अनिश पाटील

मुंबईतील एक कापड व्यावसायिक गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता. ही बाब त्याच्या पत्नीला प्रकर्षाने जाणवत होती. तिने त्याला विचारणा केली, पण त्याने उत्तर देणे टाळले. अखेर पत्नीच्या हाती एक डायरी लागली, त्यात एका व्यक्तीला गेल्या दीड वर्षापासून दिलेल्या रकमेचा हिशोब होता. त्या व्यक्तीला थोडेथोडके नाही, तर तब्बल ३० लाख रुपये देण्यात आले होते. पत्नीने याबाबत व्यावसायिकाला विचारले असता तो रडू लागला. त्याने घडलेला प्रकार पत्नीला सांगितला, ते ऐकून पत्नीलाही धक्का बसला. कारण पतीच्या मोबाइलमधील त्या दोघांचे खासगी छायाचित्र मिळवून अनोळखी सायबर भामट्याने पतीकडून ३० लाखांची खंडणी उकळली होती.

Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न

गेल्या काही दिवसांत सायबर खंडणीच्या प्रकारात कमालीची वाढ झाली आहे. कमी व्याज दरात कर्ज देण्याच्या नावाखाली सध्या खंडणी मागण्याचे प्रकार वाढले आहेत. पण आता त्याच्याबरोबर महिलांचे, तरुणींच्या छायाचित्रांचा गैरवापर करून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने छायाचित्रांमध्ये आक्षेपार्ह बदल करून धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. प्रामुख्याने अल्पवयीन मुली या प्रकारात अधिक भरडल्या जात आहेत. मालवणीत तर या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचाही प्रकार घडला होता. सायबर खंडणीसोबत नायजेरियन फ्रॉड व डेबिट कार्ड क्लोनिंगचे प्रकार वाढत आहेत. क्रेडिट कार्डचा डाटा कॉपी करून एखाद्या व्यक्तीचे बनावट क्रेडिट कार्ड केले जाते. कधी मिसकॉल देऊन, कधी लिंकवर क्लिक करायला सांगून बँक खातेदारांच्या खात्यावर डल्ला मारला जातो, तर कधी क्रेडिट कार्ड ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यापूर्वीच डाटाची चोरी केली जात आहे. सायबर गुन्हेगार त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करतात. एटीएममध्ये स्किमर लावणारे, गोड बोलून ओटीपी मागणारे, ऑनलाइन ग्राहकांना खोटे नंबर देऊन नंतर लुबाडणारे, नायजेरियन फ्रॉड, ई-मेल स्कॅम, फेसबुक फ्रेंडशिप करून मौल्यवान वस्तूंचे आमिष दाखवून पैसे मागवून लुटणारे असे अनेक प्रकारचे सायबर भामटे नागरिकांची फसवणूक करत आहेत. केवायसी, वीज बिलांच्या नावाने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी आता फाइव्ह जीच्या नावाने लुटण्यासाठी ऑनलाइन जाळे पसरवले आहे. यापूर्वी वीज बिलाच्या नावाखालीही फसवणूक करून या भामट्यांनी गेल्या वर्षभरात दोन हजारांहून अधिक नागरिकांची फसवणूक केली होती. त्याबाबत जागरूकता ठेवल्यास आपण अशा घटना टाळू शकतो.

सायबर खंडणी

सायबर खंडणी हा प्रकार भारताला नवा नाही. पण कॉर्पोरेट कंपन्यांना धमकावणाऱ्या या सायबर भामट्यांनी आता सामान्य नागरिकांकडेही खंडणी मागण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी कंपन्यांचा डेटा चोरून त्या बदल्यात धमकावण्याचे प्रकार घडायचे. परदेशात डेटाचोरीचे अनेक किस्से गाजले आहेत. डेटाचोरीच्या संकल्पनेवर हॉलीवूडमध्ये अनेक सिनेमेही बनले आहेत. व्यावसायिक कंपन्यांसोबत सरकारी विभागांतील सर्व्हर हॅक केल्यास सुरक्षा व्यवस्थेची कशी दाणादाण उडू शकते, याचे चित्रही या चित्रपटांतून उभे करण्यात आले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात मात्र असे प्रकार सर्रास सुरू असल्याने कंपन्या अनेक प्रकारच्या दक्षता घेत आहेत. पण काही चतुर हॅकर्स त्यावरही मात करू शकतात, हे सिद्ध झाले आहे.

मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत हाच प्रकार घडला. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला धमकीचा मेल आला होता. हा मेल पाठवणाऱ्याने कंपनीशी संबंधित महत्त्वाची व गोपनीय माहिती आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. शिवाय कंपनीचा महत्त्वाचा डेटा आपल्याकडे असल्याची खात्री पटावी, यासाठी हा संपूर्ण डेटा एका संकेतस्थळावर सेव्ह करून त्याची लिंक या मेलवर पाठवली होती. हा सर्व डेटा प्रतिस्पर्धी कंपन्यांना विकू नये, म्हणून डेटाचोरी करणाऱ्याने ६४ हजार अमेरिकन डॉलर्सची (३८ लाख रुपये) मागणी केली होती. अरबो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपन्यांसाठी ही रक्कम फार मोठी नाही, पण एखादा अशा प्रकारची खंडणी दिली की डेटाचोरी करणारी व्यक्ती वारंवार पैशाची मागणी करण्याची भीती असल्याने या कंपनीच्या मुख्याधिकाऱ्याने तात्काळ मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर कक्षानेही तात्काळ या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला होता.

आयपी ॲड्रेसनुसार धमकीचा ई-मेल मध्य प्रदेशातील इंदौरमधून आल्याचे सायबर पोलिसांच्या लक्षात आले. आयपी ॲड्रेसने दिलेला हा महत्त्वाचा धागा पकडून गुन्हे शाखेचे पोलीस तेथील वीणानगरमध्ये पोहोचले. संबंधित पत्त्यावर एक सॉफ्टवेअर इंजिनीअर राहत असल्याचे समजल्यानंतर पाणी इथेच मुरत असणार, ही बाब पोलिसांच्या लक्षात आली. आयपी ॲड्रेसमुळे मिळालेला पत्ता व त्यावर आयटी अभियंता राहणे, हा केवळ योगायोग होऊ शकत नाही. त्यामुळे पोलिसांच्या संशयाला आणखी बळकटी मिळाली. त्यांनी वेळ न दवडता तेथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. तो तरुण त्याच कंपनीचा माजी कर्मचारी होता. या कंपनीच्या आयटी विभागात काम करत असताना कंपनीचा महत्त्वाचा डेटा कोठे सेव्ह केला आहे, याची चांगली माहिती त्याला झाली होती. त्याचाच फायदा घेऊन त्याने हा सगळा कट रचला होता. काही वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर सायबर खंडणीचा प्रकार अस्तित्वात असल्याचे लक्षात आले होते. पण पूर्वी कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत मर्यादित असलेले सायबर भामटे सामान्य नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात धमकावत आहेत. विविध ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून नागरिकांना कमी कालावधीचे ऑनलाइन कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांची गोपनीय माहिती मिळवली जाते. त्या माहितीचा वापर करून धमकावण्याचे, खंडणी मागण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच अश्लील छायाचित्रांच्या माध्यमातूनही धमकावण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने आरोपी दूरध्वनी करतात. पीडित व्यक्तीविरोधात अश्लील छायाचित्रांप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे सांगून त्याप्रकरणी अटक होऊ शकते, असा धाक दाखवला जातो. तसेच संबंधित व्यक्तीचे छायाचित्र व चित्रीकरण समाजमाध्यमांवरून हटवण्यासाठी खंडणी मागितली जाते. अल्पवयीन पीडित मुलींना अथवा मुलांना संबंधित छायाचित्र त्यांच्या पालकांना पाठवण्याची धमकी दिली जाते. पीडित व्यक्तीच्या भीतीचा वापर करून त्यांना धमकावले जाते. सुरुवातीला थोडी रक्कम मागितली जाते. पण नंतर खंडणीची रक्कम हळूहळू वाढवून अनेक प्रकरणांमध्ये लाखो रुपये उकळण्यात आले आहेत. भांडुपमध्ये एका अल्पवयीन मुलीकडून अशा प्रकारे २५ हजारांची खंडणी घेतल्याचा प्रकार नुकताच घडला.
मुंबईत ऑगस्ट महिन्यापर्यंत अश्लील छायाचित्रांचा वापर करून व्हॉट्सॲपद्वारे धमकावण्याचे ६१ गुन्हे दाखल झाले आहेत. कर्जाच्या नावाखाली विश्वासात घेऊन खंडणी उकळण्याचे ९२ गुन्हे दाखल झाले आहेत. मॉर्फिंग म्हणजे मूळ छायाचित्रात आक्षेपार्ह बदल करणे, बनावट प्रोफाइल तयार करणे याप्रकरणी २६२ गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय राज्यभरात हजारांहून अधिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्यात आहेत. तक्रारदारांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय अनेक जण बदनामीच्या भीतीने तक्रारीही करत नसल्याचे संबंधित अधिकारी सांगतात.

मोबाइलमधील छायाचित्रे, संपर्क क्रमांक, चित्रफिती अशी महत्त्वपूर्ण माहिती संबंधित कंपनीस शेअर करण्याचे बंधन घालूनच नागरिकांना कर्ज मंजूर करण्यात येते. त्यामुळे कोणतेही अनोळखी ॲप्लिकेशन डाऊनलोड करताना अशी बंधने स्वीकारू नयेत. कोणत्याही अनधिकृत ॲपद्वारे कर्ज घेऊ नये. कमी कालावधीचे ऑनलाइन कर्ज देण्याच्या आमिषाला बळी पडू नये. तसेच कोणासोबत असा प्रकार घडल्यास त्याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच अनोळखी ॲप्लिकेशन मोबाइलमध्ये डाऊनलोड करू नये. समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीशी ओळख संवाद साधताना, ओळख करून घेताना, आपली माहिती देताना काळजी घ्यावी. विशेषत: अश्लील संवाद साधण्याची अथवा व्हिडीओ कॉल करण्याची मागणी करणाऱ्या व्यक्तींशी संपर्क ठेवू नये. कोणत्याही प्रकारे अशा घटना घडल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार करावी.

अनोळखी लिंकवर क्लिक करताना सावधान

मालाड येथील महाविद्यालयात प्राचार्य असलेल्या या महिलेचे एका खासगी बॅंकेत बचत खाते आहे. त्यांना अनोळखी व्यक्तीचा दूरध्वनी आला. त्या व्यक्तीने आपण बॅंकेतून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या बॅंक खात्याचे ‘केवायसी’ करायचे असल्यामुळे संपूर्ण माहिती द्या, अशी मागणी त्या व्यक्तीने केली. त्या वेळी तक्रारदार महिलेने माहिती देण्यास नकार देऊन बॅंकेत जाऊन ही प्रक्रिया करू, असे सांगितले. त्यानंतर दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने ‘केवायसी’साठी बॅंकेत जाण्याची गरज नसून, आपण पाठवलेल्या एका लिंकवर माहिती अपलोड केल्यास सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असा निर्वाळा दिला. त्यानुसार तक्रारदार महिलेने त्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर फक्त पाच मिनिटांतच त्यांच्या बॅंक खात्यातून आधी ४९ हजार, त्यानंतर पुन्हा ४९ हजार आणि अखेरीस १८ हजार असे एकूण एक लाख १७ हजार रुपये काढण्यात आले. या महिला प्राचार्यांनी पुन्हा त्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो दूरध्वनी क्रमांक बंद असल्याचे आढळले. त्यांनी बॅंकेत जाऊन चौकशी केली असता, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

मिसकॉलने खात्यावर डल्ला

अनोळखी दूरध्वनी क्रमांकावरून मिस कॉल आल्यानंतर आपण संबंधित क्रमांकावर परत फोन करतो. पण ही बाब धोकादायक ठरू शकते. कारण माहीममधील एका व्यावसायिकाला रात्री सहा मिस कॉल आल्यानंतर त्याच्या विविध खात्यांतून तब्बल १ कोटी ८६ लाख रुपये गायब झाल्याची घटना चांगलीच गाजली होती. तक्रारदार शाह यांच्या मोबाइलवर ४४ कोडने सुरू होणाऱ्या क्रमांकावरून सहा मिस कॉल आले होते. हा कोड ब्रिटनचा आहे. झोपेत असल्यामुळे त्यांनी फोन उचलला नाही. पण सकाळी उठून शाह यांनी आलेल्या क्रमांकावर फोन केल्यानंतर त्यांना आपलाच क्रमांक बंद झाल्याचे समजले. यानंतर करण्यात आलेल्या तपासात शाह यांच्या तक्रारीवरून क्रमांक ब्लॉक करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली.

जवळपास १४ वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण २८ व्यवहार करत पैसे पाठविण्यात आले होते. बँकेने प्रयत्न करून फक्त २० लाख रुपये परत आणले. यानंतर करण्यात आलेल्या तपासामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. ११ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास शाह यांच्या क्रमांकावरून नवीन सिम कार्डसाठी अर्ज करण्यात आला होता. तर रात्री २ वाजताच्या सुमारास त्यांच्या मोबाइलवर सलग सहा मिस कॉल करण्यात आले. हे पूर्ण प्रकरण सिम कार्ड स्वॅपिंगचे होते.

कार्डद्वारे खरेदी करताना पिन क्रमांक स्वतःच टाका

अंधेरीतील व्यावसायिकाच्या क्रेडिट कार्डचा डेटा चोरून त्याने बनावट क्रेडिट कार्डच्या मदतीने विक्रोळीतील आर सिटी मॉलमधून आयफोन व दागिने खरेदी केले होते. त्या वेळी तात्काळ व्यावसायिकाला या खरेदीबाबतचा मोबाइलवर एसएमएस आला. त्याने तात्काळ संबंधित बँकेशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. विक्रोळीतील आर सिटी मॉलमधून त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर झाल्याची माहिती या व्यावसायिकाला मिळाली. या प्रकरणी व्यावसायिकाने पार्कसाइट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मॉलमधील सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यातील खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलिसांच्या खबऱ्याने ओळखले. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्या तरुणाला अटक केली. त्याच्याकडे सहा क्लोनिंग केलेली कार्ड्स सापडली आहेत. चौकशीत त्याला एका क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यानंतर १० टक्के कमिशन मिळायचे, असे समजते.

हॉटेलमधील एखाद्या वेटरला या टोळीतील व्यक्ती पैशाचे आमिष दाखवून क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकाचा डाटा स्किमरच्या साहाय्याने कॉपी करण्यास सांगायचे. त्यानंतर या टोळीतील एक गट प्रथम हा चोरी केलेला डाटा व ग्राहकाने वापरलेला पिन क्रमांक याचे संकलन करायचा. त्यानंतर दुसरा गट या डाटा व पिन क्रमांकाच्या साहाय्याने नवीन क्रेडिट कार्ड तयार करायचा. तसेच त्याच नावाचे बनावट ओळखपत्रही बनवण्यात यायचे.

क्रेडिट कार्ड हाती येण्यापूर्वीच डेटाचोरी

क्रेडिट कार्ड येण्याआधीच हे सायबर गुन्हेगार त्यातील डेटा चोरी करत आहेत. मुंबई पोलिसांनी अब्रार अन्वर खान (२४) व खलील अख्तर अन्सारी (३०) या दोन आरोपींना सायबर गुन्ह्यांमध्ये अटक केली होती. त्यांच्या चौकशीत ही बाब पुढे आली होती. यातील अब्रार हा एका बडया कुरिअर सर्व्हिसमध्ये कुरिअर बॉय म्हणून कामाला होता. तो काम करत असलेल्या एजन्सीत वरळीपासून नरिमन पॉइंटपर्यंत कुरिअर पोहोचवण्याची जबाबदारी होती. हे आरोपी बँकेमार्फत ग्राहकांना मिळणारे क्रेडिट कार्ड त्यांच्या कुरिअर कंपनीमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे. ते क्रेडिट कार्ड ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असलेल्या खानला नागपाड्यातील खलील अन्सारी व त्याच्या दोन साथीदारांनी विश्वासात घेतले होते. त्यातून बँकेच्या क्रेडिट कार्डचे बंद कुरिअर तो या टोळीकडे द्यायचा. त्यानंतर हे कुरिअरचे पाकीट उघडून आरोपी त्यातील क्रेडिट कार्डचा डाटा चोरी करायचे. आणि कोणालाही संशय येणार नाही, अशा पद्धतीने ते पाकीट पुन्हा बंद करायचे. त्यासाठी कुरिअर बॉयला प्रत्येक क्रेडिट कार्डमागे दोन हजार रुपये मिळायचे, असे एका अधिकाऱ्याने या टोळीच्या कार्यप्रणालीची माहिती देताना सांगितले. एका क्रेडिट कार्डधारकाने ऑनलाइन खरेदी न करताही त्याला बिल आल्याने याबाबत त्याने बॅँकेशी संपर्क साधला. या प्रकरणी बॅँकेनेही कुरिअर कंपनीशी संपर्क साधला असता या रॅकेटने क्रेडिट कार्डचा डाटा चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कार्ड स्वीकारताना पाकिटावरील सील तपासून पाहा. शक्यतो तात्काळ त्याचा पिन क्रमांक बदलून घ्या.

आभासी चलन व फसवणूक

एटीसी कॉइन या आभासी चलनाच्या माध्यमातून गुंतवणूक योजना राबवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) गोरेगावमधील एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हा गुन्हा दाखल केला असून आभासी चलनाच्या संबंधित हा मुंबईतील गुन्हा आहे. १८ महिन्यांसाठी हे चलन गुंतवल्यास त्यातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या वर्षी मार्च महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यात गुंतवणूक केलेल्या रकमेच्या १० टक्के रक्कम प्रत्येक महिन्याला मिळणार होती, तसेच परदेशवारीसह जॅग्वार व मर्सिडीजसारख्या महागड्या गाड्याही देण्याचे आमिषही दाखवण्यात आले होते. २००९ मध्य़े बिटकॉइन हे आभासी चलन बाजारात आल्यानंतर अनेकांनी अशा आभासी चलन बाजारात आणले आहे. पण त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. याप्रकरणी ६५ कोटींची गुंतवणूक झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. सध्या जगभरासह भारतातदेखील व्हर्च्युअल म्हणजेच बिटकॉइनच्या साह्याने देशात व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे अशा व्यवहारांना देशात नियमित करण्यात यावे का? या संदर्भात सरकारकडून मते मागावण्यात आली आहेत. सध्या मोदी सरकारने डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. आरबीआयने नुकतेच भारतात बिटकॉइनचा वापर करणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मार्च महिन्यात जगभरातील व्हर्च्युअल चलनांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती. भारतातदेखील काही ॲपने ऑनलाइन आणि मोबाइलच्या माध्यमातून बिटकॉइनचे हस्तांतरण करण्याची सोय देऊ केली आहे. गेल्या वर्षभरात बिटकॉइनच्या मूल्यात तिप्पट वाढ झाली आहे. उच्चांकी पातळी गाठली आहे. जपानने बिटकॉइनच्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता दिल्यानंतर बिटकॉइनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली होती. पण अशा आभासी चलनाच्या माध्यमांतून फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते.

डार्क नेटचे आव्हान

यापूर्वी रस्त्यावर होणारे गुन्हेही डार्क नेटच्या मदतीने केले जात आहेत. संपूर्ण जगात करोनाने धुमाकूळ घातलेला असतानाच, टाळेबंदीमध्ये अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर अनेकांची वेतनकपात झाली आहे. अशातच नवीन नोकरीसाठी इंटरनेटवर माहिती देणाऱ्या तीन कोटी नागरिकांची माहिती डार्क नेट या वेबसाइटने लीक केल्याचे समोर आले होते. नोकरीसाठी अनेक बनावट तसेच हुबेहूब वेबसाइट असून, या वेबसाइटवर अनेक जण त्यांची माहिती अपलोड करतात. यामध्ये शिक्षण, वैयक्तिक माहिती, फोन क्रमांक, कागदपत्रे यांची माहिती होती, डार्क नेट ही माहिती इतरांना विकत असल्याने, पोलिसांनी यामागील मास्टरमाइंडचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी अमेरिकन राष्ट्रपतीच्या निवडणुकीत केम्ब्रिज ॲनालिटीकने डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी करण्यासाठी अनेक अमेरिकन नागरिकांचा डेटा लीक करीत, ट्रम्प यांना पूरक वातावरणनिर्मिती केली होती. अमेरिकेसारख्या महासत्तेकडेही डार्कनेटचा तोड अद्याप नाही. सध्या अमली पदार्थांपासून अगदी शस्त्रांची खरेदी-विक्री या डार्क नेटच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे या डार्कनेटच्या आव्हानाचे तोड सुरक्षा यंत्रणांकडे असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशिक्षण व अद्ययावत यंत्राची उपलब्धता करण्याची आश्यकता आहे.

anish4un@gmail.com