हिंदी चित्रपटसृष्टीची लोकप्रियता समजून घ्यायची असेल, तर त्यात मुस्लीम कलाकारांच्या अफाट योगदानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शाहरुख खानपासून सोहा अली खानपर्यंतचे अभिनेते, इम्तियाज अलीसारखे दिग्दर्शक, जावेद अख्तरांपासून ए. आर. रहमान यांच्यापर्यंतचे गीतकार- संगीतकार आणि फरहान अख्तरसारखे निर्माते या सर्वांनी या उद्योगाला समृद्ध केले आहे. आधुनिक धर्मनिरपेक्ष संस्थांमध्ये, मुंबईच्या चित्रपटसृष्टीने मुस्लीम ओळख घडवण्यास एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीपासूनच मुस्लीम विचारवंत, कलाकार आणि निर्मात्यांनी या व्यवसायाला आणि त्याच्या कलामूल्यांना जोपासण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे या समुदायाला त्यांच्या सामाजिक- राजकीय संकटांवर आणि आकांक्षांवर चित्रपटामधून आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली.
ऐतिहासिकदृष्ट्या, मुख्य प्रवाहातील लोकप्रिय चित्रपट त्याच्या सर्वसमावेशक, लोकशाहीवादी मूल्यांसाठी ओळखले जात असत. त्यांनी मुस्लीम प्रश्नांना बारकाईने आणि सुसंस्कृतपणे हाताळले, समभावाचे विविध पैलू आणि पात्रे प्रेक्षकांसमोर आणली. परंतु गेल्या दोन दशकांत यामध्ये एक चिंताजनक बदल झाला. लोकप्रिय चित्रपटसृष्टी हळूहळू हिंदुत्ववादी राजकीय विचारसरणीच्या प्रभावाखाली आली. त्यामुळे मुस्लिमांना गुन्हेगार, दहशतवादी वा हिंसक प्रवृत्तीचे म्हणून रंगवणार्या संकुचित कथांचे प्रमाण वाढले आहे. हे चित्रण पूर्वीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे, जिथे मुस्लिमांना सहृदय व्यक्ती म्हणून दाखवले जात असे. या पार्श्वभूमीवर आशेचा किरणही दिसतो. इम्तियाज अली यांच्या नुकत्याच आलेल्या ‘मैं वापस आऊंगा’ला मिळालेले व्यावसायिक यश आणि मिळालेली दाद या चौकटीला छेद देणारी आहे. यामुळे बॉलीवूडची धर्मनिरपेक्ष ओळख पुन्हा एकदा पुनरुज्जीवित होईल व अशा राजकीय वर्चस्वाला आव्हान देईल, असा विश्वास निर्माण होतो.
मुघलकालीन वैभव ते शहरी वास्तव्य
हिंदी चित्रपटसृष्टीत मुस्लीम पात्रांना नेहमीच विविध जॉनर्सच्या (ॠील्ल१ी२) माध्यमातून स्थान मिळाले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात, ‘बैजू बावरा’, ‘अनारकली’ आणि ‘मुगल-ए-आझम’ यांसारख्या ‘ऐतिहासिक’ किंवा ‘कॉस्च्युम ड्रामा’ चित्रपटांनी मुघल साम्राज्याची भव्यता आणि मुस्लीम राजवटीचे वैभव मोठ्या पडद्यावर आणले. या चित्रपटांनी भारताच्या सांस्कृतिक वारशात इस्लामी संस्कृतीचे योगदान, तेथली समृद्ध वस्त्रभूषा, दागिने, शायरी, कव्वाली आणि सौंदर्यशास्त्र सादर केले. याद्वारे मुस्लिमांनी स्वत:ला भारतीय इतिहासाचा एक अभिमानास्पद आणि अविभाज्य भाग म्हणून लोकांसमोर उभे केले. या सादरीकरणामुळेच हिंदी चित्रपट एक धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक कलाप्रकार ठरू शकला.
दुसर्या बाजूला, मुस्लीम चित्रपट निर्मात्यांनी सिनेमात सामाजिक वास्तववाद आणण्यासाठी आणि समाजवादी मूल्यांचा प्रसार करण्यासाठी पुढाकार घेतला (मेहबूब खान यांचा ‘मदर इंडिया’ किंवा ख्वाजा अहमद अब्बास यांचा ‘शहर और सपने’ हे चित्रपट आठवून पाहा). याच काळात, शहरी भागातील बदलत्या सामाजिक- राजकीय परिस्थितीत मुस्लीम समुदायाला भेडसावणार्या चिंतांवरही संवेदनशीलपणे भाष्य करण्यात आले.
१९७०-८० च्या दशकात शहरी कामगार वर्गातील मुस्लिमांच्या संघर्षाची गाथा चित्रपटांतून मांडली गेली. उदाहरणार्थ, ‘गरम हवा’ या चित्रपटाने फाळणीनंतरच्या काळात मुस्लिमांना सुरक्षितता देण्यास अपयशी ठरलेले राज्यकर्ते, वाढते आर्थिक अध:पतन आणि सामाजिक विभाजनाची वास्तव मांडणी केली. ‘गमन’ या चित्रपटाने शहरी भागात स्थलांतरित कामगारांचे जगणे किती हलाखीचे असते, हे दाखवले; तर ‘सलीम लंगडे पे मत रो’ या चित्रपटाने मुंबईतील कामगारांचे सांप्रदायिकीकरण चव्हाट्यावर आणले. अशा चित्रपटांनी मुस्लिमांना केवळ ‘ऐतिहासिक नाटकांच्या’ चौकटीत न ठेवता, विस्थापित झालेले, आर्थिक संकटात सापडलेले आणि अलिप्ततेच्या भावनेशी संघर्ष करणारे एक क्लिष्ट वास्तव म्हणून प्रेक्षकांसमोर आणले.
तसेच ‘उमराव जान’, ‘निकाह’ आणि ‘बाजार’ यांसारख्या चित्रपटांनी मुस्लीम समाजातील पुरुषसत्ताक व्यवस्थेवर कडाडून टीका केली. महिलांची दयनीय स्थिती आणि त्यांचे दैनंदिन जीवन यावर या चित्रपटांनी प्रकाश टाकला. जरी या दशकांवर व्यावसायिक समीकरणे आणि स्टार संस्कृतीचे वर्चस्व असले, तरी पडद्यावर दिसणारी मुस्लीम पात्रे विविधता जपणारी आणि जातीय-सांप्रदायिक पूर्वग्रहांपासून दूर राहिली. मात्र, १९८० च्या दशकापर्यंत मुस्लीम पात्रांना हळूहळू कथेच्या परिघावर ढकलले गेले. कधी त्यांना एक निष्ठावान मित्र म्हणून, तर कधी ‘जंजीर’ चित्रपटातील प्राणच्या भूमिकेसारख्या ‘पठाण’ या साचेबद्ध पात्रापुरतेच मर्यादित ठेवले गेले.
नवीन सिनेमातील खलनायकीकरण
भारतीय राजकारणात १९९० च्या दशकाची सुरुवात होताना मोठे बदल झाले. बाबरी मशीद विध्वंसानंतर निर्माण झालेला तणाव आणि हिंदूंमधील धार्मिक चिंता या पार्श्वभूमीवर हिंदी चित्रपटांनी एक स्पष्ट हिंदू-मुस्लीम असा दुजाभाव करण्यास सुरुवात केली. जनमानसाला एकत्र आणण्यासाठी हिंदुत्ववादी अजेंडा राजकीय पातळीवर स्वीकारला जाऊ लागला आणि त्याचा थेट प्रभाव हिंदी चित्रपटसृष्टीवरही पडला. उजव्या विचारसरणीच्या राजकीय प्रचाराला पूरक ठरणार्या अनेक कथा बॉलीवूडमध्ये येऊ लागल्या.
जरी १९९० आणि २००० च्या दशकात ‘बॉम्बे’, ‘नसीम’, ‘जख्म’, ‘फिझा’ आणि ‘परजानिया’ यांसारख्या संवेदनशील चित्रपटांनी जातीय दंगलींच्या जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला असला, तरी हळूहळू या संवेदनशील प्रतिमेची जागा एका नवीन प्रकारच्या सिनेमाने घेतली. या नवीन सिनेमात मुस्लिमांना गुन्हेगार किंवा दहशतवादी म्हणून उघडपणे रंगवण्यात आले. मुस्लीम पुरुषांना पडद्यावर रूढीवादी पुरुषप्रधान वृत्तीचे (‘पिंजर’), मुंबईचे अंडरवर्ल्ड गँगस्टर (‘कंपनी’) किंवा दहशतवादी (‘सरफरोश’, ‘दिल से’) म्हणून सातत्याने खलनायक ठरवले जाऊ लागले. परिणामी लोकांच्या मनातील जातीय भीती आणि सांप्रदायिक पूर्वग्रह बळकट होऊन एक साचेबद्ध मुस्लीम प्रतिमा तयार होऊ लागली. अगदी धर्मनिरपेक्ष विचार मांडणारे चित्रपटही शेवटी दंगली, जातीय दुजाभाव आणि पाकिस्तानविरोधी विखाराभोवतीच फिरताना दिसले (उदा. ‘गदर : एक प्रेम कथा’). असे सादरीकरण एकच गोष्ट साधते ती म्हणजे- वाढत्या हिंदुत्ववादी राजकारणाच्या दबावाखाली येऊन मुस्लीम पात्रांच्या आणि त्यांच्या कथांच्या कक्षा संकुचित करणे. दुर्दैवाने, या प्रवाहात मुस्लिमांचे सामाजिक प्रश्न, वर्गसंघर्ष आणि आर्थिक आकांक्षांवर नीट भाष्य केले गेले नाही.
गेल्या एका दशकात हा ट्रेंड वेगाने वाढला. हिंदुत्ववादी विचारसरणीची वाढती सांस्कृतिक हुकूमशाही आणि राजकीय वर्चस्व यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीचे लोकशाहीवादी आणि चिकित्सक तेज झाकोळले गेले आहे. चित्रपटसृष्टी आता सत्ताधार्यांच्या राजकीय हितसंबंधांची पूर्तता करणारे माध्यम झाले आहे. यामध्ये ऐतिहासिक महाकाव्ये (‘पद्मावत’), ॲक्शन ब्लॉकबस्टर (‘धुरंधर’) आणि ‘द कश्मीर फाइल्स’सारख्या डॉक्यु-ड्रामांचा समावेश आहे. या माध्यमातून मुस्लीम ओळखीला आक्रमक, पुरुषप्रधान, रानटी किंवा दहशतवाद्यांशी जोडले जात आहे. एके काळी हिंदी चित्रपटसृष्टीच्या धर्मनिरपेक्षतेची साक्ष देणारी रचना आता नाहीशी झाली आहे. त्याऐवजी हिंदुत्ववादी राजकारणाच्या राजकीय हितसंबंधांना खतपाणी घालणार्या कथांनी संपूर्ण अवकाश व्यापून टाकला आहे.
भविष्याचा मार्ग आणि नैतिक जबाबदारी
आज सामाजिक सलोखा आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांवर प्रकाश टाकणार्या प्रभावी कथांचा दुष्काळ पडला आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रभाव आणि व्यावसायिक नफा मिळवण्याची लालसा यामुळे बॉलीवूड आज केवळ राजकीय प्रचाराचे एक साधन झाले आहे आणि त्याची सर्जनशील कलात्मक ओळख मागे पडली आहे. उत्तम चित्रपटाची खरी ताकद केवळ करमणूक करण्यात किंवा सत्ताधार्यांचे राजकीय हत्यार होण्यात नसते, तर पूर्वग्रहांना आव्हान देण्याची, अन्यायाला प्रश्न विचारण्याची आणि मानवी सहानुभूती वाढीस लावण्याची कलात्मक आणि नैतिक धमक दाखवण्यात असते. म्हणूनच, आजच्या या हिंदुत्ववादी सांस्कृतिक प्रभावाच्या काळात ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटाचे यश मनाला उभारी देणारे, एक सुखावणारे अपवाद ठरते.
समाजात दुभंगलेपण निर्माण करणारे आणि विशिष्ट समुदायाला लक्ष्य करणारे साचेबद्ध सिनेमे जरी तात्पुरता व्यावसायिक नफा किंवा राजकीय लाभ मिळवून देत असले, तरी ते सिनेमाला एखाद्या बोथट हत्याराचे स्वरूप देतात. हिंदी चित्रपटाला आपला समृद्ध, सर्जनशील आणि सर्वसमावेशक वारसा पुन्हा प्राप्त करायचा असेल, तर त्याला विभाजनाच्या सोप्या राजकारणापलीकडे जावे लागेल आणि सुसंस्कृतपणे कथा सांगण्याचे धाडस पुन्हा एकदा दाखवावे लागेल. केवळ करमणुकीच्या पलीकडे जाऊन मानवी मूल्यांची जपणूक करणारा जबाबदार सिनेमा हीच आजच्या काळाची सर्वांत मोठी गरज आहे.
हरीश एस. वानखेडे
‘जेएनयू’तील सहयोगी प्राध्यापक
enarish@gmail.com
