रोझालिंड ओ’हॅनलन
१९७९ सालच्या उत्तरार्धातलं जुन्या पुण्याच्या भवानी पेठेतलं एक लहानसं ऑफिस. अडचणीची जागा असली, तरी ऑफिसात भरपूर वर्दळ आहेच. खोलीभर टेबलांवर फायली, पुस्तिका, पॅंफ्लेटं आणि पोस्टरच्या प्रतींचे ढीग. सर्व वयोगटातल्या कष्टकरी माणसांची ये-जा चाललीय. त्यांच्या चेहऱ्यांवर आशा तर आहे, पण बहुतेकांच्या शरीरांवर कष्टांचे व्रण. ऑफिसच्या खिडकीबाहेर पसरलेल्या मार्केटचे आवाज नि वास ऑफिसची जागा भरून टाकतायत. हे दृश्य अर्थातच हमाल पंचायतीच्या ऑफिसचं, ज्याची स्थापना जुने जाणते सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी १९७२ मध्ये केली होती. त्यांच्या सहायकानं हाक मारल्यावर डॉ. आढाव खुद्द मला भेटायला बाहेर आले. भरपूर उंच नि शिडशिडीत बांधा, पांढरा शर्ट. गांभीर्याचे भाव आणि स्वागतशील स्मितहास्य त्यांच्या चेहऱ्यावर एकत्रच उमटले.

डॉ. आढावांच्या निधनाच्या बातमीनं मला त्या दिवसांमध्ये परत खेचून नेलं. मी अगदी नवशिकी नि तरुण पीएच. डी. ची विद्यार्थिनी होते. लंडनच्या स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीज्मधून आलेली. माझा विषय होता महात्मा जोतीराव फुले यांचं जीवन आणि विचार. मराठीचं ज्ञान अगदीच तुटपुंजं होतं. तरीही मला इंग्रजी भाषेतल्या सरकारी फायली आणि अधिकृत दफ्तरखान्यांच्या लंडन आणि मुंबईतल्या संग्रहांच्या पलीकडची संदर्भसाधनं शोधायची असोशी वाटत होती. मला ठाऊक होतं की सत्यशोधक समाजाच्या जुन्या चोपड्या आणि वृत्तपत्रांमधून या विषयासाठी मौल्यवान संदर्भसाधनं मिळू शकतात. फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विचार घडत असताना आणि समाजासाठी ते जनमत तयार करत असतानाच्या काळातली ही संदर्भसाधनं अगदी मोलाची ठरणार होती.

पण त्या काळी असं साहित्य मिळणं सोपं नव्हतं. लायब्रऱ्यांमध्ये अशा प्रकारच्या साधनांना सहसा जागा मिळत नसे. आणि एकूण सामाजिक इतिहासाच्या चौकटीत पाहिलं तर अनेक अभ्यासकांनाही ती फार महत्त्वाची वाटत नसत. पण पुण्यात आल्यावर मला तत्कालीन पुणे विद्यापीठातले सुप्रसिद्ध इतिहासकार डॉ. अ. रा. कुलकर्णी यांचं मार्गदर्शन मिळालं ही फार सुदैवाची गोष्ट ठरली. त्यांनीच मला भवानी पेठेतल्या डॉ. आढावांच्या ऑफिसात जाऊन याबाबतीत मदत मागायचा सल्ला दिला. संशोधक विद्यार्थिनी म्हणून मला मिळालेला तो एक उत्तम सल्ला होता. डॉ. आढावांनी माझ्या विनंतीपत्राला ताबडतोब प्रतिसाद दिला.

अर्थातच, मी तिथे गेले तेव्हा नक्की काय अपेक्षा ठेवावी हेच मला माहीत नव्हतं. डॉ. आढावांचं वर्दळीचं ऑफिस मी आजतागायत पाहिलेल्या एकाही संशोधनाच्या दफ्तरखान्यासारखं नव्हतं. आता मागे वळून पहाताना, अर्थातच मला समजलंय की मी तिथे खरंतर इतिहास घडताना पहात होते. अनेक तऱ्हांचे कष्टकरी डॉ. आढावांना भेटायच्या आशेनं ये जा करत असतानाच हमाल पंचायत आकार घेत होती आणि तिचा प्रभाव वाढत जात होता. साधारण शतकभरापूर्वी पुण्यातल्या जुन्या गंज पेठेत महात्मा फुल्यांच्या वाड्यात आलेल्या पाहुण्यालाही साधारण असंच दृश्य दिसलं असतं – शहरातले कष्टकरी, गरीब शेतकरी आणि समाजाच्या परिघावरल्या माणसांची मदतीसाठीची वर्दळ.

डॉ. आढावांच्या गजबजलेल्या ऑफिसावरून नजर फिरवल्यावर मला जरा शंकाच वाटली – त्यांना मला मदत करायला वेळ होईल का, त्यांच्याकडे असणाऱ्या ऐतिहासिक साधनांचा मी अभ्यास करायचा म्हटलं तर ते तयार होतील का, आणि मलादेखील तिथे बसून वाचायला एखादा कोपरा तरी मिळेल का? पण माझ्या कुशंका फोल ठरल्या. आमच्या बोलण्यातून मला लगेच कळलं, की त्यांनी इतक्या सगळ्या कामांमधून वेळ काढून एक खास संग्रह जमा केला होता – सत्यशोधक पुस्तकं, चोपड्या, काही पत्रं आणि हस्तलिखित आठवणीदेखील. इतकंच नाही, तर साधारण त्याच सुमारास त्यांनी ‘पुरोगामी सत्यशोधक’ नावाचं लढाऊ त्रैमासिक सुरू करायलाही मदत केली होती. या त्रैमासिकाच्या दर अंकाचा काही भाग या संग्रहातली जुनी आणि दुर्मिळ संदर्भसाधनं प्रकाशित करण्यासाठी राखून ठेवलेला असे.

ही सगळी अक्षरश: अनमोल कागदपत्रं डॉ. आढावांच्या ऑफिसातल्या पोलादी कपाटात सुरक्षित ठेवलेली असत. फार वेळ न दवडता माझ्यासाठी एक छोटं डेस्क कुठूनतरी आणलं गेलं, ही संदर्भसाधनं वाचताना मला मदत करायला आणि नंतर कपाट नीट कुलूपबंद करायला एक मदतनीस दिला गेला. पहिल्या दिवशीच दुपारपर्यंत मी माझ्या डेस्कवर बैठक मारून वाचायला सुरुवात देखील केली होती. डॉ. आढावांच्या संग्रहात मला कायकाय पहायला मिळालं ते पाहून मी थरारून गेले होते. माझ्यासाठी ही महदाश्चर्याची गोष्ट होती, की इतका कार्यमग्न आणि महत्त्वाची कामं करणारा माणूस असूनही, त्यांनी कसलीही कटकट न करता शांतपणे माझ्यासारख्या परदेशी संशोधिकेला मदत करायला वेळ काढला. त्यांच्या त्या ऑफिसात नोट्स काढत मी अगदी आनंदानं भरपूर वेळ दिला. आजपर्यंत प्रकाशित न झालेलं फुल्यांचं नाटकही मी शोधू शकले. डॉ. आढावांनी ते ‘पुरोगामी सत्यशोधका’त पहिल्यांदा प्रकाशित केलं. त्यांनी मला जी जी संदर्भसाधनं पुरवली, ती सगळी माझ्या पीएच. डी. प्रबंधासाठी आणि पुढे मी फुल्यांवर जे पुस्तक लिहिलं त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरली.

या सगळ्याला आता अर्थातच खूप काळ लोटला. या काळात डॉ. आढाव हे भारतभरातल्या लोकांसाठी प्रेरणादायी माणूस म्हणून माहीत झाले. त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिळवलेलं यश सर्वश्रुतच आहे. त्यांच्या निधनामुळे देशभर सगळ्या थरांतली माणसं व्यथित झाली आहेत. माझं नशीब जोरावर होतं म्हणूनच मी १९७९ साली माझ्या मार्गदर्शक प्रा. कुलकर्णी यांचा सल्ला घेऊन त्या भवानी पेठेतल्या लहानशा ऑफिसात गेले. मला तिथे अनमोल असा संशोधनसाधनांचा दफ्तरखाना तर मिळालाच, पण उबदारपणे केलेलं स्वागतही लाभलं. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे शतकभरापूर्वी महात्मा फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजातल्या सहकाऱ्यांमध्ये भरभरून असणारा जो बुद्धीचा ऊर्जस्वल प्रवाह आणि उत्साही सामाजिक कार्यकर्त्याची वृत्ती होती, ती मला डॉ. आढावांच्या ऑफिसात दिसली.

प्रोफेसर एमेरिटस- भारतीय इतिहास आणि संस्कृती
ऑक्सफर्ड विद्यापीठ
भाषांतर – श्रद्धा कुंभोजकर