अवनीश पाटील
इतिहासलेखनाला नवी दिशा देणारे ज्येष्ठ इटालियन इतिहासकार कार्लो गिन्झबर्ग यांचे १७ जून २०२६ रोजी बोलोन्या येथे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. भूतकाळाकडे पाहण्याची नजर बदलून टाकणार्या या विचारवंताच्या योगदानाचे स्मरण.
गिन्झबर्ग हे विसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या क्षेत्रातलेे एक अत्यंत प्रभावशाली नाव मानले जाते. १९३९ मध्ये जन्मलेल्या इटलीतल्या या इतिहासकाराने इतिहास पाहण्याची आणि लिहिण्याची एक वेगळी रीत जगासमोर ठेवली. मोठ्या राजकीय घडामोडी, राजे, युद्धे आणि साम्राज्ये यांच्याभोवती फिरणार्या पारंपरिक इतिहासापासून त्यांनी आपली दिशा वळवली. सामान्य माणसांच्या जगण्यातून, त्यांच्या श्रद्धांमधून आणि त्यांच्या विचारांमधून भूतकाळ नव्याने उभा करता येतो, हे त्यांनी दाखवून दिले.
या प्रयत्नातूनच ‘सूक्ष्म इतिहास’ म्हणजेच मायक्रोहिस्ट्री या प्रवाहाला आकार मिळाला. गिन्झबर्ग यांचे सर्वाधिक गाजलेले पुस्तक ‘द चीज अँड द वर्म्स’ हे होय. यात त्यांनी मेनोक्यो नावाच्या सोळाव्या शतकातल्या एका साध्या पिठाच्या गिरणीवाल्याची कहाणी मांडली. विश्वाची उत्पत्ती दूध नासून तयार होणार्या चीजसारखी झाली आणि त्या चीजमधून किडे म्हणजेच देवदूत आणि माणसे जन्माला आली, असे विलक्षण मत मेनोक्योने धर्माधिकार्यांसमोर निर्भयपणे मांडले होते. या एकाच विधानाने गिन्झबर्ग यांचे कुतूहल जागवले.
इ्क्विवझिशन म्हणजे मध्ययुगापासून युरोपात कॅथलिक चर्चने धर्मद्रोह शोधून काढण्यासाठी आणि त्याला शिक्षा करण्यासाठी उभारलेली एक खास न्यायव्यवस्था होती. चर्चच्या मान्य शिकवणीविरुद्ध जाणार्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा देण्याचे काम ही यंत्रणा करत असे. अशाच एका इ्क्विवझिशनच्या खटल्याच्या कागदपत्रांतून त्यांनी मेनोक्योचे वाचन, त्याचे विचार आणि त्याच्या भावना यांचा सूक्ष्म मागोवा घेतला. एका सामान्य गिरणीवाल्याच्या मनातला हा विचारांचा गुंता प्रत्यक्षात त्या काळातल्या शेतकरी समाजाच्या मौखिक संस्कृतीचे प्रतिबिंब होता, असे त्यांनी सिद्ध केले.
या अभ्यासातून गिन्झबर्ग यांनी एक महत्त्वाची मांडणी पुढे आणली. उच्चवर्गीय किंवा अभिजन संस्कृती आणि सामान्य लोकांची संस्कृती या दोन वेगळ्या आणि एकमेकांपासून तुटलेल्या गोष्टी नाहीत. त्यांच्यामध्ये सतत देवाणघेवाण चालू असते आणि प्रभाव वरून खाली तसेच खालून वरही झिरपत राहतात. या परस्पर संबंधाला त्यांनी ‘सक्र्युलॅरिटी’ म्हणजेच ‘चक्राकारता’ असे नाव दिले. इंग्रजीतील या शब्दाचा अर्थ वर्तुळाकार गती असा होतो. ज्याप्रमाणे वर्तुळात कोणताही बिंदू सुरुवात किंवा शेवट नसतो आणि गती सतत फिरत राहते, त्याचप्रमाणे या दोन संस्कृतींमधले प्रभावही एका दिशेने न जाता वर्तुळासारखे फिरत राहतात, असे या शब्दातून सुचवायचे आहे. छपाई तंत्राचा विकास आणि धर्मसुधारणा या दोन घटनांमुळेच मेनोक्योसारख्या माणसाला बोलण्याचे धैर्य आणि शब्द मिळाले, हे त्यांचे निरीक्षण फार मार्मिक ठरते.
याआधीच्या ‘द नाइट बॅटल्स’ या ग्रंथातही त्यांची हीच दृष्टी दिसते. फ्रिऊली या इटलीतल्या एका दुर्गम प्रदेशातल्या ‘बेनान्दान्ती’ नावाच्या लोकांची गोष्ट त्यांनी यात सांगितली. हे लोक रात्री झोपेत आपला आत्मा शरीराबाहेर सोडून, बडीशेपेच्या काड्या घेऊन, चेटकिणींशी पिकांच्या भल्यासाठी लढतात अशी श्रद्धा होती. हा मुळात एक सुपीकतेचा कृषिविधी होता. पण इ्क्विवझिशनने त्यांना हळूहळू चेटूक करणारे ठरवले आणि अनेक दशकांच्या दबावानंतर या लोकांच्या जबान्यांचे स्वरूपही बदलत गेले. धर्मसत्तेच्या दडपणाखाली एका लोकश्रद्धेचे रूप कसे विकृत होत जाते, हे गिन्झबर्ग यांनी या खटल्यांच्या साखळीतून उलगडून दाखवले.
गिन्झबर्ग यांचे आणखी एक मोठे योगदान म्हणजे त्यांनी मांडलेला ‘सुगावा देणारा प्रमाणविचार’ होय. याचा सोपा अर्थ असा, की एखादी गोष्ट थेट दिसत नसेल, तर तिच्या मागे राहिलेल्या लहानसहान खुणांवरून ती ओळखता येते. जसा वैद्य रोग्याच्या लक्षणांवरून आजार ओळखतो किंवा शिकारी पावलांच्या ठशांवरून प्राण्याचा माग काढतो, तसाच इतिहासकारही उरलेल्या बारीक पुराव्यांवरून भूतकाळाचा वेध घेतो. प्रत्येक वेळी ठाम सिद्धता हाती लागतेच असे नाही, पण या खुणा जोडत जाऊन सत्याच्या जवळ पोहोचता येते, हीच या विचाराची मध्यवर्ती कल्पना आहे.
कला इतिहासकार जोव्हानी मोरेल्ली यांच्या पद्धतीचा आधार घेऊन त्यांनी हा विचार उभा केला. एखाद्या चित्राचा खरा चित्रकार ओळखायचा असेल, तर त्याच्या ठळक शैलीकडे न पाहता कानाची ठेवण किंवा नखांची रचना अशा बारीक तपशिलांकडे पाहावे लागते. अगदी अल्पशा खुणांमधून एक खोलवरचे, अन्यथा हाती न लागणारे वास्तव उमगते. हीच पद्धत वैद्यकशास्त्रात लक्षणे ओळखताना, मनोविश्लेषण करत असताना आणि शेरलॉक होम्ससारखा गुप्तहेर सुगावे जोडतो तेव्हा दिसते, असे त्यांनी दाखवले. यातून त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सुचवली. भौतिकशास्त्रासारखी सर्वसामान्य नियम सांगणारी ज्ञानशाखा आणि एका एका विशिष्ट गोष्टीचा वेध घेणारे ज्ञान या दोन वेगळ्या रीती आहेत. इतिहास हा दुसर्या प्रकारचा, म्हणजे व्यक्ती आणि विशेष यांचा अंदाजावर आधारलेला अभ्यास आहे.
गिन्झबर्ग यांच्या कार्यपद्धतीतला आणखी एक प्रभावी विचार म्हणजे ‘अपवादात्मक सामान्य’ ही संकल्पना होय. याचा अर्थ असा, की जे एखाद्या दृष्टीने अगदी असामान्य आणि दुर्मीळ वाटते, तेच दुसर्या दृष्टीने त्या काळातल्या अनेकांचे प्रातिनिधिक रूप असू शकते. एखादा माणूस किंवा एखादे कागदपत्र वरवर पाहता वेगळे आणि अपवादात्मक भासते, पण त्याच्या आडून त्या काळातल्या सामान्य लोकांचे न दिसणारे जग उघड होते. म्हणजे अपवादातच सामान्याचे दर्शन घडते, असा या कल्पनेचा आशय आहे. मूळ कल्पना इटालियन इतिहासकार एदुआर्दो ग्रेन्दी यांनी १९७७ साली एका लेखात सहजपणे सुचवली होती. पुढे गिन्झबर्ग आणि कार्लो पोनी यांनी तिला अधिक सखोल आणि स्पष्ट रूप दिले. वरवर परस्परविरोधी वाटणारा हा शब्दप्रयोग प्रत्यक्षात सूक्ष्म इतिहासाच्या पद्धतीचा गाभा सांगून जातो.
या संकल्पनेच्या मुळाशी एक साधा प्रश्न आहे. ज्यांनी स्वत:चे काहीच लिहून ठेवले नाही, अशा अशिक्षित शेतकरी, कारागीर, ्त्रिरया आणि दडपलेल्या लोकांचे अंतरंग इतिहासकाराला कळणार तरी कसे? कारण अशा लोकांनी स्वत: फार काही लिहून ठेवलेले नसते. आणि जे काही दफ्तरात उरलेले असते, ते बहुधा त्यांना दंड देणार्या न्यायालयांच्या आणि धर्मसत्तेच्या नजरेतून लिहिलेले असते. साधीसुधी, ठरावीक साच्यातली शेकडो कागदपत्रे चाळून पाहिली, तरी त्यांतून त्या लोकांचे मन कसे होते, ते जगाकडे कसे पाहत, कशावर श्रद्धा ठेवत आणि कशाची भीती बाळगत, या त्यांच्या अंतरंगाची नीट ओळख होणे कठीणच असते.
अशा वेळी एखादे विलक्षण आणि संख्यात्मक दृष्टीने अत्यंत दुर्मीळ कागदपत्र मात्र इतिहासकाराला अनपेक्षित खिडकी उघडून देते. मेनोक्योच्या खटल्याचे दफ्तर हे याचे समर्पक उदाहरण ठरते. मेनोक्योच्या विचारांची बेधडकता आणि धर्माधिकार्यांसमोरचा त्याचा स्पष्टवक्तेपणा हे दोन्ही त्या काळासाठी असामान्यच होते. पण नेमक्या याच असामान्यतेमुळे त्या काळातल्या शेतकरी संस्कृतीचे एक दडलेले रूप उघड झाले. एकाच साच्यातली, ठरावीक मजकूर असलेली आणि एकमेकांसारखीच भासणारी अशी हजारो कागदपत्रे एकीकडे, तर असे एखादे वेगळे आणि अपवादात्मक कागदपत्र दुसरीकडे ठेवले, तरी या एका कागदपत्रातून अधिक सत्य हाती लागू शकते, ही गिन्झबर्ग यांची मांडणी इथून पुढे आली.
गिन्झबर्ग स्वत: लिहितात, की मेनोक्योचे प्रकरण मर्यादित असले तरी ते प्रातिनिधिक ठरते, कारण त्यातून लोकसंस्कृतीच्या अशा शक्यता दिसतात ज्या एरवी फक्त तुटक आणि विकृत अशा ‘दमनाच्या दफ्तरां’मधून अंधुकपणे जाणवतात. इथे ‘दमनाची दफ्तरे’ म्हणजे सामान्य लोकांना दंड देणार्या आणि त्यांची श्रद्धा मोडून काढू पाहणार्या न्यायालयांनी व धर्मसत्तेने तयार केलेली कागदपत्रे. अशा नोंदी सत्ताधार्यांच्या नजरेतून लिहिलेल्या असल्याने त्यांत सामान्यांचे विचार मुळातच मोडकेतोडके आणि विपर्यस्त रूपात उतरलेले असतात.
म्हणजे जे एका अंगाने अपवाद वाटते, ते दुसर्या अंगाने त्या काळातल्या अनेकांच्या मनातल्या भावनांचे आणि विचारांचे प्रतिनिधित्व करते. मेनोक्यो हा एकटा बोलणारा माणूस होता, पण त्याच्या बोलण्यामागे त्याच्यासारख्या अनेकांचे न बोललेले विचार होते. अपवादातून सामान्य गवसते, आणि सामान्याचा शोध घ्यायचा असेल तर अपवादाकडे लक्ष द्यावे लागते, हा सूक्ष्म इतिहासाचा गाभा या संकल्पनेने अधिक पक्का केला. निरीक्षणाची पातळी लहान केली, की मोठ्या प्रमाणावर पाहताना अदृश्य राहणारे ताणतणाव आणि गुंते स्पष्ट दिसू लागतात, ही जोडदृष्टीही यातून पुढे आली.
गिन्झबर्ग यांनी इतिहासाच्या ज्ञानमूल्यासाठी ठाम भूमिका घेतली, हे त्यांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इतिहास म्हणजे केवळ एक प्रकारची कथनरचना आहे आणि सत्य व कल्पित यांच्यातली सीमारेषा पुसट आहे, असे मांडणारे उत्तराधुनिक विचार बळावले होते. या सापेक्षतावादाला गिन्झबर्ग यांनी निर्धाराने विरोध केला. कथनाच्या रूपाचे भान वाढले म्हणून इतिहासाची सत्य जाणण्याची ताकद कमी होत नाही, उलट ती अधिक तीव्र होते, असे त्यांनी प्रतिपादन केले. कादंबरीकार जसा एखाद्या गोष्टीचा वेध घेतो, तसाच इतिहासकारही वास्तवाचा शोध घेतो. पण म्हणून इतिहास आणि कल्पित यांची सरमिसळ करता येत नाही, ही त्यांची भूमिका शेवटपर्यंत कायम राहिली.
या संदर्भात त्यांनी ‘अंतर’ या संकल्पनेचे महत्त्व आवर्जून सांगितले. भूतकाळ आपल्या ओळखीचा वाटतो, तो आपल्यासारखाच आहे असे आपण गृहीत धरतो. पण भूतकाळातला माणूस आपल्याहून फार वेगळाही असतो. ही वेगळेपणाची, परकेपणाची जाणीव जपली, तरच आपण भूतकाळाकडे नीट पाहू शकतो. वास्तवाला, अगदी स्वत:लाही, गृहीत धरण्याच्या सवयीवर हे परकेपण एक उतारा ठरते. भावनिक जवळिकीपेक्षा बौद्धिक अंतर हे अधिक मोलाचे आहे, असा आग्रह त्यांनी धरला.
गिन्झबर्ग यांनी इतिहासाला नवे भान आणि नवी नजर दिली. भूतकाळातल्या सामान्य माणसाला त्यांनी इतिहासाच्या केंद्रस्थानी आणले. बारीक तपशिलांतून मोठ्या सत्यापर्यंत जाण्याची वाट त्यांनी दाखवली. अपवादाच्या आड लपलेले सामान्य शोधण्याचे भान त्यांनी इतिहासकारांना दिले. सत्याचा शोध हेच इतिहासाचे ध्येय आहे, या निष्ठेवर ते शेवटपर्यंत ठाम राहिले. त्यांच्या निधनाने एका विलक्षण प्रतिभावान इतिहासकाराला जग मुकले आहे. पण मेनोक्योच्या आवाजाला त्यांनी जसे शतकांच्या पडद्याआडून पुन्हा बोलते केले, तसेच त्यांचे विचारही येणार्या अनेक पिढ्यांच्या इतिहासकारांना सतत मार्गदर्शक ठरत राहतील. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.
प्रमुख, इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
avnishpatil@gmail.com
