– चंद्रकांत दडस
१० वर्षे देशाच्या राजकारणात साम, दाम, दंड, भेद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेच्या जाेरावर एकहाती वर्चस्व राखणारा भारतीय जनता पक्ष (भाजप) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर काहीसा बचावात्मक भूमिकेत म्हणजेच ‘बॅकफूट’वर आल्याचे चित्र सध्या देशभर आहे. २०१४ आणि २०१९ च्या लाटेनंतर २०२४ मध्ये बहुमतापासून दूर राहिलेला भाजप, २०२६ च्या उत्तरार्धात येत असताना राजकीय, संघटनात्मक आणि प्रशासकीय या तीनही आघाड्यांवर अभूतपूर्व कोंडीचा सामना करत आहे. विरोधकांचा आक्रमक पवित्रा, अंतर्गत कलह आणि सामान्य जनतेशी संबंधित मूलभूत मुद्द्यांमुळे देशभर पेटलेला आंदोलनांचा वणवा यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. भाजपच्या या पीछेहाटीची नेमकी कारणे काय असावीत?

सध्या भाजपच्या बॅकफूटवर जाण्यामागे सर्वात मोठे कारण ठरले आहे ते म्हणजे निवडणूक आयोगावरून देशभर सुरू असलेला गदारोळ. मतदार याद्यांची विशेष फेरतपासणी (एसआयआर) करताना देशभरातून १३ कोटी मतदारांची नावे वगळली गेल्याने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर विरोधकांनी (इंडिया आघाडी) संशय व्यक्त केला आहे. मतदार याद्यांमधील त्रुटी, एसआयआर प्रक्रियेत आपले नाव रद्द होण्याची मतदारांमध्ये निर्माण झालेली भीती आणि आयोगाच्या कार्यपद्धतीवर विरोधकांनी केलेले थेट हल्ले यामुळे सत्ताधारी पक्ष मोठ्या संकटात अडकला आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी तसेच क्रॉकोच जनता पार्टीने या मुद्द्यावरून देशव्यापी आंदोलने छेडल्यामुळे सरकारला स्पष्टीकरणे देत बचावात्मक पवित्रा घ्यावा लागत आहे. निवडणूक आयोगाविरोधात बोलत असताना भाजपने आयोगाची बाजू घेणे सामान्य जनतेला रुचत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात जर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर जावे लागले तर भाजपसमोर नव्याने मोठी संकटे तयार होणार असून त्यातून मार्ग कसा काढायचा हे भाजपच्या शिर्ष नेतृत्वाला अद्याप तरी उमगलेले दिसत नाही.

देशातील तरुण वर्ग हा एकेकाळी भाजपचा मोठा पाठीराखा मानला जात होता. मात्र, अलीकडच्या काळात परीक्षांमधील पेपरफुटीचे सत्र आणि रोजगाराच्या अपुऱ्या संधींमुळे तरुण रस्त्यावर उतरले आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान तरुणांनी काढलेले आक्रमक मोर्चे आणि त्यानंतरच्या दबावामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या ‘जेन झी’ आंदोलनाने भाजपच्या ‘सुशासन’ आणि ‘पारदर्शकते’च्या दाव्यांना मोठा धक्का दिला असून, युवकांमधील वाढता असंतोष पक्षाला बॅकफूटवर ढकलणारा ठरला आहे. शिक्षण घेऊनही जर रोजगार मिळत नाही, त्यातच सरकारकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे देशभरातील तरुणाई संतापलेली आहे.

भाजपची संघटनात्मक ताकद आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता याला अलीकडील काही पोटनिवडणुकांमध्ये मोठे तडे गेले आहेत. विशेषतः बिहार आणि मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल भाजपच्या चिंतेत भर घालणारे आहेत. भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांचा गड मानला जाणाऱ्या बांकीपूर मतदारसंघातील पराभवाने हे अधोरेखित केले की, भाजप आता मतदारांना गृहीत धरू शकत नाही. बालेकिल्ल्यांमधील या पराभवांनी विरोधकांचा आत्मविश्वास वाढवला आहे. उत्तर भारतासह अनेक राज्यांमध्ये येत्या वर्षात निवडणुका असून पक्षांतर्गत वाद आणि बंडखोरी रोखायची कशी यावर भाजपला उत्तर सापडलेले नाही.

गेल्या दशकात भाजपने राष्ट्रवाद आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यांवर निवडणुका जिंकल्या. मात्र, आता जनतेने पुन्हा एकदा शिक्षण, रोजगार, महागाई आणि रस्ते यांसारख्या मूलभूत मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने हेच मुद्दे लावून धरले जात असल्याने भाजपची कोंडी होत आहे. विचारधारेची जागा आता थेट जगण्याच्या संघर्षाने घेतल्यामुळे भाजपची रणनीती अपयशी ठरताना दिसत आहे. बँकेतील एफडीतून ७ टक्के परताव्याऐवाजी शेअर बाजारातून १० ते १५ टक्के परतावा मिळेल या आशेने अनेक सामान्य नागरिकांनी बँकेतील एफडी मोडून शेअर बाजारात गुंतवणूक केली. सरकारनेही या गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले. आणि आता मात्र शेअर बाजार जर वर्षभरात ११ टक्के नकारात्मक परतावा देत असेल तर आता पुढे काय करायचे या विवंचनेत गुंतवणूकदार आहेत. हे लालेलाल पोर्टफोलिओ तरुण मतदारांना भाजपपासून दूर नेत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत कितीही सकारात्मक आकडे सरकार जाहीर करत असले तर जमिनीवर परिस्थिती वेगळी आहे. त्यातून बाहेर कसे पडायचे याचे उत्तर अजूनही भाजपला मिळालेले नाही.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये अंतर्गत समन्वयाचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जदयूसह सरकार स्थापन करून वर्ष पूर्ण होत आले असतानाच, तिथली कायदा व सुव्यवस्था कोलमडल्याची टीका स्वतः भाजपच्याच नेत्यांकडून होत आहे. यामुळे पक्षांतर्गत गटबाजी आणि सत्तेतील अस्वस्थता चव्हाट्यावर आली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना थेट लक्ष्य केले आहे. समान नागरी कायद्यावरूनही एनडीएमध्ये मतभेद आहेत.

भाजपने देशभरात केलेल्या अफाट विस्तारामुळे पक्षाला ‘संघटनात्मक सूज’ आली आहे. इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना आणि नवीन भरती झालेल्या कार्यकर्त्यांना सत्तेत किंवा संघटनेत सामावून घेताना भाजपच्या निष्ठावान, जुन्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. पक्षाचा विस्तार इतका मोठा झाला आहे की, अंतर्गत संवाद आणि समन्वय राखणे नेतृत्वाला जड जात आहे, ज्यामुळे निर्णयप्रक्रियेत संथपणा आला आहे.

विरोधी पक्ष २०१४ ते २०२४ या काळात विखुरलेला होता, पण आता हे पक्ष कधी नव्हे इतके आक्रमक आणि संघटित झालेले दिसतात. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ आघाडीने संसदेत मतदारसंघांची फेररचना रोखलीच, पण रस्त्यावरही भाजपला घेरले आहे. विरोधकांकडे गमावण्यासारखे काही नसल्याने ते अधिक आक्रमक झाले आहेत, तर भाजपला प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागत आहे.

भाजप सध्या ज्या स्थितीत आहे, ते तात्पुरते अपयश नसून दीर्घकाळ सत्तेत राहिल्यामुळे आलेली ‘अँटी-इन्कम्बन्सी’ (सत्तेविरोधी लाट) आणि संघटनात्मक शिथिलता असू शकते. निवडणूक आयोग, शिक्षण व्यवस्था आणि प्रादेशिक अस्मिता या मुद्द्यांवर विरोधकांनी निर्माण केलेले कथन (नॅरेटिव्ह) खोडून काढण्यात भाजपची सध्याची संवाद यंत्रणा समाजमाध्यम प्रमुखांना बदलूनसुद्धा कमी पडत आहे. आगामी २०२७ च्या उत्तर प्रदेश, गुजरात सारख्या अत्यंत महत्त्वाच्या राज्य विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपला आपल्या डावपेचांत बदल करावा लागेल. केवळ विरोधकांवर आरोप करण्याऐवजी, जनतेच्या रोजगाराच्या, शिक्षणाच्या आणि सुशासनाच्या मूळ मुद्द्यांना भिडल्याशिवाय भाजपला या ‘बॅकफूट’वरून पुन्हा‘फ्रंटफूट’वर येणे सोपे असणार नाही, हेच सध्याचे राजकीय वास्तव आहे. ते नाकारणे परवडणार नाही याची कल्पना भाजपलाही असेलच.

chandrakant.dadas@expressindia.com