अवनीश पाटील
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाल्यानंतर राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय घडी बसवण्यात अनेक नेत्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. राज्य नुकतेच उभे राहत होते, अशा वेळी लोकशाही विचारांवर मनापासून विश्वास असलेले आणि सरकारी योजना कागदावर न ठेवता प्रत्यक्षात राबवण्याचा आग्रह धरणारे बाळासाहेब देसाई (१९१०–१९८३) यांनीही महाराष्ट्र उभा करण्यात मोठा वाटा उचलला. राज्याचे शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी सुरू केलेली ‘इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास’ (ईबीसी) सवलत योजना आणि १९६७ च्या भयंकर कोयना भूकंपानंतर महसूलमंत्री म्हणून त्यांनी केलेले पुनर्वसन महाराष्ट्राचे लोक कधीच विसरणार नाहीत. कारभारात कडक, विधानसभेत तयारीने बोलणारे आणि सामान्य माणसांशी थेट संपर्क ठेवणारे असे हे नेते महाराष्ट्र राज्याला आकार देणाऱ्यांपैकी एक होते. आज, १० मार्च रोजी, बाळासाहेब देसाई यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण.

वकिली करणाऱ्या बाळासाहेबांनी १९४५ साली काँग्रेसमधून राजकारणात पाऊल टाकले. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी पाटण मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेते आनंदराव चव्हाण यांचा पराभव केला. इथून त्यांच्या राजकारणाला खरी सुरुवात झाली. १९५६ मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनादरम्यान द्विभाषिक राज्याचा मुख्यमंत्री निवडताना भाऊसाहेब हिरे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यात पेच निर्माण झाला होता. त्या वेळी बाळासाहेबांनी चतुराईने यशवंतराव चव्हाण यांचे नाव पुढे केले. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचवण्यात बाळासाहेबांचा मोठा वाटा होता. पुढे १९५७ च्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या लाटेत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. असे असतानाही बाळासाहेबांनी पाटणचा गड सोडला नाही आणि मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. प्रांतिक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी गावोगावी कार्यकर्ते जोडले.

महाराष्ट्र स्थापनेनंतर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्यावर शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवली. या पदावर असताना त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १,२०० रुपयांपेक्षा कमी आहे, अशा सर्व जाती-धर्मांतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ईबीसी सवलत लागू केली आणि गरीब घरांतील मुलांना मोफत शिकता येईल अशी सोय केली. ‘केवळ कारकून निर्माण करणारे शिक्षण नको, तर राष्ट्राच्या औद्योगिक विकासाला हातभार लावणारे तंत्रज्ञ आणि पराक्रमी परंपरेला साजेसे शूर नागरिक घडवणारे शिक्षण हवे,’ हे त्यांनी विधानसभेत मांडलेले धोरण त्यांची दूरदृष्टी दाखवते. याच काळात त्यांनी कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाची स्थापना करण्यात मोठा वाटा उचलला. भाई माधवराव बागल यांना लिहिलेल्या एका पत्रात बाळासाहेब म्हणाले होते, ‘शिवाजी विद्यापीठ हे स्वप्न होते. ते साकार झाले. मी शिक्षणमंत्री असतांना झाले हे माझे भाग्य.’

अन्याय टाळणारा कणखपणा

१९६२ च्या चीन युद्धादरम्यान यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले. त्यानंतर मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात बाळासाहेबांकडे राज्याचे अत्यंत आव्हानात्मक असे गृहमंत्रीपद आले. त्याकाळात अन्नधान्य तुटवडा, कामगार संप, महागाई आणि राजकीय अस्थिरता यांमुळे राज्यात सगळीकडे गोंधळ माजला होता. अशा परिस्थितीत त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था कडक हाताने सांभाळली. याच कणखरपणामुळे त्यांना ‘महाराष्ट्राचे पोलादी पुरुष’ ही ओळख मिळाली. ‘गरज असेल तेव्हा सरकारने ‘सरकार’ म्हणूनच वागायला हवे’ असा त्यांचा बाणा होता. मात्र, कठोर असतानाही त्यांनी निरपराध जनतेवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. परिस्थिती निवळल्यावर त्यांनी आंदोलकांना सोडूनही दिले.

बाळासाहेब देसाई यांचे चरित्रकार कृ. गो. सूर्यवंशी यांनी नमूद केले आहे की, ‘खऱ्या अर्थाने बाळासाहेब पोलीस खाते व जनता यांमधील दुवा बनले.’ गृहमंत्री असताना बाळासाहेबांनी पोलीस खात्याचा एकूण कारभारच बदलून टाकला. पोलिसांनी लोकांवर दडपशाही करायची नाही, तर लोकांची सेवा करायची, हे त्यांनी पोलिसांच्या मनावर बिंबवले. समाजकंटकांचा नि:पात करण्यासाठी गोळीचा उपयोग केला पाहिजे, निष्पाप जनतेची हत्या करण्यासाठी नव्हे, हा स्पष्ट दंडक बाळासाहेबांनी पोलीस खात्याला घालून दिला.

बाळासाहेब देसाई यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि लोककल्याणाच्या नीतीचा मोठा प्रभाव होता. शिवरायांचा इतिहास आणि प्रेरणा लोकांच्या मनात टिकून राहावी यासाठी त्यांनी अनेक पुतळ्यांच्या उभारणीत आणि ऐतिहासिक वास्तूंच्या जतनात पुढाकार घेतला. मुंबईतील शिवाजी पार्कवरील पुतळा समितीचे ते अध्यक्ष होते (१३ मार्च १९६२). प्रतापगडावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी (१९५७) संयुक्त महाराष्ट्र समितीने काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला असता बाळासाहेबांनी ‘शिवछत्रपतींच्या पुतळ्याला मानाचा मुजरा करण्याच्या या प्रसंगी काळे निशाण दाखवणे अमंगल व महाराष्ट्रद्रोही आहे,’ असे ठाम मत मांडले. चीन आणि पाकिस्तानच्या आक्रमणाच्या काळात त्यांनी सातत्याने तरुणांना शिवरायांच्या शौर्याची आठवण करून दिली. ‘शिवाजी महाराजांची नीतीच संकटकाळी देशाला तारील,’ असा त्यांचा विश्वास होता. शिवछत्रपतींबद्दलची त्यांची निष्ठा फक्त भाषणांपुरती नव्हती. शिवाजी विद्यापीठाची उभारणी, गड-किल्ल्यांचे जतन आणि शिवस्मारकांच्या निर्मितीतून त्यांनी ती प्रत्यक्ष कृतीत आणली.

विरोधकांवरही विश्वास

१९६७ च्या निवडणुकीत बाळासाहेब पाटणमधून बिनविरोध निवडून आले आणि त्यांच्याकडे महसूल खाते आले. १० डिसेंबर १९६७ रोजी कोयना परिसरात भयंकर भूकंप झाला. हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. बाळासाहेबांनी केवळ मदत जाहीर केली नाही, तर स्वतः मदतकार्यात उतरून भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन केले. महसूल खात्याची सगळी यंत्रणा कामाला लावून त्यांनी नवीन गावठाणे वसवली आणि कोयनेतील लोकांना पुन्हा उभे केले.

‘विरोधकांची टीका सरकारला आरसा दाखवण्यासाठी आणि कारभार सुधारण्यासाठी असते,’ असे मानणारे ते लोकशाहीवर मनापासून विश्वास ठेवणारे नेते होते. शहरी भागांप्रमाणेच खेड्यापाड्यांत व डोंगरदऱ्यांत विकास पोहोचला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. साहित्यिक रणजित देसाई यांच्या शब्दांत सांगायचे तर ते ‘तळागाळातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचलेले नेते’ होते.

मात्र, १९७२ नंतर काँग्रेसमधील गटबाजी वाढली आणि राजकारणात बाळासाहेब हळूहळू बाजूला पडले. त्यामुळे व्यथित होऊन त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तरीही ते आमदार म्हणून आणि पुढे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. १९७८ मध्ये त्यांनी जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. १९८० च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब देसाई यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस (आय) पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. २४ एप्रिल १९८३ रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

बाळासाहेब देसाई स्पष्ट बोलणारे आणि करारी होते, पण त्याचबरोबर अभ्यासू होते, सामान्य माणसांची काळजी घेणारे होते आणि विकासाचा विचार करणारे होते. ईबीसी सवलत राबवणे, कोयना भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन करणे, कुस्ती व पारंपरिक कलांना पाठबळ देणे आणि कायदा-सुव्यवस्था कडक हाताने सांभाळणे हे सगळे त्यांचे काम महाराष्ट्रातील लोकांच्या लक्षात राहील. ते फक्त नेते नव्हते, तर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीतील एक भक्कम आधारस्तंभ होते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मनापासून अभिवादन करताना, ‘आजच्या राजकारण्यांना जर बाळासाहेब देसाई उमगले तर…’ असे कुणाला वाटल्यास नवल नाही.

avnishpatil@gmail.com