scorecardresearch

Premium

डीजेपलीकडच्या अदृश्य भिंती..

गणपती विसर्जन होऊन काहीच दिवस झाले आहेत. मिरवणुकीचा सगळा गलका, गोंधळ मागे पडला आहे आणि आपण निवांत झालो आहोत.

lekh3 band sound
डीजेपलीकडच्या अदृश्य भिंती..

डॉ. आशुतोष जावडेकर

आपण एकदाही खाली जाऊन कोपऱ्यावरच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांशी सहज संवाद साधणार नसू, तर त्यांनी आपली शांततेची गरज समजून घ्यावी, ही अपेक्षा पूर्ण होणार नाही..

Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन

गणपती विसर्जन होऊन काहीच दिवस झाले आहेत. मिरवणुकीचा सगळा गलका, गोंधळ मागे पडला आहे आणि आपण निवांत झालो आहोत. थोडय़ाच दिवसांत नवरात्र येईल आणि अनेक गावांमध्ये पुन्हा डीजेची भिंत उभारली जाईल. पुन्हा अनेक बुद्धिजीवी उत्साहात ध्वनिप्रदूषण, डीजे भिंत, उत्सव हवेत की नाही, कोणत्या धर्मात काय आहे, सरकार काय करत आहे याविषयी फेसबुकवर भल्या मोठय़ा पोस्ट लिहितील. दहाव्या मजल्यावरच्या मोठय़ा फ्लॅटमधून ट्विटरवर सरावाने टोमणे मारणारी वाक्ये लिहीत राहतील. मग एक मोठी सामसूम होईल आणि पुढच्या वर्षी गणपतीचे दिवस जवळ आले, ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू झाला की या साऱ्याची पुनरावृत्ती होईल. पण सध्याचं चित्र पाहता, असं वाटतं की मिरवणुकीत गुलालाऐवजी रक्ताचे सडे पडण्याचे दिवस फार लांब राहिलेले नाहीत! माझा वावर उदाहरणार्थ दहावा मजला आणि खालचा टपरीवाला अशा दोन्हीकडे असल्याने माझ्या मनात धोक्याची घंटा वाजते आहे आणि म्हणून अस्वस्थ होऊन काही लिहावंसं वाटलं..

ढोल-ताशे हा उत्सव आहे, डीजेची भिंत हा उन्माद आहे. डीजे भिंतीवर बंदी आलीच पाहिजे. ढोल- ताशाच्या आवाजाने काचा फुटणार नाहीत. तो मर्यादित ध्वनिलहरींचा नाद आहे. त्यात समूह संगीताची शिस्त आहे आणि नादांची अनेक सकारात्मक आंदोलनं देखील.. पण आता ढोल ताशेही कर्कश वाटू शकतात. महिनाभर रोज घराशेजारी सराव चालणार असेल तर त्या संगीताविषयी पराकोटीचा संताप निर्माण होणंदेखील स्वाभाविक आहे. पण तरी मूलभूत फरक लक्षात घ्या. ढोल-ताशा हे संगीत आहे. शिस्तबद्ध तालात चाललेलं. आणि डीजे भिंत हा केवळ कर्कश गलका आहे.

कर्कश म्हणजे नक्की काय?

 बहिरेपणा आणण्याची शक्यता असलेली आवाजाची पातळी नको असलेले आवाज संख्याशास्त्रीय घटिते- जिथे आवाजाची आंदोलने विस्कळीत आणि बेशिस्त असतात. (Keizer 2010;  Hainge 2013) माझा इलेक्ट्रॉनिक संगीताला अजिबात विरोध नाही. पण मिरवणुकीत ज्या डीजेच्या भिंती आहेत त्या मुळात संगीत उत्पन्नच करत नाहीत. हे वरचे कर्कशतेचे तिन्ही निकष त्या पूर्ण करतात. त्यामुळे डीजेच्या भिंतींवर कायदेशीर बंदी यायला हवी.

त्या भिंतीसमोर एवढी माणसं आनंदात का नाचत असतात? त्यांचे कान फुटत कसे नाहीत? कोण असतात ही माणसं? आपण मनातून अव्हेरलेली, नाकारलेली, समोर आली तर आपण ज्यांच्याशी सहज म्हणूनही हसत नाही, ती ही माणसं असतात. ती बेदम नाचत असतात. जणू ती पांढरपेशा समाजाला सांगतात, ‘दोन दिवसांनी आम्ही इथे गाडीचालक असू, पण आज रस्ता आमचा आहे. बस! तुम्ही कलटी मारा. आम्ही रस्ता अडवणार, उपभोगणार. हो, आम्ही दारूही पिणार. तुम्ही नाही जात पबमधे नाचायला, दारू प्यायला? आम्हाला ते नाही परवडत म्हणून आम्ही इथे दंगा घालणार. आणि हो, देव आमचा आहे. १० दिवस सगळं रीतीने, शिस्तीने केलंय. आता थोडा दंगा चालतो.’

मार्क्‍सचा वर्गसंघर्षच आहे हा. भारतीय वर्गसंघर्ष हा धर्माच्या अफूच्या गोळीतूनच जातो हे काही मार्क्‍स साहेबांनी कल्पिलेलं नसणार. पण स्पिरिट तेच आहे. आणि वर्षांगणिक हा संघर्ष वाढत आहे. माणसं अधिकाधिक दंगा घालणार, कारण ती अधिकाधिक पिचली आहेत. युवाल नोआह हरारीने सांगितलेलं श्रीमंत अधिक श्रीमंत होण्याचं, गरीब अधिक गरीब होण्याचं भाकीत आत्ताच खरं ठरू लागलं आहे. पण हा बघा माझ्यासमोर मिरवणुकीत पोरगा नाचतोय. तर्र्र झालाय. शुद्ध नाहीच! नुसती दारू घेतली आहे की एखादं ड्रग, कळत नाही. विशीचा कोवळा मुलगा आता रस्त्याच्या कडेला जाऊन ओकतोय. एका रिक्षात झोकून देतोय मग स्वत:ला. हे हरवणं मला अस्वस्थ करतं. हा विशीतला वर्गसंघर्ष नाही, नुसती मस्तीदेखील नाही- एक निर्थक दैहिक कोलाहल आहे इथे. व्यसनांचे- ज्यात नुसती सिगारेट, दारू नव्हे तर ड्रग्ज आहेत- मिरवणुकीत त्याचे प्रमाण ज्या झपाटय़ाने वाढत चालले आहे, ती समाजासाठी फारच मोठी धोक्याची घंटा आहे. कारण व्यसनाने जबाबदार माणसाचादेखील तोल जातो.

घट्ट आधाराचा काठ या पिढीला कोणीच देत नाही का? समाज? माध्यमं? ओटीटी? तरुण जे नित्य पाहतात ते पॉर्न? नक्की काय काय ओकायचं आहे बाहेर, म्हणून व्यसनं करावी लागतात. किती करुण आहे हे! आणि प्रचंड अस्वस्थ करणारं.. आपल्या इथे व्यसनमुक्तीसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांनी पुढच्या वर्षी गणपती आधी महिनाभर एकत्रित येऊन समाज प्रबोधनासाठी कार्यक्रम हाती घ्यायला हवेत. मला भारतीय तरुणांविषयी एक खात्री आहे. त्यांना त्यांच्या भाषेत मुद्दा समजावून सांगितला तर ते ऐकतात. बदल घडतात.

अनेकदा पोस्टी पडतात, ‘हे साले उत्सव नकोतच. किती वैताग आहे यु नो गणपती डेज् म्हणजे?- दादर ते बँड्रा पोचायला तासभर लागतोय..’ वगैरे. नुसते अभिजन, लब्धप्रतिष्ठित! जाऊ द्या, समाजात उत्सव हवा ही कल्पनाच अनेक विचारवंत मंडळींना पटत नाही. प्रतीके आणि उत्सव याने समाज नुसता बांधून राहतो असं नाही, तर एक सेफ्टी व्हॉल्व म्हणून देखील सुरक्षित राहतो, हे या मंडळींना माहीत नसतं. आताचं समाजकारण- राजकारण बघता त्यांना ही उत्सवप्रियता काहीशी सक्तीने पटवून घ्यावी लागते आणि मग या अशा गमतीशीर पोस्ट पडत राहतात.

उत्सव आणि उन्माद यातली सीमारेषा आधीही पुसट होती. आता नाहीशीच झाली आहे, पण उन्माद नको म्हणून उत्सवच नको ही भूमिका बालिश आहे. यातून सामाजिक मनाचा अपुरा अभ्यास डोकावतो. दुसरीकडे ‘आमचा धर्म, आमचा उत्सव आणि आमचा १२० डेसिबलचा गोंगाट यावर कोणी काही बोलायचं नाही,’ ही वृत्तीदेखील समाजाच्या स्वास्थ्यासाठी घातकच आहे. हट्टी, आक्रमक. यांच्या पोस्टचा आवाज देखील १२० हट्र्झ निघायचा!

चिकित्सा हवीच! ती नसली तर समाज संपलाच. राजकारणावर देखील खूप बोललं, ऐकलं गेलं या काळात. हे सगळं शिंदे सरकारमुळे कसं झालं आहे, वगैरे. हे मुख्यमंत्री थेट गणपती मंडळांमध्ये भेटीला जातात, रस्त्यात गाडी थांबवून पुण्यात सहज वडापाव खातात हे मला चांगलं वाटलं. अखेर तिथेच कार्यकर्ते आहेत. (आणि तुम्हाला आवडो न आवडो, तेच अखेर उदाहरणार्थ तुमच्या गल्लीत एक दिवस आधार कार्डचा कॅम्प घेतात.) पण त्याच वेळी उत्सवासाठी दंगा करायला जी मुभा देऊ केली आहे, ती योग्य नव्हे. नेत्याने समाजाला प्रेम द्यावं लागतं तसा योग्य वेळी धाकही दाखवावा लागतो!

एक लक्षात घेऊया, नुसतं सरकार काही घडवत- बिघडवत नसतं. समाजाची आपली एक गती असते. तीच अनेक गोष्टी ठरवते. सध्या ती गती उन्मादी आहे. आपल्याला उत्सव आणि आनंद हे समीकरण पुन्हा हवं असेल, तर अखेर आपण सशक्त पर्याय निर्माण केले पाहिजेत. नुसत्या पोस्ट टाकून काय होणार आहे!

आपल्या वर्गीय धारणा अधिकाधिक घट्ट होणार असतील तर कशातच सुधारणा होणं अशक्य वाटतं. आपण एकदाही खाली जाऊन कोपऱ्यावरच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांशी सहज संवाद साधणार नसू तर त्यांनी आपली शांततेची गरज समजून घ्यावी, ही अपेक्षा पूर्ण होणार नाही. तुम्ही डॉक्टर, वकील, अगदी इंटिरियर डिझायनर असाल, तर एखाद्या मंडळात दोन दिवस मोफत सेवा द्या. शिक्षक असाल तर कार्यकर्त्यांच्या मुलांसाठी उदाहरणार्थ इंग्रजीचा सराव वर्ग घ्या. तुम्ही ‘इन्स्टा’वर चांगले डान्स रील करत असाल तर मंडळातल्या मुलांना छान स्टेप शिकवा ढोलाच्या तालावर. का नाही? तुम्ही अगदी नास्तिक असाल तरी कधीतरी कोपऱ्यावर असलेल्या मंडळात आरतीसाठी जा. सगळय़ांसाठी प्रसाद घेऊन जा. एखादं गणपती मंडळ हे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी भरलेलं असेल म्हणून सगळी तशीच असतात हे म्हणणं वेडेपणाचं ठरेल.

भिंत उभी आहे, ती फक्त डीजेची नव्हे, तर ती आर्थिक, सामाजिक विषमतेची देखील आहे. आपल्याला कदाचित ती विषमता भरून काढता येणार नाही, पण आपण इतरांशी संवाद साधणं, इतरांना माणूस म्हणून समजून घेणं हेदेखील फार महत्त्वाचं असतं. ते करूया. पालकांनो, नुसत्या सोसायटीतील गणपतीत तुमच्या मुलांना अडकवू नका. ती ‘गेटेड कम्युनिटी’ची भिंत तुमच्या अपत्याला समृद्ध न करता कमकुवत करणार आहे. ते बाहेरचं जग बऱ्या- बुऱ्या रूपात तुमच्या अपत्याला भेटणार आहेच.

गणेश चतुर्थीचा दिवस.. शाळकरी लेकीला दुचाकीवर मागे बसवून गावात गेलो. चौकात मुला मुलींचं एकत्र पथक होतं. सुंदर वेशभूषा होती. शिस्तीत ढोल- ताशा वाजत होता. एक तरणा मुलगा झेंडा उंच नाचवत होता. तितक्यात एक तरुणी सर्रकन गोलात आली, तिने तो ध्वज त्या मुलाकडून घेतला आणि ढोलाच्या नादात उंच उंच न्यायला सुरुवात केली. मी माझ्या लेकीकडे वळून पाहिलं. ती त्या तरुणीकडे टक लावून कौतुकाने, कुतूहलाने पाहत होती. झेंडा डौलात वर वर जात होता आणि त्याच्याही वर विस्तारलेलं आभाळ होतं, जिथे कुठलीच भिंत नव्हती. होती ती निळी शक्ती, स्वच्छ ऊर्जा- बहुधा गणपतीसारखीच!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dj in the circle with activists ganapati immersion of the procession ysh

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×