालत आलेल्या वैद्यकशाखा आणि त्यामानाने नवी, पाश्चात्त्यांकडूनच आलेली होमिओपॅथी यांचं शिक्षण दिलं जातं. तसं रीतसर शिक्षण दिल्यामुळे त्या पर्यायी शास्त्रांचं पुनरुज्जीवन होईल, त्यांच्या औषधांचा अज्ञानी जनसामान्यांकडून जो अनिर्बंध, वारेमाप वापर होतो त्यावर जाणकारांचा वचक बसेल आणि त्या औषधांना नवे कठोर निकष लावून सर्वमान्य करून घेता येईल, अशीही सरकारची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात मात्र काही वेगळंच घडतं. 

सल आणि न्यूनगंड

‘आयुष’मधले विद्यार्थी एकदा डॉक्टर झाले की त्यांना संशोधनात जन्म घालवणं किंवा गावाकडे समाजसेवेसाठी जाणं पसंत नसतं. त्यांच्यातले बहुसंख्य विद्यार्थी शहरातच दवाखाना थाटतात. मग त्यांच्यावर तिथल्या समाजाच्या अपेक्षांचा मानसिक दबाव येतो. त्यांना रक्तदाबमापक, स्टेथोस्कोप, ग्लुकोमीटर वगैरे आधुनिक यंत्रं वापरणं, नव्या वैद्यकशास्त्रातली क्रोसिन, अ‍ॅम्पासिलिनसारखी औषधं, कॅल्शियम, बी-कॉम्प्लेक्ससारखी इंजेक्शनं देणं भाग पडतं.

होमिओपॅथीच्या अभ्यासक्रमात नव्या औषधशास्त्राचा समावेश नाही. युनानी, सिद्ध वगैरे पर्यायांत तर नव्या वैद्यकशास्त्राचा अंतर्भावच नाही. डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना नव्या वैद्यकाचा अभ्यास करण्याची संधी मिळत नाही. ‘पर्यायी शास्त्राचं चार वर्षांचं रीतसर शिक्षण पदरी असूनही आपण नव्या वैद्यकशास्त्राचा बेकायदा वापर करत आहोत,’ या अपराधी भावनेचा सल मनस्ताप देतो.

‘आयुष’ विद्यापीठाच्या आयुर्वेद शाखेचा अभ्यासक्रम फार सुंदर आखलेला आहे. त्याच्यात शरीररचनाशास्त्र, शरीरविकृतिविज्ञान, नवीन औषधशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र हे सगळं सामावून घेतलं आहे. एमबीबीएसच्या मुलांना तेवढाच अभ्यास करायलाही वेळ पुरत नाही. इथे तर सोबत आयुर्वेदाचाही सखोल अभ्यास अपेक्षित आहे. मुलं कितीही हुशार असली तरी मानवी मेंदूच्या मर्यादा असतात. साडेचार वर्ष त्या सगळय़ा अभ्यासाला अपुरी पडणार-  मग कुठला तरी भाग कच्चा राहणार. त्या मुलांसाठी दोन शास्त्रांमधल्या वर्ष-सहा महिन्यांच्या खास सेतू-अभ्यासक्रमाचा उ:शाप आहे. पण नव्या वैद्यकाच्या जगड्व्याळ ज्ञानाचा जगन्नाथ-रथ धावायला तो सेतू अपुरा आहे. व्यवसायात मात्र त्यांच्यातल्या बऱ्याचशा मुलांना नव्या वैद्यकपद्धती सर्रास वापराव्या लागतात. ‘माझा त्या शास्त्राचा अभ्यास कमी आहे,’ हा न्यूनगंड आयुष्यभर छळत राहतो.

भारतातून पर्यायी वैद्यकशाखा बाद होणं शक्य नाही. तो आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला आहे. गेल्या दोन शतकांत विज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये नवे क्रांतिकारक शोध लागले, अतक्र्य गतीने प्रगती झाली. त्याच काळात नव्या तर्कशुद्ध वैद्यकशास्त्राचा जम बसत होता. त्याला त्या सर्वागीण वैज्ञानिक प्रगतीचं पाठबळ मिळालं. प्रत्येक आजाराचं अतिसूक्ष्म स्तरावरचं कारण समजलं. अचूक निदानासाठी नेमक्या चाचण्या ठरल्या. आजारावरचा चपखल उपचार बेतणं जमलं. प्रत्येक नव्या निष्कर्षांला कठोर कसोटय़ांच्या सक्तीच्या अग्निपरीक्षेची शिस्त लागली. वैद्यक शिकू इच्छिणाऱ्या कुणालाही त्या नव्या ज्ञानाची वाट बंद होता नये. पर्यायी वैद्यक शिकणाऱ्यांनाही नव्या शास्त्राचं ज्ञान मिळायला हवं. गावातल्या माणसाला हृदयविकाराचा झटका आला, कुणी प्रवासी आडवाटेवरच्या अपघातात गंभीररीत्या जखमी झाला तर त्याला नव्या उपचारांचा पर्याय उपलब्ध असायला हवा ना?

त्यासाठी उपचार पद्धतींमधला संघर्ष दूर व्हायला हवा. संघर्ष शास्त्रांत नसतो. तो डॉक्टरांच्या मनांत असतो. डॉक्टरांना जर सगळय़ा शाखांविषयी आपुलकी वाटली तर ‘इथे आयुर्वेद उत्तम काम करेल’, ‘इथे होमिओपॅथी योग्य होईल’, ‘या दुखण्याला योगाने आराम मिळेल’ अशी निकोप चढाओढ डॉक्टरांच्या मनात सुरू होईल.

तो वैद्यकसंगम कसा साधायचा?

एमबीबीएस, ‘आयुष’ वगैरे वैद्यकशास्त्राच्या कुठल्याही शाखेत प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्तेच्या, अभ्यासाच्या बाबतीत फारसं डावं-उजवं नसतं. सगळे सारखेच हुशार, अभ्यासू असतात. त्या सगळय़ांना सारखाच अभ्यासक्रम व्यवस्थित झेपू शकतो. म्हणून त्यांना एकसारखाच अभ्यास करायची संधी द्यायची. वैद्यकशास्त्राच्या सगळय़ा शाखांमधल्या विद्यार्थ्यांना पहिल्या पदवी परीक्षेसाठी नवं शास्त्रच शिकवायचं. साडेचार वर्षांचं ते शिक्षण झाल्यावर सगळय़ांनाच वर्षभर वैद्यकशास्त्राच्या पर्यायी शाखांच्या मूलतत्त्वांचा अभ्यास रीतसर शिकवायचा. अभ्यासक्रमाचा कालावधी साडेपाच वर्षांचा होईल. पण त्यायोगे विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलून जाईल. इतरही बरंच साधता येईल. तसंही ब्रिटनमध्ये डॉक्टर व्हायला बारावीनंतर पाच ते सात वर्ष लागतात आणि अमेरिकेत सात वर्ष.

नवं शरीरशास्त्र, औषधशास्त्र यांची पार्श्वभूमी मिळाली की विद्यार्थी अधिक परिपक्व होतील. त्यांची आरोग्याविषयीची, आजारांच्या कार्यकारणासंबंधांविषयीची समज सखोल होईल. त्यानंतर ते पर्यायी वैद्यकशास्त्रं डोळसपणे शिकतील. आयुर्वेद, योग वगैरेंचा अभ्यास मारून मुटकून न होता जिज्ञासेपोटी, उत्साहाने होईल. त्या शास्त्रांचा अधिक अभ्यास करायची त्यांना इच्छा निर्माण होईल. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी नव्या वैद्यकशास्त्रासोबत पर्यायी शास्त्रांचेही सखोल अभ्यासक्रम त्यांना उपलब्ध करून द्यावे.

अमेरिकेत ऑस्टिओपॅथी ही वैद्यकशास्त्राची वेगळी शाखा आहे. तिथल्या अभ्यासक्रमात एमबीबीएससारखाच नव्या वैद्यकशास्त्राचा पूर्ण अभ्यास करावा लागतो. शिवाय त्यांना ऑस्टिओपॅथीविषयी शिकवलं जातं. अभ्यासक्रम लांबलचक, पाच वर्षांचा असतो. मग तीन ते आठ वर्ष इंटर्नशिप करावी लागते. पण पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांना ऑस्टिओपॅथी किंवा नव्या वैद्यकशास्त्राची कुठलीही शाखा खुली असते. 

इंग्लंड-अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जिल्ह्या-तालुक्यांतल्या रुग्णालयात पाठवतात. आपल्याकडे तशा मोठय़ा गावांतल्या रुग्णालयांत रुग्णवैविध्याची लयलूट आहे. परिपक्व होऊन विद्यार्थी तिथे गेले की त्यांना तिथे भरपूर शिकायला मिळेलच, पण रुग्णांनाही निगुतीने उपचार मिळतील. नवी औषधं, आसवं-अरिष्टं किंवा होमिओपॅथीच्या गोळय़ा यांच्यातून निवड करायला रुग्णांना वाव असेलच शिवाय त्यांना त्या निवडीसाठी योग्य, अभ्यासपूर्ण, निष्पक्षपाती सल्लाही मिळेल. एक छान विश्वासाचं नातं निर्माण होईल. मग त्या डॉक्टरांना आयुष्यभर तिथेच काम करायला, रुजायलाही आवडेल. गावोगावी जाणकार डॉक्टरांची संख्या आपसूकच वाढेल.

पर्यायी वैद्यकाचा धंदाटळेल..

स्वत:च्या आवडीनुसार पर्यायी वैद्यकशास्त्र निवडणारे विद्यार्थी त्या शास्त्रांचा मनापासून अभ्यास करतील. त्यांच्या अभ्यास पद्धतीला नव्या ज्ञानाची, त्याच्या शिस्तीची बैठक असल्यामुळे ते पर्यायी वैद्यकाकडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून बघतील. त्या जुन्या शास्त्रांत ते नवं, मूलगामी संशोधनही करतील. पर्यायी शास्त्रांचा योग्य कस लावून सर्वमान्यता मिळवून देतील. पर्यायी औषधांमधली मर्मतत्त्वं हुडकून त्यांचं पेशींमधल्या सूक्ष्म स्तरावरचं काम ते समजून घेतील. त्या औषधांवर आणि चाचण्या वगैरेंवरही जगन्मान्य कसोटय़ांतून पार पडून ‘प्रमाणित’ झाल्याची कायदेशीर मोहर उमटेल. पर्यायी वैद्यकावर बसलेला छद्मविज्ञान (स्यूडोसायन्स) हा शिक्का पुसला जाईल. नियम कडक होतील. कुणीही सोम्यागोम्या छंद म्हणून पर्यायी वैद्यकाचा ‘धंदा’ करू शकणार नाही.

‘आयुष’ विद्यापीठ सुरू करण्यामागची, सरकारला अभिप्रेत असलेली अनेक उद्दिष्टं साध्य होतील. रीतसर नवं-जुनं शास्त्र शिकून पर्यायी वैद्यकाचा व्यवसाय करणाऱ्या कुठल्याही डॉक्टरच्या मनात मग कसलाही न्यूनगंड, अपराधी भावना, उच्च-नीच भाव राहणार नाही. त्या डॉक्टरांना शहरांतही आणि गावांतही सन्मान मिळेल. त्यांच्या सर्वागीण ज्ञानामुळे बकूआत्यांपासून अभियंत्यांपर्यंत सगळय़ांच्याच मनांत त्यांच्याविषयी आदर असेल.  परंपरा, समाज मानसिकता, आरोग्य आणि विज्ञान या साऱ्यांनाच योग्य न्याय मिळेल.

लेखिका वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त आहेत.

ujjwalahd9@gmail.com