कोणत्याही पारंपरिक परीक्षेमध्ये उत्तरपत्रिका तपासणी ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिकेची तपासणी आधी परीक्षक, मग पर्यवेक्षक अशा टप्प्यांत केली जाते. मात्र, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रियाही आता ऑनलाइन करण्यात येऊ लागली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ अशा काही संस्थांनी उत्तरपत्रिका तपासणीत ऑनस्क्रीन मूल्यांकनाची पद्धत अवलंबली आहे.

विद्यापीठांच्या परीक्षांतील विद्यार्थ्यांची संख्या लाखांमध्ये असली, तरी राज्य मंडळे, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत विद्यापीठांचा विद्यार्थी टक्का कमीच आहे. ऑनस्क्रीन मूल्यांकनामुळे उत्तरपत्रिका तपासणीला मिळणारा वेग, निकाल लवकर जाहीर करणे शक्य असे काही फायदे आहेत. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच ‘सीबीएसई’ने इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेत ऑनस्क्रीन मूल्यांकनाचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऑनस्क्रीन मूल्यांकनामध्ये तंत्रज्ञानाचा जितका मोठा वाटा आहे, तितकेच उत्तरपत्रिका तपासणार्‍या शिक्षकांचेही योगदान मोठे आहे. त्यामुळे ऑनस्क्रीन मूल्यांकनाची प्रक्रिया राबविताना शिक्षकांसाठी प्रशिक्षण, अद्ययावत सुविधा उपलब्ध असणे महत्त्वाचे असते. ऑनस्क्रीन मूल्यांकनाचे फायदे आहेत, तशा अनेक मर्यादाही आहेत. पारंपरिक पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणी न करता थेट ऑनस्क्रीन मूल्यांकनाकडे जाणे हा फार महत्त्वाचा निर्णय होता. ‘सीबीएसई’ने ऑनस्क्रीन मूल्यांकनाबाबत शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात अनेक त्रुटी राहिल्या. परिणामी, शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीमध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावे लागल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यात तांत्रिक पायाभूत सुविधांपासून शिक्षकांच्या मानसिक अवस्थेपर्यंतच्या अडचणींचा समावेश होता.

ऑनस्क्रीन मूल्यांकनातील सहभाग असलेल्या बहुतांश शिक्षकांची तक्रार आहे, की उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग दर्जेदार नव्हते. स्कॅनिंग केलेल्या उत्तरपत्रिकांचे ‘रिझोल्यूशन’ कमी असल्याने विद्यार्थ्यांनी केलेले लेखन, आकृत्या अस्पष्ट दिसायच्या. त्यामुळे अधिक बारकाईने वाचावे, पाहावे लागत होते. त्यात वेळ जात होता. ‘‘सीबीएसई’ने ऑनस्क्रीन मूल्यांकनासाठी दिलेले प्रशिक्षण केवळ एका आठवड्याचे होते. या प्रशिक्षणाच्या जोरावर आम्ही संगणकावर वेगाने काम करावे, अशी अपेक्षा होती. मूल्यांकनाची ही पद्धत अत्यंत वैतागवाणी होती. विद्यार्थ्यांना गुणच देऊ नयेत असे कधी कधी वाटायचे,’ अशा शब्दांत पुण्यातील एका शिक्षकाने भावना व्यक्त केल्या.

सतत स्क्रीनकडे पाहण्यामुळे शारीरिक त्रास होत असल्याकडे एका शिक्षिकेने लक्ष वेधले. विशेषत: वयाची चाळिशी-पन्नाशी ओलांडलेल्या शिक्षकांसाठी ऑनस्क्रीन मूल्यांकन अधिक आव्हानात्मक होते. आधीच मोबाइलमुळे स्क्रीन टाइम वाढलेला आहे. त्यात आता ऑनस्क्रीन मूल्यांकनाची भर पडली आहे. सतत स्क्रीनकडे पाहणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळे कोरडे पडतात. त्यामुळे सतत विश्रांती घ्यावी लागते. ऑनस्क्रीन मूल्यांकनामुळे उत्तरपत्रिका तपासणीचा वेग वाढणे अपेक्षित असले, तरी प्रत्यक्षात ते शक्य नाही. काम सोपे होण्यापेक्षा ते अधिक थकवणारे, मानसिक दडपण निर्माण करणारे आहे, असे त्यांनी सांगितले.

ऑनस्क्रीन मूल्यांकन वाटते तितके सोपे नाही. कारण, निष्पक्ष आणि योग्य मूल्यांकन करणे ही केवळ शिक्षकांचीच जबाबदारी आहे. कोणतीही तांत्रिक चूक, विलंब किंवा चुकून झालेला क्लिक विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक ठरू शकतो. उत्तरपत्रिका तपासणीसाठी एकाग्रता महत्त्वाची असते. ऑनस्क्रीन मूल्यांकनामध्ये दिवसाला २०पेक्षा जास्त उत्तरपत्रिका तपासणे शक्यच होत नाही. या सगळ्यांचा ताण निर्माण होतो. शाळेच्याच संगणक प्रयोगशाळेत उत्तरपत्रिका तपासणी करावी लागत असल्याने अचानक मुख्याध्यापक, प्रशासनाकडून काही कामासाठी बोलावले जाणे, मधल्या सुटीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या शंका घेऊन येणे, अन्य वर्गांचे निकाल तयार करणे, तातडीच्या बैठकांना उपस्थित राहणे हेही होतच होते, ही बाबही एका शिक्षकाने निदर्शनास आणली. अस्पष्ट उत्तरपत्रिका, शिक्षकांना येणार्‍या अडचणींशिवाय तंत्रज्ञानाच्या अडचणीही होत्याच. इंटरनेटचा वेग मंदावणे, सर्व्हरला अडचणी येणे, उत्तरपत्रिका डाउनलोड होण्यास वेळ लागणे शिक्षकांसाठी त्रासदायक ठरत होते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कटकटी, अडचणी असताना केवळ उत्तरपत्रिकांच्या गुणांची बेरीज किंवा मोजणी बोटे मोडून करावी लागत नव्हती, हाच शिक्षकांसाठी एकमेव दिलासा होता.

ऑनस्क्रीन मूल्यांकनात अनेक शिक्षकांना अडचणी आल्या असल्या, काही शिक्षकांनी सुरळीतपणे ही प्रक्रिया पार पडली असली, तरी ऑनस्क्रीन मूल्यांकनामुळे झालेला गोंधळ हा काही पहिलाच प्रकार नाही. काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाने ऑनस्क्रीन मूल्यांकन लागू केल्यानंतर गोंधळाची स्थिती उद्भवली होती. त्यावरून झालेल्या टीकेनंतर तत्कालीन कुलगुरूंना राजीनामाही द्यावा लागला होता. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांशी संबंधित एक मोठा निर्णय घेताना ‘सीबीएसई’सारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने व्यापक पूर्वतयारी, सज्जता, दक्षता घेणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात, ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या या प्रक्रियेत परीक्षकांचीच परीक्षा घेतली गेल्याचे दिसून येते.

काही शिक्षकांचा सकारात्मकही प्रतिसाद

एकीकडे अनेक शिक्षकांना अडचणी येत असल्या, तरी विनाअडथळा, सुरळीतपणे ऑनस्क्रीन मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडलेले शिक्षकही आहेत. हे शिक्षक प्रामुख्याने शहरी भागांतील, खासगी शाळांतील आहेत. पुण्यातील व्हिबग्योर (बालेवाडी) शाळेच्या मुख्याध्यापक प्रियदर्शिनी माने म्हणाल्या, ‘आमच्या शाळेतील चार-पाच शिक्षकांनी ‘ओएसएम’चा वापर करून उत्तरपत्रिका तपासल्या. त्यांना यात अडचण आली नाही. करोनाकाळात ऑनलाइन तंत्रज्ञानाची बर्‍यापैकी सवय झाली होती. त्यामुळे ऑनलाइन मूल्यांकनाची मूलभूत माहिती होती. या प्रणालीमुळे शिक्षकांचे काम एरवीपेक्षा अधिक जलद आणि परिणामकारक झाले, असे शिक्षकांनी आम्हाला सांगितले. अर्थात, ‘सीबीएसई’ने आणखी तयारी करून ही प्रणाली लागू केली असती, तर देशभरातील ज्या शिक्षकांना या प्रणालीची माहिती नाही, त्यांंना फायदा झाला असता.’

तयारी कशी केली होती?

* सीबीएसई’ने ऑनस्क्रीन मूल्यांकनाबाबत केलेल्या तयारीची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार ऑनस्क्रीन मूल्यांकनाची संकल्पना ‘सीबीएसई’त २०१४ मध्येच मांडण्यात आली होती. त्या वेळी उत्तरपत्रिकेची पाने न फाडता ती स्कॅन करू शकणारे योग्य तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने पानांची सरमिसळ होण्याची भीती होती. त्यामुळे त्या वेळी ती संकल्पना प्रत्यक्षात आणता आली नाही. मात्र, कालांतराने या तंत्रज्ञानातील सुधारणांच्या अभ्यासासाठी संशोधन करण्यात आले. त्यात अनेक विद्यापीठे आणि परदेशी शिक्षण मंडळे या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करत असल्याचे ‘सीबीएसई’च्या निदर्शनास आले. त्यामुळे ‘सीबीएसई’च्या नियामक मंडळाने २०२५ मध्ये ऑनस्क्रीन मूल्यांकनास मंजुरी दिली. याबाबत सीबीएसईने संकेतस्थळावरील माहितीत केलेले दावे पुढीलप्रमाणे आहेत…

* शिक्षकांना ऑनस्क्रीन मूल्यांकनाची प्रणाली परिचित वाटावी म्हणून उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावरील प्रश्ननिहाय गुणांचे रकाने थेट ‘मार्किंग स्कीम’च्या नियमांशी जोडण्यात आले.

* प्रणालीची व्यवहार्यता तपासण्यासाठी पाच शाळांमध्ये दोन दिवस प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात आली. त्यात केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, खासगी शाळांच्या शिक्षकांना समाविष्ट करून घेण्यात आले. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.

* या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापकांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या प्रक्रियेतून प्रणालीमध्ये आवश्यक बदलांची माहिती ‘सीबीएसई’ला उपलब्ध झाली.

* सॉफ्टवेअर प्रणालीत आवश्यक असलेले बदल करून घेतल्यानंतर पुन्हा शिक्षकांचा अभिप्राय घेण्यात आला.

* देशभरातील शाळांना ऑनस्क्रीन मूल्यांकनासाठी आवश्यक पूर्वतयारीबाबतच्या सूचना ९ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या. शिक्षकांना वेबिनार, वैयक्तिक ऑनलाइन सत्रांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.

* प्रत्येकी पाच उत्तरपत्रिका तपासण्याचा सरावही करून घेण्यात आला. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील सर्व शिक्षकांसाठी पाच वेगवेगळ्या सत्रांत आभासी मूल्यांकन सराव आयोजित करण्यात आला होता.

* शंकानिरसनासाठी स्वतंत्र सत्रे घेण्यात आली. उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग अस्पष्ट असल्यास संबंधित उत्तरपत्रिका नाकारण्याची सुविधाही शिक्षकांना देण्यात आली होती.

chinmay.patankar@expressindia.com