अंगभूत अभिनयकला अभ्यासपूर्वक प्रयत्नांनी, चौफेर निरीक्षणशक्तीची जोड देत जोपासणाऱ्या, वाढवणाऱ्या आणि शून्यातून स्वत:चे विश्व उभारणाऱ्या दिग्गज प्रतिभावंतांपैकी एक म्हणजे विक्रम गोखले. घरात अभिनयाचा वारसा आहे म्हणून कोणतीही गोष्ट सहजतेने मिळावी इतकी अनुकूल परिस्थिती त्यांच्या आजूबाजूला नव्हती, किंबहुना तशी ती असती तरी घराणेशाहीचा फायदा घेण्याची त्यांची वृत्ती नव्हती. त्यामुळे चंद्रकांत गोखले या कसलेल्या अभिनेत्याचा मुलगा ही ओळख असतानाही मुंबईत येऊन अभिनय क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना अमाप संघर्ष करावा लागला. कोणाच्या तरी घरी झोपण्यापुरती जागा मिळवत दिवसभर टॅक्सी चालवण्यापासून, विवाह सोहळय़ांमध्ये आईस्क्रीमची भांडी विसळण्यापर्यंत मिळेल ती कामे त्यांनी केली. मात्र या अथक संघर्षांतून सोनेरी यश मिळवल्यानंतरही आपल्या गरिबीचे, संघर्षांचे उदात्तीकरण त्यांनी कधीही, कोणासमोर केले नाही. त्यांच्या संघर्षांऐवजी कायमच त्यांचा अभिनय, त्यांच्या नाटक-चित्रपटातील भूमिका, त्यांनी वेळोवेळी मांडलेल्या वैचारिक भूमिका याचसाठी ते कायम चर्चेत राहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विक्रम चंद्रकांत गोखले यांचा जन्म पुण्यातला. पुण्यातील भावे हायस्कूल आणि वि. र. वेलणकर हायस्कूल येथून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. तर, आताच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. अभिनय क्षेत्रातील त्यांचा प्रवेश हा बालकलाकार म्हणूनच झाला होता. ‘आग्य्राहून सुटका’, ‘राजसंन्यास’, ‘बेबंदशाही’ या नाटकांमधून त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले.  ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’  हे त्यांनी भूमिका केलेले पहिले व्यावसायिक नाटक होते. मात्र, खऱ्या अर्थाने ‘बॅरिस्टर’ या नाटकाने त्यांना चांगला नट म्हणून ओळख मिळवून दिली. ‘अपराध मीच केला’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘जास्वंदी’, ‘स्वामी’, ‘महासागर’, ‘जावई माझा भला’, ‘दुसरा सामना’ आदी नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clever actor acting with studious efforts among the geniuses vikram gokhale of acting ysh
First published on: 27-11-2022 at 00:02 IST