जो काल तिरंग्यावर टीका करीत होता आणि आज त्याचा जयघोष करीत आहे, त्याला एकच प्रश्न विचारणे पुरेसे आहे – आजचा स्वीकार हा पूर्वीच्या भूमिकेचा पुनर्विचार आहे की राजकीय परिस्थितीशी जुळवून घेतलेली नवी सार्वजनिक भाषा?

भारतीय राष्ट्रध्वजाचा इतिहास हा भारताच्या राष्ट्रकल्पनेच्या, स्वातंत्र्यलढ्याच्या वारशाच्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय विचारसरणींच्या संघर्षाचा इतिहास आहे. आज तिरंगा हा भारताची सर्वमान्य ओळख आहे. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने तो प्रत्येक घरावर फडकताना दिसतो. ‘घर घर तिरंगा’सारख्या मोहिमांमधून तिरंग्याभोवती देशभक्तीची व्यापक सार्वजनिक भावना निर्माण केली जाते. परंतु याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रारंभीच्या तिरंग्याविषयीच्या भूमिकेचा विचार केला, तर एक लक्षणीय वैचारिक परिवर्तन दिसून येते. कधीकाळी तिरंग्याऐवजी भगवा ध्वज हा भारताच्या राष्ट्रस्वरूपाचा अधिक योग्य आहे, अशी भूमिका मांडणाऱ्या वैचारिक परंपरेतील संघटना आज तिरंग्याच्या सन्मानासाठी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कार्यक्रम करतात. हा बदल स्वागतार्ह आहे की सोयीच्या राजकारणातून आलेला आहे, हे आजच्या हिंदुत्ववादी सत्ताधाऱ्यांच्या राजकारणातून अनेकदा स्पष्ट झालेले आहे. 

भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असतांना राष्ट्रीय ध्वजाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता. २२ जुलै १९४७ रोजी संविधानसभेने आजच्या तिरंग्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकार केला. त्यापूर्वीचा ध्वज हा जेव्हढा काँग्रेसचा पक्षध्वज होता त्यापेक्षा स्वातंत्र्यलढ्यातील व्यापक राष्ट्रीय चळवळीचे तो एक महत्त्वाचे प्रतीक बनला होता. चरखा असलेला ध्वज पुढे अशोकचक्र असलेल्या तिरंग्यात रूपांतरित झाला आणि स्वतंत्र भारताच्या सार्वभौम राष्ट्राचे प्रतीक बनला. त्यामागे स्वातंत्र्यलढ्याचा प्रदीर्घ राजकीय आणि भावनिक इतिहास होता. याच काळात संघाच्या वैचारिक विश्वात मात्र वेगळी राष्ट्रकल्पना प्रभावी होती. भगवा ध्वज हा भारतीय संस्कृतीचा आणि हिंदू परंपरेचा अधिक प्राचीन आणि योग्य प्रतीक आहे, असे संघाच्या विचारवंतांकडून मांडले जात होते. गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट्समधील ‘ड्रिफ्टिंग अँड इमिटेटिंग’ या लेखात नव्या राष्ट्रीय ध्वजाच्या स्वीकारावर टीका करण्यात आली. त्यांच्या मते तिरंग्याची कल्पना ही भारतीय राष्ट्रदृष्टीतून नैसर्गिकपणे निर्माण झालेली नव्हती; तर ती इतर देशांच्या ध्वजांकडून प्रेरित झालेली होती. तिरंग्याच्या तीन रंगांनाही त्यांनी आक्षेप घेतला आणि भगवा ध्वज भारतीय सांस्कृतिक परंपरेशी अधिक सुसंगत असल्याचे प्रतिपादन केले.

याहूनही स्पष्ट भाषेत १४ ऑगस्ट १९४७ रोजी ‘ऑर्गनायझर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात तिरंग्यावर टीका करण्यात आली. त्या लेखात तीन रंगांचा ध्वज देशावर वाईट मानसिक परिणाम करेल. तीन हा अंकच अनिष्ट असल्याचा आशय व्यक्त करण्यात आला होता आणि त्यामुळे संघाच्या मुखपत्रात तिरंग्याला अनिष्ट ठरवणारी भाषा वापरली गेली. म्हणून गोळवलकरांनी स्वतंत्रपणे तिरंग्याऐवजी भगवा ध्वज अधिक योग्य मानला. पण भारतीय राज्यघटनेने पुढे स्वीकारलेली राष्ट्रकल्पना नागरिकत्वावर आधारित होती. हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी किंवा कोणत्याही धार्मिक अथवा सांस्कृतिक परंपरेचा नागरिक असला, तरी तो समान अधिकारांचा भारतीय नागरिक आहे. राष्ट्रीय ध्वजही त्यामुळे एखाद्या धर्माचा किंवा सांस्कृतिक समूहाचा ध्वज न राहता सर्व नागरिकांचा ध्वज असणे महत्त्वाचे होते. 

संघाच्या प्रारंभीच्या विचारसरणीत मात्र ‘राष्ट्र’ ही संकल्पना भारतीय सांस्कृतिक परंपरेशी, विशेषतः हिंदू सांस्कृतिक वारशाशी अधिक घट्ट जोडलेली होती. म्हणून भगवा ध्वज हा केवळ धार्मिक ध्वज नसून भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. या दृष्टिकोनातून पाहिले तर तिरंगा आणि भगवा यांच्यातील वाद हा केवळ दोन ध्वजांमधील वाद नव्हता; तर तो नागरिक राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद यांच्यातील संघर्षाचा एक प्रतीकात्मक भाग होता. यामुळेच गोळवलकरांनी तिरंग्याचा स्वीकार हा ‘ड्रिफ्टिंग अँड इमिटेटिंग’ म्हणजेच अनुकरणातून झालेला प्रकार असल्याची टीका केली होती. तिरंग्याच्या तीन रंगांना विविध समुदायांचे प्रतिनिधित्व मानण्याच्या व्याख्येवरही त्यांनी आक्षेप घेतला होता. या भूमिकेतून त्यांना राष्ट्रीय ध्वज हा सर्व समुदायांच्या राजकीय समानतेचे प्रतीक असण्यापेक्षा एका विशिष्ट सांस्कृतिक राष्ट्रकल्पनेचे प्रतीक असावा, असे वाटत होते, असे दिसून येते. 

मात्र स्वातंत्र्यानंतर भारतीय प्रजासत्ताकाने आपला मार्ग वेगळा निवडला. राज्यघटना स्वीकारली गेली, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आला आणि नागरिकत्व हा राष्ट्राचा मूलभूत आधार बनला. तिरंगा या नव्या प्रजासत्ताकाचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज बनला. त्यामुळे एखाद्या संघटनेला आपला सांस्कृतिक ध्वज प्रिय असणे ही एक गोष्ट होती आणि भारतीय राष्ट्रराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंग्याला मान्यता देणे ही दुसरी गोष्ट होती. याच संदर्भात संघाच्या नागपूर मुख्यालयावरील तिरंगा फडकवण्याचा इतिहास महत्त्वाचा ठरतो. उपलब्ध वृत्तनोंदीनुसार १५ ऑगस्ट १९४७ आणि २६ जानेवारी १९५० या दोन प्रसंगी नागपूरच्या संघ मुख्यालयावर तिरंगा फडकवण्यात आला होता. त्यानंतर २६ जानेवारी २००२ रोजी जवळपास ५२ वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा अधिकृतपणे तिरंगा फडकवण्यात आला. या घटनेभोवती नंतर अनेक राजकीय वाद निर्माण झाले. संघाच्या बाजूने ध्वजसंहितेतील तत्कालीन नियमांचा संदर्भ देण्यात आला. टीकाकारांनी मात्र असा प्रश्न विचारला की शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक संस्था आणि सामान्य नागरिकांच्या राष्ट्रध्वजाच्या वापराच्या पार्श्वभूमीवर संघाच्या मुख्यालयावर तिरंगा इतकी दीर्घकाळ का फडकवले गेला नाही?

२००२ मध्ये झालेला बदल म्हणूनच महत्त्वाचा आहे. त्या काळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राजकीय व्यवस्था केंद्रात सत्तेवर होती. संघाशी जवळचे वैचारिक नाते असलेल्या राजकीय प्रवाहाला राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळाले होते. त्याच काळात तिरंगा आणि भगवा यांच्यातील वैचारिक प्राधान्याचा प्रश्न असूनही संघाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवला गेला. यानंतर संघ आणि त्याच्या प्रभावातून निर्माण झालेल्या भारतीय जनता पक्षाने मतलबी राजकारणापोटी का होईना पण तिरंग्याला भारतीय राष्ट्राच्या प्रतीकाच्या रूपात अधिक स्पष्टपणे स्वीकारले. २०१८ मध्ये मोहन भागवत यांनी संघाच्या भगवा ध्वजाबाबतच्या भूमिकेचे स्पष्टीकरण करताना तिरंग्याच्या सन्मानाशी संघाचे नाते असल्याचे सांगितले होते. त्याच वेळी संघाच्या शाखेत भगवा ध्वज का वापरला जातो, हा प्रश्न वेगळा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. म्हणजे त्यांनी एक नवा भेद निर्माण केला. भगवा हा संघाचा सांस्कृतिक ध्वज आणि तिरंगा हा भारतीय राष्ट्राचा ध्वज. पण येथेच एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. जर आज तिरंगा भारताच्या राष्ट्रभक्तीचा सर्वोच्च सार्वजनिक प्रतीक म्हणून स्वीकारला जात असेल, तर तिरंग्याबद्दल पूर्वी व्यक्त करण्यात आलेल्या तीव्र आक्षेपांचे काय? विचारसरणी बदलली असेल, तर तो बदल स्पष्टपणे स्वीकारला का जात नाही? पूर्वीची भूमिका चुकीची होती, असे म्हटले जाते का? की जुन्या भूमिकेचे नवे अर्थ लावून तिच्याशी आजची भूमिका सुसंगत असल्याचे दाखवले जाते? 

जर एखादी संस्था असे म्हणत असेल की पूर्वी आम्हाला भगवा ध्वज राष्ट्रीय ध्वजासाठी अधिक योग्य वाटत होता; आज आम्ही भारतीय प्रजासत्ताकाचा तिरंगा पूर्णपणे स्वीकारतो, तर तो प्रामाणिक वैचारिक बदल ठरेल. परंतु जर आज तिरंग्याच्या नावाने देशभक्तीचे राजकारण केले जात असेल आणि तिरंग्याविषयीच्या आक्षेपांचा इतिहास विसरला जात नसेल, तर त्या बदलामागील राजकीय गरज स्पष्ट होते. यालाच ‘निवडक देशभक्ती’ असे कोणी म्हटले तर ते चूक कसे ठरेल? ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या संदर्भात हा विरोधाभास अधिक तीव्रतेने जाणवतो. आज प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, सामाजिक माध्यमांवर तिरंगा ठेवावा, तिरंग्याशी स्वतःची देशभक्ती जोडावी, असा आग्रह केला जातो. परंतु या आग्रहामागे जर अशी राजकीय भाषा असेल की तिरंगा फडकवणारा देशभक्त आणि तिरंगा न फडकवणारा देशद्रोही, तर हा दृष्टिकोन धोकादायक ठरू शकतो. कारण देशभक्तीचे मोजमाप ध्वज फडकावण्याच्या बाह्य प्रदर्शनाने होत नाही. तिरंग्याचा राजकीय वापर करून विरोधकांना देशद्रोही ठरवणे हे कुठल्या सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे? तिरंग्याचा अर्थ भारतीय नागरिकांच्या समानतेत आहे. तो राज्यघटनेच्या सार्वभौमत्वात आहे. तो विविधतेतील एकतेच्या कल्पनेत आहे. तो स्वातंत्र्यलढ्यातील बलिदानांच्या स्मरणात आहे. तो शेतकरी, कामगार, सैनिक, शिक्षक, वैज्ञानिक, कलाकार, व्यापारी आणि सामान्य नागरिक या सर्वांच्या समान भारतीयत्वात आहे. 

याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे भगवा रंग भारतीय संस्कृतीत प्राचीन आहे, त्याला त्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. त्याचप्रमाणे तिरंगा हा आधुनिक भारतीय प्रजासत्ताकाचा राष्ट्रीय ध्वज आहे. एखाद्या व्यक्तीला भगवा प्रिय असणे आणि तिरंग्याचा आदर करणे यात विरोधाभास नाही. विरोधाभास तेव्हा निर्माण होतो जेव्हा एका सांस्कृतिक प्रतीकाला राष्ट्रराज्याच्या अधिकृत प्रतीकाचा पर्याय म्हणून उभे केले जाते. यामुळे आजच्या ‘घर घर तिरंगा’ मोहिमेकडे पाहताना योग्य भूमिका अशी असली पाहिजे की, आजचा तिरंगा स्वीकार सकारात्मक असेल तर त्या स्वीकारामागील वैचारिक प्रवास आणि पूर्वीची भूमिका यांचाही प्रामाणिकपणे स्वीकार झाला पाहिजे. शेवटी प्रश्न संघाचा किंवा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा राहत नाही. प्रश्न भारतीय लोकशाहीच्या राजकीय संस्कृतीचा आहे. देशभक्ती ही कोणत्याही एका पक्षाची किंवा संघटनेची मालमत्ता नाही. तिरंगाही कोणत्याही पक्षाचा ध्वज नाही. तो भारतीय प्रजासत्ताकाचा ध्वज आहे. त्यामुळे जो काल तिरंग्यावर टीका करीत होता आणि आज त्याचा जयघोष करीत आहे, त्याला एकच प्रश्न विचारणे पुरेसे आहे – आजचा स्वीकार हा पूर्वीच्या भूमिकेचा पुनर्विचार आहे की राजकीय परिस्थितीशी जुळवून घेतलेली नवी सार्वजनिक भाषा? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर मिळाले तर तो विरोधाभास इतिहास समजून घेण्याचे साधन ठरेल. उत्तर टाळले गेले तर ‘सोयीची देशभक्ती’ ठरेल आणि ‘निवडक राष्ट्रवाद’ ही टीका अधिक धारदार होईल. पण या संपूर्ण वादात सर्वांत महत्त्वाचे सत्य एकच आहे, ते म्हणजे तिरंगा भारतीय प्रजासत्ताकाचा ध्वज आहे. त्याचा सन्मान हा कोणत्याही संघटनेच्या बदलत्या भूमिकेपेक्षा मोठा आहे. 

आज प्रत्येक घरावर तिरंगा फडकत असेल तर ते दृश्य निश्चितच आनंददायी आहे. पण त्या तिरंग्याकडे केवळ राष्ट्रवादाचे प्रदर्शन म्हणून न पाहता त्यातील अशोकचक्राचा गती, परिवर्तन आणि पुढे जाणे हा अर्थही लक्षात घेतला पाहिजे. म्हणून विचार बदलणे चुकीचे नाही; पण विचार बदलल्याचा इतिहास प्रामाणिकपणे मान्य करणे हीच खरी वैचारिक प्रामाणिकता आहे. 

jetjagdish@gmail.com

(लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)