स्पर्धा परीक्षांमधील यशाचा इतका जल्लोष करणे योग्य नाही... | competitive exams, students, MPSC, UPSC, jobs, political parties | Loksatta

स्पर्धा परीक्षांमधील यशाचा इतका जल्लोष करणे योग्य नाही…

यश साजरे करत असताना ‘सामाजिक भान’ तर सुटत नाही ना, याचे भान ठेवायला हवे.

स्पर्धा परीक्षांमधील यशाचा इतका जल्लोष करणे योग्य नाही…
स्पर्धा परीक्षांमधील यशाचा इतका जल्लोष करणे योग्य नाही…

पद्माकर कांबळे

नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणाऱ्या ‘विक्रीकर निरीक्षक’ (एसटीआय) पदाचा निकाल जाहीर झाला. स्पर्धा परीक्षांची तयारी पूर्ण करून यश संपादन करणाऱ्या उमेदवारांना, या यशाबद्दल आनंद होणे साहजिकच आहे; परंतु हे यश साजरे करत असताना ‘सामाजिक भान’ तर सुटत नाही ना; याचा विचार स्पर्धा परीक्षांची तयारी करून यश संपादन करणाऱ्या उमेदवारांनी ठेवले पाहिजे, असं सांगण्याची वेळ आली आहे. याला कारण, नुकताच एमपीएससीने जाहीर केलेल्या एसटीआय पदाच्या अंतिम निकालानंतर, पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी केलेला ‘जल्लोष’!

खरं तर ‘एसटीआय’ हे पद काही, वर्ग एकचे किंवा प्रशासकीय सेवेतील उच्च पद नाही. पण समाजमाध्यमातील ‘व्हॉट्सॲप’, ‘इन्स्टाग्राम’ आदींवरील ‘व्हायरल व्हिडीओ’ पाहिल्यावर तसेच वृत्तवाहिन्यांनी ज्या तऱ्हेने या निकालाच्या जल्लोषास प्रसिद्धी दिली हे पाहिल्यावर आपल्या एकंदर ‘सामाजिक जाणिवे’विषयी शंका उपस्थित होईल की काय अशी परिस्थिती आहे!

‘पुणे हे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नवे केंद्र’ हे चित्र वरवर फार चांगले दिसेल… आयआयटी- जेईईसारख्या प्रवेश परीक्षांसाठी राजस्थानातील कोटा शहराला जे महत्त्व आले किंवा दिल्लीच्या मुखर्जी नगराने पदोपदी यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेसाठी ‘कोचिंग क्लासेस’ चालवून जो लौकिक कमावला, तसा तो आता पुण्याला मिळतो आहे. महागडे कोचिंग, राज्यातील इतर भागातून पुणे शहरात येऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुला-मुलींची (उमेदवारांची) राहण्याची-जेवणाची सोय आणि यामागील ‘अर्थचक्र’ हा तर स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पुणे यासाठी उत्तम उदाहरण आहे.

स्पर्धा परीक्षेतील यश आवाक्यात आणल्याचा ‘भास’ हे क्लास निर्माण करतात, त्यासाठी आक्रमक जाहिराती केल्या जातात (‘लोकसत्ता’सह अनेक वृत्तपत्रे त्या छापतातही हा त्यांच्या व्यावसायिकेतेचा भाग झाला)… स्वतःला ‘इन्स्टिट्यूट’ किंवा ‘अकॅडमी’ म्हणवणाऱ्या या कोचिंग क्लासेसच्या जाहिराती तर गेल्या काही वर्षात तर ‘योजना’सारख्या सरकारी नियतकालिकात अन् ‘इंडिया ईअर बुक’सारख्या सरकारी प्रकाशनातही पानोपानी दिसू लागल्या आहेत. आता तर स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्लासेसचे हे लोण शहरांपुरते मर्यादित न राहता तालुका पातळीवर पोहचले आहे. क्लास किती बडा यावर नव्हे तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवाराचा ‘अभ्यासाचा पाया’ किती पक्का? अन् ‘तयारी किती’? यावर यश मिळते.

‘पुणे जिल्हा कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतो?’ या ‘बेसिक’ प्रश्नाचं उत्तर माहीत नसलेला मुलगा किंवा मुलगी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यात येतो/ येते! स्पर्धा परीक्षांची आठ-आठ वर्षे तयारी करत तारुण्यातील उमेदीची वर्षे वाया घालवतात. शेवटी पर्यायी करिअर हातात नसते (हा एक आपल्या शिक्षण व्यवस्थेचा मूलभूत दोष किंवा शिक्षण व्यवस्थेचा कुचकामीपणा)! अखेरीस निराशा येते… घरी- गावी परतल्यावर घरच्यांना सांगणार काय? त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते…

एक वेळ प्रेमातील देवदास परवडला, पण स्पर्धा परीक्षेतील ‘देवदास’ नको…

आणि मग एसटीआयसारख्या परीक्षेतील यशाचा जल्लोष काय अधोरेखित करतो?

‘काही जण निवडले गेलेत, पण लाखो बाहेर फेकले गेलेत…!’

सरकारी नोकरी म्हणजे आयुष्य सार्थकी लागलं…’जॉब सिक्युरिटी’… लग्नाच्या बाजारात भाव वधारला… वगैरे ‘सामाजिक धारणा’ आजही युवा वर्गाला स्पर्धा परीक्षांकडे वळण्यासाठी भाग पाडतात!

सध्या, समाजमाध्यमातून ‘स्पर्धा परीक्षा समन्वय समिती’ या नावाखाली एक निवेदन जोरकसपणे ‘व्हायरल’ होत आहे. त्यात ‘एसटीआय, एएसओपदी निवड झालेल्या उमेदवारांचा पुणे शहरात, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी अभ्यासिकेबाहेर फटाके लावून, गुलाल उधळून, प्रसंगी ‘डीजे’ लावून ‘जल्लोष’ केला!’ या गोष्टींविषयी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली आहे. असे प्रकार भविष्यात थांबवावेत अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

पुढे त्या निवेदनात एक मार्मिक भाष्य केले आहे, ‘कारण यामुळे स्पर्धा परीक्षांविषयी उगीचच ग्लॅमर (वलय) निर्माण होते…याला भुलून युवकांच्या घरच्या मंडळींच्या अपेक्षा वाढतात… उमेदीची वर्षे वाया जातात… त्यामुळे आपलं स्पर्धा परीक्षेतील यश गावभर साजरं करावं की घरच्यांसोबत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी असे प्रकार वारंवार पाहायला मिळत आहेत… ज्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी यश संपादन केले आहे ते ‘वैयक्तिक’ आहे… त्यात समाजासाठी त्यांनी असे कोणते काम केले आहे की, तुम्ही त्याला खांद्यावर उचलून घेऊन नाचावं? आणि समजा आज ज्याला तुम्ही खांद्यावर उचलून घेऊन नाचत आहात तो/ ती भविष्यात प्रशासनात काम करत असताना भ्रष्ट- लाचखोर निघाला/ निघाली तर मग काय करणार? कारण आज समाजमाध्यमातून अशा अनेक लाचखोर अधिकाऱ्यांचे ‘व्हिडीओ व्हायरल’ केले जातात, ज्यांची स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासनात निवड झाल्यानंतर… त्यांना खांद्यावर उचलून घेऊन नाचवलं गेलं होतं!’

महात्मा गांधींना, परिचयातील एका व्यक्तीने ‘सिव्हिल सर्व्हिस’ (आत्ता आयएएस) परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल मेजवानीस आमंत्रित केले होते. गांधीजींनी त्याला सल्ला दिला, ‘तुझे हे वैयक्तिक यश आहे, तू या प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून समाजासाठी काही तरी चांगले करून दाखव… मग आम्ही आनंद साजरा करू!’

आज समाजातील बहुतांश वर्ग शिकत आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. स्पर्धा परीक्षेकडे ओढा असलेल्यांमध्ये बहुजन समाजातील मुला-मुलींचा भरणा अधिक आहे. यात प्रामुख्याने आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकरी- शेतमजूर वर्ग आहे.

मध्यंतरी प्रस्तुत लेखकाला प्रवासात, पुण्याजवळील ग्रामीण भागात महामार्गाजवळ मराठा महासंघाने रेखाटलेला फलक वाचण्यात आला… त्यात स्पष्ट म्हटले होते, ‘स्पर्धा परीक्षांच्या पलीकडेही जग आहे, याचा बहुजन समाजातील मुला-मुलींनी विचार करावा!’

स्पर्धा परीक्षा, विशेषतः यूपीएससीतर्फे घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा यावर प्रस्तुत लेखकाने लोकसत्तेच्या माध्यमातून वारंवार ‘भाष्य’ केले आहे, ‘टीका-टिप्पणी’ केली आहे!

आज अनेक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार, निवडीनंतर सर्रासपणे राजकीय पक्ष आणि संघटना यांचे जाहीर सत्कार स्वीकारताना दिसतात! असे जाहीर राजकीय सत्कार नम्रपणे नाकारणारे आहेत… पण त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच…

राज्याचे माजी माहिती आयुक्त सुरेश जोशी यांनी काही वर्षांपूर्वी, यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या उमेदवारांच्या सत्कार सोहळ्यात सांगितलेले की, ‘ज्या वर्षी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालो… थोडक्यात आयएएस झालो… त्या वर्षी निकालाच्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आतील पानावर एक कॉलमची बातमी छापून आली होती… त्या मानाने तुम्ही फारच भाग्यवान इतकी चौफेर प्रसिद्धी तुम्हाला मिळते!’

आज एसटीआय निकालाच्या पार्श्वभूमीवर ही बाब परत एकदा अधोरेखित झाली.

padmakarkgs@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 10:59 IST
Next Story
सेक्स्टॉर्शन करणारे चलाख असतील, पण तुम्ही सजग राहा… तुमचं डिजिटल विश्व कडीकुलुपात ठेवा…