रघुनंदन भागवत
सध्या देशातील वातावरण कॉक्रोच पार्टीने केलेले जंतर मंतर वरील आंदोलन, संसदेवर मोर्चा आणि पोलिसांची कारवाई यांनी ढवळून निघाले आहे. त्यातच संसदेत व संसदेबाहेर रोज होत असलेल्या गदारोळाने वृत्तपत्रांचे मथळे व्यापून टाकले आहेत. पण या गदारोळातच ३० जुलैला बिहार, मध्य प्रदेश व गुजरात राज्यांत विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकांचे निकाल ३ ऑगस्टला लागले.

गुजरातमध्ये मांजलपूरची पोटनिवडणूक जिंकून भाजपने ती जागा आपल्याकडे राखली. मध्य प्रदेशमध्ये दतियाची जागा आपल्याकडे ठेवण्यात काँग्रेसने यश मिळवले. बिहारमध्ये बांकीपूर मतदारसंघात मात्र प्रशांत किशोर यांनी भाजपचा धक्कादायक पराभव करून ती जागा खेचून आणली. प्रशांत किशोर यांनी आपल्या जनसुराज पक्षातर्फे ही जागा लढवली होती. त्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. राष्ट्रीय जनता दलाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. वरील तीन निकालांपैकी बंकीपूरचा निकाल भाजपची झोप उडवणारा आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर बांकीपूरच्या जागेचा राजीनामा दिल्याने तिथे पोटनिवडणूक झाली. या जागेवर नितीन नवीन सलग पाच वेळा निवडून आले होते. त्यापूर्वी त्यांचे वडील या जागेवर निवडून येत असत. १९९५ पासून सलग ही जागा भाजपकडे होती. अशा बालेकिल्ल्यात झालेला पराभव भाजपच्या निश्चितच जिव्हारी लागला असेल. असेल. त्यातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःचा गड राखू शकले नाहीत हा संदेश या निकालातून गेला आणि असा संदेश जाणे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या गरिम्याला धक्का लावणारा आहे.

प्रशांत किशोर यांचा बांकीपूरचा विजय अधिक लक्षवेधक व भविष्यातील राजकारणाची दिशा दाखवणारा ठरू शकतो. केवळ नऊ महिन्यापूर्वी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत जनसुराज पक्षाचा धुव्वा उडाला होता. त्यांना एकही जागा मिळाली तर नाहीच शिवाय बहुतांशी मतदारसंघात त्यांचे अनामत रक्कमही जप्त झाली होती. ती निवडणूक प्रशांत किशोर यांनी लढवली नव्हती. या पार्श्वभूमीवर त्यांचा भाजपच्या बालेकिल्ल्यातील विजय बिहारच्या भविष्यातील बदलाचे संकेत तर देत नाही ना?

नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूत द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचा अनपेक्षित पराभव होऊन विजय जोसेफ या अभिनेत्याने केवळ दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या टीव्हीके पक्षाला जनतेने पसंती दिली व सर्वात मोठा पक्ष या नात्याने इतर पक्षांच्या मदतीने विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. तामिळनाडूत जनतेने द्रविडी पक्षांची मिरासदारी मोडून काढली तशीच बिहारमधील जनता दल व भाजप यांची मक्तेदारी मोडीत काढून पुढील विधानसभा निवडणुकीत मतदार प्रशांत किशोर यांना पसंती देऊन काही चमत्कार घडवतील का? हा उत्सुकतेचा विषय राहील. बंकीपूरचा विजय हा त्या दृष्टीने भविष्यातील बदलाची नांदी आहे का?

बिहारमध्ये नुकतेच सत्तांतर होऊन नितीश कुमार दिल्लीला राज्यसभेत गेले आणि भाजपचे सम्राट चौधरी बिहारचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनले. सम्राट चौधरींनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यावर झालेल्या पहिल्याच पोटनिवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.

अर्थात बंकीपूरचा पराभव भाजपसाठी अगदीच अनपेक्षित नसेल. भाजपने उमेदवार निवडीत घातलेला गोंधळ या पराभवाला प्रामुख्याने जबाबदार आहे. प्रथम ज्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले त्याला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले आणि त्या जागी दुसरा उमेदवार उभा केला गेला. पहिल्या उमेदवाराचे आई वडील चारा घोटाळ्यात दोषी ठरले होते हे उमेदवारी दिल्यानंतर लक्षात आले म्हणून त्याची उमेदवारी रद्द केली गेली. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. त्यातच प्रशांत किशोर यांना तुल्यबल लढत देईल असा उमेदवार भाजपकडे नव्हता. नितीन नवीन यांनी कार्यकर्त्यांची दुसरी फळी तयार केली नाही असा याचा अर्थ निघतो.प्रशांत किशोर यांच्यासारखा तगडा ब्राह्मण उमेदवार मिळाल्यावर भाजपची हक्काची उच्चवर्णीय मते त्यांच्याकडे वळली असण्याची शक्यता आहे. तसेच तरुणांनी सुद्धा प्रशांत किशोर यांच्यावर विश्वास दाखवलेला दिसतो.

मध्य प्रदेशमधील दतिया मतदारसंघात तर कहरच झाला. शिस्तबद्ध पक्ष या भाजपच्या प्रतिमेला पूर्णपणे काळिमा फासणारा घटनाक्रम येथे घडला. या मतदारसंघात २००८ पासून भाजपचे नरोत्तम मिश्रा हे बडे नेते निवडून येत असत. मात्र २०२३ च्या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या उमेदवाराने पराभव केला त्यावेळी मिश्रा राज्याचे गृहमंत्री होते. काँग्रेसच्या आमदाराची निवड रद्द ठरल्याने ही जागा रिकामी झाली. तेव्हापासून आपली उमेदवारी गृहित धरून मिश्रा हे तयारीला लागले. पण ऐन वेळी त्यांचे तिकीट कापण्यात आले आणि आशुतोष तिवारी यांना भाजपची उमेदवारी मिळाली. यावरून मिश्रा यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आणि त्यांनी हाय वे रोखून धरणे, टायर जाळणे, पोलिसांवर हल्ला करणे, दगडफेक करणे अशी हिंसक कृत्ये केली. नंतर पक्षश्रेष्टीनी तात्पुरता समेट घडवून आणला आणि मिश्रा यांनी तिवारी यांना पाठिंबा जाहीर केला. पण मिश्रा यांच्या दुखावलेल्या समर्थकांनी आशुतोष तिवारी यांना दगाफटका केलेला दिसतो.

बिहार व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांत भाजप सत्तेत असूनसुद्धा त्यांचा पराभव झाला. बांकीपूर व दतिया येथील पराभव भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. भाजप श्रेष्टीनी याची नोंद घेतली असेलच. भाजप आपल्या चुका दुरुस्त करण्यात तत्पर असतो. महाराष्ट्रात सुद्धा २०२३ मध्ये पुण्यातील कसबा या भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव झाला होता. मात्र त्यापासून योग्य तो बोध घेऊन चुकांची पुनरावृत्ती टाळण्यात आली आणि २०२४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ती जागा पुन्हा आपल्याकडे खेचून आणली. अशीच तत्परता बांकीपूर व दतिया या दोन मतदार संघात दाखवली जाईल व पुढच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही जागा भाजप जिंकेल, ही शक्यताही नाकारता येत नाही, मात्र पक्षात निर्माण झालेली बेशिस्त, अंतर्गत कलह व गटबाजी ही भाजपसाठी पराभवापेक्षा अधिक धोक्याची घंटा आहे हे खरे आहे.


raghunandan.bhagwat@gmail.com