scorecardresearch

चतु:सूत्र : नेहरूंची ऐतिहासिक शोधयात्रा!

‘ग्लिम्प्सेस’मधून नेहरूंनी दाखवलेली जागतिक इतिहासाची झलक म्हणजे भविष्याकडे पाहण्याची मुक्तीदायी वाटच.

चतु:सूत्र : नेहरूंची ऐतिहासिक शोधयात्रा!

नेहरूवाद

श्रीरंजन आवटे

‘ग्लिम्प्सेस’मधून नेहरूंनी दाखवलेली जागतिक इतिहासाची झलक म्हणजे भविष्याकडे पाहण्याची मुक्तीदायी वाटच. देशातील सध्याच्या इतिहासाचं अस्मिताकेंद्री खोदकाम करण्याच्या वातावरणात कुणालाही इतकं निखळ राहता येईल?

उत्तर कोरियाच्या आक्रमणाच्या विरोधात लढा देऊन १९५० मध्ये दक्षिण कोरिया स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून लोकशाही आणि लष्करशाही या दोन्ही टोकांमध्ये दक्षिण कोरियाचा लंबक फिरत होता. शीतयुद्धाच्या चौकटीत ढोबळमानाने साम्यवाद विरुद्ध भांडवलवाद या प्रकारचा संघर्ष सुरू झाला. १९८३ साली यू. सी. मीन या साम्यवादी विचारांच्या कार्यकर्त्यांला दक्षिण कोरियाच्या सरकारने अटक केली. कामगार चळवळीच्या या नेत्यावर राष्ट्रद्रोही असल्याचा आरोप करण्यात आला. त्याने वर्षभरात जगभरातील साहित्य, राजकारण या संदर्भातील सुमारे १५० पुस्तकं वाचली. त्यात टॉलस्टॉय आणि दोस्तोवस्कीसारख्या श्रेष्ठ लेखकांच्या आणि क्रांतिकारी विचारांना प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे; मात्र दोन ‘विघातक’ (subversive) पुस्तकं वाचण्यापासून त्यांना रोखलं गेलं. त्यापैकी एका पुस्तकाचं नाव होतं- ‘ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’ !

पंडित नेहरूंचं हे पुस्तक प्रसिद्ध झालं १९३३ साली. सुमारे ५० वर्षांनंतर दक्षिण कोरियाच्या सरकारला ते घातक वाटलं. ‘इस्टर्न इकॉनॉमिक रिव्ह्यू’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाच्या १० जुलै १९८६च्या अंकात हा वृत्तांत आहे. योगायोग असा की नेहरूंनीही हे पुस्तक लिहिलं ते तुरुंगात असताना. इंदिरा या त्यांच्या तेरा वर्षांच्या मुलीला पत्रं लिहीत इतिहासाचा वेध घेण्याचा नेहरूंचा प्रयत्न रोचक आहे.

नेहरू इतिहासकार नव्हते. इतिहासकार असल्याचा त्यांनी दावाही केला नाही. त्यामुळं त्यांच्या लेखनात अकादमिक काटेकोरपणा आढळत नाही. ‘ग्लिम्प्सेस’मध्ये कोणतेही एक असे सूत्र नाही. साधारणपणे उत्पादन पद्धती, अर्थव्यवस्था, राजे, साम्राज्य, सभ्यता अशा विविध सूत्रांभोवती इतिहासलेखन केले जाते. नेहरूंच्या या पुस्तकात कोणतेही एकच एक असे सूत्र नाही आणि त्यामुळे शब्दश: हे पुस्तक म्हणजे ‘ग्लिम्प्सेस’ अर्थात जागतिक इतिहासाची झलक आहे.

नेहरू इतिहासकार नसले आणि त्यांचं लेखन अकादमिक प्रबंधाच्या चौकटीबाहेरचं असलं तरीही एक राजकारणी आणि स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेल्या नेत्याचं इतिहासाबाबतचं आकलन आणि अन्वयार्थ लावण्याची पद्धती समजावून घेणं महत्त्वाचं ठरतं. त्यांच्या काळातील नेत्यांना अपवादानेच अशा प्रकारचं भान असल्याचं दिसतं.

साम्राज्ये, राजे आणि त्यांच्या लढाया इतकाच इतिहास असू शकत नाही किंबहुना सामान्य माणसाचं जगणं कशा प्रकारचं होतं, ते कसं बदलत गेलं हे समजावून घेणं नेहरूंना महत्त्वाचं वाटतं. सभ्यतांचा आणि समाजाच्या विकसनाचा प्रवास एकमेकांपासून वेगळा आहे, असे ते मानत नाहीत; उलटपक्षी त्यांचा अन्योन्य संबंध आहे त्यामुळं एखाद्या समाजाला समजावून घ्यायचे तर इतर समाजांचा अभ्यास करणे अध्याहृत आहे. नेहरू स्वत:च म्हणतात त्याप्रमाणे अर्ध-मार्क्‍सवादी नि अर्ध-उदारमतवादी दृष्टीने त्यांनी इतिहासाकडे पाहिले आहे.

येथे नेहरू वेगवेगळय़ा सांस्कृतिक सभ्यतांच्या प्रवासाचा आलेख मांडतात. या सभ्यतांचा ऱ्हास का झाला, हा प्रश्न त्याच्या मुळाशी आहे. कुपमंडूक वृत्तीमुळे या सभ्यतांचा ऱ्हास झाला असा निष्कर्ष काढत खुलं, उदार मन हे सांस्कृतिक सभ्यतांचं अस्तित्व टिकवू शकतं आणि मानवी प्रगतीत निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यास समर्थ ठरू शकतं, असा दावा ते करतात.

जगाच्या इतिहासाकडे नजर टाकताना नेहरू भारताला केंद्रस्थानी ठेवतात. त्यामुळं जगाच्या इतिहासात भारताला स्थानांकित करण्याचा हा प्रयत्न आहे आणि नंतर भारताची ‘डिस्कव्हरी’ आहेच. इतिहास म्हणजे केवळ गतकाळातील तपशिलांची एकत्रित जंत्री नव्हे. ऑगस्ट कॉम्ट म्हणतो तसं इतिहासात आपण मृत माणसांच्या जीवनकाळात जगत राहतो, भूतकाळातून शाश्वततेची एक जाण येते; पण तेच जगणं असू शकत नाही. वर्तमानातल्या घटनांचा भूतकाळातील संदर्भाशी अन्वय जोडल्याशिवाय इतिहासाला अर्थ नाही. नेहरूंची ही इतिहासविषयक धारणा ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्ये प्रतिबिंबित झाली आहे.

भविष्याची स्वप्नं पाहून त्या दिशेने झेपावता येत नाही तर त्यासाठी भूतकाळाचं सम्यक आकलन असणं जरुरीचं असतं. भारताला नव्या स्वप्नांच्या, भविष्याच्या दिशेने मार्गक्रमण करायचं असेल तर हा भूतकाळ समजावून घेतला पाहिजे, या जाणिवेने नेहरूंनी इतिहासविषयक लेखन केलेलं आहे.  इतिहासविषयक असं लेखन करणं ही नेहरूंची राजकीय कृती आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. 

भविष्याचं बांधकाम करण्याच्या दृष्टीने इतिहासाकडं पाहात असताना नेहरूंना तीन बाबी अधिक महत्त्वाच्या वाटल्या: लोकशाहीच्या अधिष्ठानावर आधारलेला समाज, सामाजिक एकोपा, एकतेच्या अखंड सांस्कृतिक सभ्यतेचा प्रवाह. या तिन्ही बाबी ऐतिहासिक परंपरेत शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हे करताना एच. जी. वेल्स यांचं ‘आउटलाइन ऑफ हिस्ट्री’ (१९२२) या पुस्तकाच्या प्रारूपाचा त्यांनी विचार केला.

प्राचीन भारतातील गावांमध्ये सशक्त लोकशाही अस्तित्वात होती. या सभ्यतेच्या प्रवासात वेगवेगळय़ा धर्म, परंपरा आणि पंथांमध्ये संतुलन होतं, एकोपा होता आणि साधारण इ. स. १०८०च्या आसपास या संतुलनाचा आणि एकोप्याचा हळूहळू लोप झाला. हरप्पा काळापासून भारतीय सांस्कृतिक सभ्यतेच्या प्रवाहात एकता होती. असे अनेक मोठे दावे नेहरूंच्या मांडणीतून समोर येतात. रोमिला थापर आणि डी. डी. कोसंबी यांसारख्या प्रख्यात इतिहासकारांनी विशेषत: प्राचीन इतिहासाबाबतच्या नेहरूंच्या या दाव्यांची चिकित्साही केली आहे.

पाश्चात्त्य/ युरोपीय इतिहासकारांच्या भारतीय सभ्यतेला मागास ठरवण्याच्या प्रकल्पाला नेहरू आव्हान देतात. जेम्स मिलने हिंदु कालखंड, मुस्लीम कालखंड आणि ब्रिटिश कालखंड अशी जी सरधोपट आणि पूर्णत: चुकीची मांडणी केली आहे तिला नेहरूंनी नकार दिला.

ब्रिटिशांपासून मुक्ती मिळवत राजकीय स्वातंत्र्य मिळवणं इतकंच आपलं उद्दिष्ट आहे, असं नेहरू मानत नाहीत. स्वातंत्र्योत्तर भारताच्या प्रवासाकरता इतिहासाचं सम्यक भान घडवणं हा त्यांच्या लेखनप्रपंचाचा उद्देश आहे. त्यामुळे इथं ते जागतिक इतिहासाकडे पाहताना भारतीय राष्ट्रवादाच्या चष्म्याचा वापर करतात आणि एक प्रकारे भारतीय राष्ट्रवाद कसा असेल, याचे सूचनही करतात.

भारतीय राष्ट्रवाद निव्वळ वसाहतवादाची प्रतिक्रिया असता कामा नये याकरता ऐतिहासिक भान घडवण्याचा ते प्रयत्न करतात. भारतीय राष्ट्रवादाच्या गुणात्मकतेसाठी त्यांचं हे ऐतिहासिक उत्खनन होतं. वसाहतवादाला नकार देऊन प्राचीन भारतीय परंपरेतील मुळं शोधताना ‘गौरवशाली’ वृथा अभिमानाची पुराणमतवादी आवृत्ती घातक ठरू शकते, याचीही त्यांना जाणीव होती आणि त्यामुळेच नेहरूंसाठी ही तारेवरची कसरत होती. भारतातील प्रगती, विकास याचे श्रेय वसाहतवादाला न देता ते औद्योगिक क्रांतीच्या वैश्विक परिमाणाकडे निर्देश करतात. पुढे तर ते यातून निर्माण झालेल्या साम्राज्यवादाची चिकित्सा करतात. लेनिनच्या मते, साम्राज्यवाद हे भांडवलशाहीचे टोक आहे तर नेहरूंची साम्राज्यवादाबाबतची अधिक व्यापक धारणा आहे. भांडवलवाद हे केवळ जागतिक बाजारपेठांसाठींच्या संघर्षांचे उत्पादित नाही तर उत्पादन व्यवस्थेतील असमान वितरण हादेखील महत्त्वाचा आयाम ते अधोरेखित करतात.     

नेहरूंनी जागतिक इतिहासावर टाकलेल्या प्रकाशझोतात लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका या दोन खंडांमधील मानवी सभ्यतेच्या प्रवासाविषयी लिहिलेले नाही. अर्थात त्या वेळी या खंडांमधल्या इतिहासाविषयी इंग्रजीमध्ये लेखन उपलब्ध नव्हतं. शिवाय नेहरू तुरुंगात असल्याने पुरेशा संदर्भसाहित्याचा अभावही होता. चीनचा इतिहास नेहरूंनी अवघ्या काही परिच्छेदात लिहिला आहे आणि आपल्याला इतक्या महत्त्वाच्या सभ्यतेविषयी पुरेशी माहिती नाही, याबाबत नेहरू खेद व्यक्त करतात.

हे सारं मांडत असताना नेहरूंच्या मनात अमुक एखाद्या सांस्कृतिक सभ्यतेचा अहंगंड, न्यूनगंड किंवा द्वेष नाही.  वेदांतापासून ते बौद्ध परंपरेपर्यंत आणि ग्रीक रोमन सभ्यतेपासून ते अरबी संस्कृतीपर्यंत असलेला नेहरूंच्या आस्थेचा मोठा परीघ दिसून येतो. म्हणून तर फ्रान्सची जोन ऑफ आर्क त्यांना प्रभावित करते नि इटलीचा गॅरीबाल्डी त्यांना आपला वाटतो. सम्राट अकबरात त्यांना एकोप्याची परंपरा दिसते तर झाशीच्या राणीत पराक्रमाची गाथा!

इतिहासाकडे मुक्तिदायी भविष्याची वाट असल्याप्रमाणे नेहरू पाहतात, मात्र त्यासाठी अस्मिताकेंद्री इतिहासाचं जोखड दूर करण्याची आवश्यकताही प्रतिपादित करतात. विंदा करंदीकर एका कवितेत म्हणतात त्याप्रमाणे इतिहासाचे अवजड ओझे फेकून देऊन पदस्थल केल्याशिवाय भविष्याची ओळ वाचता येणे अशक्य आहे. स्वप्निल भविष्याचं बांधकाम करताना नेहरू हेच सांगण्याचा प्रयत्न करत राहिले! 

त्यामुळे दक्षिण कोरियातल्या हुकूमशहांना नेहरूंचं पुस्तक ‘विघातक’ वाटू शकतं; पण आजच्या भारताच्या ‘टू मच डेमॉक्रसी’ असलेल्या वातावरणातसुद्धा नेहरू ‘धोकादायक’ वाटत असतील तर थोडा अधिक विचार करायला हरकत नाही. म्हणजे मग इतिहासाच्या या ‘डिस्कव्हरी’मधून हरवलेल्या भारताच्या ‘रिकव्हरी’ची आवश्यकता पटू शकेल.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chatusutra nehru historic expedition glimpses history global liberating ysh

ताज्या बातम्या