पद्माकर कांबळे आज भारतीय संविधानाला कधी नव्हे ते उघड उघड हादरे बसत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या नावाखाली नुसतं मिरवणुकीत नाचण्याऐवजी त्यांच्या ‘विचारांची जयंती’ साजरी करणे गरजेचे आहे! सर्वप्रथम ‘सार्वजनिक’पणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘वाढदिवस’ साजरा करण्याची प्रथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी सदाशिव रणपिसे यांनी सुरू केली! साल होते १९२७ आणि स्थळ होते पुणे शहर! तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वयाची अवघी ३५ वर्षे पुरी झाली होती! स्वतः डॉ. आंबेडकर १९२७ पासून पुढील १५ वर्षे आपल्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना तसेच सभेला हजर राहात नसत. १९४१ साली देवीदास नामदेव कांबळे या विद्यार्थ्यास उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे, ‘लोक मला ईश्वरी अवतार मानून माझ्या फोटोंचे पूजन करतात आणि माझ्याशिवाय दुसरा कोणी होणारच नाही, असा समज करून घेतात! यावर आपण जो कटाक्ष ठेवला आहे तो स्तुत्य आहे. या अंधश्रद्धेचे व भोळेपणाचे अनुकरण आपण मातंग समाजास करू न देण्याचा आपण जो निर्धार केला आहे तो आपण कृतीत आणावा अशी माझी आपणास आग्रहाची सूचना आहे. विभूतिपूजा ही मानवाला कमीपणा आणणारी गोष्ट आहे. मी समतेचा मोठा भोक्ता, नव्हे पुरस्कर्ता आहे. मी देव नाही, महात्मा नाही असे सांगून थकलो; पण त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही.’ (जनता, १४ जून १९४१). आणखी वाचा- आंबेडकरी चळवळीतील दुर्लक्षित महानायिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ५० वा वाढदिवस १४ एप्रिल १९४२ रोजी मुंबईत आणि महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांत साजरा झाला. स्वतंत्र मजूर पक्ष आणि मुंबई आणि इतर उपनगरे यातील ४९ सार्वजनिक संस्था यांनी आंबेडकरांचा पन्नासावा वाढदिवस सलग ९ दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम आखला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांची सुरुवात १२ एप्रिल १९४२ पासून मुंबई आणि उपनगरातील सर्व विभागातून एकदम आणि एकाच वेळी झाली. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पन्नासाव्या ५० वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष लेख प्रसिद्ध करत, त्यांची सेवा आणि विद्वत्ता यांविषयी गौरव केला. आचार्य अत्रे यांनी तर ‘नवयुग’चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक प्रकाशित केला. पुणे जिल्हा लोकल बोर्डात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्र अनावरणाचा कार्यक्रम झाला. भारतातील राजकीय, सामाजिक, कायदा या क्षेत्रांतील महनीय व्यक्तींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शुभेच्छा संदेश पाठवले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी विशेष संदेश प्रसिद्ध करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाचे योग्य मूल्यमापन केले. आणखी वाचा- अल्पसंख्याक, मानवाधिकार… आणि पाकिस्तानी राजकारण! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५० व्या वाढदिवसाची मुख्य सभा मुंबई येथे चौपाटीवर १९ एप्रिल १९४२ रोजी बॅ. मुकुंदराव जयकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली. डॉ. आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेसाठी प्रथमच हजर राहिले, तेही यापुढे आपल्या वाढदिवसाचे समारंभ साजरे करू नका हे सांगण्यासाठी. त्या सभेत बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले, ‘‘तुम्ही माझा वाढदिवस गेली १५ वर्षे साजरा करीत आहात. माझा नेहमीच या प्रकाराला विरोध असल्यामुळे मी आजवर अशा समारंभांना कधीही हजर राहिलो नाही. तुम्ही आता माझा सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे. इतके पुरे झाले. यापुढे माझ्या वाढदिवसाचे समारंभ साजरे करू नका. नेत्याविषयी अपार भक्ती बाळगली की जनतेचा आत्मविश्वास नाहीसा होतो. एखाद्या कसोटीच्या प्रसंगी असा नेता नसेल किंवा कशाचाही विधिनिषेध न बाळगणाऱ्या पुढाऱ्याच्या तावडीत जनता सापडली तर तिला निराधार असल्यासारखे वाटू लागते. मुक्तीसाठी तुम्ही कोणत्याही एका व्यक्तीवर विसंबून राहू नका. तुमची मुक्ती तुमच्या हातात आहे आणि ती तुम्हीच प्रयत्न करून मिळवली पाहिजे.’ (महाराष्ट्र शासन, सोर्स मटेरियल ऑन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲण्ड मूव्हमेंट ऑफ अनटचेबल्स, खंड १, १९८२, पृ. २५१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५० व्या वाढदिवसाची शेवटची सभा २० एप्रिल १९४२ रोजी परळच्या कामगार मैदानावर झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष आचार्य मो. वा. दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली ती घेतली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्तरादाखल केलेल्या भाषणात म्हणाले, ‘‘माझा वाढदिवस साजरा करण्याची ही सवय तुम्ही टाकून द्या. कारण जो समाज एखाद्या मनुष्याचा देवाप्रमाणे उदोउदो करतो तो नाशाच्या मार्गावर आहे असे मी समजतो. कोणासही अतिमानवाचे गुण लाभलेले नाहीत. जो तो आपल्या प्रयत्नांमुळेच चढतो किंवा पडतो.’’ आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना, अनुयायांनी या सगळ्याचं भान राखलं पाहिजे. आज देशातील भोवतालचं वातावरण पाहता, भारतीय संविधानाला कधी नव्हे ते उघड उघड हादरे बसत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या नावाखाली नुसतं मिरवणुकीत नाचण्याऐवजी त्यांच्या ‘विचारांची जयंती’ची खरी गरज आहे! लेखक विविध सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.padmakarkgs@gmail.com