राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताची कामगिरी उत्साहवर्धक असली, तरीही दुसर्‍या फळीच्या स्पर्धांतील यशावर आपण किती काळ समाधान मानायचे, यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याचा काळ आला आहे…

स्कॉटलंड येथील ग्लासगोमध्ये नुकत्याच पार पडलेल्या २३ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी उत्साहवर्धक आहे. मात्र, ती नव्या खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी किंवा इथून पुढे होणार्‍या आशियाई आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या दृष्टीने किती पूरक ठरेल, याबाबत नक्कीच शंका आहे. सरकारकडून होणारे प्रयत्न आणि खेळाडूंची मेहनत प्रामाणिक असली, तरी खरंच राष्ट्रकुल स्पर्धेला जागतिक स्तरावर इतके महत्त्व आहे का, असा प्रश्न या स्पर्धेतील एकूणच कामगिरी आणि तिचे बदललेले स्वरूप पाहिल्यावर पडतो.

बदललेले स्वरूप आणि भारताला फटका

ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होताना भारताने या वेळी मैदानावरील आव्हानांबरोबरच व्यवस्थापकीय आणि आयोजनाच्या अभ्यासावरही विशेष लक्ष केंद्रित केले होते. याचे मुख्य कारण म्हणजे यापुढील २०३० मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात अहमदाबाद येथे आयोजित केली जाणार आहे. ते या स्पर्धांचे शताब्दी वर्ष असणार आहे. भारताचे एक व्यवस्थापकीय पथक या आयोजनाच्या अभ्यासासाठी ग्लासगोमध्ये मुक्कामी होते. प्रशासकीय पातळीवर या पथकाने सूक्ष्म अभ्यास केला असेलही, परंतु त्याबरोबरच आपल्या मैदानावरील कामगिरीवरही नजर टाकणे तितकेच गरजेचे आहे. मुळात, आर्थिक नियोजनाचे कारण पुढे करत यजमानांनी यावेळी खेळांची संख्या १९ वरून थेट १० वर आणली. त्यामुळे आधीच स्पर्धेतील मुख्य चुरस कमी झाली होती आणि भारताला या वगळलेल्या खेळांचा मोठा फटका बसला. बर्मिंगहॅम (२०२२) स्पर्धेत भारताने मिळवलेल्या ६१ पदकांपैकी २५ पदके ही हॉकी, बॅडमिंटन, क्रिकेट, कुस्ती व नेमबाजी यांसारख्या ग्लासगोत वगळलेल्या खेळांत मिळाली होती. या प्रतिकूल परिस्थितीतही भारताने मर्यादित खेळाडूंसह सहभाग नोंदवला. जिम्नॅस्टिक्स, सायकलिंग आणि लॉन बॉल्स या प्रकारांत भारताची पाटी कोरी राहिली असली, तरी ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, ज्युडो आणि वेटलिफ्टिंग या खेळांनी पदकांची संख्या उंचावत भारताला पदक तालिकेत मानाचे चौथे स्थान (३९ पदके) मिळवून दिले, हे कौतुकास्पद आहे.

उत्तेजकांचा वाढता विळखा

ही कामगिरी भारताच्या बदलत्या क्रीडा संस्कृतीची साक्ष नक्कीच आहे. जागतिक क्रीडा नकाशावर महासत्ता होण्याच्या दिशेने भारताने टाकलेले हे एक अतिशय सकारात्मक पाऊल असल्याचे गोडवेही गायले जातील. मात्र, हे यश जितके आनंददायी, तितकेच ते अंतर्मुख होण्यास भाग पाडणारे आहे. आपण आपल्या हुकमी खेळांच्या पलीकडे जात स्वत:ला सिद्ध केले असले, तरी खेळाडूंचा घसरणारा दर्जा आणि उत्तेजक सेवनाचा वाढता विळखा या आव्हानांचा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल.

ग्लासगो येथे स्पर्धेला सुरुवात होत असतानाच वेटलिफ्टिंग आणि ज्युडोतील आपल्या काही खेळाडूंना ऐनवेळी बाहेर बसावे लागले. ॲथलेटिक्समधील खेळाडूंच्या संख्येला आधीच कात्री लावण्यात आली होती. यामागे उत्तेजक चाचणी हे एकच मुख्य कारण होते. भारताने २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा येथे आयोजित करण्याचे स्वप्न बाळगले आहे, अशा वेळी झटपट यशाच्या मागे लागून अमली पदार्थांचा आधार घेणारे खेळाडू देशाचे पाय मागे ओढत आहेत. ऑलिम्पिकमध्ये नियमांची अत्यंत काटेकोर अंमलबजावणी केली जाते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती संबंधित देशाची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी आणि उत्तेजकमुक्त खेळाला सर्वोच्च प्राधान्य देते. अनेक जागतिक स्पर्धांमध्ये भारत पदकांच्या संख्येत दोन अंकी आकड्यात पोहोचण्याची किमया फार कमी वेळा करू शकला आहे. अलीकडे नेमबाजी, कुस्ती, तिरंदाजी यांसारख्या क्रीडा प्रकारांनी दिले आहे. अर्थात, ही कामगिरी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांपुरतीच मर्यादित राहते, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च व्यासपीठावर आपली मजल अजूनही हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच पदकांपर्यंत मर्यादित राहते, हे आपले दुर्दैव आहे.

ॲथलेटिक्समध्ये प्रगती, जलतरणात दुष्काळ

ॲथलेटिक्समध्ये अलीकडे आपल्या कामगिरीत सुधारणा झाली असली, तरीही आपली प्रगती सध्या तरी प्रामुख्याने ‘उडी’ आणि ‘फेक’ (जम्पिंग आणि थ्रोईंग) या प्रकारांपुरतीच मर्यादित आहे. साहजिकच ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा हा या सर्वांचे मुख्य प्रेरणास्थान आहे. त्यानंतर मुरली श्रीशंकर, प्रवीण चित्रवेल, सर्वेश कुशारे, यशवीर सिंग, तेजस्विन शंकर, सेल्वा प्रभू तिरुमारन आणि सीमा कालिरामन यांसारख्या खेळाडूंनी आपापल्या परीने पदकांची कमाई करत योगदान दिले आहे. ॲथलेटिक्समधील पदकांची संख्या वाढली, तरी धावण्याच्या प्रकारांमध्ये आपण आजही जागतिक स्तरावर कुठेच दिसत नाही; तिथे एकट्या गुलवीर सिंगने दोन पदकांची कमाई केली. मैदानावर घाम गाळून घेतलेल्या या मेहनतीचे फळ खेळाडूंना जरूर मिळाले; पण यातील चिंतेची बाब म्हणजे एकही स्पर्धक त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम किंवा राष्ट्रीय विक्रमी कामगिरीच्या आसपासही पोहोचू शकला नाही. स्पर्धा जिंकलेल्या अन्य देशांच्या पदकविजेत्यांबाबतही काहीसे असेच चित्र होते. ‘किमान कामगिरी’ करून पदक मिळवण्यासाठीच आपण या स्पर्धेत सहभागी व्हायचे का, हा महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे. जलतरणाबाबत तर बोलूच नये, अशी स्थिती आहे. गेली अनेक वर्षे या मुख्य खेळात आपला एकही खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर पदकापर्यंत पोहोचू शकला नाही. राष्ट्रकुलसारख्या स्पर्धेतही आपल्याला ते अद्याप शक्य झालेले नाही. भारताचा जलतरणातील शेवटचा आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडू कोण? हे आठवून सांगायचे म्हटले, तरी सर्वसामान्यांना घाम फुटेल, अशी आपली अवस्था आहे.

वेटलिफ्टिंग, ज्युडो, बॉक्सिंगचे वास्तव

वेटलिफ्टिंगमध्ये कर्णम मल्लेश्वरीने सुरू केलेला ऐतिहासिक वारसा कुंजुराणी देवी आणि आता मीराबाई चानूपर्यंत यशस्वीपणे पोहोचला आहे. आता बिंद्याराणी देवी, हरजीत सिंग ही नवी नावेही पुढे येत आहेत. पुरुषांमध्ये ऋषिकांता सिंग, राजा मुथुपांडी, वल्लुरी अजय बाबू, लवप्रीत सिंग या खेळाडूंनी आपली चमक दाखवली. मात्र, खरंच या स्पर्धेत आपल्या खेळाडूंना तोडीस तोड आव्हान होते का? मीराबाई चानूने तर सुरुवातीलाच वजनाचा असा काही टप्पा निवडला की, पदक तालिकेतील अन्य दोन विजेते तिच्या आसपासही पोहोचू शकले नाहीत. मुख्य म्हणजे, ग्लासगोला येण्यापूर्वीच भारतात उत्तेजक सेवनाची (डोपिंगची) पाच प्रकरणे समोर आल्यामुळे वेटलिफ्टिंग संघाला मोठी कात्री लावण्यात आली होती. ही संख्या पाचपेक्षा जास्त झाली असती, तर आंतरराष्ट्रीय नियमांनुसार आपण या खेळाच्या पात्रतेतूनच बाद झालो असतो, ही मोठी शोकांतिका आहे. दुसरीकडे, ज्युडो या खेळात आपण आतापर्यंत जागतिक स्तरावर फारसे कुठेच नव्हतो; परंतु या वेळी थेट दोन सुवर्णपदकांपर्यंत मारलेली मजल थक्क करणारी आहे. अस्मिता डे आणि हर्ष शहा यांच्या या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. अर्थात, या यशामुळे आता त्यांची जबाबदारी वाढली असून, हे यश आगामी आशियाई आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये परावर्तित होणे आवश्यक आहे. बॉक्सिंगमधील भारताचे यश सुखावणारे असले, तरी स्पर्धेला जाताना माजी जगज्जेती मेरी कोम हिने व्यक्त केलेली खंत विसरता येणार नाही. राष्ट्रकुल स्पर्धेत जागतिक दर्जाचे सर्वोच्च बॉक्सर्स येत नसतानाही जर आपल्याला सुवर्णपदक मिळवणे कठीण जात असेल, तर आशियाई स्पर्धेत हे आव्हान कित्येक पटीने कठीण असणार आहे, असा इशारा तिने दिला होता. सुदैवाने, मेरी कोमची ही खंत आपल्या महिला बॉक्सर्सनीच पदके जिंकून दूर केली आहे आणि देशाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. यातील काही खेळाडू विद्यमान जगज्जेत्या असल्याने, त्यांनी प्रतिस्पध्र्यांच्या दुसर्‍या फळीसमोर आपली लय आणि दर्जा उत्तम राखला. मात्र, आता खर्‍या आव्हानाचा सामना आशियाई स्पर्धेत होणार असून, खेळाडूंनी अशीच कामगिरी तिथेही करून दाखवावी, अशी रास्त अपेक्षा थेट बॉक्सिंग महासंघाकडूनच व्यक्त करण्यात आली आहे.

बक्षिसांपलीकडचा विचार हवा!

अशा या एकूणच दुसर्‍या फळीच्या स्पर्धांमधील यशावर आपण किती काळ समाधान मानायचे, यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याचा काळ आला आहे. या एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. आतापर्यंत या स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीकडे पाहिले, तर ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ अशीच काहीशी आपली स्थिती आहे. स्पर्धेत सहभागी व्हायचे, पदक मिळवून सरकारने जाहीर केलेली लाखो रुपयांची रोख पारितोषिके पदरात पाडून घ्यायची आणि शासकीय सेवेत मानाचे स्थान मिळवायचे, एवढेच काय ते खेळाडूंचे उद्दिष्ट होते की काय, अशी शंका घेण्यास वाव आहे. कारण, ग्लासगोतील यशानंतर मायदेशात परतलेल्या खेळाडूंचा गौरव करताना खुद्द केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी, ‘हे यश केवळ सरकारी नोकरी मिळविण्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यातून प्रेरणा घेत खेळाडूंनी देशात नवी पिढी घडवावी,’ असे थेट आणि स्पष्ट आवाहन केले आहे.

अखेर आणखी एका राष्ट्रकुल स्पर्धेची सांगता झाली आहे आणि आपण सध्या यशाच्या हिंदोळ्यावर झुलत आहोत. मात्र, भविष्यात या झुल्यावरून खाली कोसळायचे नसेल, तर हा झुला आशियाई आणि ऑलिम्पिकच्या आकाशात अधिक उंच उंच नेण्याची क्रीडा संघटना, सरकार आणि स्वत: खेळाडूंवर असलेली जबाबदारी वाढली आहे, हे नक्की!