सामूहिक पातळीवर मानवी भूमिका घेणे आजही महत्त्वाचेच- पण तसे घडत नाही, तेव्हा एकट्यादुकट्याने केलेल्या प्रयत्नांचे महत्त्वही ऐतिहासिक मानले पाहिजे. धम्मचक्र प्रवर्तनाच्या ७० व्या वर्षी किंवा डॉ. आंबेडकरांच्या महाड सत्याग्रहाची, त्यांनीच स्थापलेल्या ‘समाज समता संघा’ची शताब्दी साजरी करताना भारतातल्या सवर्ण ‘सामुराईं’ची ही नोंद…

धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून १४ ऑक्टोबर १९५६ ही तारीख इतिहासात कोरली गेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो अनुयायांसह ७० वर्षांपूर्वी बुद्ध धम्म स्वीकारला. त्या तारखेस अशोक विजयादशमी होती, म्हणून आजही नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्या दिवशी लोक जमतात. त्यानिमित्ताने भारतातील प्रबोधनाला एका उंचीवर नेऊन ठेवणार्‍या या सम्यक भूमिका घेणार्‍या व्यक्तीच्या  स्मृती जागवणे महत्त्वाचे आहे.

इतिहास हा आपल्या मनासारखा कधीच नसतो. इतिहासाचं स्वरूप हे तत्कालीन कालखंडात मानवी व्यवहारांवर अवलंबून असतं. तत्कालीन कालखंडातील माणसाच्या वागण्या-बोलण्याचा परिणाम म्हणजे आजचा इतिहास. मानवी भूमिका घेणार्‍यांची नोंद सामाजिक इतिहासात होत असते. या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वातील चळवळीला एक वेगळे महत्त्व आहे. ही चळवळ शोषणाविरुद्धच्या आवाजांना बळकट करणारी आहे.

चळवळीच्या पायाभरणीची सुरुवात डॉ. आंबेडकरपूर्व कालखंडातील प्रबोधन काळाने केली. शिक्षण, आर्थिक स्वरूपातील मोबदला, स्वत:ला उन्नत करून घेण्यासाठी मिळालेला अवकाश या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषाचा उदय झाला. त्यांनी मानवमुक्तीचा लढा सर्वव्यापक स्तरावर नेला.

जात, धर्म व वंश यापलीकडे जाऊन मानवी भूमिका घेणार्‍या प्रत्येकाला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. पुरोगामी स्पृश्यांना त्यांनी कधी अव्हेरले नाही. याच समविचारी सहकार्‍यांना घेऊन मानवमुक्तीचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मानवमुक्तीचा लढा सुरू असताना ज्यांना शोषणाची परंपरा आहे, अशा समूहातील अनेकांनी शोषणाच्या परंपरेचे वाहक होणे नाकारले. अस्पृश्यांच्या प्रश्नांना माणसाचे प्रश्न समजून मानवी भूमिका घेतली. भारतातील अशा एकेकट्या सामुराईंचे अनेक संदर्भ आंबेडकरी चळवळीचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतात.

या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज यांनी अस्पृश्यांसाठी केलेले कार्य महत्त्वाचे आहे. भारतातील अस्पृश्यांमधील अनेक उपजातींनी या लढ्यात आपले योगदान दिले. उपजातींच्या भिंती तोडल्या. काही प्रमाणात आदिवासींनीसुद्धा हा लढा आपला मानला. सवर्ण सहकार्‍यांनीसुद्धा समाजाचा रोष पत्करून प्रसंगी जातिबहिष्कृतता, नातेवाईकांचा रोष पत्करून या लढ्यात योगदान दिले. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, प्रभू, भंडारी, मराठा इ. समाजांतील लोक दिसून येतात. त्यातही स्त्री आणि पुरुष अशा दोघांचा समावेश आहे. या समूहातील अगदी सर्वसामान्य लोकसुद्धा काही प्रमाणात या मानवी भूमिका घेताना दिसतात.

हे वर्ष महाडच्या चवदार तळ्याच्या संघर्षाचे (२० मार्च) शताब्दी वर्ष आहे, तसेच ४ सप्टेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला ‘समाज समता संघ’ या सामाजिक संस्थेचेही. या संस्थेचा मुख्य उद्देश सामाजिक समतेचा प्रसार करणे आणि जातिव्यवस्था नष्ट करणे हा होता. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात अस्पृश्य व सवर्ण सहकार्‍यांनी भाग घेतला. एखादा समूह ज्याचे वर्षानुवर्षे शोषण झाले आहे तो स्वत:च्या मुक्तीसाठी लढत असेल व ज्या समूहाने शोषण केले त्या समूहातील लोक त्या शोषण निर्मूलनाच्या बाजूने उभे राहत असतील तर ही गोष्ट प्रबोधन परंपरेला बळकटी देणारी असते.

जपानमधील सामुराई वर्गाने एटा/ हिनिन या समुदायाच्या बाबतीत शोषण संपवण्याची भूमिका घेतली होती. त्यांची ही भूमिका सार्वजनिक स्तरावर व सामूहिक होती. अशी भूमिका भारतातील अस्पृश्यांच्या बाबतीत सार्वजनिक व सामूहिक स्तरावर घेतली गेली नाही. ही भारतातील प्रबोधनाची शोकांतिका आहे; परंतु काहींनी मानवी भूमिका अस्पृश्यांच्या बाबतीत वैयक्तिक पातळीवर घेतल्या. ते या मानवी लढ्याचा भाग झाले. यात सुरबानाना टिपणीस, ना. म. जोशी, प्राचार्य म. भि. चिटणीस, चंद्रकांत धर्माधिकारी, आचार्य दादासाहेब दोंदे, बॅ. मनोहर बाळकृष्ण समर्थ, सीताराम चिंतामणराव जोशी, श्रीधर बळवंतराव टिळक, गंगाधर नीलकंठ सहस्रबुद्धे, व्ही. जी. राव, माधवराव बागल यांच्यासारखे सीकेपी, ब्राह्मण, प्रभू, मराठा जातींमधले सहकारी होते.

महाड सत्याग्रहाच्या वेळी डॉ. आंबेडकरांनी  स्त्रियांसमोर जे भाषण दिले ते स्त्रियांमध्ये आमूलाग्र बदल घडवणारे होते. बाबासाहेब म्हणाले, ‘तुमचा पेहराव हा तुम्ही अस्पृश्य आहात हे सुचवणारा आहे, तुम्ही तो बदलला पाहिजे’ यानुसार वत्सलाबाई चित्रे व लक्ष्मीबाई टिपणीस यांच्या मदतीने दुसर्‍या दिवशी अनेक महिला ब्रह्मणी पद्धतीचे पायघोळ नऊवारी लुगडे नेसून आल्या. समाज समता संघाच्या माध्यमातून जे सवर्ण सहकारी काम करत होते त्यांच्या वाट्याला संघर्ष, अपमान आला. आजही दलितांची बाजू घेणार्‍यांना बर्‍याच गोष्टी ऐकाव्या लागतात तर १०० वर्षांपूर्वी त्यांच्या वाट्याला आलेल्या अवहेलनेची कल्पना न केलेली बरी.

बाबासाहेबांच्या प्रत्येक सवर्ण सहकार्‍याच्या चरित्राचा नीट अभ्यास केला तर आपणास दिसून येईल की त्यांना, त्यांच्या घरातील स्त्रियांना व त्यांच्या मुलांना खूप त्रास सोसावा लागला. समाज समता संघात अनेक सवर्ण सहकार्‍यांनी काम केले. श्रीधरपंत बळवंत टिळक यांच्या भूमिका फार महत्त्वाच्या वाटतात. टिळकांसारख्या तत्कालीन राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तीच्या घरातील हे गृहस्थ पुण्यात गायकवाड वाड्यात अस्पृश्यांच्या श्रीकृष्ण मेळ्याला प्रवेश देतात आणि समाज समता संघाची शाखा गायकवाड वाड्यात स्थापन करून संध्याकाळी सहभोजनाचा कार्यक्रम घेतात. ही घटना विलक्षण क्रांतिकारी आहे. स्वतंत्र मजूर पक्षात खोतांविरुद्धच्या लढाईत सुरेंद्रनाथ टिपणीस यांची भूमिका ही जिवावर उदार होऊन न्यायाची लढाई लढण्याची होती. ही काही उदाहरणे चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍यांची. पण सर्वसामान्यांच्या या बाबतीत काय भूमिका होत्या हेही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

पुण्यातील मजुरांनी जनता वृत्तपत्राला एका दिवसाची संपूर्ण मजुरी दिली होती. हा काळ १९४० चा. यामध्ये गवंडीकाम करणारे रामा केसू, धोंडी शाबा, रामा गोपाळा, गणपत तुकाराम, अब्दुलभाई लालभाई शेख, नगूबाई लालभाई शेख, रामा सावळा कुंजीर , सलप्पा वीरप्पा, तसेच गंगुबाई प्रभू, लीलाबाई साधू अशा मराठा, मुस्लीम, बेलदार, धनगर जातींतल्या सर्वांचा समावेश होता. हे कामगार खडकी येथील होते. सर्वसामान्य माणसांमध्येही अस्पृश्यांचा माणुसकीचा लढा समजण्याची मानसिकता दिसून येते; पण त्याचे स्वरूप सामूहिक नव्हते. अस्पृश्यांच्या शोषणाचे व अवहेलनेच स्वरूप मात्र सामूहिक होते.

अस्पृश्यांच्या प्रश्नांकडे माणसाचे प्रश्न म्हणून बघून ते सोडवण्यासाठी भारतातील उच्चवर्णीय समाज हा सामूहिक पातळीवर सामुराईची भूमिका घेईल यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले. समाज समता संघाची स्थापना केली, कौटुंबिक सामूहिक सहभोजन घडून आणले, ‘समता’ या पाक्षिकाच्या माध्यमातून सामाजिक मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केले. पण सामूहिक पातळीवर मानवी भूमिका घेणारा समाज दिसत नव्हता; म्हणून येवला येथे धर्मांतराची घोषणा केली व १४ ऑक्टोबर १९५६ ला त्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला.

महाड येथील सत्याग्रह, समाज समता संघ, स्वतंत्र मजूर पक्ष यामध्ये काम करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक सहकार्‍याचे कार्य मोलाचे आणि महत्त्वाचे आहे. सामुराईप्रमाणे जशी येथील सवर्ण समाजाने मानवी भूमिका घेणे गरजेचे आहे तसेच या मानवी भूमिका घेणार्‍या माणसांवर विश्वास ठेवून त्यांचा स्वीकार करणे, त्यांनी केलेल्या कामाला आदर देणेसुद्धा गरजेचे आहे. वेगवेगळ्या जातिधर्मांतील लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य, समता व बंधुता यांसाठी त्रास सहन करून चळवळीत काम करत होते. त्यांच्या भूमिका या वैयक्तिक पातळीवर घेतलेल्या सामुराईंच्या भूमिकाच ठरतात.

सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी आज अशा वैयक्तिक पातळीवर का असेना सामुराईंच्या भूमिका घेणार्‍या माणसांच्या संख्येत वाढ होणे गरजेचे आहे. आज दिवसेंदिवस जी सामाजिक अन्यायाची उदाहरणे समोर येत आहेत ती

बघता आपण स्वतंत्र झालो असलो तरी माणूसपणाच्या केंद्रबिंदूपर्यंत पोहोचलेलो नाही. ज्यांच्यावर अन्याय होतो फक्त त्यांनीच सम्यक भूमिका घेऊन उपयोग नाही. या सम्यक असण्याच्या भूमिका त्यांनाही घ्याव्या लागतील ज्यांना परंपरेने काही विशेषाधिकार दिले आहेत, कारण जात/ धर्म/ पंथ यांपेक्षा माणूस केंद्रस्थानी आहे. जेव्हा केव्हा माणुसकीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माणूसपण जगणारी, सम्यकपणे भूमिका घेणारी ही भारतातील सामुराई माणसे त्या इतिहासातील नायक असतील.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या प्रमुख

sunitsawarkar@gmail.com