प्रिया आचरेकर
आधी तपोवन, आता भीमाशंकर… महाराष्ट्राच्या फुफ्फुसांवर घाव घातला गेला. राज्याबाहेरचे धंदेवाले आणि राज्यातले पाताळयंत्री राजकारणी यांनी शेकडो वर्षांच्या जीवसृष्टीवर कुऱ्हाड चालवली. रातोरात झाडांच्या शंभर पिढ्यांची कत्तल झाली. पण या कानाची त्या कानाला जाग लागली नाही. गुपचूप गुपचूप. यांच्या सगळ्या कारवाया पहाटेपूर्वीच, अंधारात.
उद्योगपतीची कुऱ्हाड मोठी आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं की या कुऱ्हाडीचा दांडा त्या प्राचीन म्हणीसारखाच गोतास काळ ठरलेला – स्थानिक समाजातला आहे. या स्थानिक समाजाचा निवडून दिलेला लोकप्रतिनिधी , इथून पुढे गेलेला राजकारणीच या उद्योगपतींच्या सृष्टीविध्वंसक उद्योगात मोलाची मदत करतो आहे. या संपूर्ण विध्वंसाचा चेहरा असलेला मनुष्य पिडीत राज्याचा मुखिया आहे. जी ‘क्लीन एनर्जी’ ऊर्फ स्वच्छ ऊर्जा मिळवण्यासाठी ही तोडातोड चालवली आहे , तो स्वच्छ वीज निर्मिती प्रकल्प हाच मुळी एक महाभ्रष्ट , अभद्र आणि अस्वच्छ मानसिकतेतून उद्भवलेला उद्योग आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोणाचंही उचलून कोणालाही देऊन टाकायचं हे स्थानिक जनतेनं यापुढे खपवून घेता नये. आमची भूमी आमचे नैसर्गिक स्रोत, आमचं पाणी दुसऱ्यांना देण्याचा अधिकार आम्ही तुम्हाला दिलेला नाही.
इथल्या जनतेनं तुम्हाला स्वतःची कामं करण्यासाठी पूर्णवेळ कामाला ठेवलं आहे… चांगला गलेलठ्ठ पगार देऊन. तुम्हाला मालक केलेलं नाही. इथल्या जल, स्थल, तरु, तृण, काष्ठ, पाषाण, निधी आणि निक्षेपाचे अविछिन्न मक्तेदार असल्यासारखे वागू नका.
बरं प्रत्येकवेळी महाराष्ट्रच का ?
महाराष्ट्राची परिस्थितिकी (इकॉलॉजी) आणि इथल्या विविध जैव परिसंस्था (इकोसिस्टिम) म्हणजे या प्रदेशाची श्रीमंती आहे. महाराष्ट्रातल्या परिसंस्थेचा विध्वंस केला तर इथले पक्षी प्राणी आणि संपूर्ण जीवसृष्टी नाहीशी होईल. आमच्या या समृद्ध जैवविविधतेनं आम्हाला उत्तुंग इतिहास दिला. सर्वांगसुंदर आणि सर्वसमावेशक भूगोल दिला. इथे शेतकरी आहेत, कातकरी आहेत. मच्छिमार आहेत, व्यापारी आहेत. समुद्र, बंदरं, जंगलं आणि विस्तीर्ण माळरानं यांनी या प्रदेशातल्या माणसाला उपजीविकेची विविध साधनं दिली. बंदरांनी व्यापार प्रगतीपथावर नेला; समुद्रानं मच्छीमारांना तारलं; जंगलांनी आदिवासी जमातींना पोसलं; पठारी प्रदेश शेतकऱ्यांचा आणि पशुपालकांचा पोशिंदा झाला.
महाराष्ट्र म्हटलं की सुंदर समुद्रकिनारा, औषधी आणि अन्न पुरवणारी विस्तीर्ण जंगलं, प्राचीन वृक्षराजींनी बहरलेला पश्चिम घाट, जीवनदायिनी नद्यांचे उगम असलेल्या सह्याद्रीच्या रांगा …हे सगळं निसर्गदत्त साम्राज्य नजरेसमोर येतं. अपरान्त आणि गोमंचल म्हणून प्राचीन काळापासून ओळख असलेले हे प्रदेश, ही भूमी ही आज आमची ओळख आहे. इथल्या जमिनीच्या पोटात खनिजांचे साठे आहेत… आमचं जीव- भौतिक- रसायनशास्त्र आम्हाला जन्मानं मिळालं आहे. ते हिरावून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. हे साम्राज्य उध्वस्त करुन इथे कसलाही विकास करू नका ही भूमिका त्यामुळे रास्त आहे. इथली अन्नसाखळी (जैवसाखळी) तुटली तर इथल्या मानवी जीवनावर त्याचा सरळ परिणाम होणार आहे. इथल्या जंगलांनी झाकलेल्या ओल्या जमिनी उघड्या झाल्या तर त्याचा परिणाम पाण्याचे स्रोत आणि पिकांचं चक्र यावर होणार आहे.
पुण्या-मुंबईसारख्या सोसायटीतल्या लोकांना न विचारता एखादा भटका सार्वजनिक कुत्रा कोणी उचलून नेला तर त्याच्यावर कारवाई होते. मग सार्वजनिक नैसर्गिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या या उद्योगपतींवर कारवाई कधी होणार? आम्हाला आमचं अपरान्त तसंच गोमंचल वाचवायचं आहे. तेवढंच कशाला ? संपूर्ण आर्यावर्त उखडण्याचा डाव उधळायचा आहे. अपरान्त, गोमंचल (दमणगंगा नदीपासून गंगवल्ली नदीपर्यंतचा किनारी प्रदेश) आणि पौराणिक काळात ज्याचा ‘सप्त कोकण’ असा उल्लेख आढळतो तो प्रदेश मुळात कुऱ्हाडवाल्यानेच निर्माण केला आहे…. परशुरामांपेक्षा तुमची कुऱ्हाड नक्कीच मोठी नाही. या सप्तकोकणाला हात घालू नका… परिमाण वाईट होतील.
भीमाशंकर अभयारण्य हे मुंबई पुण्याचं फुफ्फुस आहे. दमणगंगा ते गंगवल्ली नदीच्या दरम्यान असलेल्या कंकणाकृती प्रदेशाला कोकण म्हणतात. यात प्रदेशाची लांबीरुंदी आणि कुठपासून कुठपर्यंत या बाबत मतभेद असू शकतात. कारण आपण संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासत असलेल्या पुस्तकांमध्ये वेगवेगळी माहिती मिळते. पण ही दमणगंगा नदी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून उगम पावून महाराष्ट्र दादरा नगरहवेली गुजरातच्या वापी दमण भागातून दुथडी परिसर समृद्ध करत जाऊन अरबी समुद्राला मिळते. तर गंगवल्ली नदी ही उगमाजवळ शाल्मला नावाने ओळखलीजाते. धारवाड जवळच्या पश्चिम घाटांमधून निघून ती उत्तराकन्नडा जिल्ह्याची तहान भागवत अंकोला या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते. या दोन नद्यांच्या मधला परिसर जैवविविधतेनं नटलेला आहे.
या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित, सदाबहार वनं आहेत. इथे लॅटराईट प्रकारची माती आहे. पश्चिम वाहिनी नद्या आहेत. हा सदाहरित जंगलांनी व्यापलेला समृद्ध प्रदेश तुम्हाला वाळवंटात रूपांतरित करायचा आहे! हे मोठ्ठंच दिव्य कार्य या धंदेवाईक लॉबीनं हाती घेतलं आहे. या प्रदेशाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जास्त पाऊस. हा पाऊस इथल्या घनदाट सदाहरित जंगलांमुळे पडतो. आणि पाऊस जास्त पडतो म्हणून जंगलं जास्त सघन आहेत. असं चक्रनेमिक्रमी निसर्ग चक्र आहे. लाखो वर्षं हे असं घडत आलं आहे. आता झाडं गेली, वनं विरळ झाली तर पाऊस घटणारच. परिणामी दूरगामी प्रदेशात पाणी पुरवणारे भूगर्भीय जलस्रोत आटणारच. म्हणजे एकूणच या प्रदेशाची अतोनात हानी होणारच. तुम्ही आमचं निसर्गचक्र बिघडवताय. ज्या निसर्गाने पाऊस आणि अरण्य यांच्या परस्परपूरक जीवनचक्रात मानवाला काहीच भूमिका दिलेली नाही किंवा त्याला खिजगणतीतही धरलं नाही त्यात मानव आता वृक्षतोड करणारी यंत्रं घेऊन घुसतो आहे. या भूभागातील ऑटोमेटेड रेनिंग सायकल तुम्ही विस्कळीत करताय. हे स्वयंप्रेरीत, स्वयंचलित वर्षावनांचं निसर्गचक्र मानवी हस्तक्षेपाशिवाय आणि मानवी प्रयत्नांशिवाय लाखो वर्षं चालत आलं आहे. आता माणसाने येऊन ते बिघडवायचं किंवा बंद पाडायचं. बरं हा निर्णय कोणी एका पाताळयंत्री उपटसुंभानं परस्पर गुपचूप घ्यायचा!
हे चालणार नाही. भौतिक संपत्तीपेक्षा नैसर्गिक साधनसंपत्ती सर्वार्थाने खूप मोठी आहे. तळघर भरून नोटा ठेवल्या तरी त्या भुकेला चावून खाता येत नाहीत. अन्न शेतातच पिकतं. नोटांमधून प्राणवायू निघत नाही. तो झाडांमधूनच निघतो. अंगावरचं वस्त्र, डोक्यावरचं छप्पर, जीव वाचवणारं पाणी हे निसर्गातून मिळतं. सार्वजनिक संपत्ती असलेल्या निसर्गाची नासधूस तुम्ही करायची नाही. त्याचे दुष्परिणाम दूरगामी नाहीत तर नजीकच्या काळातच होणार आहेत.
हा घाव भीमाशंकरच्या झाडांवर नाही… हा मानवजातीवर पडलेला घाव आहे. हे पाप तुम्हाला घेऊन बुडेल. स्वतःच्या बुडाखालची खुर्ची कायम बुडाला बांधून ठेवण्यासाठी किती खाली जाल ? युगानुयुगं , पिढ्यानपिढ्या दुर्लक्षित ठेवलेला कोकण आता वापरायला काढलाय. प्रगती मागितली तर चारदोन मोठ्या कंपन्या वसवायच्या सोडून एकदम अणुऊर्जा प्रकल्प डोक्यात मारायचा. ही मस्ती फार काळ चालणार नाही. तुम्ही कुऱ्हाड उगारलेला सह्याद्री तुम्हाला सोडणार नाही. तो नक्की सूड उगवेल. परशुरामांची ही पावन भूमी आस्थेवाईक, अगत्यशील आहे खरी. पण खाऊन ताटात तोंड धुणाऱ्याचं थोबाड फोडल्याशिवाय रहाणार नाही.
एखाद्या प्रदेशात भूगर्भीय जलस्रोतांशी छेडछाड झाली तर त्याचे परिणाम केवळ जवळच्या नाहीत तर दूरवरच्या प्रदेशातही जाणवतात . यासाठीच निसर्गचक्रात ढवळाढवळ करण्यापूर्वी त्यावर अवलंबून असणाऱ्या सगळ्या घटकांचा विचार करावा लागतो. किंबहुना त्या सगळ्यांचा विचार घ्यावा लागतो. स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी यंत्रणा या त्या त्या परिसरातील निसर्गाचं संरक्षण करण्यासाठी योजलेल्या आहेत. त्यांना स्थानिक निसर्गाची नासधूस करण्याची परवानगी देण्याचा अधिकार नाही. स्थानिक निसर्गावर काही संकट आल्यास त्यांनी सर्वदूर त्याची माहिती द्यावी, निसर्गाचा बचावही करावा, ही मूलभूत अपेक्षा आहे. पण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे सोयीस्कर अर्थ काढायची पद्धत आहे . एखाद्या ठिकाणची वृक्षतोड करण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतली आहे का हा प्रश्न कुठल्या हास्यजत्रेतून आला ?
टेंडर भरलं आणि स्थानिक राज्यसरकारमध्ये बसलेल्या माणसांना बरोबर घेऊन कुठेही काम सुरू केलं ही पद्धत आता बदलली पाहिजे. कुठल्याही सार्वजनिक नैसर्गिक राखीव जंगलं, गायरानं, अभयारण्यं, नद्या, ओढे, समुद्र, खाडी, तलाव, झरे , डोंगर, मोठमोठे जुने वृक्ष यांना स्वतःच्या खाजगी कामांसाठी वापरायला काढण्यापूर्वी तुमची योजना आणि प्रस्ताव किंवा इच्छा तुम्ही आघाडीची वृत्तपत्रं , वृत्तवाहिन्या आणि सार्वजनिक संपर्काच्या इतर प्रमुख माध्यमांमधून प्रसिद्ध करा. त्यावर समाजातल्या सर्वथरातल्या लोकांची मतं घ्या. परस्पर मंत्रालयांच्या मजल्यांवरून अंडरग्राऊंड कारभार करू नका. आता पूर्वीच्या पद्धती बदलल्या पाहिजेत. अशा विषयांची माहिती सर्वांसाठी खुली असली पाहिजे.
देशात कुठेही अशा पैशाला हपापलेल्या लोकांना मुजोरी करून राष्ट्रीय संपत्तीची नासाडी करू देता नये. समाजातल्या विद्वानांनी समजदार लोकांनी यासाठी जागरूक राहिलं पाहिजे. या लोकांनी भीमाशंकरच्या जंगलात एवढे महान उद्योग करण्यापूर्वी समाजातल्या कोणा तज्ञांना किंवा शास्त्रज्ञांना विचारलं होतं किंवा त्यांचा सल्ला घेतला होता ते नावांसह जाहीर करावं.
भीमाशंकरसारख्या जीवसृष्टीसंपन्न अभयारण्यातली साडेतीन हजार झाडं पुन्हा जिवंत होऊ शकणार नाहीत. भरून न येणारं नुकसान झाल्यावर ही माहिती मिळून काय करणार? – हा प्रश्न विचारणं सोपंच! पण सार्वजनिक संपत्तीची नासधूस आणि सार्वजनिक जीवनोपयोगी नैसर्गिक स्रोत नाहीसे केल्याची शिक्षा कायद्यानं दोषींना मिळूनच नये? वास्तविक, कोणत्याही पदावरच्या व्यक्तीला बेड्या ठोकून गजाआड करण्याची वेळ आली तरी कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांनी मागे हटता नये. अन्यथा संविधान , कायदा आणि लोकशाही हे फक्त भाषणात ऐकण्याचे शोभेचे शब्द आहेत असंच म्हणावं लागेल. ज्या राष्ट्रात महिला, मुलं, मुके जीव आणि झाडं सुरक्षित नाहीत किंवा त्यांच्यावर अत्याचार करुन दोषी मोकळे फिरत असतील तर ती कसली लोकशाही ?
आमच्या मायबाप निसर्गावर कुऱ्हाड चालवणाऱ्या निर्मम, निर्दय, लाचार राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे की हा घाव आम्हाला विसरता येणारा नाही. ही भळभळती जखम आता आमच्या कपाळावर कायम वाहात राहील.. कितीही सरकारं बदलली तरी आता कोणावरही आंधळा विश्वास टाकता येणार नाही… भीमाशंकरच्या वृद्ध वृक्षांचं बलिदान वाया जाणार नाही!
सगळ्यात महत्वाचं वाटतं ते म्हणजे भीमाशंकर राखीव जंगलात जे वृक्ष तोडले गेले आहेत पण ज्यांची मुळं अजून शाबूत आहेत त्यांना पुन्हा पालवी कशी फुटेल हे बघावं लागेल. त्यासाठी या प्रचंड ऑक्टोबर हिट मध्ये या दुखावलेल्या झाडांना पाणी द्यावं लागेल. त्यासाठी तज्ञांना पाचारण करुन तरुणांचे गट करुन कामं वाटून द्यावी लागतील. कोणी लक्ष ठेवणारं, कोणी प्रत्यक्ष झाडांच्या मुळात श्रम करणारं असं नेमावं लागेल. हे काम लवकरच करावं लागेल. जोपर्यंत झाडं जिवंत आहेत तोपर्यंत हे शक्य आहे. या जंगलाला आता पुन्हा माणसांत आणणाऱ्या स्पर्शाची गरज आहे.
लेखिका मुक्त पत्रकार आहेत. acharyapriya@gmail.com
