शकुंतला भालेराव, शहाजी गडहिरे

सफाई कामगारांना केवळ हातमोजे आणि मास्क दिले म्हणजे त्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची काळजी घेतली, असं यंत्रणांना वाटतं. पण मॅनहोल साफ करताना गुदमरून होणारे मृत्यू, अपघातांमुळे येणारं अपंगत्व सुरक्षिततेच्या उपाययोजना तोकड्या असल्याचं दर्शवतं. पंढरपूर म्हटलं की कोणाच्याही डोळ्यांपुढे भक्तिमय वातावरणच उभं राहतं, पण तिथे उसळणाऱ्या गर्दीतही स्वच्छता राखणाऱ्या सफाई कामगारांना कोणत्या दिव्यातून जावं लागतं, याविषयी…

पंढरपूर. सफाई कर्मचाऱ्यांची वस्ती. एका मीटिंगमध्ये १५-२० महिला आणि तेवढेच पुरुष. वाल्मीकी समाज. पुरुषांसमोर घुंघट ओढण्याची म्हणजे चेहरा दिसू नये, अशी परंपरा. लाल, गुलाबी, हिरव्या गर्द साड्यांमध्ये बसलेल्या त्या.

पुण्यातल्या येरवडा वस्तीत लहानपण गेल्याने या सगळ्या मला खूप जवळच्या वाटत होत्या. सरकारी नोकरी, खाऊन-पिऊन व्यवस्थित गुजराण करणारा हा समाज. असंच आजही वाटत होतं. सफाईच्या कामामुळे कोणते आजार होतात आणि आजारपणात उपचारासाठी कोणत्या सुविधा, विमा, योजना आहेत. यावर चर्चा सुरू झाली आणि वस्तुस्थितीची उकल होऊ लागली…

‘‘पयलं मैला डोक्यावर उचलत व्हते. मग ते टोपली संडास बंद झाल्यावर आमच्या माणसांना चेंबरचं काम दिलं. आन मग ह्यांना दारू पियाची आदत पडली. आता त्यांना चालता येत न्हाय. पाय सुजल्यात. लिवरचा प्राब्लेम हाय. आपरेशनचा खर्च पाच लाखांपर्यंत जातूया. व्याजावर पैसे आणून, कसातरी उपचार करतूया. औषधं आणायची, पाजायची आणि घरी ठेवायचं. दोन पोरं व्हती, दोन्ही पण गेली. एक बापाच्याच कामावर लागला व्हता. चेंबरमध्ये उतरायचा. दारूची नशा असल्याशिवाय चेंबरमध्ये काम करता येत न्हाय. फकस्त पाच वर्षं सर्व्हिस केली अन् दोनच वर्षं दारू पिली पोराने. चोविसाव्या वषात वारला. काय करू शकलो न्हाय.’’

हुंदक्यांचे आवंढे गिळत जया मावशी आपली करुण कहाणी सांगत होत्या. पंढरपूर शहरात गेल्या ३० वर्षांपासून सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहेत. अशातच दोन तरुण मुलांच्या मृत्यूचं दु:ख. नवरा आजारी. सुना नातवंडांची जबाबदारी. अशा भळभळत्या जखमा घेऊन संपूर्ण बळ एकवटून जया मावशी आयुष्य रेटत आहेत. आम्ही आरोग्य हक्क गटाचे कार्यकर्ते, कष्टकरी वंचित घटकांचे आरोग्यप्रश्न याविषयी माहिती घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या विविध शहरांत भटकत होतो. यावेळी पंढरपूरमधील ‘अखिल भारतीय सफाई मजदूर संघटने’च्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाली. त्यांचं जीवन पाहिल्यावर कोणाच्याही मनात या व्यवस्थेविषयी चीड निर्माण होईल.

राष्ट्रीय स्तरावरील सफाई कर्मचारी आंदोलनाच्या आकडेवारीनुसार भारतात २६ लाख कर्मचारी सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालयांची सफाई करतात. साडेसात लाखांपेक्षा जास्त कर्मचारी गटार-चेंबरमध्ये उतरून काम करतात. ३६ हजार लोक रेल्वे स्थानके हाताने साफ करतात. सतराशे साठ लोक तुंबलेली गटारे आणि मॅनहोल त्यात उतरून साफ करतात. अनेकदा त्यातील विषारी वायूंमुळे गुदमरून मरतात.

दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनाला लाखोंच्या संख्येत विठ्ठलभक्त पंढरीला जातात. हा अवर्णनीय सोहळा आपण सारेच अनुभवतो. परंतु या लाखोंच्या प्रातर्विधीचं नियोजन कसं होत असेल? मोठी वारी सोडली तर इतर छोट्या वारी या दर चार महिन्यांनी असतात.

जया मावशी सांगतात, वारीच्या वेळी एका सफाई कर्मचाऱ्याला एका वारीला दोन मास्क आणि एक जोड हातमोजे एवढंच मिळतं. तेदेखील व्हिडीओ काढतात म्हणून किंवा कुणी मंत्री आला तर. बाकी मग तसंच. हातानेच मैला साफ करा. हातानेच कचरा उचला. भारतात हाताने मैला साफ करणे ही कायद्याने बंदी घातलेली प्रथा आहे. तरीही लाखोंचा समूह जिथे जमा होतो, त्या ठिकाणी सफाई कामगारांना हे काम करावंच लागतं.

सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२५ मध्ये देशभरातील प्रमुख महानगरांमध्ये हाताने मैला साफ करणं, गटार आणि सेप्टिक टँकची हाताने साफसफाई करण्याची धोकादायक पद्धत पूर्णपणे थांबवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या कुप्रथेचे पूर्णपणे निर्मूलन झालेले नाही.

हाताने मैला साफ करणे म्हणजे कोरड्या शौचालयांमधील किंवा गटारांमधील मानवी मलमूत्र स्वच्छ करणे, वाहून नेणे आणि त्याची विल्हेवाट लावणे. ही अमानुष प्रथा आहे आणि जातीच्या उतरंडीत तथाकथित सर्वात खालच्या दर्जाच्या लोकांवर ती लादली गेली. ही प्रथा केवळ भेदभावाचं एक प्रमुख कारण आहे.

पंढरपूरमधील सफाई कर्मचारी सीता गोयल सांगत होत्या,‘‘चेंबर साफ करताना त्यांच्या मुलाच्या पायाला चेंबरचं झाकण लागलं. त्यावर त्यांनी काही मूलभूत उपचार पंढरपूरच्या खासगी दवाखान्यात केले. इथे सरकारी दवाखानादेखील नाही. जखम वाढतच गेली. मग आजूबाजूच्या तालुक्यांतले खासगी दवाखाने, मग सोलापूर सिव्हील हॉस्पिटल, नंतर मुंबई आणि शेवटी सूरतला खासगी रुग्णालयात उपचार केले. तिथे शेवटी पाय कापावा लागला. आता मुलगा घरी बसून आहे. या सगळ्यामध्ये साडेतीन-चार लाखांवर कर्ज झालं. सावकाराकडून महिना १० टक्के व्याजाने कर्ज उचललं. महिन्याला २२-२३ हजार रुपये केवळ व्याज द्यावं लागतं. नगरपरिषदेकडून एक रुपया सुदिक मिळाला नाही.’’ असं त्या सतत बोलत राहिल्या. कोण जबाबदार आहे याला? का नाही मिळत त्यांना आवश्यक त्या आरोग्यसेवा? खरंतर या समूहाची विशेष काळजी घेतली पाहिजे.

भारतातील ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलच्या संकेतस्थळावर २०२१ मध्ये प्रकाशित, ऑर्की बंडोपाध्याय यांच्या ‘गटारांमुळे होणारे मृत्यू: कठोर वास्तव’ या अभ्यासानुसार, केवळ २०१९ मध्ये, देशाने उघड्यावर शौच थांबवण्यासाठी, ग्रामीण भागात घरोघरी शौचालये बांधण्यासाठी आणि गटार स्वच्छतेचे यांत्रिकीकरण करण्यासाठी देशव्यापी ‘स्वच्छ भारत अभियाना’चा विस्तार केला. या दरम्यान गटार आणि सेप्टिक टाक्या साफ करताना ११० लोकांचा मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षांत, हानीकारक वायूमुळे किंवा मॅनहोलमध्ये घसरून ३४० लोकांचा मृत्यू झाला. २०१३ ते २०१७ मध्ये दिल्ली महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, शहर परिसरातील सुमारे दोन हजार ४०० स्वच्छता कामगारांचा निवृत्तीचे वय गाठण्यापूर्वीच मृत्यू झाला. कारणे विष्ठेच्या संपर्कामुळे होणारा कॉलरा किंवा विविध आरोग्य समस्या ही आहेत. अनेकजण धोकादायक वायूंमुळे, ऑक्सिजनच्या अभावामुळे गुदमरतात.

हे असंख्य जीव नरकयातना भोगत कष्ट करत आहेत. सरकारी दवाखान्याची मागणी पूर्ण करण्यात यावी म्हणून आक्रोश करत आहेत. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, सोयी-सुविधा असाव्यात, यासाठी सतत आवाज उठवताहेत. चतुर्थ श्रेणी कामगारांसाठी आरोग्य योजनांमध्ये कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयएस) आणि ‘आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ या प्रमुख योजनांचा समावेश आहे. परंतु या कामगारांना आतापर्यंत ना याची माहिती दिली गेली, ना याचा लाभ मिळाला. मग अशा योजना केवळ कागदोपत्रीच राहणार का? कष्टकरी समूह कर्जबाजारी होऊन प्रसंगी उपचाराविना बळी पडणार का? याची जबाबदारी कुणावर? जयामावशींचा सवाल रास्त आहे. ‘‘निवृत्तीनंतर आमच्याच कष्टाचा पैसा पण सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवल्याशिवाय मिळत नाही. का? का तुम्ही आमच्याशी असं वागता? आज आम्ही जे काम करतो, ते तुम्ही एक दिवस तरी करून दाखवा, आम्ही घाटावर बसून भीक मागून तुम्हाला पैसे देऊ. पण एक दिवस तरी हे काम करा. तुम्ही नेहमीच आमचा उपयोग करून घेतलात, पण आमच्या वेळेला कधी तुम्ही मदत केली नाहीत. का? आम्ही पण माणसंच आहोत ना?’’ जयामावशींचा हा त्रागा नाही, तर एक सणसणीत चपराक आहे या समाजावर, या व्यवस्थेवर…

लेखक आरोग्य हक्क कार्यकर्ते आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

shaku25@gmail.com