प्रभा पुरोहित
माहिती आणि प्रसार तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे आजकाल देशाच्या कानाकोपऱ्यांत घडणाऱ्या गोष्टींना त्वरित प्रसिद्धी मिळते. त्याच्या प्रतिक्रिया सर्वदूर उमटतात. लैंगिक अत्याचार वाढले आहेत तसेच आज त्यांना वाढती आणि तात्काळ प्रसिद्धी मिळत आहे. पूर्वी जेता पराभूत पक्षाच्या मालमत्तेची लूट करीत असे त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार करणेही त्यातच मोडत असे. हे टाळण्यासाठी राजपूत स्त्रिया जोहार करीत अग्नीच्या स्वाधीन होत असत. अशा अत्याचारांच्या घटना फाळणीच्या वेळी दोन्ही बाजूंनी घडल्या. आज युद्धाचे स्वरूप बदलल्याने हे प्रकार कमी झाले आहेत. परंतु कुटुंबाची, समाजाची, जातपंचायतीची मान्यता असलेले अनेक लैंगिक अत्याचार सर्रास घडत असतात परंतु ते गुन्हा म्हणून गणले जात नाहीत व त्याची नोंद वा दखल घेतली जात नाही.
लैंगिक अत्याचारांची तीन प्रमुख कारणे आहेत. कुटुंबसंस्थेचा ऱ्हास, हे एक. पुरुषप्रधान संस्कृतीतील स्त्रियांचे दुय्यम स्थान हे त्यांच्यावरील अत्याचाराचे दुसरे कारण. तिसरे कारण समाजात असलेले लैगिक जीवनासंबंधीचे चुकीचे आकलन.
सामाजिक गुन्हेगारीत कुटुंबाची भूमिका महत्त्वाची असते. आई-वडील, भाऊ-बहीण व मुलगा- सून यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध लैंगिक गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवतात. आज बेटं होऊन राहिलेल्या माणसांच्या कुटुंबात असे नातेसंबंध उरलेले नाहीत. घरातील पुरुष बाहेर क्रूर लैंगिक अत्याचार करून आला असला तरी घरातील इतरांना त्याचा थांगपत्ताही नसतो. वाढत्या शहरीकरणाने कुटुंबसंस्था मोडकळीस आली आहे. नोकरी, शिक्षणासाठी पुरुष शहरात तर त्याचे कुटुंब गावी असते. ही परिस्थिती दोन्ही ठिकाणी लैंगिक अत्याचाराला चिथावणी देणारी ठरते.
लैंगिक अत्याचारांचे दुसरे कारण आपली पुरुषप्रधान संस्कृती. ही संस्कृती स्त्रीला कुटुंबात, समाजात दुय्यम स्थान देते. तिच्याकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जाते. कायद्याने स्त्रीला पैसे मिळविणे, संपत्ती निर्माण करणे, वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळविणे हे हक्क दिले असले तरी प्रत्यक्षात समाज आणि कुटुंबातील पुरुष त्याच्या आड येतात. त्याला विरोध करतात. त्यामुळे स्त्रियांमधे एकप्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. आणि त्यांच्यावर हिंसक अत्याचार करण्याची वृत्ती पुरुषांत बळावते. माध्यमांतील जाहिरातींमधून स्त्रीचे व लैंगिक संबंधांचे व्यापारीकरण होते. अविवाहित, परित्यक्ता, घटस्फोटित आणि विधवा स्त्रियांकडे समाज विकृत दृष्टीने बघतो. या गोष्टी लैंगिक अत्याचारांना प्रोत्साहन देतात.
लैंगिकतेबद्दल जनमानसात असलेले अपसमज लैंगिक अत्याचाराचे एक मोठे कारण आहे. लहापणापासून आयुष्यातील या महत्वाच्या गोष्टीबाबत मौन पाळले जाते. उघडपणे बोलायची चोरी असते. नीती-अनीतीच्या चुकीच्या संकल्पना माणसाच्या लैंगिक उर्मींचा कोंडमारा करतात. समाजातील मोठा वर्ग या नैसर्गिक अनुभवापासून वंचित रहातो आणि अनेक मानसिक विकृतींचा शिकार होतो. अशा विकृत मनोवृत्तीच्या माणसांकडून अघोरी लैंगिक अत्याचार घडतात.
लैंगिक अत्याचार कमी करण्यासाठी सहज सुचणारा आणि सोपा वाटणारा एक उपाय म्हणजे यासंबंधी कठोर कायदा करणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे. दुसरा उपाय या विषयी सामाजिक जाण निर्माण करून अत्याचारांविरोधात वातावरण आणणे. तिसरा सर्वांत कठीण परंतु सर्वांत परिणामकारक उपाय म्हणजे लैंगिकतेचे योग्य आकलन होण्यासाठी प्रबोधनाची मोठी मोहीम राबविणे. य़ा उपायांवर थोडे विस्ताराने बोलू या.
कायद्याचे भय थोड्याफार प्रमाणात गुन्हेगारीला आळा घालते. परंतु कायद्याबरोबरच त्यातील पळवाटा पण निर्माण होतात. भ्रष्ट शासन आणि भ्रष्ट न्यायव्यवस्था कायद्याला निष्प्रभ करतात. स्त्रीभ्रूणहत्या, हुंडा याविरोधात कायदे असूनही हे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे केवळ कडक कायद्यांमुळे लैंगिक अत्याचार बंद होतील अशा भ्रमात राहून चालणार नाही. लैंगिक गुन्ह्यांची प्रकरणे हाताळताना अधिक संवेदनाशीलता दाखविण्याची गरज आहे. असे झाले तरच अधिकाधिक महिला कायद्याचा मार्ग स्वीकारतील.
लैंगिक अत्याचार रोखणे ही समाजाने आपली जबाबदारी मानली पाहिजे. सामाजिक प्रश्नाबाबत समाजसहभागाची काही उदाहरणे महाराष्ट्रातील काही खेड्यांतून आढळून येतात. गावातील महिला एकत्र होऊन ‘आडवी बाटली’ला मत देऊन गावातील दारूची दुकाने बंद करण्यास शासनाला भाग पाडतात आणि गावातून दारूचे व्यसन हद्दपार होते. अशाच सामाजिक भानाने आज ‘संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान’ राबवून अनेक गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. जलसंवर्धनासाठी पाणी फौंडेशनला जनतेकडून उत्स्फूर्त सहकार्य मिळत आहे. अशी जागरूकता जर लैंगिक गुन्ह्यांबाबत दाखविली तर खास करून अल्पवयीन मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार मोठ्या प्रमाणावर टाळता येतील.
निसर्गाने मानवाला सुंदर शरीर आणि कामभावना बहाल केली आहे. परंतु कामजीवनाविषयीच्या आपल्या विकृत आकलनाने माणूस आज या निरामय आनंदास पारखा झाला आहे. लैंगिक अत्याचार करून नतद्रष्ट मानवाने या सहजसुंदर कामभावनेची पार वासलात लावली आहे. समुचित लोकशिक्षण हाच त्यावर प्रभावी उपाय आहे. ‘जेवण्यापूर्वी व प्रातर्विधीनंतर हात धुवा’ अशी मोहीम म्हणून आपण राष्ट्रीय दिन साजरा करतो. माध्यमातून त्याबाबत भडिमार करतो. उद्योजकांना त्यात सहभागी करून घेतो. मग लैंगिक व्यवहारासारख्या महत्वाच्या गोष्टीसंबंधी जोरदार प्रबोधन मोहीम नको का? असे प्रबोधन सर्वांसाठी हवे. शाळेतील- शाळेबाहेरील मुलांसाठी, वस्ती-वस्तीतून, ग्रामसभेतून झाले पाहिजे. लैंगिकतेचे मानसिक, शारिरीक, सामाजिक, सांस्कृतिक अशा चौफेर दृष्टिकोनातून योग्य आकलन करून त्यासंबंधी शिक्षणाचा आशय ठरविणे हे एक मोठे आव्हान आहे.
लैंगिक शिक्षणाचे प्रचलित प्रकार नीती-अनीतीच्या चुकीच्या कल्पनांनी, बुरसटलेल्या विचारांनी भरलेले आहेत. त्याला बुद्धिप्रामाण्यवादाचा पाया नाही. कामभावनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रह्मचर्य पालन करा, हनुमान चालीसाचा जप करा, घट्ट लंगोट वापरा, पायघोळ वस्त्रे वापरा वा वीरपुरुषांची चरित्रे वाचा असे हास्यास्पद उपाय सुचविले जातात. अत्यंत नैसर्गिक गोष्टीला स्वप्नदोष असे नाव देऊन त्याबद्दल पश्चातापाची भावना निर्माण केली जाते. किती रक्तापासून किती थेंब वीर्य तयार होते याची निरर्थक चर्चा केली जाते. हे भयानक शिक्षण घातक न्यूनगंड निर्माण करते आणि मनाला तृप्त आणि शरीराला सशक्त करणारे लैंगिक जीवन दूरच राहते.
मानवी लैंगिकतेविषयी लोकशिक्षणाचा आशय काय असावा या संबंधी विचार करताना या विषयाचा सर्वांगाने सखोल अभ्यास असलेल्या आणि त्यावर विपुल लेखन केलेल्या एका लोकविलक्षण बुद्धिवादी व्यक्तीची तीव्रतेने आठवण येते. ती व्यक्ती म्हणजे र. धो. कर्वे (१९२१ ते १९५४). स्त्रीलाही लैंगिक सुखाची भावना असते. अविवाहित, परित्यक्ता, विधवा, विधुर अशा समाजातील मोठ्या वर्गाच्या नैसर्गिक भावनांना अनीतीमान ठरविल्यामुळे लैंगिक अत्याचार वाढतात. ज्या संबंधातून रोग फैलावतो, मग तो भले दोन विवाहित व्यक्तींमध्ये का असेना त्याला अनीतिमान समजले पाहिजे, असे स्फोटक पण मौलिक विचार त्यांनी मांडले. लैंगिक शिक्षण म्हणजे केवळ शरीरविज्ञान अथवा लैंगिक संबंध नव्हे. त्यात लैंगिकतेविषयीचे आत्मभान, नैसर्गिक आकर्षण, एकमेकांबद्दल आदरभाव, आत्मसन्मान, स्वप्रतिमा असे अनेक मुद्दे येतात.
मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ येतात. आधुनिक काळातील लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रीपुरुष समानता या नव्यामूल्यांच्या संदर्भात परंपरेने चालत आलेल्या लैंगिक प्रथांचा पुनर्विचार करायला हवा. याबाबत संवेदनाशील करणारे साहित्य वाचकांपर्यंत नेणे गरजेचे आहे. प्रकाश संत यांच्या ‘शारदा संगीत’ व इतर ‘लंपन’च्या कथा, मिलिंद बोकील यांचे ‘शाळा’ या पुस्तकांतून लैंगिकतेच्या पहिल्या जाणिवांचा हळुवार आविष्कार दिसतो. तर ‘वाटेवरती काचा गं’ नाटकातून, सादत अली मंटोच्या ‘ठंडा गोश्त’ किंवा अशोक पवारांच्या ‘साधना’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘पण या कवितेवर कविताच लिहिता येत नाही…!’ अशा कथांमधून लैंगिक शोषणाचे विदारक चित्रण लैंगिक अत्याचाराबद्दल घृणा निर्माण करते. लैंगिक शिक्षण देताना हिंसा, मानवी व्यापार, ‘लव्ह जिहाद’ची ‘राजकीय’ चळवळ या गुन्हेगारी विश्वाची ओळख करून देणेही पण आवश्यक आहे.
ब्रह्मचर्यपालनाऐवजी सुरक्षित लैंगिक संबंध राखणे, मुला-मुलींना एकत्र शिक्षणाची संधी देणे, घरात वा घराबाहेर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास मुलांना शिकविणे. नकोशी वाटणारी,जबरदस्तीने घडणारी शारिरीक जवळीक, नकोसे स्पर्श यांना दमदार विरोध करण्याचे शिक्षण देणे या गोष्टी सहज शक्य आहेत ज्यामुळे लैंगिक अत्याचार टाळता येतील. लैंगिक अत्याचारांसारख्या सामाजिक प्रश्नांचे उत्तर शोधणे कठीण काम आहे. भौतिक शास्त्राप्रमाणे येथे नियंत्रित परिस्थितीत प्रयोग करणे शक्य नसते.
इतिहासातून व अन्यत्र असलेल्या परिस्थितीतून पडताळे घ्यावे लागतात. वर नमूद केलेला लैंगिकतेचा आणि नीती कल्पनांचा वेगळा विचार आदिवासी समाजात आढळून येतो. आदिवासींमध्ये योनीशुचितेला अवास्तव महत्व दिले जात नाही. ‘घोटूल’ या त्यांच्या समाजकेंद्रात तरुण, तरुणी एकत्र जमतात. तेथे पालकांना प्रवेश नसतो. सहमतीने होणाऱ्या शरीरसंबंधाला मान्यता असते. अशा संबंधातून होणाऱ्या मुलाला व आईला समाज स्वीकारतो. ती स्त्री त्या अथवा अन्य पुरुषाशी लग्न करू शकते. लग्नास घरातून विरोध झाल्यास गावकरी एकत्र येऊन मुलांना घर, संपत्तीचे हक्क मिळवून देतात. घोटूलमधे बहीण-भाऊ ह्यांचे शरीरसंबंध निषिद्ध मानले जातात. अशा या आदिवासी समाजात स्त्रीभ्रूणहत्या, विनयभंग, बलात्कार अशा गुन्ह्यांची फारशी उदाहरणे नाहीत. लैंगिक विकृती कमी आढळतात. अशी आदिवासी संस्कृती आता आपल्या नागरी संस्कृतीच्या अतिक्रमणाने झपाट्याने नष्ट होत आहे. परंतु आदिवासींच्या या ‘घोटूल’ प्रयोगातून आपण खूप काही शिकू शकतो.
स्त्री-पुरुष मुक्त संबंध पाश्चिमात्यांकडून आले असे मानणाऱ्या हिंदू संस्कृतिरक्षकांनी या आपल्या अत्यंत जबाबदार प्राचीन आदिवासी संस्कृतीकडे व प्राचीन ग्रंथांकडे बारकाईने पाहण्याची गरज आहे. सर्व नीतिमत्तेचा मक्ता आपल्यालाच दिला आहे, असे मानून एकत्र येऊन नाचगाण्याचा आनंद लुटणाऱ्या तरुण-तरुणींवर हल्ला करणाऱ्या आपल्या तथाकथित ‘नीती-रक्षकांना’ आवर घालावा लागेल. ज्या समाजात सहमतीने घडलेल्या शरीरसंबंधाची निरर्थक चिकित्सा न होता प्रत्येक माता-अर्भकास सुरक्षा मिळते तोच खऱ्या अर्थाने ‘प्रौढ समाज’ होय. अशा समाजात लैंगिक अत्याचार अभावानेच असतील.
