पंडित रावजी पवळे
पाऊस आला की शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. आभाळ भरून आले की त्याच्या डोळ्यांसमोर हिरवेगार शिवार उभे राहते. पावसाच्या प्रत्येक सरीत त्याला आपल्या कष्टाचे सोने दिसते. पण गेल्या काही वर्षांत पावसाचे हे पारंपरिक गणितच बदलत चालले आहे. कधी पाऊस लांबतो, कधी अचानक मुसळधार बरसतो, तर कधी गरजेच्या वेळी दडी मारून पिकांची चिंता वाढवतो.
यंदाच्या खरीप हंगामातही महाराष्ट्राने पावसाच्या असमान वितरणाचा अनुभव घेतला आहे. २ सप्टेंबरपर्यंत राज्यात लक्ष्याच्या सुमारे ९५.१ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत पेरणीचे क्षेत्र कमी आहे. मका आणि कडधान्यांसारख्या काही पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे.म्हणजेच प्रश्न केवळ ‘पाऊस किती झाला?’ एवढाच राहिलेला नाही. पाऊस कुठे, केव्हा आणि किती झाला? हा शेतीच्या भवितव्याचा अधिक महत्त्वाचा प्रश्न बनला आहे.
शेतकरी हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेवून पेरणी करतो. बियाणे, खत, औषधे, मजुरी आणि मशागतीवर खर्च करतो. त्यानंतर आकाशाकडे डोळे लावून बसतो. पाऊस वेळेवर झाला तर पीक उभे राहते; पण पावसाने अचानक रूप बदलले तर महिन्यांची मेहनत काही तासांत मातीमोल होऊ शकते. अलीकडे अवकाळी पावसामुळे काही जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांसाठी भरपाई मंजूर करण्यात आली.तर काही ठिकाणी अत्यअल्प पावसामुळे पिकाची योग्य वाढच झाली नाही.एक प्रकारे तोही काही जिल्ह्यात दुष्काळच आहे.म्हणून त्यांना ही नुकसानभरपाई सरकार करणार का? या पिक-पाण्यार हजारो कुटुंबांचे स्वप्न, कर्जाचा भार, मुलांच्या शिक्षणाची चिंता आणि पुढच्या हंगामाची धडपड दडलेली आहे. पाऊस दोषी की आपले नियोजन?निसर्गाला आदेश देता येत नाही. पाऊस आपल्या सोयीने पडणार नाही. हवामानातील बदल पूर्णपणे थांबवणेही आपल्या हातात नाही. मग उपाय काय?
शेतकऱ्याला स्थानिक पातळीवर अधिक अचूक हवामानविषयक माहिती मिळाली पाहिजे. कोणत्या कालावधीत पाऊस अपेक्षित आहे, किती पाऊस होऊ शकतो, पिकाला त्याचा काय परिणाम होईल आणि अशा परिस्थितीत कोणती उपाययोजना करावी, याची माहिती वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय कृषी हवामान विभागाकडून स्थानिक हवामानाच्या आधारे कृषी सल्ला, ‘मेघदूत’सारख्या सेवा आणि शेतकऱ्यांसाठी हवामानाधारित मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते.
मात्र माहिती उपलब्ध असणे आणि ती शेतकऱ्याच्या मोबाईलपर्यंत, त्याच्या भाषेत आणि योग्य वेळी पोहोचणे, यात मोठा फरक आहे. प्रशासनाने ‘नुकसान’ नव्हे, ‘जोखीम’ मोजावी पाऊस झाला, पीक गेले, पंचनामा झाला आणि मग भरपाई- ही प्रक्रिया आवश्यक आहेच. परंतु ती पुरेशी नाही. प्रशासनाने आता आपत्ती आल्यानंतर मदत करण्यापेक्षा आपत्तीपूर्व नियोजनावर भर देण्याची गरज आहे.तालुकानिहाय हवामान जोखीम नकाशे तयार झाले पाहिजेत. कोणत्या गावात कोणते पीक अधिक धोकादायक आहे, कोणत्या भागात पाणी साचण्याची शक्यता आहे, कोणत्या पिकाला कमी कालावधीचे पर्याय आहेत, पाण्याचा निचरा कसा करायचा—याचे ग्रामपातळीवर नियोजन झाले पाहिजे.पिकांचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे आणि मदत यंत्रणा वेगाने काम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या नैसर्गिक आपत्ती मदत व्यवस्थेत पीक नुकसानीसाठी निश्चित निकषांनुसार मदतीची तरतूद आहे आणि पंचनाम्याच्या माध्यमातून नुकसान नोंदविण्याची प्रक्रिया आहे.
परंतु शेतकऱ्याला मदत वेळेत मिळाली तरच तिचा खरा अर्थ आहे.विमा, बाजारभाव आणि हवामान- तीनही प्रश्न एकत्र सोडवावे लागतील शेतीचा धोका केवळ पावसाचा नाही. पाऊस चांगला झाला तरी बाजारभाव कोसळला तर शेतकरी अडचणीत येतो. पीक चांगले आले तर भाव पडतो आणि पीक खराब झाले तर उत्पादन कमी होते.म्हणून शेतकऱ्याच्या सुरक्षिततेसाठी तीन गोष्टींचे एकत्रित नियोजन आवश्यक आहे- हवामानाचा अंदाज, पीक विमा आणि बाजारभावाची हमी. याशिवाय जलसंधारण, शेततळे, निचरा व्यवस्था, ठिबक सिंचन, पीक विविधीकरण आणि स्थानिक परिस्थितीनुसार पिकांची निवड याकडे गांभीर्याने पाहावे लागेल.
‘एकच पीक’ मानसिकता अयोग्य
हवामान बदलत असताना पारंपरिक पद्धतींना आधुनिक ज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. एकाच पिकावर संपूर्ण आर्थिक अवलंबित्व ठेवण्याऐवजी शेतकऱ्याने उपलब्ध पाणी, जमीन आणि बाजारपेठ लक्षात घेऊन पीक विविधीकरणाचा विचार केला पाहिजे. यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी अधिकारी आणि तज्ज्ञांनी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे. कार्यालयात बसून सूचना देण्यापेक्षा शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणारी यंत्रणा अधिक प्रभावी ठरेल. शेतकऱ्याला दया नको; सक्षम व्यवस्था हवी नुकसान झाले की शेतकऱ्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली जाते. मदतीच्या घोषणा होतात. पण शेतकऱ्याला कायम मदतीचा हात लागावा, ही परिस्थितीच बदलायला हवी.शेतकऱ्याला दया नको आहे; त्याला जोखीम व्यवस्थापनाची सक्षम व्यवस्था हवी आहे.
त्याला वेळेवर हवामान माहिती हवी. योग्य बियाणे हवे. पिकाचे संरक्षण करण्यासाठी तंत्रज्ञान हवे. नुकसान झाल्यास त्वरित पंचनामा हवा. विम्याची रक्कम वेळेवर हवी. आणि शेवटी त्याच्या मालाला उत्पादन खर्चापेक्षा समाधानकारक परतावा मिळाला पाहिजे.
प्रश्न पावसाचा नाही, तयारीचा आहे
पाऊस कमी पडला तर संकट; जास्त पडला तरी संकट- अशी परिस्थिती असेल तर केवळ निसर्गाला दोष देऊन चालणार नाही. निसर्ग अनिश्चित आहे; पण आपले नियोजन अनिश्चित असता कामा नये. आज गरज आहे ती हवामानाचा अंदाज आणि शेतीचे नियोजन यांना एकत्र आणण्याची. गरज आहे त्वरीत नदीजोड प्रकल्प राबवण्याची. गावागावात पाणी व्यवस्थापनाची नवी आखणी करण्याची. शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याची. प्रशासनाला अधिक संवेदनशील आणि तत्पर करण्याची.पावसाची प्रत्येक सर शेतकऱ्यासाठी संकट ठरू नये; ती संधी ठरावी, अशी व्यवस्था उभी करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही- तर कृषी क्षेत्राशी संबंधित प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे. कारण पाऊस आपल्या हातात नाही, पण पावसासाठीची तयारी आपल्या हातात आहे. निसर्ग बदलतोय; आता शेतीचे नियोजनही बदलले पाहिजे!
panditpawale@gmail.com
