डॉ. शुभा थत्ते
डॉ. आनंद आडकर्णी यांच्या जाण्यामुळे समाजाची  अपरिमित हानी झाली आहे.  त्यांच्यासारखा सहृदय, सर्जनशील, विचारवंत, ज्ञानी माणूस विरळाच !
कशी आणि कुठे सुरुवात करू तेच कळत नाहीयेे… एक तर आनंद आता आपल्यात नाही आणि कधीही नसणार हे सत्य पचायला वेळ लागेल. त्याच्या झंझावाती दौर्‍यांप्रमाणे हे तीन दिवस पुण्यात असेल, तिथून औरंगाबाद व नंतर नाशिक आणि मग परत येईल अशीच मनाची समजूत ! आणि या वेळी गेला तो कसा?  मार्च अखेरीस डॉक्टरांनी  निदान केले व त्याबरोबर दिलासा ही दिला की अगदी प्रथमावस्थेतील कॅन्सर आहे. धोक्याचे काही कारण नाही. त्यामुळे आनंदनेही  उभारी धरली की अडीच तीन महिन्यात परत सगळे पूर्ववत  होईल. त्याच्या पद्धतीप्रमाणे नवीन देळापत्रक तयार झाले. भारतीय वेदान्त आणि मानसशास्त्र या चालू असलेल्या कोर्समधील पहिली सत्रे घेतली, सर्व सभासद भारून गेले असताना ‘आता पुढील दोन सत्रे माझ्या शस्त्रक्रियेनंतर’ असे सांगून त्याने त्यांचा खुशीत निरोप घेतला. आम्हा कोणाला निरोप घ्यायला अवसरही न देता आज सकाळी निघून गेला आणि  तेही कुठे  तर त्याच्या आवडत्या किशोरकुमारच्या गाण्याप्रमाणे ‘जहाँ  बस प्यार ही प्यार पले’ अशा ठिकाणी, कधीही परत न येण्यासाठी ! (आज हे लिहितानाही मनात हाच विचार आहे की लिहून झाले की आनंदला मेल करू. ) 

‘आनंद’ चित्रपटातल्या त्या सुप्रसिद्ध संवादाप्रमाणे ‘आनंद कभी मरते नही’ म्हटले तरी डॉ. आनंद आडकर्णी यांच्या जाण्यामुळे त्याचे सर्व कुटुंबीय म्हणजे आय. पी. एच. या संस्थेची अपरिमित हानी झाली आहे. पण त्याहीपेक्षा अधिक समाजाची हानी झाली आहे.  त्याच्यासारखा सहृदय, सर्जनशील, विचारवंत, ज्ञानी (आपले ज्ञान  सोप्या भाषेत सर्वांपर्यंत पोहोचवणारा) माणूस विरळाच ! करोनापूर्वीच्या दोन दशकांमध्ये  आय.पी.एच.तर्फे ठाणे येथे  होणार्‍या  ‘वेध’  या कार्यक्रमामुळे संस्कारक्षम युवकांची पिढी  तयार करण्याचे बहुमोल काम आनंदने केले. त्याच्यातील कुशल मुलाखतकार समोरच्या व्यक्तीच्या पोटात शिरून त्यांना बोलते करत असे आणि समोरचा माणूस आपली प्रसिद्धीची  झूल उतरवून मोकळेपणे गप्पा मारत असे. ‘वेध’ बरोबरच स्किझोफ्रेनियाचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी असलेला ‘द्विज’ हा कार्यक्रम, मानसिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणारी ‘मैत्र’ ही  टेलिफोन सेवा, ‘मनोविकास’सारखे उपक्रम  आमच्या संस्थेतर्फे चालवले गेले ते त्याची सर्जनशीलता आणि कुशल व्यवस्थापन यामुळे ! गेल्या चार वर्षात ‘कर्ता शेतकरी’ सारखे ग्रामीण भागातील लोकांच्या मनआरोग्यासाठी  सह्याद्री फार्म्ससाठी केलेले  कार्यक्रम आणि  नाशिक येथील नवउद्यमी मंडळींसाठी  केलेले भावनिक सजगता व उत्पादकता यावरचे कार्यक्रम यात तो गेली पाचसहा वर्षे व्यग्र होता. त्याने केलेल्या विविध प्रकारच्या कामांची आणि लेखनाची यादी पाहिली तर एक माणूस आपल्या आयुष्यात, दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सात दिवस काय करू शकतो यावर विश्वास बसणार नाही. 

त्याचा माझा खरा परिचय १९८० साली तो के.इ.एम. हॉस्पिटलमधील आमच्या मनोविकारशास्त्र विभागात विद्यार्थी म्हणून आला तेव्हाचा. त्यापूर्वी  तो  ठाण्याला आमच्या घराजवळच राहत होता व आमच्या घरावरून बेडेकर शाळेत जात असे. आमच्या घरी जेव्हा यदुनाथकाका (थत्ते ) येत असत तेव्हा त्याचे वडील प्रो. नाडकर्णी  त्यांना भेटण्यासाठी येत. त्यांनी आनंदबद्दल मला सांगितले होते. मीही त्याला जाता येता पाहात असे. आनंद आमच्या विभागात आला, त्याआधीच त्याची कीर्ती पोहोचली होती मराठी मंडळ, नाटके लिहिणे, बसवणे इत्यादीमुळे ! आमचा विभाग तसा शिस्तशीर आणि त्यामुळे कप्पेबंद आणि साचेबंद होते. पण आनंदकडे उसळता उत्साह होता. अनेक गोष्टीतील प्रावीण्यामुळे तो अनेक गोष्टीत प्रयोगशील होता. तो विद्यार्थी म्हणून आला त्याच सुमारास त्याच्याबरोबर सुमारे तिशीपस्तिशीचा  एक मुलगा येत असे. आनंदने माझी ओळख करून दिली, ‘हा अनिल अवचट. त्याला  ‘गर्द’ या विषयावर पुस्तक लिहायचे आहे म्हणून तो माझ्या व्यसनी मुलांच्या गटाबरोबर बोलण्यासाठी येतो आहे.’  नंतर काही  वर्षांनी  अनिल त्यांचा ‘बाबा’ झाला  आणि आनंद  झाला मुक्तांगणचा विश्वस्त. गेली अनेक वर्षे तो तिथे झोकून देऊन काम करत आहे.  सुनंदा गेल्यावर  आणि दोन वर्षांपूर्वी बाबा गेल्यावर तर त्याने अधिक लक्ष  घातले.  अतिशय कार्यक्षम असलेल्या मुक्ताला त्याने आपल्या नियोजनाची जोड दिली आणि ती संस्था  त्या क्षेत्रातील  भारतातील एक नामवंत संस्था झाली.  तो मला ‘गुरु’ मानत असला तरी इतरांबद्दल वाटणारा कळवळा, समोरच्या व्यक्तीच्या समस्येच्या मुळाशी जाऊन त्याला बोलते करणे व त्याच्याशी भावनिक नाते जोडणे या सर्व गोष्टी त्याच्या ‘निसर्गदत्त’ होत्या. त्या सर्व त्याने उत्तम रीतीने जोपासल्याने, त्यांना खतपाणी घातल्याने त्याची सर्जनशीलता अनेक अंगांनी फुलत गेली. तो अत्यंत अभ्यासू. प्रचंड वाचन आणि स्मरणशक्ती असल्याने त्याच्या सहवासात आलेला प्रत्येक माणूस त्याचा त्या अर्थाने ‘भक्त’ बनत असे. व्यासंगी तर इतका की  त्या विषयात खोलवर बुडी मारून त्यातून निघालेली रत्ने, माणके वाचकांपुढे पुस्तकरूपाने मांडणार. त्याने लिहिलेल्या         ३० पुस्तकांतील बरीच पुस्तके त्या विषयातील त्याच्या गाढ्या अभ्यासातून आलेली आहेत. लिहिण्यासाठी त्याला वेळ, काळ, जागा, शांतता इ. कोणत्याही मर्यादा नसत. रुग्ण पाहतानाही दोन रुग्णांच्यामध्ये वेळ मिळाला  की बाजूचे कागद पुढे ओढून लेखणी सुरू! अगदी ३५ वर्षांपूर्वी आम्ही दोघे  आरइबीटी (फएइळ)  चे वर्ग घेण्यासाठी पुण्याला जात असू तेव्हा कल्याणला डेक्कन क्वीनमध्ये आम्लेटब्रेडचा  नाश्ता केल्यावर मला मस्त पेंग येत असे आणि शिवाजीनगर येण्यापूर्वी आनंद माझ्या हातात ‘स्वभाव विभाव’ पुस्तकाचा ‘ओव्हनफ्रेश’ लेख वाचण्यासाठी देत असे.  

 त्याचा कामाचा झपाटा तर कोणालाही लाजवेल असा होता. त्यामुळे त्याचा रुग्ण सेवेच्या बरोबरीने, नाटक, लेखन, संगीत, वक्तृत्व इ. सर्वच क्षेत्रात तेवढ्याच तयारीने वावर होता. त्याच्या जोडीला गेली काही वर्षे त्याला रेखाटनांचाही छंद जडला होता. तो जेथे सहलीला जाईल तेथील रेखाचित्रे तो काळ्या पेनने काढत असे. त्यात त्याने खूप प्रगती केली होती. त्याच्या लेखनाला मिळालेल्या पुरस्कारांची यादी लांबलचक आहे आणि एवढे असूनही तो अत्यंत विनम्र व सहिष्णू होता. वागण्यात, पेहरावात, बोलण्यात तो अतिशय साधा, निर्विष आणि नितळ होता. त्याच्या मनात छक्केपंजे नव्हते किंवा दुसर्‍यावर छाप पाडण्याची उर्मी नव्हती. त्यामुळे तो सर्वांनाच जवळचा व सच्चा वाटे. आज सकाळी सरस्वती मराठी शाळेच्या प्रांगणात त्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जो समुदाय लोटला होता त्यावरूनच त्याचा परिसस्पर्श किती जणापर्यंत पोचला आहे ते जाणवत होते. त्याने दिलेल्या विचारधनामुळे श्रीमंत झालेली ती सर्व मंडळी होती. सध्याच्या जगात असे विचार पेरणारी, रुजवणारी व त्याची जोपासना करणारी माणसे कमी होत चालली आहेत. त्यामुळे अशावेळी त्याचे जाणे ही आपल्या समाजाची मोठी हानी आहे.

आमची संस्था मुळात उभी राहिली ती मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती, मानसिक आजारांबद्दल रुग्णांबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी. के.इ.एम. मधून बाहेर पडतानाच तो कात टाकून मनोविकार तज्ज्ञाचा मनोविकास तज्ज्ञ झाला होता ‘मानसिक आरोग्य सर्वांसाठी’ हे आमचे ब्रीदवाक्य. १९९०/९२ मध्ये म्हणजे आमच्या सुरुवातीच्या काळात हा विचार नवीन होता. तुटपुंज्या साधनांनी हे लोकांपर्यंत पोचवणे जिकिरीचे होते. आमच्या दोन खांबी प्रयत्नांनी, अनेक अडचणींना तोंड देऊन आम्ही आमचे काम पुढे रेटले आणि समविचारी लोक येत राहिले. तो आमच्यासाठीही कसोटीचा काळ होता. आमच्या विचारांशी, तत्त्वांशी एकनिष्ठ होते ते राहिले, बाकीचे सोडून गेले. समाजाला आमच्या शिकवणीचे महत्व पटले ते मदत करत राहिले ‘और कारवाँ बनता गया’!         जे सोडून गेले यांच्याबद्दलही आमच्या मनात कटुता नव्हती. विवेकनिष्ठ विचारांचे विचारधन लोकांपर्यंत पोहोचवायचा आम्ही जणू वसा घेतला. पुणे, ठाणे व इतर ठिकाणी बोलावतील तसे जाऊन आम्ही या प्रशिक्षणाचे गट घेतले. शिकलेल्या मंडळींना त्या परिसस्पर्शाने धन्य वाटले व तो वसा त्यांनी पुढे चालू ठेवला. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आज हा खजिना आमच्या ‘आवाहन’ या यूट्यूब चॅनलवर सर्वांना उपलब्ध आहे. आज आमची संस्था मानसिक आरोग्य क्षेत्रातील भारतातील एक नामवंत संस्था म्हणून कार्यरत आहे. आनंदचे बलदंड नेतृत्व नसले तरी त्याने दिलेल्या विचारांचा वारसा इतका कमकुवत नाही की कोमेजून जाईल. तयार झालेली पुढची फळीही त्याच विश्वासाने कार्यरत राहील आणि हीच त्याला खरी श्रद्धांजली !

आमच्या या शिकवणीचे ऋण मानणारी एक मैत्रीण (सावनी गोडबोले, पेण ) आनंदच्या निधनानंतर लिहिते,

इतके होते जगण्याजोगे,

का मग अवचित हा अंधार,

ऐन भरातचं होते गाणे,

कशास मग ही तुटली तार !!

आनंदाचे झाडचं जणू ते,

भव्य खोल अन डेरेदार,

कित्येकांचे छत्र हरपले,

फांद्यांचा तुटता संभार !!

परि मना, धीराने तू घे,

अटळ असा दु:खाचा वार,

त्या झाडाची फळे अन बीजे,

नेऊ रुजवू सीमापार !!

आपुल्या कार्यामधूनी ज्यांनी                          

नित्य घडवला साक्षात्कार,

स्मरण तयांचे मनात ठेवूनी,

शोधू शब्दातून आधार

आय.पी.एच., ठाणे या संस्थेच्या संस्थापक, विश्वस्त   व क्लिनिकल पर्यवेक्षक

thatteshubha@gmail.com