डॉ. प्रल्हाद देशपांडे
ज्वलनशील वायूच्या दाहिनीत धडाडण्यार्या अग्निशिखा फार काळ दिसत नाहीत. बंद दरवाजाआड पार्थिव मूकपणाने अग्नीच्या स्वाधीन होत जाते. कवी द. भा. धामणस्कर यांनी आपल्या पूर्ण हयातीला असेच कवितेच्या स्वाधीन करून टाकलेले. अंत्यसंस्कार होण्याआधी ‘दभां’चा मुलगा अजित म्हणत होता, ‘आबा निसर्गकवी होते हे जाहीरच आहे. त्यांचे अंत्यविधी, निसर्गाला जवळचे म्हणजे कसे करावेत?’, ‘अर्थात, विद्युतदाहिनी, डिझेल किंवा एलपीजी वायुदाहिनी.’ मी सांगितलं.
आबांची आठवण आली की त्यांच्या ज्या कविता क्षणात आठवतात त्यांपैकी, ‘झाडे सत्तेवर आली की…’ ही कविता हट्टाने स्वत:ला पुढे करते.
उद्या झाडे सत्तेवर आली की तीही तोडलेल्या माणसांची हाडे अशीच उघड्यावर रचून ठेवतील;
खुनाच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्याची कला झाडेही आत्मसात करतील…
अशा या ओळी केवळ पर्यावरण आणि मानवनिर्मित निसर्गविनाशाची दवंडी देत नाहीत तर माणसाच्या आत्मघाती विकासावरच्या कवितिक विधानाची नोंद करतात.
प्रस्तुत लेखाच्या मर्यादेच्या पल्याड असलेलं असं खूप काही धामणस्करांच्या कवितेत आहे आणि त्यांच्या व्यक्तित्वातही शिगोशिग भरून होतं. रक्ताच्या नात्यांनी आणि कवितेने चाहत्यांनी त्यांना बहाल केलेलं ‘आबा’ हे लाडकं संबोधन. आबांशी हितगुज करताना एकदा ते म्हणाले, ‘देवाने मला रक्ताच्या नात्यांचं एक कुटुंब दिलंय आणि कवितेमुळे मला तुमच्यासारख्या कवींच्या नात्यांचं अजून एक कुटुंब मिळालं.’
वयाच्या ऐन पौगंडावस्थेत पहिली कविता लिहिल्यावर पुढली पंधरा वर्ष, ‘मनासारखी कविता’ सापडण्याची वाट पाहणार्या या कवीच्या संयमशीलतेला सामान्य, अधीर कवींनी सलाम करावा.
‘कविता’, ‘सत्यकथा’, ‘हंस’, ‘कविता रती’, ‘अनुष्टुभ’, ‘मौज’, ‘दीपावली’ अशा नामांकित प्रकाशनांमधून मुशाफिरी होऊनही धामणस्करांच्या संयमाने त्यांना संग्रह प्रकाशित करण्याच्या घाईत लोटलं नाही. पहिला-वहिला, ‘प्राक्तनाचे संदर्भ’ संग्रहाचे बाड अनोळखी प्रकाशकाच्या टेबलावरून उचलून मौजेच्या टेबलावर नेऊन ठेवण्याचा लाघवी तरीही अनाग्रही हेका धामणस्कर करू जाणोत. या संकोची स्वभावामुळेच की काय त्यांचे तिन्ही संग्रह १५-२० वर्षांच्या अंतराने रसिकांच्या भेटीस आले.
‘प्राक्तनाचे संदर्भ’मधल्या ‘हस्तांतर’ कवितेने तर या कवीला, देशातल्या पाच विविध भाषांतल्या रसिकांत नेऊन ठेवलं.
या पहिल्याच संग्रहातल्या ‘पोर वयात’, ‘हस्तांतर’, ‘झाडे सत्तेवर आली की’, ‘फुलांच्या कविता’ अशा कवितांनी धामणस्कर हे नाव करुणा, जीवनाप्रति कळवळा आणि निसर्गातल्या चैतन्याविषयी अपार ओढ अशा काव्यगुणांचं या कवीशी असलेलं नातं दृढ केलं. नंतर, यथावकाश प्रकाशित झालेल्या, ‘बरेच काही उगवून आलेले’ आणि वयाच्या नवव्या दशकात आलेल्या ‘भरून आलेले आकाश’ या संग्रहातल्या कवितांनी धामणस्कर हे नाव मराठी कवितेच्या क्षितिजावर अढळ करून ठेवलं.
जगण्यातल्या चैतन्य शक्तीवरचा गाढ विश्वास, मानवी भावभावनांना स्वत:च्या स्नेहमयी दृष्टीने टिपण्याची अमोघ कुशलता, हे कौशल्य साजूक शब्दांमध्ये उतरवण्याची हातोटी आणि अल्पाक्षरात रसिकाच्या मनाला साद घालणारी शैली या गुणांनी सजलेल्या या कवितेने संवेदनशील रसिकांना कवेत घेतलं.
‘बरेच काही…’ संग्रहात ‘कंदील विकणारी मुले’, ‘अनंताचे फूल’, ‘मी चराचराशी निगडित’, ‘नवी पालवी’, ‘साधना’ अशा हळुवार आशयाच्या कवितांनी या कवीच्या तरल प्रतिभेचा जिव्हाळायुक्त आविष्कार घडवला. वाचक अशा कविता परस्परांना ऐकवताना त्या कविता आपल्या स्वत:च्याच असल्यागत वागतात ही खरी या कवितेला मिळालेली हृद्य दाद असते.
२०१६ साली, कवीच्या वयाच्या ८६ व्या वर्षी ‘भरून आलेले आकाश’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला तेव्हा या कवीचे वाचक कवितेची वाट पाहत तिष्ठत होतेच. ‘फुलांचं जिणं’ या पहिल्या कवितेपासून ते ‘सूर्यास्तानंतर’ या अखेरच्या कवितेपर्यंत रसिक वाचक,
‘सूर्यास्तानंतरचे आकाश आपले नाही हे
फारच उशिरा ध्यानी आलेल्या
दिङ्मूढ पक्ष्यासारखा मी…’
या ओळींना गाठेस्तोवर, संग्रह हातातून सोडत नाही.
अशा या कवी धामणस्करांना कुणी डोंबिवलीचे कुसुमाग्रज म्हणो, कुणी या नगरीचे काव्यपितामह म्हणो, तर कुणी त्यांना काव्यमहर्षी म्हणो. आबा हे आपल्या स्वत:च्या काव्यनिर्मितीइतकेच मराठी भाषेत कविता लिहिणार्या संत तुकारामाच्या अभंगापासून ते महाराष्ट्राच्या कोपर्यात, चांगली कविता लिहिणार्या पोरसवदा कवीच्या कवितेतही तितक्याच तन्मयतेने रमलेले असायचे. आवडलेल्या प्रत्येक कवितेच्या, लेखाच्या निर्मात्याचा संपर्क शोधून त्याला, सुवाच्य अक्षरात, आवर्जून कौतुकपर प्रतिक्रिया कळवायचे. केवळ आपल्या ममतेने, आश्वासक शाबासकीने कवी घडवणारा आबा ही कदाचित एकमेव असामी असावी.
कवितेबाबतची आबांची मतं नर्म भाषेतली असूनही त्यांत सुप्त दाहकता समजूतदार नवख्याला जाणवे. ‘कवी कितीही थोर असो, त्याच्या संग्रहातल्या एकूण कवितांपैकी काही मोजक्याच कविता अस्सल असतात. बाकीच्या केवळ पानपूरक.’ असं मत व्यक्त करणार्या आबांच्या तीनही संग्रहातली प्रत्येक कविता थांबून थांबून वाचावी लागते आणि याविषयी आबा कधीच प्रौढी मिरवताना दिसणार नाहीत.
आबांना एकदा भेटून गेलेली व्यक्ती भारावून गेल्याविना परतत नाही याचा अनुभव ठायी ठायी यायचा. गॉसिप या प्रकाराला आबा मोठ्या खुबीने बगल द्यायचे. समोरच्याने एखाद्याबद्दलचा कोणताही दोष आबांना सांगितला की, ‘पण, त्यांची साहित्यिक जाण घेण्यासारखी आहे.’ म्हणत आबा विषय बदलायचे.
तुकाराम, कुसुमाग्रज, बोरकर, अनिल, इंदिरा संत, शंकर वैद्य, विंदा असे तालेवार कवी तर आबांना मुखोद्गत होतेच पण, एखाद्या नवोदिताच्या, त्यांना भावलेल्या ओळीही ते स्मरणात राखून उद्धृत करीत असत. ‘हा कवी नवीन असला तरी प्रॉमिसिंग आहे. जरूर वाचा.’ असं ते सांगत तेव्हा त्या कवितेबाबत आपली निराशा होणार नाही याची ऐकणार्याला पूर्ण खात्री असायची.
ओशो, जे. कृष्णमूर्ती, इमर्सन अशा विचारवंतांची त्यांनी उद्धृत केलेली कोटेशन्स म्हणजे आबांच्या ओठावर तरळणारी उद्बोधक सायच जणू. ‘द अर्थ लाफ्स इन फ्लावर्स’ या इमर्सनच्या सुभाषितांचा आविष्कार आबांच्या एकूणच कवितेतून झालेला आपल्याला दिसेल.
तिच्या केसांत अनंताचे फूल आहे
म्हणजे तिच्या अंगणात अनंताचे झाड असणार
या विचाराने मी अंतर्बाह्य मोहरून जातो.
अशी कमाल सौंदर्यदृष्टी लाभलेल्या या कवीच्या प्रतिभेने वाचक शहारून जातो. बालकवी, इंदिरा संत आणि नलेश पाटील यांच्या मालिकेत मराठीतला सर्वात मोहक निसर्गकवी कोण असा विचार करता द. भा. धामणस्कर हेच नाव आपल्या नजरेसमोर येतं.
दिशा हरवलेल्या आजच्या काळाला ज्या निरामयतेची आवश्यकता आहे, ज्या सा्त्विवक दिलाशाची निकड आहे तीच निरामय आणि सा्त्विवक प्रभा द. भा. धामणस्कर या विभूतीसोबत अनंताच्या मार्गावर प्रस्थान करती झाली. त्यांच्या कवितेतील ‘महामूर’, ‘निवळशंख’ अशांसारखी विशेषणे यापुढे कवितेमधून विखुरलेली दिसणार नाहीत.
काळाने आपल्या खुणा शरीरावर कोरायला सुरुवात केली आणि त्यामुळेच, हल्ली हल्ली उतारवयानुसार आबांच्या भटकंतीवर मर्यादा आल्या तरीही त्यांच्या घरी जाऊन भेटण्यासाठी जाणार्या चाहत्यांसाठी ही भेट म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाच्या विटेला स्पर्श करण्याइतकंच पावन कृत्य असायचं.
कवितालेखन म्हणजे आपला श्वास मानणार्या धामणस्करांना, श्री. पु. भागवत, राम पटवर्धन, शंकर वैद्य, पाडगावकर, विंदा, गुरुनाथ सामंत, परेन जांभळे, नारायण लाळे, अरुण म्हात्रे, रविप्रकाश कुलकर्णी, हेमंत जोगळेकर असे अनेक कवी म्हणजे ‘आपलं जगणं सोपं करणारे…’ सुहृद वाटायचे इतकी या कवीच्या मनाची ऋजुता सा्त्विवक होती.
धामणस्करांच्या अंत्ययात्रेप्रसंगी त्यांच्या चाहत्या शिष्यांनी आपल्या गुरुतुल्य कवीच्या कवितांचं वाचन करतच स्मृतिवंदना दिली.
कवी प्रवीण दामले याने जी प्रार्थना सादर केली त्याचे सार… ‘तुझ्या भविष्यातील ध्येय, कर्म आणि ध्येयसूत्रासाठी निसर्गाशी समरूप होण्याकरिता आम्ही आमच्या सार्या सदिच्छा आपणाला देत आहोत.’ हे होतं, त्यापेक्षा उचित अशी कोणती श्रद्धांजली आबांएवढ्या थोर कवीला द्यावी…!
आबांच्याच एका कवितेतील एक तहानलेले पाखरू पाण्याशी जाताना त्याला ज्या मानवाची धास्ती वाटत होती तोच महामानव आज, पाखराच्या मनातील भीती दूर करण्यासाठी स्वत:च आकाश होऊन गेला की काय असे वाटत राहते.
drpralhadd@gmail.com
