कॅप्टन अशोक खरात या  ६७ वर्षीय भोंदू बाबाला पोलिसांनी बलात्काराच्या  प्रकरणात अटक केली, हे प्रकरण सध्या गाजते आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती, मंत्र तंत्र, ज्योतिषी या सगळ्या गोष्टींच्या बळावर अनेक महिलांना तो आपल्याकडे आकर्षित करायचा. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर बलात्कार करायचा. तो अनेक महिलांना त्याने ब्लॅकमेलिंग केले. त्याची एकंदरीत संपत्ती अंदाजे ५०० कोटीच्या वर असल्याचे सांगितले जाते. हे सगळे देवाधर्माच्या नावावर सुरू  होते. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओही आता यायला लागले आहेत. त्याच्याबरोबर अनेक बड्या बड्या नेते मंडळीचेही फोटो दिसत आहेत.विविध टीव्ही चॅनेल्सवरून ते दाखवले जात आहेत. आजचे आपले राजकारणी कशा प्रकारे अशा भोंदूगिरींला खतपाणी घालत आहेत, हेही त्यावरून दिसते. खरेच राजकीय कार्यकर्त्यांना किंवा पोलिसांना हे काय चालले आहे माहित नसेल ? अहो, जाळ असला की धूर निघतोच ना मग इथे का कुठूनच धूर  निघाला नाही? खरे तर हे सत्तेच्या दबावाखाली अशी अनेक प्रकरणे दाबली जातात म्हणूनच अशांची हिंमत वाढते. हे जे काही सगळं चालत आहे ते केवळ आणि केवळ देवाधर्माच्या नावाने. कारण त्यावरील विश्वासाने सामान्य माणसे चालतात आणि हे भोंदू त्यांचा गैरफायदा घेतात.  

 आज  शहरात, खेड्यात किंवा आदिवासी पाड्यावर  असे भोंदूबाबा पावलोपावली सापडत आहेत. अशा भोंदूबाबांविषयी किंवा धर्माच्या नावाखाली चाललेल्या भोंगळ कारभाराविषयी कोणीही बोलत नाही. कारण धर्माच्या आडून चाललेला अनैतिक व्यवहार, विषमता, भेदाभेद याविषयी कोणी आवाज उठवत असेल तर त्यालाही देशद्रोही ठरवले जाते.

आपल्या सरकारला सर्वसामान्य माणसांचे, सुशिक्षित बेरोजगारांचे, तरुणांचे, शेतकऱ्यांचे, स्त्रियांचे प्रश्न दिसत नाहीत ?. त्यांचे जीवनमान उंचावणे, त्यांच्या जीवनामध्ये वैज्ञानिकता निर्माण करावी असे अजिबात वाटत नाही? या सगळ्यांना अज्ञानात कसे ठेवता येईल याचा खटाटोप मात्र वेगवेगळ्या माध्यमातून केला जातो. आज देशात वेगवेगळ्या ठिकाणची मोठमोठी मंदिरे सुशोभित केली जात आहेत, कुंभमेळे घेतले जात आहेत, साधूसंतांना  बोलावून वृत्तपत्रातून, टीव्हीवरून जाहिराती देऊन त्यांचे मोठेपण सांगितले जात आहे. वेगवेगळ्या प्रकारची संमेलने घेऊन, कुठे वेगवेगळ्या प्रकारच्या बाबा, बुवा, महाराज यांना बोलवून लाखोंच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम घडवून आणले जात आहेत. अशा माणसांना धर्माच्या गर्दीत अडकवण्यासाठी छोट्या-मोठ्या बाबा बुवांची संख्या वाढताना दिसत आहे. ते भविष्य सांगण्याच्या माध्यमातून लोकांना  आकर्षित करत आहे. त्यातूनच खऱ्या अर्थाने विषमतेला, जातीयतेला, धर्मांधतेला, भ्रष्टाचाराला जोरदार खतपाणी मिळत आहे.

 आजचा सामान्य माणूस याच्या पलीकडे जाऊन विचार करण्यास असमर्थ ठरत आहे. भारतीय संविधानामध्ये कुणाला कोणताही धर्म स्वीकारता येईल हे सांगितले आहे. तरीही सरकारने धर्मांतर बंदीचा कायदा करून भारतीय संविधानाला धक्का दिला. म्हणे लव्ह जिहादच्या नावाखाली बळजबरीने धर्मांतर केले जात आहे. काही ठिकाणी तर वेगवेगळ्या धर्मातील मुला-मुलींना लग्न करण्यासाठी आई-वडिलांची परवानगी घ्यावी लागणार आहे. अनेक ठिकाणी तळागाळातील सर्वसामान्य माणसे हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्मात व बौद्ध धम्मात प्रवेश करताना दिसत आहेत. म्हणून असा कायदा केल्याचे म्हटले जात आहे. सरकारच्या अशा धोरणामुळे संविधानाचे तत्व बाजूला सारले गेले आहे.  एक माणूस दुसऱ्याकडे धर्माच्या, जातीयतेच्या आणि तुच्छतेच्याच नजरेने पाहताना दिसत आहे. धर्म वाढविण्याच्या दृष्टिकोनातून असे अनेक भोंदूगिरीचे, बाबा, बुवांचे प्रकार वाढताना दिसत आहेत. सर्वसामान्य माणसाला व भोळ्या भाबड्या माणसांना लुटताना आणि लुबाडताना दिसत आहे.

 कुंभमेळा आणि त्यातील साधू, संत, बाबा, बुवांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. त्यांच्यासाठी झाडे तोडली जातात. रस्ते बांधले जात आहेत. परंतु सर्वसामान्यांच्या मुलांसाठीच्या गावातल्या शाळा मात्र बंद केल्या जात आहे. आता तर अनेक महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शाळा, महाविद्यालयात शिक्षक, प्राध्यापक भरती केलेली नाही. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून सगळी शिक्षण व्यवस्था खिळखिळी करून टाकली आहे. याच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा म्हणजे अनुसूचित जाती – जमातीचा पैसा मतांसाठी लाडक्या बहिणीकडे वळवला जातो. पण शाळा महाविद्यालये सुधारली जात नाहीत. अनेक संशोधन केंद्रे बंद पाडली गेली आहेत. शाळा महाविद्यालयासाठी अनुदान देणे बंद केले गेले आहे. अनेक आरक्षणेही उडवून टाकली गेली आहेत. आरक्षणाच्या नावाखाली  जाती-जातीत भांडणे लावली जात आहे. शाळा शिकली तर मुलं ज्ञानी होतील. ज्ञानी झाली तर चांगले काय आणि वाईट काय हे त्यांना कळेल. शिक्षणामुळे त्यांच्या जीवनमानात बदल होईल. घर सुधारेल. पुढच्या पिढ्या समृद्ध होतील. अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, धर्म, जातीयता यापासून दूर राहतील. हे असे होऊ द्यायचे नाही म्हणून सरकार धर्माचे अवडंबर, जातीयता, भ्रष्टाचार, विषमता, भोंदूगिरी जाणून बुजून पसरवित आहे.  यातून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना हरताळ फासला जात आहे. या महापुरुषांनी कुठल्याही प्रकारची जातीयता, विषमता,धर्मांधता, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी -परंपरा पेरण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी तळागाळातील, कुठल्याही जाती धर्मातील माणूस सुधारला पाहिजे, घडला पाहिजे, शिकला पाहिजे, पुढे गेला पाहिजे यासाठी प्रयत्न केले. आज मात्र त्यांच्याच विचारांना, कार्याला, कर्तुत्वाला तिलांजली दिली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर केवळ अन् केवळ फक्त राजकारणासाठीच केला जातो. आज त्यांचे नाव घेऊन, त्यांची प्रतिमा ठेवून त्यांच्यासमोरच धर्मांधतेला आणि जातीयतेला खतपाणी घातले जाते.

महात्मा जोतिबा फुले यांनी बहुजनांसाठी शिक्षणाची दारे उघडून खूप मोठे परिवर्तन घडवून आणले. राजर्षी शाहू महाराजांनीही भेदाभेद आणि विषमता केली नाही.त्यांनाही याविषयी अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले होते. वेळप्रसंगी जीवघेण्या संकटांना सामोर जावे लागले होते. त्यांच्या दरबारात आलेल्या ज्योतिषालाही त्यांनी चांगलाच धडा शिकवलेला होता. ही गोष्ट सर्वश्रुत आहे. याविषयी शाहू महाराज म्हणतात की, सदगुणी कृत्याच्या गुणकारकतेवर विश्वास ठेवला पाहिजे. ज्योतिषशास्त्र ही एक लबाडी आहे. ज्योतिषशास्त्र हे स्वार्थी ब्राह्मणांनी निर्माण केलेले आहे. मनुष्याचे सर्वात मोठेपण चांगल्या कृत्यावरच अधिष्ठित असते. मूर्ती ही भटांचे वर्चस्व वाढवणारे एक साधन आहे. जातीभेद किंवा वर्णव्यवस्था ही एक लबाडी आहे. चार वर्ण हे निरनिराळ्या चार गुणांवर किंवा कृत्यावर आधारलेले होते असे म्हणतात. परंतु ब्राह्मणाला आपल्या कुटुंबीयांची किंवा आपल्या जातीतील लोकांची सेवा करावी लागत नाही काय ? प्रत्येक मनुष्य हा कमी अधिक प्रमाणात चारही वर्गात पडतो.” ( राजर्षी शाहू छत्रपती, धनंजय कीर,पृ.४७५ )
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही या धर्मव्यवस्थेमुळे आणि जातीव्यवस्थेमुळे जीवघेणे हाल सोसावे लागले. अनेक मरण यातना घेऊन तत्कालीन अस्पृश्य समाज जगत होता. हे केवळ फक्त धर्मामुळेच होत आहे हे डॉ. लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून बौद्ध धम्म स्वीकारला. ते  म्हणतात की, “हिंदू समाज हा एक जातीचा समूह आहे. हिंदूंच्या हानीचे मूळ जातीभेदात आहे. जात ही हिंदूच्या अवनतीचे कारण आहे. जातीव्यवस्था हिंदूंच्या अखंड पराभवास कारणीभूत झाली आहे. जातीभेदामुळे हिंदू हे हिंदुस्थानातील रोगट लोक ठरले आहेत. जाती व्यवस्थेने हिंदूच्या वंशाचा सत्यनास केला आहे. तरी हिंदू समाजाला नीती भ्रष्ट नि दुबळे करून ठेविले आहे. त्यांचे वाटोळे केले आहे. ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धनंजय कीर,पृ.२७९ )

अशाप्रकारे आज जे समाजातील वातावरण धर्माभोवती, हिंदुत्वाभोवती फिरताना दिसते त्याचा अशोक खरात सारखे लोक गैरफायदा घेताना दिसतात. अंधश्रद्धा पसरविताना दिसतात. माणसामाणसांमध्ये विषमता, जातीयता, भेदाभेद पसरविताना दिसतात. संत तुकाराम महाराज म्हणतात की,
ऐसे कैसे जाले भोंदू ।
कर्म करोनि म्हणति साधु ॥१॥
अंगी लावूनियां राख ।
डोळे झांकुनी करिती पाप ॥२॥
दावुनि वैराग्याची कळा ।
भोगी विषयांचा सोहळा ॥३॥
तुका म्हणे सांगों किती ।
जळो तयांची संगती ॥४॥
 
हे सर्व जाती धर्मातील माणसांनी विचारपूर्वक समजून घेणे महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधींनीही आपल्याला जनतेने निवडून दिलेले आहे हे ध्यानात ठेवून जनतेच्या कल्याणासाठी झगडणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक माणसाला धर्माचे आचरण करण्याचा अधिकार दिला आहे. परंतु तो धर्म कोणत्याही माणसाच्या हिताच्या आड येता कामा नये हेही लक्षात ठेवूनच कार्य करायला हवे.


मराठी विभाग प्रमुख,
कर्म.आ.मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालय,
पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे

dr.satish_maske@rediffmail.com