प्रा. डॉ. दासू वैद्य

‘आधी सोवळ्यात ठेवलेलं शिक्षण आज आपण विकायला काढलं आहे.’ हे बाबा आढावांचं निरीक्षण समजावून घ्यावं लागेल. विनाअनुदान शिक्षणाची काय अवस्था आहे? वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळवायची असेल तर पन्नास लाख दक्षिणा मोजावी लागते. खासगी मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर व्हायचं असेल तर दोन कोटी रुपये मोजावे लागतात. या प्रकारात सर्वसामान्य विद्यार्थी असूच शकत नाही. शिवाय असे दक्षिणा गोळा करणारे संस्थाचालक शिक्षणसम्राट म्हणून समाजात राजरोस मिरवत असतात. मराठी साहित्यात शिक्षणाच्या अध:पतनाचं किती प्रतिबिंब उमटलं आहे? विनाअनुदान शिक्षणाचे वाभाडे काढणारं विजय तेंडुलकरांचं ‘पाहिजे जातीचे’ नाटक सोडलं तर थेट जाब विचारणारी साहित्यकृती का निर्माण झाली नाही? मराठी साहित्य व्यवहारात अधिक प्राध्यापक आहेत, म्हणून हा विषय जोर धरत नसेल का? अध:पतनाचं आपण समर्थन करतो आहोत काय? असे अनेक प्रश्न फेर धरतात.

sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
Sharad Pawar was given a clear speech by the Collector Office on the invitation of Namo Maha Rozgar Melava
… म्हणून शरद पवार यांना नमो महा रोजगार मेळाव्याचे निमंत्रण नाही; जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली ‘ही’ स्पष्टोक्ती
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !

भविष्याच्या काळजीमुळे आपण मुलांना इंग्रजी शाळेत भरती करतो. पण खेडोपाडी निघालेल्या इंग्रजी शाळेतील अध्यापनाची अवस्था चिंताजनक आहे. चांगल्या मराठी शाळा दुर्मीळ होतायत. कित्येक मराठी शाळा बंद पडतायत. ही इंग्रजी शाळेत शिकलेली मुलं मराठीपासून तुटतात आणि इंग्रजीतही पारंगत होत नाहीत. अधांतरी लटकणारी ही बहुतांश मुलं मराठी साहित्य वाचत नाहीत. मग उद्या मराठी साहित्याचा वाचक कोण असेल? याचा विचार होणे आवश्यक आहे.

‘भाषा मरता देशही मरतो

संस्कृतिचा मग दिवा विझे’

हा कुसुमाग्रजांचा इशारा आपण समजून घेऊन कृती केली पाहिजे. मराठी साहित्य वाचणारा शेजारच्या घरात जन्मावा असं म्हणून चालणार नाही.

मासिक तरतूद हवी, पुस्तकांसाठी!

एकूण आपल्या वाचनाबद्दलच चिंता करावी अशी बाब आहे. टीव्ही, मोबाइलमुळे आपली जीवनशैलीच बदलली. धर्माज्ञा असल्याप्रमाणे या माध्यमाचा आपल्यावर प्रभाव आहे. पाल्य पालकांचं ऐकत नाहीत पण त्यांचं अनुकरण करतात. अशा वेळी आई-वडील एखादं पुस्तक वाचतायत, पुस्तकावर चर्चा करतायत असं दृश्य मुलांनी कधी पाहिलेलंच नसतं. मग मुलं वाचनाकडे कशी वळतील. १८९६ साली शंकर वावीकर यांनी ‘वाचन’ नावाची पुस्तिका लिहिली होती. यातही शिक्षक, प्राध्यापक वर्ग वाचत नाही अशी नोंद केलेली आहे. आज तर सहा महिन्यांच्या लेकरानं खाद्य नीट खावं म्हणून त्याची आई त्याच्या पुढ्यात मोबाइल ठेवते. इथून तो प्रवास सुरू होतो. चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठीच आपला जन्म झाला असावा, अशी परिस्थिती आहे. माध्यम कुठलंच वाईट नसतं. त्याचा योग्य वापर करता यायला हवा. खरं तर संवादाची ही माध्यमं विचारपूर्वक वापरली तर विधायक आहेत. किती तरी ग्रंथ या माध्यमात उपलब्ध आहेत. पण वाचनाबद्दलची अनास्था वाढतेच आहे. अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचणं हे वाचन नव्हे. चौफेर वाचन ही सवय व्हायला हवी. आपल्या मासिक खर्चाच्या तरतुदीमधे पुस्तक खरेदीसाठी काही रक्कम नियोजित ठेवली जाईल, तो सुदिन असेल. हे जरा रोमॅन्टिक वाटलं तरी अशक्य नाही. आज आपण संवादासाठी हजारेक रुपयांची मासिक तरतूद (मोबाइल रिचार्ज) करतोच की.

समाजमाध्यमी कवितांचे पीक…

समाजमाध्यमावर लोक व्यक्त होतायत ही चांगली गोष्ट आहे. लेखक-कवींना मुक्त व्यासपीठ मिळालं. नाही तरी मराठी नियतकालिकांची स्थिती नेहमीच व्हेंटिलेटर लावल्यासारखीच असते. ‘सत्यकथा’ जुन्या काळात बंद पडलं असं म्हणताना आजच्या काळात कुठलं नियतकालिक सुस्थितीत आहे? वाङ्मयीन नियतकालिकाचे संपादक अंक चालवतानाचं रडगाणं ऐकवून थकले आहेत. दहा-अकरा कोटी मराठी माणसांत एक हजार पुस्तकांची आवृत्ती संपत नाही. नव्या लेखक-कवींना लिहिण्यासाठी व्यासपीठ नाही. उलट या समाजमाध्यमामुळे काही चांगले कवी-लेखक पुढेही आले. यातून काही वेळा ‘कुणीही उठून कविता लिहू लागलंय’ अशी कुजबुज ऐकू येतेय. पण कुणीही कविता का लिहू नये? लिहिणं-व्यक्त होणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, प्रत्येकाची गरज आहे. अर्थात प्रत्येक लिहिणारा महाकवी होत नसतो. पण अनेकांच्या लिहिण्यातून एक घुसळण होते. अशा काही शतकांच्या घुसळणीतून एखादा ज्ञानेश्वर, एखादा तुकाराम जन्माला येतो. त्यामुळे आपण ज्ञानेश्वर-तुकाराम नसलो तरी त्या दिंडीत चालणारे सर्जक आहोत ही भावनाही आनंददायी आहे. म्हणून प्रत्येकानं व्यक्त झालं पाहिजे. फक्त व्यक्त होताना जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. समाजमाध्यमावर संवादापेक्षा विसंवादच अधिक दिसतोय. द्वेष ओकला जातोय. किती खालच्या स्तराला जाऊन लोक व्यक्त होतायत. एकमेकाला रक्तबंबाळ करण्यात धन्यता मानतात.

‘कुणाला द्यायचंय प्रतिउत्तर

म्हणून शब्दांना धार लावत

बसलेत लोक घरोघर,

किती जन्मांचा गिळलाय द्वेष

जो ओकला जातोय

पायऱ्या पायऱ्यांवर’

समाजमाध्यमाचा दुसरा एक धोका आहे. त्याकडे आपले लक्ष मी वेधू इच्छितो. समाजमाध्यमामुळे कवींना मुक्त व्यासपीठ मिळालं. कविता उमटू लागल्या. छापणाऱ्यांची मक्तेदारी संपली. ‘लाइक’चा पाऊस पडू लागला. अंगठे दाखवले जाऊ लागले. वॉव, एक्सलंट, नाइस, ऑसम, व्हेरीगुड.. अशी प्रशस्ती मिळू लागली. पसंती देणारे सगळेच रसिक जाणकार नसतात. या ‘लाइक’ करण्यामध्ये बहुतांश वेळा गांभीर्य नसतं. पण आपल्या कवितेला चार-पाचशे लाइक्स मिळवलेला कवी सुखावून जातो. त्यातून खरी प्रतिक्रिया कळत नाही. कविता नाकारण्याचा तर प्रश्नच नाही. अशा वेळी कविता साभार परत येण्याचंही महत्त्व लक्षात येतं. कच्चं, अपरिपक्व लेखन प्रतिष्ठित होतंय याचा मोठा धोका असतोच. गोडगोड प्रतिक्रियांमुळे लिहित्या कवी-लेखकाचं नुकसानही होऊ शकतं. समाजमाध्यमावर मुक्त स्वातंत्र्य आहे. पण या स्वातंत्र्यात संभाव्य धोकाही लपलेला असतो. समाजमाध्यमावर वाट्टेल तशी, वाट्टेल तेव्हा कविता झळकवता येते. मनात आले तर नव्या छपाई तंत्रज्ञानातून आकर्षक पुस्तक छापता येते. वर्तमानपत्रे कौतुक छापायला तयार असतात. गल्लोगल्ली पुरस्कारही तयार असतात. हा मोहक प्रवास मनाला भुरळ पाडणारा आहे. इतर कलांमध्ये उमेदवारी नावाची पायरी असते. म्हणजे नर्तक व्हायचे असेल तर किमान बारा वर्षे साधना करावी लागते. मग त्या साधकाला रंगमंचावर सादरीकरणाची परवानगी गुरू देतात. संगीतातही टप्पे ओलांडत रियाज करावा लागतो. वेगवेगळ्या मैफलींत साथ-संगत करावी लागते. तेव्हा कुठं स्वतंत्रपणे गायची मुभा मिळते. कवितेत मात्र पहिली कविता लिहिली की ‘कविवर्य’ होता येतं. इथे रसिकांनी कवीवर (साहित्यिकावर) टाकलेला विश्वास म्हणावा का? पण या झटपट प्रसिद्धी देणाऱ्या माध्यमांचे धोके साहित्यिकाने जाणले पाहिजेत.

आज आपण तंत्रस्नेही झालो आहोत. ते महत्त्वाचंही आहे. मानवाने शेकडो वर्षांच्या रियाजाने स्मरणशक्ती, एकाग्रता, संयम, शोधक वृत्ती अशा क्षमता स्वतःमध्ये विकसित केल्या आहेत. पण गूगलच्या उपलब्धतेमुळे अनेक गोष्टी आपण विसरायला सुरुवात केली आहे. कारण कुठलीही माहिती बोटांच्या टोकावर उपलब्ध असताना लक्षात का ठेवायची. अनेक फोन नंबर पाठ असणारे आपण मोबाइल आल्यापासून स्वतःचा नंबर विसरायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. शोधक वृत्तीही कमी होत आहे. एकाग्रता तर विखंडित झाली आहेच. शेपटीचा वापर कमी होत गेल्यामुळे मानवाची शेपूट गळून गेली. तसं स्मरणशक्तीचं, एकाग्रतेचं झालं तर काय होईल? अशा प्रश्नांना पुढच्या काळात सामोरं जावं लागेल. साहित्यविचार म्हणजे माणसाला केंद्रस्थानी ठेवून केलेला जगण्याचा विचार असावा.

अभिजात भाषेचा दर्जा मिळेलही, पण…

आपण मराठी भाषक आहोत ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पण नुसताच अभिमान बाळगून कसं चालेल. मराठी भाषेसाठी नुसत्या घोषणा देऊन, रस्ता रोको करून भागणार नाही. मराठी भाषा व्यवहाराची भाषा करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न हवेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा. तो मिळेलही. पण तेवढ्यावर भागणार नाही. जोपर्यंत आपल्या भाषेवर आपण मनापासून प्रेम करणार नाही, तोपर्यंत ती खऱ्या अर्थाने गौरवीत होणार नाही. आपण मराठी साहित्य वाचतो का? मराठी पुस्तकं विकत घेतो का? मराठी नाटक-चित्रपट पाहतो का? मराठी गाणी ऐकतो का? आपण आपली स्वाक्षरी मराठीतून करतो का? आपल्या घरावरची नावाची पाटी मराठीत आहे का? आपण शक्य तिथे आवर्जून मराठी बोलतो का?… असे प्रश्न आपण स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे. अर्थात असं केलं म्हणजेच आपण मराठी आहोत असा अट्टहास नाही. पण अशा छोट्या छोट्या गोष्टींतून आपलं मराठीपण उजागर होऊ शकतं. मुख्य म्हणजे, भाषा वापरात असणं महत्त्वाचं आहे. सायकल सहा महिने न वापरता घरात नुसतीच ठेवून दिली तर, काही दिवसांनी तिच्या चाकातली हवा आपोआप कमी होते. धुळीनं, कोळिष्टकानं भरून जाते. गंजून जाते. हळूहळू निकामी होते. भाषेचं सायकलपेक्षा वेगळं नाही. संस्कृत भाषेचं उदाहरण आपल्यासमोर आहे. इंग्रजी शब्दकोशात दर दोन वर्षांनी नवनव्या शब्दांची भर घातली जाते. नवे शब्द शोधताना अनेक प्रादेशिक भाषांतील लोकप्रिय शब्द ‘ढापले’ जातात. उदाहरणार्थ जबरदस्त, गुरू, अण्णा, जुगाड, चमचा, फंडा, दादागिरी, सूर्यनमस्कार.. असे कितीतरी आपले शब्द आज इंग्रजी शब्दकोशात सुखेनैव विराजमान झाले आहेत. ते त्यांनी ढापले. आपल्याला अजून व्यावसायिक अभ्यासक्रम (मेडिकल, इंजिनीअरिंग, इ.) मराठी माध्यमातून सुरू करता आलेले नाहीत. निजामाच्या राजवटीत असे अभ्यासक्रम उर्दू माध्यमातून सुरू होते, ही उल्लेखनीय बाब आहे. त्यामुळे मराठी भाषेला शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला की सर्व प्रश्न संपून आनंदीआनंद होईल असे नाही.

भाषेसाठी आपल्याला गांभीर्याने काम करावे लागेल. माझा सूर जरा नकारात्मक वाटला तरी वास्तव मांडू पाहणारा आहे. चरितार्थासाठी अन्य भाषेचा सहारा घ्यावा लागला तरी आपली स्पंदनाची भाषा मराठी आहे, तोपर्यंत मायमराठीची चिंता नाही. पण व्यवहाराची भाषा मराठी होण्याकरिता आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. तशा प्रयत्नांचा भाग म्हणजे हे साहित्य संमेलन आहे. हे संमेलन फक्त एक उत्सव न राहता एक गरज बनेल असा विश्वास मी इथे व्यक्त करतो.