डॉ. सत्यजित शिवलिंगराव
डोंबिवलीतील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांना झालेल्या मारहाणीची घटना पाहून कोणत्याही संवेदनशील माणसाच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. या रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि एनआयसीयुमध्ये खाट उपलब्ध नसल्यामुळे तिथे प्रसूतिसाठी आलेल्या एका गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्या गर्भवतीची अवस्था काहीशी गंभीर असल्याचे सांगितले जाते.
रुग्णालयात दाखल करून घेतले जात नसल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी त्यांच्या वॉर्डाच्या नगरसेवकांशी संपर्क साधून मदत मागितली. इथपऱ्यंत सगळे ठीक सुरू होते. पण त्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे आपल्या समर्थकांसह रुग्णालयात जणू काही ‘रॉबिन हूड’ बनून पोहोचले आणि डॉक्टर व कर्मचाऱ्यांना त्यांनी फिल्मी स्टाईलने मारहाण केली. एरवी त्यांच्या या मारामारीची दखलही घेतली असती का ही शंकाच आहे. पण जिथे हा प्रसंग घडला, तिथे सीसीटीव्ही असल्यामुळे त्यात सर्व प्रसंग चित्रित झाला आणि काय आणि कसे घडले ते पुरेसे स्पष्टपणे जगापुढे आले.
तसे पाहिले तर रमेश म्हात्रेंसमोर दुसरा पर्याय तरी कोणता उरला होता म्हणा. आजकाल शांतपणे विकासकामे करून प्रसिद्धी मिळत नाही. त्यासाठी कॅमेऱ्यासमोर स्टंटबाजी करावी लागते, आक्रमक चेहरा दाखवावा लागतो, व्हिडिओ आणि रिल्स काढून त्या व्हायरल कराव्या लागतात. कारण प्रसिद्धीशिवाय पुढची निवडणूक जिंकता येत नाही आणि केवळ पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचे दिवसही बहुधा संपत चालले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील खाटा आणि सुविधा वाढविण्यापेक्षा कॅमेऱ्यासमोर ‘जनतेचा तारणहार’ बनणे त्यांना अधिक सोयीचे वाटले असावे. थोडक्यात काय तर समस्या सुटली नाही तरी चालेल; पण स्टंट व्हायरल झाला पाहिजे!
येथे प्रश्न पडतोच की, सत्ताधुंद मुजोर गुंड रमेश म्हात्रे हा स्वतःला डोंबिवली (म्हात्रे संस्थान)चा राजा समजतो काय?, नगरसेवकपद म्हणजे शहराची जहागिरी मिळाल्याचे प्रमाणपत्र आहे काय?, लोकांनी मतदान केले म्हणजे डॉक्टरांच्या अंगावर हात उचलण्याचा, महिला कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्याचा आणि रुग्णालयात दहशत निर्माण करण्याचा परवाना मिळतो काय?
नगरसेवकाचे काम रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना मारणे नसते. रुग्णालयात एनआयसीयूत खाटा का नाहीत, आवश्यक उपकरणे का नाहीत, तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिका अपुऱ्या का आहेत, याचा जाब प्रशासनाला विचारणे हे त्यांचे काम असते. खरोखरच रुग्णांची काळजी असती, तर महापालिकेच्या सभागृहात आवाज उठविला असता, निधी मंजूर करून घेतला असता आणि आरोग्यव्यवस्थेतील त्रुटी दूर केल्या असत्या. पण व्यवस्था सुधारण्यासाठी बुद्धी, अभ्यास, नियोजन आणि सातत्य लागते; डॉक्टरांवर हात उचलण्यासाठी मात्र सत्तेचा माज आणि गुंड समर्थकांची गर्दी पुरेशी असते!
रमेश म्हात्रे काही काल-परवा राजकारणात आलेले नवखे लोकप्रतिनिधी नाहीत. ते अनेक वर्षांपासून त्या परिसराचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मग एवढ्या वर्षांत शास्त्रीनगर रुग्णालयात पुरेशा खाटा, एनआयसीयु, अत्यावश्यक उपकरणे आणि मनुष्यबळ का निर्माण झाले नाही? रुग्णाला खाटेअभावी दुसरीकडे पाठवावे लागत असेल, तर ते ड्युटीवरील डॉक्टरांचे नव्हे; वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या लोकप्रतिनिधीचे अपयश आहे. डॉक्टरांनी स्वतःच्या पगारातून एनआयसीयु उभारायचे काय? खिशातून व्हेंटिलेटर काढायचा काय? म्हात्रे यांनी डॉक्टरांना जाब विचारण्याआधी आरशात स्वतःला विचारायला हवे होते की, “इतकी वर्षे नगरसेवक राहून मी या रुग्णालयासाठी नेमके काय केले?, एनआयसीयुत खाटांच्या कमतरतेला जबाबदार कोण?” आणि स्वतःकडूनच खरे उत्तर मिळाल्यावर एक सणसणीत चपराक स्वतःच्याच मुस्काटीत हाणून घ्यायला पाहिजे होती.
सुविधा निर्माण करण्यात अपयशी ठरायचे आणि स्वतःच्या अपयशाचे खापर डॉक्टरांवर फोडून त्यांनाच मारहाण करायची, हा डॉक्टरांवरील संताप नाही; हा तर स्वतःचे अपयश झाकण्यासाठी केलेला सत्तेचा उन्मत्त स्टंट आहे.
या घटनेनंतर दोन डॉक्टरांनी नोकरी सोडल्याचे वृत्त आहे. म्हणजे एका राजकीय स्टंटमुळे सरकारी आरोग्यव्यवस्थेने दोन डॉक्टर गमावले आणि त्याची किंमत शेवटी गरीब रुग्णांनाच मोजावी लागणार आहे. विशेष म्हणजे ज्या म्हात्रेवर मारहाणीचा आरोप आहे, त्यांनाच छातीत दुखू लागल्यानंतर डॉक्टरांनीच उपचार दिले. एका बाजूला मार खाऊनही उपचार करणारा डॉक्टर आणि दुसऱ्या बाजूला पदाच्या माजावर डॉक्टरांवर हात उचलणारा लोकप्रतिनिधी या दोघांमधील संस्कारांचा फरकही महाराष्ट्राने आज स्पष्टपणे पाहिला!
drsatyajitibite@gmail.com
