जयदेव रानडे
‘महासत्ता’ हा शब्दही न उच्चारता चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस क्षी जिनपिंग यांनी जागतिक आकांक्षा उघड केल्या; तसेच आदल्या एकाही नेत्याबद्दल उणा शब्द न काढताही मीच यांच्यापेक्षा चांगले काम करणार, तैवानचा ताबाही मीच मिळवून देणार, हे त्यांनी सूचित केले…

अर्थव्यवस्थेतील मंदी, वाढती बेरोजगारी आणि वाढत्या महागाईमुळे लोकांमध्ये असंतोष चीनमध्ये वाढत असतानाच, चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीसीपी)  स्थापनेचा १०५ वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी २९ जून ते १ जुलै या काळात संपूर्ण चीनमध्ये भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकंदर उत्सवी वातावरण पसरवून पक्षाची ओसरती लोकप्रियता सावरण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याचबरोबर पुढील वर्षीच्या उत्तरार्धात होणार्‍या (आणि क्षी जिनपिंग यांनाच चौथ्या कार्यकाळासाठी कायम ठेवण्याचा औपचारिक निर्णय घेऊ शकणार्‍या) २१ व्या पक्ष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर क्षी जिनपिंग यांची प्रतिमा अधिक बळकट करण्याचा उद्देश या उत्सवामागे होता, हे लपून राहिले नाही.

उलट, खुद्द जिनपिंग यांनी सुमारे चार हजार शब्दांच्या आणि सुमारे ४० मिनिटे चाललेल्या ‘महत्त्वपूर्ण’ भाषणातून सीसीपीच्या यशस्वी उपलब्धींचा पाढा वाचला. हे पक्षाचे यश म्हणून जिनपिंग यांनी जे सांगितले, त्यातील बहुतेक भाग अपेक्षेप्रमाणेच देशांतर्गत यशाबद्दल होता. शिवाय, आपल्या आजवरच्या कार्यकाळातही माओ झेडाँगपासूनची काही धोरणे कशी अबाधित आहेत, हे माओनंतरच्या आणि स्वत:च्या आधीच्या जिआंग झेमिन, हु जिन्ताव आदी प्रत्येक पक्ष-सरचिटणीसाचे नाव घेऊन, त्या-त्या नेत्याच्या योगदानाची स्तुती करत क्षी यांनी सांगितले. दारिद्र्य (ॲब्सोल्यूट पॉव्हर्टी)  चीनमधून आता हद्दपार झाल्याचा दावा क्षी यांनी केलाच, पण चिनी राष्ट्राला आजच्या विकसित पातळीवर नेण्यास विचारधारा आणि धोरणे यांच्यात ‘सीसीपी’ने राखलेले सातत्य कारणीभूत आहे, असे श्रेयदेखील त्यांनी दिले.

‘पीएलए’ अर्थात ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ या संयुक्त चिनी सेनादलांचा खास उल्लेख क्षी यांनी तैवानच्या संदर्भात केला. क्षी हे तैवानला ‘कळीचा मुद्दा’ म्हणून महत्त्व देतात, हेही या भाषणातून स्पष्ट झाले. मात्र सुरक्षेच्या बाबतीतही अंतिम श्रेय ‘सीसीपी’चेच आहे; एकेकाळी अंतर्गत आणि बाह्य दबावाखाली पिचलेल्या तसेच गरिबी आणि दौर्बल्य यांनी ग्रासलेल्या चीनचे ‘प्रचंड, ऐतिहासिक अवस्थांतर’ घडवून आणण्यात ‘सीसीपी’ने बजावलेली भूमिका ही ‘पाठीच्या कण्या’सारखी आहे, अशी भलामण क्षी यांनी केली.

चीनला २०४९ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे राष्ट्रीय ध्येय आम्ही गाठणारच, ‘चिनी राष्ट्राचा हा महान कायाकल्प कोणासही थांबवता येणार नाही’  याचा पुनरुच्चार क्षी यांनी जोरकसपणे केला. या प्रक्रियेत चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रांतिक सरचिटणीसांचेही योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, पक्षाची सदस्य संख्या गेल्या वर्षी १० कोटी होती ती यंदा १० लाखांनी वाढून १० कोटी १० लाख झालेली आहे, अशा शब्दांत त्यांनी या प्रत्येकाचे संपूर्ण सहकार्य आपल्याला हवे असल्याचे सूचित केले.

आपल्या पूर्वसुरी नेत्यांचा उल्लेख क्षी यांनी वारंवार केला आणि अत्यादरानेच केला. ‘चिनी कम्युनिस्टांनी राष्ट्राचा कायाकल्प सामूहिकपणेच घडवला असला तरी कॉमरेड माओ झेडाँग, डेंग शिआओपिंग, जिआंग झेमिन आणि हु जिंताव हे त्यात स्मरणीय योगदान देणारे प्रतिनिधी ठरतात’ यातून अप्रत्यक्षपणे सरचिटणीस पदाचे महत्त्व अधोरेखित करताना एकदा; मग ‘माओ झेडाँग, चाउ एन्लाय, लिउ शाओकी, शू डे, डेंग शिआओपिंग आणि चेन युन तसेच कॉमरेड जिआंग झेमिनसुद्धा’ अशा क्रमाने नावे घेऊन त्या सार्‍यांवर ‘नि:स्वार्थ राष्ट्रनिष्ठा राखणारे…’, ‘इतिहासाचे शिल्पकार, खरेखुरे नायक’ अशी स्तुतिसुमने उधळत दुसर्‍यांदा हा उल्लेख होणे स्वाभाविक. पण ‘माओ यांचा विचार हा मार्क्सवादाचे चिनीकरण आणि नूतनीकरणही करणारा होता’,  ‘द थिअरी ऑफ द थ्री रिप्रेझेन्ट्स’ (ढोबळमानाने- उत्पादक उद्योगांतून आर्थिक विकास, चिनी सांस्कृतिक अस्मितेचा उद्घोषण आणि बहुसंख्य चिनी समाजाचे हितरक्षण यांसाठी पक्षयंत्रणा राबवण्याची वैचारिक भूमिका) आणि विकासाबद्दलचा वैज्ञानिक दृष्टिकोन हे डेंग यांचे वैचारिक योगदान आहे असे सांगताना ‘नवयुगासाठी चिनी वळणाचाच समाजवाद हवा हा आग्रह मार्क्सवादाला समृद्ध आणि विकसित करणारा ठरतो’ यावर जिनपिंग यांचा भर होता.

जागतिक स्तरावर चीन आज अग्रगण्य राष्ट्र मानला जातो. या प्रगत भूमिकेचा उल्लेख करून क्षी यांनी नवीन जागतिक व्यवस्थेबाबतच्या आपल्या दृष्टिकोनाचा तपशील मांडताना आधारभूत तत्त्वांवर भर दिला ‘आम्ही मानवजातीसाठी ‘सामायिक भविष्य असलेल्या समुदाया’च्या निर्मितीला चालना देत आहोत आणि प्रमुख जागतिक आव्हाने सोडवण्यासाठी चिनी शहाणीव, उपाय व सामर्थ्य यांचे योगदान देत आहोत’ असे ते म्हणाले. 

‘महासत्ता’ हा शब्द क्षी यांच्या भाषणात कुठेही नव्हता, परंतु २०४९ पर्यंत चीनला ‘जागतिक स्तरावर अग्रणी प्रभाव असलेली एक प्रमुख शक्ती’ बनवण्याच्या उद्दिष्टाचा पाठपुरावा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला; याचा अर्थ असा की, चीन अमेरिकेच्या बरोबरीने उभा राहील किंवा कदाचित अमेरिकेस मागेही टाकेल. हे महासत्तापद मिळाल्यावर काय करणार, याचेही सूचक दिग्दर्शन या भाषणात होते. ते म्हणाले की, चीन ‘संपूर्ण मानवजातीच्या सामायिक मूल्यांना, तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांच्या एका नवीन प्रकाराच्या निर्मितीला प्रोत्साहन देईल; त्याचबरोबर जागतिक विकास, सुरक्षा, संस्कृती आणि प्रशासन यांविषयीच्या उपक्रमांच्या अंमलबजावणीला चालना देऊन जागतिक शांतता व विकासात अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल.’

पण या अमूर्त, दूरान्वित, ता्त्विवक विधानांपेक्षा अधिक तातडीचे  आणि इशारावजा ठरते ते क्षी यांचे तैवानविषयीचे म्हणणे. ते काहीसे अपेक्षितही होते. पक्षाच्या वर्धापनदिनी केलेल्या या भाषणात ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए) साठी स्वतंत्र परिच्छेद होता. जिनपिंग यांनी पुनरुच्चार केला की, ‘पीएलए’ ही सामर्थ्यवान असली पाहिजे आणि तिने राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यास सक्षम असलेच पाहिजे. ‘पीएलए’वर पक्षाचे पूर्ण वर्चस्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले – ‘‘पीएलए’ने नवीन युगात लष्कराला बळकट करण्याबाबतच्या पक्षाच्या विचारांची पूर्णपणे अंमलबजावणी केली पाहिजे’ तसेच ‘जागतिक दर्जाचे लष्कर म्हणून ‘पीएलए’ची उभारणी वेगवान करणे, राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाच्या हितांचे दृढतेने रक्षण करणे आणि जागतिक शांतता व विकासासाठी अधिक योगदान देणे’ या गोष्टी (पक्षानेही) साध्य केल्या पाहिजेत. तैवानच्या मुद्द्याला ‘कळीचा मुद्दा’ (कोअर इश्यू) म्हणून या भाषणात विशेष महत्त्व देण्यावर न थांबता, या मुद्द्याच्या निराकरणासाठी कालमर्यादेचे संकेत क्षी जिनपिंग यांनी दिलेले आहेत. ‘नवीन युगात तैवानचा प्रश्न सोडवण्याबाबतच्या पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणाची अंमलबजावणी केली गेली पाहिजे’ – असे ते म्हणाले आहेत.

तैवान हा चीनचाच भाग असल्याचे ‘सर्वसमावेशक’ धोरण तर पूर्वापार होतेच; मग आताच त्याच्या ‘अंमलबजावणी’चा तगादा वाढवणारे ‘नवीन युग’ ते कोणते? – हा प्रश्न याबाबत पडल्यास तो रास्तच. यातून क्षी यांना ‘आपल्या सध्याच्या (तिसर्‍या) कार्यकाळातच तैवान प्रश्न सोडवा’ असे सूचित करायचे होते का, ही शंका तज्ज्ञांना आल्यास तीही रास्त. कारण ३० जून रोजीच चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी अमेरिकी परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चेत स्पष्टोक्ती केली होती- ‘तैवानचा मुद्दा दूरगामी परिणाम घडवणारा आहे, (त्यामुळे) तैवान-संबंधीच्या घडामोडींबाबत अमेरिकेने काळजी घ्यावी, अशी आशा आम्हाला आहे’.

तैवानबद्दल फक्त बोलून चीन थांबणारा नाही, हे २९ जून रोजीच स्पष्ट झाले होते. त्या दिवशी, चिनी तटरक्षक दलाने ‘कायदा रक्षणासाठी नित्याची गस्त’ या नावाखाली तैवानच्या ताब्यातील किनमेन बेटाजवळ घिरट्या घातल्या होत्या. हे किनमेन बेट, चीनच्या मुख्य भूमीवरील फुजिआन समुद्रकिनार्‍यापासून अवघ्या तीन ते दहा किलोमीटरवर आहे.

‘सीसीपी’च्या वर्धापनदिनी अर्थातच पक्षाचे गोडवे गायले जाणार, इतिहासाची उजळणीही होणार… हे सारे तर क्षी जिनपिंग यांच्या यंदाच्या भाषणात होतेच. परंतु ‘जागतिक शांततेची उभारणी, वैश्विक विकासात योगदान आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची राखणदारी’ ही तीन कार्ये चीनचा कम्युनिस्ट पक्ष जोमाने करू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यातून जिनपिंग यांनी चीनची जागतिक महत्त्वाकांक्षाही उघड केली आहे. ‘या शतकाच्या मध्यापर्यंत आपण सर्वार्थाने आधुनिक समाजवादी राष्ट्र ठरणार आहोत आणि शतकभरातले आपले दुसरे ध्येयही साधणार आहोत… काळ कुणासाठी थांबत नसतो, इतिहास कुणाचीही वाट पाहात नसतो!’  हा या भाषणातला सूर जिनपिंग यांना या महत्त्वाकांक्षा- पूर्तीचे श्रेय हवेच आहे,  हे सूचित करण्यासाठी पुरेसा ठरतो! 

‘सेंटर फॉर चायना ॲनालिसिस ॲण्ड पॉलिसी’चे अध्यक्ष आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे माजी सदस्य