भारत सरकारने ऑस्ट्रेलियन भारतीय समुदायाला राष्ट्रपिता महात्मा गांधींचा ४२६ किलो वजनाचा कांस्य पुतळा भेट दिला होता. या पुतळ्याचे अनावरण सव्वा चार वर्षापूर्वी १२ नोव्हेंबर २०२१ रोजी ऑस्ट्रेलियाचे तत्कालीन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी या अनावरणानंतर अवघ्या काही तासांत समाजकंटकांनी हा पुतळा तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला होता. आता गांधीजींच्या ७८ व्या स्मृतिदिनानंतर दोन दिवसांनी हा पुतळाच कापून घेण्यात आलेला आहे. लोखंड कापण्याचे यंत्र वापरून हा भव्य पुतळा तोंड झाकलेल्या भ्याड तीन अज्ञात चोरट्यांनी नेल्याचे तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियात भारत विरोधी कट्टरपंथीयांच्या कारवायांमध्ये वाढ होताना दिसते आहेच. अशातच झालेला हा प्रकार अतिशय निषेधार्ह आहे. गांधीजी हे गोळी झाडण्याने, कापण्याने, जाळण्याने , पुरण्याने मरत नसतात. पण अशा प्रकाराने ऑस्ट्रेलियात काय किंवा जगातील कोणत्याही देशात आणि खुद्द भारतामध्ये गांधीजींचा पुतळा, प्रतिमा यांच्यावर हल्ले करून गांधी विचार संपणार नाही. खुद्द भारतात १९३४ पासून गांधीजींचा खून करण्याचे अनेक प्रयत्न झाले होते. पण भारत स्वतंत्र झाल्यावर अवघ्या साडेपाच महिन्यांनी म्हणजे ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम विनायक गोडसे या अतिरेकी विकृताने दिल्लीतील बिर्ला भवनच्या परिसरात सार्वजनिक प्रार्थना स्थळाजवळ बंदुकीतून गोळ्या झाडून त्यांचा खून केला. विचाराला विचाराने उत्तर देता येत नसले की खुनशी विकृत खून करतात हे वास्तव आजही समोर दिसते आहेच. गांधीजी गोळी मारूनही मरत नाहीत तर पुतळ्याची विटंबना करून कसे काय संपणार आहेत ? २ ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिन संयुक्त राष्ट्रांच्या वतीने गेली अनेक वर्षे जागतिक अहिंसादिन म्हणून साजरा केला जातो. पाशवी सत्तेलाही आत्मिक बळाने जिंकणारे एक महान संत, राजकीय नेते म्हणून गांधीजींचे नाव इतिहासात हजारो वर्षे घेतले जाणार आहे यात शंका नाही. जगातले कोणीही राष्ट्रप्रमुख भारतात येतात तेव्हा गांधीजींच्या पुतळ्यासमोरच ते नतमस्तक होतात आणि जगातल्या बहुतांश देशात गांधीजींचेच पुतळे आहेत यातूनही गांधीजींची महानता अधोरेखित होते हे लक्षात घेतले पाहिजे.

गांधी आणि गांधीवादाचे महत्त्व कालातीत आहे. आपल्या राजकारणासाठी गांधीजींनी जे मार्ग अवलंबले होते ते सत्याचा आग्रह धरणारे होते. त्यांचा सत्याचा मार्ग अतिशय प्रभावी आणि भिन्न स्वरूपाचा होता. त्याद्वारे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला नवा मंत्र दिला. गांधीजींनी सत्य, अहिंसा, असंग्रह, अस्तेय (चोरी न करणे, नको असलेली वस्तू घेणे) अभय, स्वदेशी, स्पर्श भावना (अस्पृश्यता निवारण ) सर्वधर्मसमभाव, शरीरश्रम, आस्वाद (गरजेपुरते पण सकस अन्न ), ब्रह्मचर्य ( भोगविलास व इंद्रियांवर नियंत्रण) अशी एकादश सूत्रे सांगितली. गांधीजी सत्याबाबत ‘ईश्वर सत्य आहे’पासून ‘सत्य ही ईश्वर है’ या भूमिकेपर्यंत गेलेले होते. आणि त्यांचा अहिंसा विचार भ्याडाचा नव्हे तर पराक्रमी शूरत्वाचा होता. सत्याग्रहाच्या मार्गानेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषाविरोधी लढा जिंकलेला होता. १८९३ ते १९१५ या काळात गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये लढले. आणि १९१५ पासून देशाला स्वातंत्र्यमिळेपर्यंत ते भारतासाठी लढले. सर्वसामान्य माणसाच्या बाजूने गांधीजींनी ५५ वर्षे अखंड लढले. हा इतिहास गोळ्या झाडून, पुतळे फोडून, प्रतिमा जाळून नष्ट होणार नाही. कारण गांधी हे एका युगाचे नाव आहे.

गांधीजींच्या व्यक्तिमत्वाने आणि विचाराने अक्षरशः लाखो जणांना स्तिमित करून टाकले होते व टाकले आहे. गांधीविचार संपणे अशक्य आहेत. कारण मानवतावादाच्या प्रस्थापनेसाठीचा तो मूलभूत विचार आहे. गांधीजींना हयातीत व नंतरही एवढा अभूतपूर्व पाठिंबा त्यांच्या विधायक कार्यामुळेच हे शक्य झाले हे स्पष्ट होते. विधायक कार्यातून व्यापक जनसंपर्क या वचनाची येथे प्रचिती येते. शिवाय हे विधायक काम करताना त्यांच्या डोळ्यापुढे सातत्याने शोषित समाज होता. त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, ‘एखादे काम करणे योग्य की अयोग्य असा प्रश्न तुमच्या मनात येईल तेव्हा समाजातल्या सर्वात दुर्बल, वंचित, शोषित व्यक्तीला डोळ्यासमोर आणा. तिला त्या कामाचा फायदा होणार आहे की नुकसान याचा विचार करा. तिला फायदा होणार असे उत्तर आले तर ते काम करा, नाही तर करू नका.’

म्हणून तर अर्बर्ट आईन्स्टाईनसारख्या विश्वविख्यात शास्त्रज्ञाने म्हटले होते की, गांधीजींसारखी विभूती कधी पृथ्वीतलावावर सशरीर वावरत होती यावर विश्वास ठेवणे कदाचित पुढच्या पिढ्यांना अवघड जाईल. तर आचार्य विनोबा भावे यांनी म्हटले होते की, गांधीजी हे एक विरळा महापुरुष होते. प्राचीन परंपरांचे फळ आणि आधुनिक परंपरेचे बीज आम्हाला गांधीजींमध्ये मिळते. भूतकाळी महापुरुषांनी जे काही दिले त्याचे सार गांधीजींमध्ये आपल्याला मिळते. आणि भविष्यात होणाऱ्या महापुरुषांचे बीजही गांधीजींनी आम्हाला दिले. गांधीजींच्या जीवनात भूत आणि भविष्य यांचा संगम आहे.’

गांधीजी हे भारताचे राष्ट्रपिता तर आहेतच आहेत. पण त्याचबरोबर ते एक आदर्श राजकीय नेते, अतिशय सूक्ष्मदृष्टीचे समाजशास्त्रज्ञ, भारतीयच नव्हे तर वैश्विक दर्शनाचे चिकित्सक अभ्यासक, यंग इंडिया – नवजीवनसारखी वृत्तपत्रे काढणारे साक्षेपी संपादक, अव्वल दर्जाचे लेखक, वक्ते सर्वसामान्यांना आपले वाटेल आणि बघताक्षणी आपुलकी निर्माण होईल असे महामानव होते. खुनशी विचारधारेशीही प्रेमाने वागून त्यांच्यात मनपरिवर्तन करण्याची क्षमता बाळगून असणारे ते दुर्मिळ व्यक्तिमत्व होते. ज्या ब्रिटिश सत्तेला त्यांनी भारतामधून हाकलून दिले, त्या ब्रिटिशांच्या संसदेसमोर १४ मार्च २०१५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नऊ फूट उंचीचा पुतळा उभा केलेला आहे. त्यावेळी बोलताना ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून म्हणाले होते, ‘इतिहासातील एका सर्वश्रेष्ठ नेत्याला या पुतळ्याच्या माध्यमातून ब्रिटनने अभिवादन केले आहे.’

या सर्व पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींच्या पुतळ्याची केली गेलेली विटंबना अतिशय निषेधार्ह आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने गुन्हेगारांना तातडीने पकडून कठोर शिक्षा केली पाहिजे.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत. तसेच प्रबोधिनीच्या वतीने गेली सदतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. )

prasad.kulkarni65@gmail.com