scorecardresearch

Premium

क्रिकेट हा केवळ खेळ आहे!

‘क्रिकेट हा केवळ एक खेळ आहे आणि हार-जीत हा खेळाचा अविभाज्य घटक आहे,’ हे वाक्य कितीही घासून घासून गुळगुळीत झाले असले तरीही ते १०० टक्के खरे आहे.

Cricket Indian team players Cricket World Cup Tournament G 20 Summit
क्रिकेट हा केवळ खेळ आहे! |

ज्युलिओ रिबेरो

‘क्रिकेट हा केवळ एक खेळ आहे आणि हार-जीत हा खेळाचा अविभाज्य घटक आहे,’ हे वाक्य कितीही घासून घासून गुळगुळीत झाले असले तरीही ते १०० टक्के खरे आहे. भारतीय संघातील खेळाडूंची राज्ये, त्यांचे धर्म, मातृभाषा सारे काही भिन्न आहे, मात्र ते एकदिलाने खेळतात. वैविध्यातील या ऐक्यात देशातील जनतेला एकत्र आणण्याची जी क्षमता आहे, ती अन्य कशातही नाही..

Video of umpire in Sindh Premier League goes viral
SPL 2024 : अंपायरने अपील न होताच फलंदाजाला केले बाद घोषित, पाकिस्तानमधील सामन्यातील VIDEO होतोय व्हायरल
Who is Tanmay Agarwal
Tanmay Agarwal : सर्वात जलद त्रिशतक झळकावत रिचर्ड्स-सेहवागचा विक्रम मोडणारा, कोण आहे तन्मय अग्रवाल?
Rahul Dravid has says that KL Rahul will not take wicket keeping
IND vs ENG : राहुल द्रविडने घेतला मोठा निर्णय, केएल राहुलला ‘या’ जबाबदारीतून केले मुक्त
ICC has Announced the best Test team for 2023 and Pat Cummins captain
ICC Test Team : आयसीसीचा सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर, विराट-रोहित नव्हे तर ‘या’ दोन भारतीय खेळाडूंना मिळाले स्थान

भारतात नुकतीच क्रिकेट विश्वचषक स्पर्धा झाली. ‘जी- २० शिखर परिषदे’नंतर देशात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला, तो क्रिकेट विश्वचषक! भारतीयांच्या क्रिकेट वेडामुळे समाजाच्या सर्व स्तरांतील व्यक्तींचे लक्ष या स्पर्धेवर केंद्रित झाले होते. अशिक्षित, उपेक्षित वर्गाला जी- २० परिषदेत काहीच स्वारस्य नव्हते. जी-२० परिषदेप्रमाणेच विश्वचषक स्पर्धेचेही आयोजन अगदी चोख करण्यात आले होते. त्याचे श्रेय अर्थातच जय शहा आणि बीसीसीआयमधील त्यांच्या सहकाऱ्यांना जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला विश्वचषक प्रदान केला. भारतीय संघ विश्वविजेता ठरला असता, तर सर्व भारतीयांप्रमाणेच पंतप्रधानांचाही आनंद निश्चितच गगनात मावेनासा झाला असता. तसे झाले असते, तर कदाचित २०२४ च्या निवडणुकांत भाजपच्या पारडय़ात आणखी काही मते पडली असती. कारण अगदी साधे सरळ आहे. नरेंद्र मोदींचे चाहते देशात घडलेल्या कोणत्याही चांगल्या घटनेचे श्रेय मोदींनाच देतात.

पण १९ नोव्हेंबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने उत्तम कामगिरी केली. विशेषत: क्षेत्ररक्षणातील त्यांची चपळता लक्षणीय होती. रोहित शर्माने टोलावलेल्या चेंडूचा ट्रॅव्हिस हेडने सहा ते सात मीटर धावून अतिशय उत्कृष्ट झेल घेतला आणि त्याला पॅव्हेलियनची वाट दाखविली. हा बळी सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरला. माझ्या मते, विराट कोहली बाद झाल्यानंतरचा आपल्या संघाचा पवित्रा फारच बचावात्मक होता. शर्मा आणि कोहली बाद झाल्यानंतर मागचे फलंदाज कोशात गेल्यासारखे वाटू लागले. टी-२०च्या मुशीत तयार झालेला फलंदाज सूर्यकुमार यादवही मोठे फटके मारण्यास फारसा उत्सुक दिसला नाही. साहजिकच प्रतिस्पर्धी संघासाठी आव्हानात्मक ठरेल अशी धावसंख्या उभारण्यात भारतीय संघ अपयशी ठरला.

आपला संघ नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्यासाठी उतरला तेव्हा आपल्या खात्यात सलग दहा सामन्यांतील विजय नोंदविलेला होता. परिणामी स्टेडियममधील प्रेक्षकांसह सर्वच भारतीय आधीच आत्मसंतुष्ट झाले होते. आपल्याभोवती अजिंक्यपदाचे वलय असल्याच्या भावनेने भारतीय क्रिकेट संघाला वेढले होते. मात्र आपण वास्तावाचे भान राखले असते, तर संभाव्यतेचे गणित आपल्या विरोधात जाण्याची शक्यता वेळीच ओळखू शकलो असतो.

हेही वाचा >>>महिलांविरोधातील गुन्ह्यांकडे दुर्लक्षच होणार असेल, तर नवनव्या कायद्यांचा काय उपयोग?

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने आपल्या संघाला या मालिकेच्या सुरुवातीच्या काही सामन्यांत आलेल्या अपयशातून बाहेर काढले. भारताविरुद्धचाही एक सामना ऑस्ट्रेलियाने गमावला होता. मात्र पॅट कमिन्स महिनाभरापूर्वीच म्हणाला होता, ‘आमचा संघ सध्या सर्वोत्तम कामगिरी करू शकत नसला, तरीही स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यांत आम्ही आमचे लक्ष्य गाठूच.’ सामन्याच्या आदल्या दिवशीही तो म्हणाला होता की, ‘आमच्या संघाला दणाणत्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पसरलेली शांताता अनुभवणे आवडेल.’ तशी शांतता त्यांच्या संघाने अनुभवली आणि सर्व भारतीयांनाही ती अतिशय तीव्रतेने जाणवली.

‘क्रिकेट हा केवळ एक खेळ आहे आणि हार- जीत हा खेळाचा अविभाज्य घटक आहे,’ हे वाक्य कितीही घासून घासून गुळगुळीत झाल्यासारखे वाटले, तरीही ते १०० टक्के खरे आहे. कमिन्सच्या हाती विश्वचषक देताना आपल्या पंतप्रधानांच्या चेहऱ्यावरचे भाव हे नेत्याला साजेसे होते. अन्य एखादी व्यक्ती असती, तर तिला निराशा लपवता आली नसती, मात्र पंतप्रधानांनी चेहऱ्यावर निराशेचा लवलेशही दिसू दिला नाही. त्यानंतर त्यांनी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन भारतीय संघाची भेट घेतली आणि मोहम्मद शमीला मिठी मारली.

माझ्या घरामागे पोलिसांची वसाहत आहे. उपांत्य सामन्यातील भारताच्या विजयानंतर या वसाहतीतील लहान मुलांना जेवढा आनंद झाला होता, तेवढाच तो नरेंद्र मोदींनाही झाला असावा. सामना संपताच सुमारे पावणेअकरा वाजता म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने निश्चित केलेली कालमर्यादा संपून ४५ मिनिटे उलटल्यानंतर पोलिसांच्या मुलांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. दुसऱ्या दिवशीच्या सर्व वृत्तपत्रांत या विजयाविषयीची पंतप्रधानांची प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली होती. या संदेशात त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले होते आणि विशेषत: विराट कोहली आणि मोहम्मद शमीचे कौतुक केले होते. आपल्या गोलंदाजीच्या आक्रमक फळीत आणखी एक मुस्लीम गोलंदाज आहे- मोहम्मद सिराज आणि एक शीख गोलंदाजही आहे- जसप्रीत बुमरा. शिवाय दोन फिरकी गोलंदाज आहेत- रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव. यांच्यापैकी एक नरेंद्र मोदींचे मूळचे राज्य असलेल्या गुजरातचा, तर दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशचा आहे. हे सर्वजण मिळून जागतिक दर्जाची गोलंदाजीची फळी संघात निर्माण झाली आहे. अंतिम सामन्यात सुरुवातीला ऑस्ट्रेलिया संघही त्यांच्यापुढे अडखळतच खेळत होता. मात्र तिसरा बळी गेल्यानंतर त्यांनी खेळ सावरला.

हेही वाचा >>>संविधानाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनांतला फरक कुठे नेणार?

आपल्या देशातील मतपेटीचे राजकारण निवडणुकांतील विजयासाठी पूर्वापार भेदभाव आणि अगदी द्वेषालाही चालना देत आहे, दुर्दैवाची बाब आहे. पण समाधानाची बाब ही की आपल्या क्रिकेट संघातील खेळाडू केवळ खेळाच्या दर्जावर निवडले गेले आहेत. ते विविध राज्यांतील आहेत, त्यांच्या मातृभाषा भिन्न आहेत, धर्म भिन्न आहेत. पण कोणीही जाती-धर्माच्या निकषांवर संघातील स्थानावर दावा करू पाहत नाहीत. वैविध्यातील या ऐक्यात देशातील जनतेला एकत्र आणण्याची जी क्षमता आहे ती अन्य कशातही नाही. 

स्पर्धा कोणतीही असो, माझ्या माहितीतील प्रत्येक भारतीय आपल्या संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत असतो. मुंबईत एक बिगरसरकारी स्वयंसेवी संस्था आहे- ‘मोहल्ला कमिटी मूव्हमेंट ट्रस्ट’. ही संस्था १९९२-९३पासून धार्मिक ऐक्य आणि शांततेसाठी प्रयत्न करत आहे. त्यांनी एक संकल्पना मांडली आहे- ‘शांततेसाठी क्रिकेट’! नैतिकता पुनप्र्रस्थापित करण्याचे ध्येय समोर ठेवून काम करणाऱ्या एक कार्यकर्त्यां आहेत- सुशोभा बर्वे. त्या धार्मिक विशेषत: हिंदू-मुस्लीम एकात्मतेच्या खंद्या पुरस्कर्त्यां आहेत. त्यांनी ‘इंटर पोलीस स्टेशन क्रिकेट सॉफ्ट बॉल टुर्नामेंट’ची संकल्पना मांडली आहे. यात एका संघात एक पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी असतो आणि दोन्ही धर्मातील मिळून १० खेळाडू असतात. ‘मोहल्ला कमिटी ट्रस्ट’ गेल्या तीन दशकांपासून दरवर्षी ‘क्रिकेट फॉर पीस टुर्नामेंट’ आयोजित करते. या स्पर्धेला मुंबई शहर पोलिसांचे सक्रिय सहकार्य असते. या स्पर्धानी हिंदू आणि मुस्लीम धर्मीयांतील आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ वर्गातील अनेक तरुणांना एका मैदानात आणले आहे. आपण सारे एक आहोत- एकमेकांचे चांगले मित्र आहोत, ही भावना वृद्धिंगत करण्यात या स्पर्धेने लक्षणीय योगदान दिले आहे. १९९३नंतर आजवर मुंबईत एकही जातीय दंगल झालेली नाही.

हेही वाचा >>>विद्यार्थी कोटातील कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतात, कारण…

भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडू परस्परांचे उत्तम मित्र आहेत. ते क्रिकेट विश्वचषकाचा प्रत्येक सामना ते एकदिलाने खेळले. उपांत्य फेरीतील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने सात बळी घेतले तेव्हा त्यांनी त्याचे जे कौतुक केले तो त्यांच्यासाठी निखळ आनंदाचा भाग होता. त्यांच्या त्या आनंदात प्रत्येक भारतीयही सहभागी होता. एकीकडे ८०-२० असे धार्मिक विभाजन मतदारांच्या मनावर बिंबविण्यासाठी आटोकाट प्रयत्न होत असताना दुसरीकडे क्रिकेटमध्ये या ‘इस्लामोफोबिया’चा लवलेशही दिसत नाही. एका इंग्रजीभाषक वृत्तपत्रात क्रिकेट समालोचकाने लिहिले होते की, ‘जेव्हा जेव्हा एखादा फलंदाज चेंडू सीमेपार टोलावत होता, तेव्हा स्टेडियममध्ये पसरणारी शांतता अस्वस्थ करणारी होती.’ मला याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही. घरचे प्रेक्षक आपल्याच संघाच्या बाजूने उभे राहणार. ते प्रतिस्पध्र्याबाबत पक्षपाती असणारच! प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी मारलेल्या प्रत्येक चौकार वा षटकारागणिक आपला संघ विजयापासून दूर जाताना दिसत असेल, तर घरच्या स्टेडियममध्ये शांतताच पसरणार.

मी आणि माझा परिचर- आम्ही दोघांनी विश्वचषकाचा उपांत्य सामना माझ्या घरच्या टीव्हीवर पाहिला. डॅरेल मिचेलला चौकार आणि षटकारांचा वर्षांव करताना पाहून मलाही धक्का बसला होता. षटकार मारण्याच्या प्रयत्नात त्याने टोलावलेला चेंडू रवींद्र जडेजाच्या हातात जाऊन स्थिरावला, तेव्हा स्टेडियममध्ये जो जल्लोष झाला, त्यात मीही माझ्या घरून सहभागी झालो. अर्थात माझा जल्लोष केवळ माझ्या परिचराच्या कानी पडला. मिचेल पॅव्हेलियनकडे परतत होता, तेव्हा संपूर्ण वानखेडे स्टेडियम उभे राहून टाळय़ांचा गजर करत होते. मुंबईतील त्या हजारोंच्या जनसमुदायाबरोबर मीही हे जाणून होतो की, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असला, तरीही आता आपल्या संघाचा विजय निश्चित झाला आहे. भारत आणि विजयाच्या दरम्यान फक्त मिचेल उभा होता. तो बाद झाल्यानंतर आपला संघ अहमदाबादला जाणार हे निश्चित झाले होते..लेखक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cricket indian team players cricket world cup tournament g 20 summit amy

First published on: 26-11-2023 at 03:16 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×