डॉ. मुक्ता पुणतांबेकर
असंख्यांना मानसिक आधार देणारा आनंदयात्री’ असे ज्यांचे वर्णन केले गेले, ते मानसोपचारतज्ज्ञ, ठाण्यातील आयपीएच  या संस्थेचे संस्थापक,  डॉ. आनंद नाडकर्णी यांचे नुकतेच निधन झाले.  त्यांच्या सुहृदाने त्यांना  वाहिलेली आदरांजली.

आनंदकाका गेला हे अजूनही मला खरं वाटत नाही…आपल्या आयुष्यात काही अशी माणसं असतात जी आपल्यासाठी नेहमी असणारच असंच वाटत असतं. माझ्यासाठी तो असा माणूस होता. कुठलाही प्रॉब्लेम आला तर फक्त त्याला फोन करायचा ही इतक्या वर्षांची सवय…

तो शेवटच्या प्रवासाला निघाला तेव्हा सरस्वती शाळेच्या मैदानावर हजारो माणसं जमली होती.   एका मानसोपचारतज्ज्ञाच्या शेवटच्या प्रवासाला एवढी गर्दी का? प्रत्येकालाच तो जवळचा वाटायचा. आपल्या घरातलाच माणूस गेला आहे असं प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होतं. अनेक जण त्यांच्या भावना व्यक्त करत होते.

स्किझोफ्रेनियाच्या एका रुग्णाचे वयस्कर आई-वडील आम्हाला भेटले. ‘डॉक्टरांनी फक्त उपचार केले नाहीत, तर त्रिदल गटाच्या माध्यमातून त्याला स्वत:च्या पायावर उभं केलं, आत्मविश्वास दिला. आम्ही आता समाजात केवळ त्यांच्यामुळे ताठ मानेने जगू शकतो’, हे सांगताना दोघेही बांध फुटून रडत होते.

एक खेळाडू म्हणाली, ‘डॉक्टरकाकांनी भावना आणि दृष्टिकोन समजून घ्यायला शिकवलं. आत्मविश्वास वाढवला. म्हणून मी सुवर्णपदक मिळवू शकले’.

एक तरुण मुलगा म्हणाला, ‘टाळेबंदीच्या काळात माझी नोकरी गेली. मी खूप निराश झालो होतो. आत्महत्येचे विचार मनात येत होते. त्यावेळी डॉक्टरांचे पॉडकास्ट ऐकलं आणि त्यातून मला बळ मिळालं.’

आपल्या व्यसनमुक्तीचे श्रेय आनंदकाकांना देणारे आमचे बरेच व्यसनमुक्त मित्र अंतिम दर्शन घ्यायला आले होते. रुग्ण, त्यांचे कुटुंबीय, वाचक, प्रेक्षक, फॅन्स, सहकारी, विद्यार्थी सर्वांच्या मनात आज आपण खूप मोठा आधार गमावला आहे अशीच भावना होती.

 त्याला एकदा भेटणार्‍या प्रत्येकालाच तो आपला अतिशय जवळचा माणूस आहे असंच वाटायचं. माझ्या बाबतीत तर मी मानसशास्त्रात शिक्षण घ्यायचं ठरवलं ते त्याच्याकडूनच प्रेरणा घेऊन. गेली ३२ वर्षे मी त्याची सहकारी म्हणून मुक्तांगणमध्ये काम करत आहे.

मी मुक्तांगणमध्ये काम करायला सुरुवात केल्यावर ‘‘आता मी तुला आनंदकाका म्हणणार नाही तर आनंद म्हणणार’’, हा माझा आगाऊपणासुद्धा त्याने हसतमुखाने, कौतुकाने ऐकून घेतला. तो माझा फ्रेंड, गाइड आणि फिलॉसफर आहे असे मी नेहमी म्हणते. माझे आई-बाबा डॉ. अनिता आणि डॉ. अनिल अवचट यांचा आनंदचे वडील मधुसुदन नाडकर्णी यांच्याशी स्नेह होता.

आनंद शाळेत असताना त्याच्या आई-बाबांबरोबर जळगावहून उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्यात आला होता. तेव्हा त्याचे आई-बाबा कमला नेहरू पार्कमध्ये घेऊन आले आणि माझे आई-बाबासुद्धा फिरायला तिथेच आले होते. तिथे सर्वांची भेट होऊन त्यांनी खूप गप्पा मारल्या. तेव्हा मी आईच्या पोटात होते. त्यामुळे ‘मी आनंदला माझ्या जन्माआधीपासून ओळखते’, असे मी सर्वांना अभिमानाने सांगते.

आमची खरी ओळख झाली मी दहावीत असताना. १९८३- ८४ च्या दरम्यान. जगभरामध्ये ‘ब्राऊन शुगर’च्या व्यसनाची लाट आली होती. माझ्या आई-बाबांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणीच्या मुलाला हे व्यसन लागले होते.

माझी आई मानसोपचारतज्ज्ञ असल्यामुळे त्याचे आई-बाबा त्याला आमच्याकडे घेऊन आले. माझ्या आई-बाबांनी त्या मुलाला घरीच उपचार दिले.  बाबा रोज त्या मुलाला फिरायला घेऊन जायचा. त्याच्याशी बोलताना बाबाच्या लक्षात आलं की व्यसन हा फक्त एका व्यक्तीचा नाही तर एक मोठा सामाजिक प्रश्न बनायला लागलेला आहे. बाबाच्या स्वभावानुसार त्याने या विषयावर अधिक माहिती घ्यायचे ठरवले. तेव्हा मुंबईला के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये डॉ. आनंद नाडकर्णी यासाठी काम करतात हे त्याला कळले. आनंदची ओळख असल्यामुळे बाबाने लगेच त्याच्याशी संपर्क साधला. तीन-चार महिने त्याच्याबरोबरच राहून त्याचं काम बघितले. व्यसनाधीन रुग्ण, कुटुंबीय यांच्या मुलाखती घेतल्या. हा प्रश्न समजून घेतला. ‘गर्दच्या जाळ्यात’ ही या विषयावर एक लेखमाला लिहिली. पुढे ‘गर्द’ या नावाने त्याचे पुस्तक प्रकाशित झाले. पुलं आणि सुनीताबाई देशपांडे यांनी आई-बाबांना बोलावून घेतले. या विषयावर तुम्ही काही काम करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला आर्थिक मदत  देऊ असे आश्वासन दिले.

आनंदशी चर्चा झाल्यानंतर व्यसनाधीन रुग्णांना परिपूर्ण उपचार देणारे एक निवासी केंद्र सुरू करायचे ठरले. त्यातूनच ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’ची स्थापना २९ ऑगस्ट १९८६ या दिवशी झाली. हा सगळा प्रवास बाबाने ‘मुक्तांगणची गोष्ट’ या पुस्तकात लिहिलेला आहे.

आई, बाबा, आनंद यांनी ठरवले की आपण रुग्णांकडून शिकतच मुक्तांगणची उपचारपद्धती तयार करू. त्याप्रमाणे आनंदचे के. ई. एम. मधले अनुभव आणि मुक्तांगणमध्ये दाखल झालेल्या मित्रांशी चर्चा करून हळूहळू मुक्तांगणची उपचारपद्धती तयार होत गेली.

बाबाने ‘गर्द’ पुस्तकात म्हटले आहे, ‘काही मानसोपचारतज्ज्ञ मित्र या व्यसनाच्या बाबतीत फार निराश आहेत. ते म्हणतात, आम्ही रुग्णाला पाहतो. उपचार करतो. पुढे फॉलोअपसाठी आठवड्यातून एकदा नियमितपणे बोलावतो. पण एक-दोनदा आल्यानंतर ते येईनासे होतात. मग काय, कधीतरी कळतं की तो परत व्यसनाकडे वळला झाला आहे. त्याच्या बाबतीत आम्ही काहीच करू शकत नाही’. ही अडचण खरी आहे. एकटा मानसोपचारतज्ज्ञ फारसं काहीच करू शकणार नाही. पण या सगळ्या उपचारातलं त्याने सूत्रधार बनलं पाहिजे. मानसोपचारतज्ज्ञ, रुग्ण, कुटुंबीय,सामाजिक कार्यकर्ते या सगळ्याचा मेळ घालून प्रत्येकाची योग्य ती मदत रुग्णाला होईल हे त्याने पाहिलं पाहिजे. आम्ही आमच्यासमोर आलेल्या रुग्णाला मानसोपचारतज्ज्ञ म्हणून तपासणार आणि उपचार करणार एवढं म्हणून भागणार नाही. तर आपली खुर्ची सोडून त्याच्या वस्तीत घरी गेलं पाहिजे. रुग्णावर नंतर कोण चांगले लक्ष ठेवेल, ठेवू शकेल अशी व्यक्ती हेरून तिला तिचं काम समजावून दिलं पाहिजे. या दृष्टीने आनंद करत असलेलं काम म्हणजे आपल्या समाजाला साजेशी उपचारपद्धती शोधून काढायचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे असं वाटतं.

 तो मुळात डॉक्टर असला तरी प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता आहे. अनेक व्यसनी लोकांना तर तो मित्र वाटतो. पडेल ते काम करायची त्याची तयारी आहे. त्या त्या वस्तीत जाऊन तो ग्रुप तयार करतो. एखादा पुन्हा व्यसनाकडे वळलं तर त्याला व्यसनमुक्त  झालेल्या रुग्णामार्फत तो परत बोलावून घेतो. त्याने बर्‍या झालेल्या रुग्णांची चांगली टीमच तयार केली आहे. त्यांच्यातला कोअर ग्रुप तयार करून त्यांना तो वेगळे प्रशिक्षण देतो.’’

बाबांनी हे लिहिले आहे १९८६ मध्ये.

अशा प्रकारे व्यसनमुक्ती उपचारांचा आनंद एक ‘पायोनियर’ आहे असं म्हणायला हरकत नाही. केवळ व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातच नाही तर मानसिक आजारांच्या क्षेत्रातही आनंदने केबिनपलीकडे जाऊन मानसिक उपचार समाजाभिमुख केले.

बाबा गेल्यानंतर त्याची कागदपत्रे आवरताना आम्हाला आनंदाने बाबाला लिहिलेले लिहिलेले एक पत्र सापडले. त्यात ‘मानसिक आजारांवर उपचार करण्यासाठी एक संस्था सुरू करायचे मनात आहे, त्याचे नियोजन करतो आहे’, असे त्याने म्हटले आहे.

मुक्तांगणच्या स्थापनेनंतर चार वर्षांतच आयपीएच या संस्थेची त्यांनी स्थापना केली. सुरुवातीला ‘इ्स्टिटट्यूट फॉर सायकॉलॉजिकली हॅण्डिकॅप्ड’ हे त्याने नाव ठरवले. काम करायला सुरुवात केल्यावर मात्र मानसिक आजारांकडे बघायचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे हे त्याच्या प्रकर्षाने लक्षात यायला लागले. त्यामुळे त्याने ‘इ्स्टिटट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ असा नावात बदल केला. ‘सुदृढ मन सर्वांसाठी’, अशी टॅगलाइन दिली.

 तो अतिशय चांगला लेखक, कवी असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाची नावे आणि टॅगलाइन अतिशय सुंदर असे.

मानसिक आजारांच्या उपचारांबरोबरच जनजागृती, प्रशिक्षण, स्वयंसेवक तयार करणे, स्वमदत गट, हेल्पलाइन अशी कितीतरी कामे त्याने आयपीएचच्या माध्यमातून सुरू केली.

स्वत:ला तो ‘मनोविकारतज्ज्ञ’ असे न म्हणता ‘मनोविकासतज्ज्ञ’ म्हणवून घ्यायचा. तो खर्‍या अर्थाने त्याच्याच एका पुस्तकाच्या नावाप्रमाणे ‘शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट’ होता.

मानसिक रुग्णांना फक्त औषधोपचार पुरेसे नाहीत. समुपदेशन आणि आधाराचीसुद्धा आवश्यकता असते या विचारातून आयपीएचच्या माध्यमातून आनंदने अनेक सपोर्ट ग्रुप सुरू केले. त्याची नावेसुद्धा अतिशय सुंदर ठेवली .ओसीडी आजाराच्या रुग्णांसाठी ‘परफेक्ट’ ग्रुप, मधुमेहींसाठी ‘मधुस्नेही’, एपिलेप्सी रुग्णांसाठी ‘उत्तेजन’, विशेष मुलांच्या पालकांसाठी ‘अन्वय’, स्किझोफ्रेनिया रुग्णांसाठी ‘त्रिदल’ अशी कितीतरी नावं सांगता येतील. संपूर्णपणे स्वयंसेवक चालवत असलेली ‘मैत्र’ ही हेल्पलाइन सुरू केली.

मानसिक आजारांवरचा कलंक (स्टिग्मा) कमी व्हावा म्हणून मानसिक रुग्ण आणि त्यांना मदत करणारे कुटुंबीय म्हणजेच शुभार्थी आणि शुभंकर यांना ‘द्विज’ पुरस्कार दिले जातात.

आयपीएचच्या सुरुवातीच्या काळातच आनंदने पौगंडावस्थेतील मुलांसाठी ‘टफ टिन क्लब’ हा उपक्रम सुरू केला. त्यानंतर वेध व्यवसाय परिषद ठाण्याला सुरू झाली. आज महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यांमध्ये ती घेतली जाते. आता तर यूट्यूबच्या माध्यमातून ‘ग्लोबल वेध’सुद्धा सुरू आहे.

दोन वर्षांपूर्वी मी ‘माइंड, लाइफ, वेदांता ॲण्ड बुद्धिझम’ हा त्याचा कोर्स केला. पुन्हा एकदा त्याची विद्यार्थिनी बनण्याची संधी मिळाली. कुठल्याही प्रसंगात तो एवढा शांत कसा राहू शकतो याची थोडीफार उत्तरे मिळाली.

काल एक मुलगी भेटली. ती म्हणाली, ‘मी आठवीत असताना पहिल्यांदा ‘वेध’ला आले. तिथल्या मुलाखती मला खूप आवडल्या. दरवर्षी यायला लागले. मी मानसशास्त्रातच शिक्षण घ्यायचं ठरवलं. आज मी तर काकांच्या आयपीएचमध्ये काम करते याचा मला खूप अभिमान वाटतो.’

आनंदच्या कामाच्या झपाट्यामुळे बाबा त्याला महामानव म्हणायचा.

महिन्यातून एकदा तो पुण्याला ‘मुक्तांगण’मध्ये यायचा. बाबाकडे पत्रकार नगरमध्ये त्याचा मुक्काम असायचा. तो येणार हा आमच्यासाठी एक अतिशय उत्साहाचा प्रसंग असायचा. दिवसभर रुग्ण तपासणे, मुक्तांगणच्या कार्यकर्त्यांची मीटिंग, रुग्णांची ग्रुप थेरेपी हे सगळे करूनही संध्याकाळी त्याचा उत्साह जराही कमी झालेला नसायचा. जेवायला काय करायचे किंवा कुठे बाहेर जायचे याची त्याची फर्माईश असायची. कामाबरोबरच त्याच्यामधली रसिकता, आनंदी स्वभाव, माणसांना जोडणे, मैत्री टिकवणे हे मला खूप महत्त्वाचे वाटते.

मानसशास्त्राप्रमाणेच त्याने लेखन, चित्रपट, संगीत अशा अनेक क्षेत्रांत एवढे प्रचंड काम केलेले आहे की ते सर्व या लेखात मांडणे अवघड आहे.

काही वर्षांपूर्वी वैयक्तिक आयुष्यात एका मोठ्या संघर्षाला त्याला तोंड द्यावे लागले. त्या काळातही त्याने स्वत:ला कोलमडू दिले नाही. नंतर सविताशी लग्न झाले, ही मला त्याच्या आयुष्यातली सर्वात छान गोष्ट आहे असे वाटते. तिच्या शांत स्वभावानुसार तिने त्याला प्रत्येक गोष्टीत सहजपणे साथ दिली.

आनंदच्या शेवटच्या प्रवासाला कबीर ज्या शांतपणे, धैर्याने सामोरा जात होता, ते बघताना हे सर्व किती आनंदमधून त्याच्यात उतरले आहे हे आम्हाला जाणवत होते.

मागच्या महिन्यात आनंदला ताप आला, पोट बिघडले, हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. तेव्हा मी त्याचे सहकारी मंगेश बाणे यांच्याशी बोलत होते. ‘आता बरा होऊ दे. आपण त्याला चांगली विश्रांती घ्यायला लावू. खूप जास्त काम करतो’, असे आमचे ठरले होते. पण तो अशी एवढी मोठी कायमची विश्रांती घेईल हे कधीच वाटले नाही.

कॅन्सरचे निदान झाले तेव्हा आम्ही सर्व घाबरलो. तो त्याच्या आध्यात्मिक उंचीने आमची समजूत काढत होता. माझी आई गेली तेव्हा बरोबर आनंद होता. बाबा होता. त्या दोघांमुळे या प्रसंगाला तोंड देता आले.

बाबाच्या शेवटच्या आजारपणात त्याच्या इच्छेनुसार ‘व्हेंटिलेटर लावायचा नाही’ हा निर्णय घ्यायला माझी बहीण यशोदा आणि माझ्याबरोबर आनंद होता. बाबा गेल्यानंतरही आनंद आहे हा आधार होता. आता आनंद गेल्यावर काय? आता कोणाचा आधार?

खूप लोकांचे मेसेज येत आहेत. भेटायला येत आहेत. मुक्तांगण आणि आयपीएचचे सहकारी बरोबर आहेत. आपण एकटे नाही आहोत, ही जाणीव त्यामुळे होते.

मुक्तांगणचा रोजचा दिनक्रम तसाच सुरू आहे. रुग्णांची काळजी आई-बाबा आणि आनंद यांनी घालून दिलेल्या तत्त्वाप्रमाणे घेतली जात आहे. म्हणजे ते आहेतच इथे कुठेतरी…

माझी मैत्रीण शिल्पा हिचा मेसेज आला,

‘तो खरा कर्मयोगी.. त्यानं जितकं काम केलं आहे ते समजून घ्यायलाही आपलं आयुष्य कमी पडेल. अशा व्यक्ती आपलं जगणं अर्थपूर्ण आणि सुंदर करतात. आणि त्यांच्या जाण्याने भरून न निघणारी पोकळी निर्माण होते. तो आपल्याला प्रेरणा देतच राहील.’

संचालक , मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे</p>

puntambekar@hotmail. Com