आज आठ मार्च. जागतिक महिला दिन. स्त्रीत्वाचा सन्मान करण्याचा दिवस. पण याच दिवशी ‘लोकसत्ता सखोल’च्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ला मांडावा लागत आहे, स्त्रीशोषणाचा नवा पैलू. मुंबईजवळील बदलापुरातील अवैध स्त्रीबीज विक्री प्रकरणाच्या माध्यमातून स्त्रीशोषणाचा हा नवा प्रकार उघडकीस आला आहे. स्त्रीच्या शरीराचा व्यापार ही गोष्ट प्राचीन काळापासून चालत आली असली तरी स्त्रीबीज विक्रीचा अवैध व्यवसाय आणि त्याच्या भोवती असलेले मोठे आर्थिक जाळे हे स्त्रीदेहाच्या वस्तुकरणाचे टोक म्हणावे लागेल अशी परिस्थिती आहे. एकीकडे आर्थिक गरजेसाठी स्त्रीबीज विक्री करणार्या स्त्रिया आणि दुसरीकडे मातृत्वासाठी आसुसलेल्या स्त्रिया या दोन टोकांवर हेलकावणारी ही बाजारपेठ विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करत या दोन्ही स्तरांतील गरजू स्त्रियांचे फक्त शोषणच करत नाही, तर कायद्याला बगल देत अनेक गैरप्रकारांना, अवैधरीत्या काम करणार्या यंत्रणांना फोफावायला मदत करते. यासंदर्भातील सर्व पैलूंचा आढावा…
बदलापूरच्या जोवेली परिसरातील एका साध्यासुध्या निवासी इमारतीत सगळं काही नेहमीसारखंच दिसत होतं. वरवर पाहता तिथे कोणतीही वेगळी हालचाल दिसत नव्हती. मात्र त्या इमारतीतील एका सदनिकेत गेल्या काही वर्षांपासून शांतपणे एक असा व्यवसाय सुरू होता, ज्यामध्ये पैशासाठी गरीब महिलांच्या शरीराचा वापर केला जात होता. स्त्रीबीज, म्हणजेच महिलांच्या गर्भाशयात अंडी तयार करून त्यांची विक्री करण्याचे हे अवैध
रॅकेट होते.
फेब्रुवारी २०२६ मध्ये हा प्रकार उघडकीस आला आणि ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकामागून एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. काही दिवसांतच या प्रकरणात सात जणांना अटक झाली आणि तपास जसजसा पुढे गेला तसतसे या रॅकेटचे जाळे किती खोलवर पसरले होते हे स्पष्ट
होत गेले.
तक्रारीतून उघडकीस आलेले रॅकेट
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका महिलेच्या तक्रारीतून झाली. आर्थिक अडचणीत असलेल्या या महिलेला काही एजंटांनी पैशाचे आमिष दाखवून ‘स्त्रीबीज’ विक्री करण्यास तयार केले होते. परंतु काही वेळानंतर तिला ठरलेले पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर ती महिला ठाणे उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकार्यांपर्यंत पोहोचली आणि तिने संपूर्ण प्रकार सांगितला. या तक्रारीनंतर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला. तेव्हा बदलापुरातील जोवेली परिसरातील एका सदनिकेत मोठ्या प्रमाणात हार्मोन इंजेक्शन, सोनोग्राफी अहवाल, बनावट कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे सापडले. याच छाप्यात या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेल्या तीन महिलांना अटक करण्यात आली. पण या तीन महिला म्हणजे हिमनगाचे टोक होत्या. या प्रकरणाचा तपास होत गेला तसतसे अनेक धक्कादायक खुलासे, माहिती पुढे आली. ही एक संपूर्ण नियोजनबद्ध साखळीच ठाणे जिल्ह्यातील परिमंडळ चारच्या पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे. त्यातील एक एक नवे दुवे जोडले जात असून त्यातून फक्त राज्यातच नाही तर देशभर पसरलेला अवैध स्त्रीबीज विक्रीचा प्रकार उघडा पडतो आहे.
अवैध स्त्रीबीज विक्रीची ही साखळी अगदी एखाद्या कंपनीप्रमाणे कार्यरत होती. प्रत्येक स्तरावर वेगळी व्यक्ती आपली जबाबदारी पार पाडत होती. त्यांचे नेतृत्व अद्याप उघडकीस आलेले नाही. मात्र आतापर्यंत झालेल्या तपासात उघड झाले की या रॅकेटचे मुख्य लक्ष्य आर्थिक अडचणीत असलेल्या महिला होत्या. महिला किंवा पुरुष दलाल त्यांना शोधून काढत होते. त्यांना सातत्याने सांगितले जात होते की फक्त काही दिवसांची प्रक्रिया आहे. शरीराला काही धोका नाही. आणि त्या बदल्यात २५ ते ३० हजार रुपये मिळतील. एरवी गर्भधारणा, प्रसूतीपूर्व, प्रसूती आणि प्रसूतीपश्चात होणारा शारीरिक त्रास सहन करणार्या महिलांसाठी हा तसा कमी त्रासदायक प्रकार. त्यामुळे महिलाही यासाठी तयार होत होत्या. कौटुंबिक पार्श्वभूमी, पैशांची चणचण आणि शारीरिक त्रासाला सामोरे जात फुटणारी आर्थिक कोंडी यामुळे या महिला हे काम करत होत्या. त्यामुळे अनेक महिलांनी स्त्रीबीजनिर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी होकार दिला. प्रत्येक वेळी बीज दान केल्यानंतर त्यांना साधारण २५ ते ३० हजार रुपये दिले जात होते. एकदा प्रक्रिया सुरू झाली की त्या महिलांना वारंवार या प्रक्रियेत ओढले जात होते. काही महिलांकडून तर २०-३० वेळा अंडी काढण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली.
या प्रक्रियेत विविध टप्प्यांवर विविध व्यक्ती भूमिका वटवत होत्या. पहिल्या टप्प्यात महिलांचा शोध घेतला जात होता. दलाल गरीब वस्त्या, कामगार वसाहती किंवा ओळखीच्या माध्यमातून आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना शोधत होते. दुसर्या टप्प्यात त्यांना हार्मोन इंजेक्शन दिले जात होते. त्यामुळे महिलांच्या शरीरात जास्त अंडी तयार होण्यासाठी कृत्रिम उत्तेजन दिले जात असे. हे इंजेक्शन दिले जात असताना वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती असणे अनिवार्य आहे. मात्र कोणत्याही अधिकृत प्रशिक्षणाशिवाय हे इंजेक्शन दिले जात होते. त्यासाठी लागणारी इंजेक्शन्स मिळवण्यासाठी या रॅकेटमध्ये एका औषध विक्रेत्याचाही समावेश होता. हा औषध विक्रेता कोणत्याही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही इंजेक्शन आणि औषधे देत होता.
स्त्रीबीजाची निर्मिती होत असताना या काळात सोनोग्राफी करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यावरून त्याची वाढ योग्यरीत्या होत आहे का हे कळते. मात्र अशा प्रकारे आणि मोठ्या प्रमाणावर कोणत्याही सोनोग्राफी केंद्रावर कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ला किंवा चिठ्ठीशिवाय हे शक्य नव्हते. त्यामुळे या प्रक्रियेत उल्हासनगरातील एका सोनोग्राफी केंद्रातील महिलेला सहभागी करून घेण्यात आले होते. ही महिला कोणत्याही चिठ्ठीशिवाय सोनोग्राफी करून देत असे. स्त्रीबीजाची पूर्ण वाढ झाली असे सोनोग्राफी अहवालात स्पष्ट झाले की या महिलांना आयव्हीएफ केंद्रात नेऊन शस्त्रक्रियेद्वारे स्त्रीबीज काढले जात असे. यात जे आयव्हीएफ केंद्र वापरले जात होते, त्या केंद्राची परवानगी नाशिक येथील होती. मात्र ते ठाण्यात चालवले जात होते. यानंतर ही अंडी दुसर्या महिलांच्या गर्भधारणेसाठी वापरली जात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला जात होता.
कायद्यानुसार एका महिलेला आयुष्यात फक्त एकदाच अंडदान करण्याची परवानगी आहे आणि त्यासाठी कडक नियम आहेत. परंतु या रॅकेटने तो नियम चुकवण्यासाठी वेगळी युक्ती वापरली होती. महिलांची बनावट आधार कार्डे, बनावट प्रतिज्ञापत्रे आणि खोट्या नावांनी कागदपत्रे तयार केली जात होती. त्यामुळे एकच महिला वेगवेगळ्या नावाने अनेक वेळा ‘दाता’ म्हणून दाखवली जात असे. तपासात असेही उघड झाले की या बनावट कागदपत्रांची व्यवस्था करण्यासाठी वेगळे लोक काम करत होते. त्यातील एका व्यक्तीला नुकतीच जळगाव येथून अटक करण्यात आली आहे. नाशिक येथील आयव्हीएफ केंद्राच्या डॉक्टरच्या अटकेनंतर झालेली ही अटक या सर्व तांत्रिक बाबींचा उलगडा करू शकते.
पोलिसांच्या तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. हे रॅकेट अचानक उभे राहिले नव्हते. गेल्या तीन वर्षांपासून ही साखळी सुरू होती अशी माहिती आहे. या काळात किमान ३० ते ४० महिलांचा वापर झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. या महिलांना कधी कधी वारंवार हार्मोन इंजेक्शन देऊन प्रक्रिया करण्यात येत होती, त्याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. हे रॅकेट सुरुवातीला ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील वांगणी परिसरात कार्यरत होते. बदलापूर शहरापासून वांगणी अवघ्या काही किलोमीटरवर आहे. ग्रामीण भाग असल्याने येथे या प्रकाराकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. नंतर काही कारणांमुळे ते बदलापूरमध्ये हलवण्यात आले. बदलापूर पूर्वेतील जोवेली परिसरातील एका सदनिकेतून संपूर्ण नेटवर्क चालवले जात होते.
या स्त्रीबीज विक्री प्रकरणात समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. ज्या महिलेच्या शरीराचा या स्त्रीबीजनिर्मितीसाठी वापर केला जात होता, त्या महिलेला एका वेळासाठी अवघे १८ ते २५ हजार दिले जात होते. मात्र त्याच स्त्रीबीजांची विक्री लाखो रुपयांना केली जात होती. विशेष म्हणजे या स्त्रीबीजांचा दर त्याच्या दर्जावरून ठरवला जात असे. त्यामुळे ही उलाढाल कोट्यवधींच्या घरात असण्याची दाट शक्यता आहे. यात दलालांच्या हाती अनेकदा अधिकची रक्कम पडत होती. मात्र महिलांच्या हाती काय लागत होते याचा पोलीस तपास करत आहेत.
भारतामध्ये सहायक प्रजनन तंत्रज्ञान अधिनियम २०२१ (Assisted Reproductive Technology ( ART) Act 2021) नुसार स्त्रीबीज किंवा अंडदानासाठी कठोर नियम आहेत. एका महिलेला आयुष्यात एकदाच अंडदान करता येते. तर महिलेला आर्थिक मोबदला देण्यास मनाई आहे. संपूर्ण प्रक्रिया वैद्यकीय देखरेखीखालीच करावी लागते. मात्र बदलापूरमधील या रॅकेटने हे सर्व नियम धाब्यावर बसवले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे. पोलीस सध्या या रॅकेटचा आर्थिक व्यवहार, डॉक्टर आणि आयव्हीएफ केंद्रांचा सहभाग, तसेच यामागील मोठे जाळे तपासत आहेत.
मात्र या प्रकरणाने अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयार झालेली आधुनिक वैद्यकीय प्रणाली काही गरीब महिलांचे शारीरिक शोषण तर करत नाही ना, असा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काही हजार रुपयांच्या आमिषासाठी महिलांना त्यांच्या आरोग्यासाठी मोठा धोका पत्करावा लागतो आणि दुसरीकडे या प्रक्रियेतून कोट्यवधींचा व्यवसाय उभा राहतो. वैद्यकीय खाचखळग्यांचा अंदाज लावत त्यातून उभा राहिलेला हा अवैध व्यवसाय व्यवस्थेतील अनेक गोष्टींवर बोट ठेवतो आहे. बेकायदा पद्धतीने होणारी सोनोग्राफी, औषध विक्री, आयव्हीएफ केंद्रांचा वापर वैद्यकीय क्षेत्रातील त्रुटींवर भाष्य करत आहे. एकीकडे आधार दुरुस्तीसाठी संबंधित केंद्रांमध्ये खेटे घालणार्या पालकांना मुलांच्या आधार दुरुस्तीसाठी तासंतास रखडावे लागते. दुसरीकडे स्त्रीबीज प्रकरणात सर्रासपणे बनावट आधार कार्डे बनवली जातात. शासकीय यंत्रणांच्या नाकाखाली इतके सारे होत असताना एक स्त्रीच या प्रकरणाला वाचा फोडते हीसुद्धा यंत्रणांसाठी लाजिरवाणी बाब आहे.
वारंवार स्त्रीबीज काढल्याने गर्भधारणेवर परिणाम
आयव्हीएफ प्रक्रियेत महिलांना हार्मोनल इंजेक्शन देऊन अंडाशयाला अधिक अंडी तयार करण्यासाठी उत्तेजित केले जाते. यामुळे महिलांमध्ये ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम होण्याचा धोका असतो. या स्थितीत अंडाशय खूप मोठे होणे, पोटात सूज येणे, उलटी होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे असे त्रास होतात. हार्मोनल इंजेक्शनमुळे काही महिलांना वजन वाढणे, मूड स्विंग, डोकेदुखी, थकवा तसेच पोट फुगल्यासारखे वाटणे असे दुष्परिणाम जाणवतात. स्त्रीबीज काढण्याची प्रक्रिया ही सूक्ष्म शस्त्रक्रियेच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे रक्तस्राव, संसर्ग किंवा आसपासच्या अवयवांना इजा होण्याचा धोका असतो. प्रजनन आरोग्यविषयक समस्यांमध्ये अंडाशयात सिस्ट तयार होणे, ओव्हेरियन रिझर्व्ह कमी होणे, मासिक पाळी अनियमित होणे, तसेच मानसिक आणि सामाजिक समस्यांही उद्भवतात. भारतामध्ये आयव्हीएफ आणि एआरटी संदर्भात एआरटी कायदा २०१२ आणि सरोगसी कायदा २०२१ हे कायदे लागू आहेत. मात्र त्यांची कठोर अंमलबजावणी होत नाही. सर्व आयव्हीएफ केंद्रांची नियमित तपासणी होत नाही, काही अनधिकृत केंद्रेही कार्यरत आहे. गरीब महिलांना पैशाचे आमिष दाखवून स्त्रीबीज दान करण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. आयव्हीएफमुळे अनेक दाम्पत्यांना पालकत्वाची संधी मिळत असली, तरी स्त्रीबीज काढण्याच्या प्रक्रियेचा अनियंत्रित वापर केल्यास महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या प्रक्रियेसाठी कठोर वैद्यकीय देखरेख, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि महिलांचे योग्य समुपदेशन अत्यावश्यक आहे. – डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय
sagar99narekar@gmail.com
