रवींद्र पाथरे

अभिनेते प्रशांत दामले यांच्या विक्रमी १२५०० व्या प्रयोगाच्या देवदुर्लभ सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी रसिकांकडून करण्यात आली आणि त्या मागणीस उपमुख्यमंत्र्यांनी लगोलग प्रतिसाद देत त्यांच्या नावाची शिफारस करण्याचे मान्य केले. परंतु अशा तऱ्हेने सन्मानाची मागणी करण्याची वेळ सर्जनशील कलावंतांबाबत मुळात का यावी, हा प्रश्न संवेदनशील रसिक व कलावंतांनाही आजवर पडत आलेला आहे… विशेषत: महाराष्ट्रीय कलावंतांना! राष्ट्रीय सन्मानासाठी कलावंतांचे कर्तृत्वच पुरेसे नाही का, हा सवालही त्यात अध्याहृत आहे.

supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?

प्रशांत दामले यांच्यासारख्या रसिकप्रिय कलाकाराच्या बाबतीत अशी लोकाग्रही मागणी करावी लागत असेल तर जे प्रसिद्धीपराङ्मुख सर्जनशील कलावंत आहेत, त्यांना तर कसली अपेक्षाच करायला नको अशीच सद्य:स्थिती आहे. याची वानवळादाखल बरीच उदाहरणे आहेत. नाटककार रत्नाकर मतकरी, बुजुर्ग अभिनेते व निर्माते भालचंद्र पेंढारकर, ‘आविष्कार’चे अरुण काकडे, ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळायला वयाच्या मावळतीची किरणे दिसावी लागली, यापरते दुर्दैव ते दुसरे काय असावे? याच्या अगदी उलट काही वर्षांपूर्वी एका अभिनेत्रीला तितकेसे कर्तृत्व नसतानाही ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आली होती. ‘बॉलिवूडच्या सिनेमांतून निर्बुद्ध करमणूक करणाऱ्या सामान्य वकुबाच्या कलाकारांना एकीकडे चणेफुटाण्यांसारखी ‘पद्मश्री’ वाटणाऱ्यांना महाराष्ट्रातील खऱ्याखुऱ्या प्रतिभावंत कलाकारांची दखल राष्ट्रीय पुरस्कारांनी आणि सन्मानांनी घ्यावी असे कधीच वाटू नये,’ याबद्दल अनेक कलावंत उद्वेगाने खंत व्यक्त करीत असतात.

निव्वळ मराठी रंगभूमीचा विचार केला तरी नाटककार महेश एलकुंचवार, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासारख्या दिग्गजांनाही अद्याप पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही. एवढेच नव्हे तर कर्तबगारीची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करूनही दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, नाटककार प्रेमानंद गज्वी, नाटककार प्रशांत दळवी, रंगकर्मी अतुल पेठे यांच्यासारख्या अनेकांना अद्याप संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनीदेखील सन्मानित करण्यात आलेले नाही… तिथे ‘पद्म’ पुरस्कार तर दूरच! या मंडळींचे सिनेमा, दूरचित्रवाणी मालिका, साहित्य, सामाजिक बांधिलकी या क्षेत्रांतील योगदानही लक्षणीय आहे.

हेच कशाला, ‘वाडा चिरेबंदी’ त्रिनाट्यधारा समांतर आणि व्यावसायिक अशा दोन्ही रंगभूमीवर ताकदीने सादर करणाऱ्या, तसेच सत्तरपेक्षाही जास्त आशयघन, वैविध्यपूर्ण नाटके निरनिराळ्या रंगप्रवाहांतून सादर करणाऱ्या चंद्रकांत कुलकर्णी यांच्या नाट्यकृती राष्ट्रीय नाट्यमहोत्सवांतून आजतागायत सन्मानपूर्वक पाचारण केल्या गेलेल्या नाहीत, यापेक्षा महाराष्ट्राच्या सर्जनशीलतेची दुसरी उपेक्षा ती काय असू शकते?

या उपेक्षेमागे राष्ट्रीय स्तरावर अशा संस्थांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची ‘पहुँच’ तरी कमी पडत असावी किंवा त्यांची जाण तरी कमी पडत असावी असा संशय घ्यायला जागा आहे. किंवा मग इतर प्रांतीयांच्या तुलनेत त्यांचे वजन कमी पडत असावे. त्याचबरोबर राज्य सरकारनेदेखील आपपरभाव बाजूला ठेवून अशा कर्तृत्ववानांच्या नावांची, त्यांच्या उत्तम कलाकृतींची राष्ट्रीय सन्मानांसाठी शिफारस करणेही गरजेचे असते. पण तिथेही ‘आपला’ आणि ‘तुपला’ असा भेदभाव होत असल्याने किंवा त्यांच्यापर्यंत असे कलाकार संपर्क दुव्याअभावी ‘पोहोचत’च नसल्याने ज्यांचे त्यांच्याशी लागेबांधे असतात असे कलाकारच पुरस्कारांचे, मानसन्मानांचे धनी होतात. मग त्यांचे कर्तब त्या योग्यतेचे असो वा नसो… हाच आजवरचा अनुभव आहे. तशात व्यवस्थेच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या, आपल्यापेक्षा (सरकारपेक्षा) भिन्न विचारांच्या कलावंतांना तर राष्ट्रीय सन्मानांच्या बाबतीत खड्यासारखे बाजूलाच सारले जाते.

हे कलावंतही अशा पुरस्कारांबद्दल ‘उदासीन’ असतात. आपले सर्जनाचे काम प्रामाणिकपणे करत राहणे एवढेच ते जाणतात. पण लोकशाही सरकारने त्यांची, त्यांच्या कामाची उचित बूज राखणे हे त्यांचे कर्तव्य नाही का, असा प्रश्न नाट्यवर्तुळात नेहमी विचारला जातो.

प्रशांत दामले सन्मान सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही ही खंत बोलून दाखवली. ‘परदेशांत कलावंतांची योग्य ती कदर केली जाते. त्यांच्याबद्दल लोकांना आणि शासनकत्र्यांनाही आत्मीयता असते. रोम विमानतळाला लिओनार्दो द विंचीचे नाव दिले गेल्याचे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. पण आपल्या इथे मात्र मोहम्मद रफी ‘चौक’च तेवढा असतो. कुठल्या तरी गल्लीबोळातील रस्त्याला कलावंतांची नावे दिली जातात… तीही क्वचित. संगीत, कला, नाटक, सिनेमा, साहित्य अशा विविध क्षेत्रांतील प्रतिभावंत आपल्या सर्जनशीलतेने रसिकांना गुंगवून, गुंतवून ठेवतात म्हणून… अन्यथा या देशात अराजक माजले असते,’ हे त्यांचे उद्गारही बरेच काही सांगून जाणारे आहेत.

(लेखक ज्येष्ठ नाट्यसमीक्षक आहेत)