scorecardresearch

वंचितांसाठीच्या कामाची जागतिक पोचपावती

डॉ. अशोक दयालचंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट, पाचोड’ या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून गेली साडेचार दशके सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने कार्य केले.

IHMP Health Vicharmanch

– डॉ. बाळ राक्षसे

डॉ. अशोक दयालचंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट, पाचोड’ या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून गेली साडेचार दशके सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने कार्य केले. ‘दी वर्ल्ड्स चिल्ड्रन प्राइझ २०२०’ ही त्यांनी समाजातील उपेक्षित, वंचित घटकांना सुदृढ निरोगी ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची पोचपावती आहे.

वर्ष १९७६, औरंगाबाद शहरापासून सुमारे ५५ किलोमीटर आग्नेयेला एक छोटेसे गाव. वैद्यकीय पदवी घेतलेला एक तरुण आरोग्याच्या क्षेत्रात काही करण्याच्या ध्येयाने हिमाचल प्रदेशातील आपली नोकरी सोडून थेट या गावात आला. त्याने पाच खाटांचे एक छोटेसे रुग्णालय सुरू केले. त्या तरुणाचे नाव होते डॉ. अशोक दयालचंद. ज्या वेळी एखादी व्यक्ती चांगल्या कामासाठी पुढाकार घेते त्या वेळी समविचारी त्याला येऊन मिळतात. त्यांना डॉ. मनीषा खळे आणि डॉ. एम. आय. सोनी यांच्यासारखे लोक येऊन मिळाले.

या सर्वांनी मिळून ‘आशीष ग्राम रचना ट्रस्ट’ आणि त्याअंतर्गत ‘इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट, पाचोड’ची (आयएचएमपी) स्थापना केली. कामाला वेग येऊ लागला. दोन वर्षांनंतर, दोन डॉक्टर, एक पोषणतज्ज्ञ आणि एक लोकसंख्याशास्त्रज्ञ यांचा समावेश असलेला एक गट स्थापन करण्यात आला. त्यांनी सुमारे ६० हजार लोकसंख्या असलेल्या ५२ गावांमध्ये सर्वसमावेशक आरोग्य आणि विकास प्रकल्प सुरू केला. आयएचएमपीने ‘दाई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रसूती सेविकांच्या प्रशिक्षणात पुढाकार घेतला आणि त्यांच्यामार्फत माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यासाठी कार्यक्रम राबविणारी ही देशातील पहिली संस्था ठरली. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. आज आपण आशा कार्यकर्ती म्हणून जे मॉडेल पाहतो, त्याचा जन्मच मुळात या बीजातून झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

समाजातील वंचित घटकांना सार्वजनिक आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने, आयएचएमपीने माता आणि नवजात बालकांचे आरोग्य, कुपोषण, स्वच्छता, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग, किशोरवयीन मुलींसाठी जीवन कौशल्य शिक्षण, प्रजनन आणि बालआरोग्य सेवा आणि लिंगसंवेदना यावर काम केले आहे. खेड्यातील आणि शहरी झोपडपट्ट्यांतील तरुण पुरुष आणि मुलांचे आरोग्य राखण्यात या संस्थेचे खूप मोठे योगदान आहे. १९८६ मध्ये, आयएचएमपीने सार्वजनिक आरोग्यात कौशल्य प्रदान करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले.

१९९० पर्यंत, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण केंद्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. भारत, ‘साउथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन’ (सार्क) आणि आफ्रिकन देशांमधील १० हजारांहून अधिक सेवाभावी संस्था आणि सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आयएचएमपीत प्रशिक्षण घेतले आहे. आयएचएमपीने १९९६मध्ये पुणे शहरात आपल्या सेवांचा विस्तार केला. तिथे त्यांनी शहरी झोपडपट्ट्यांसाठी सार्वजनिक आरोग्याचा आराखडा तयार केला. २००५मध्ये, आयएचएमपीला भारत सरकारने राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एनयूएचएम) धोरण तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या कृतिदलात काम करण्यासाठी आमंत्रित केले होते. २०२०मध्ये, आयएचएमपीने शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या आर्थिक दुर्बल गटांतील व्यक्तींना उच्च दर्जाची निदान, उपचारात्मक आणि संदर्भ सेवा प्रदान करण्यासाठी अत्याधुनिक ‘क्लिनिकल पॅथॉलॉजी प्रयोगशाळा’ आणि ‘मोबाइल वैद्यकीय युनिट’ची स्थापना केली.

संस्थेने केवळ कामच केले नाही तर ‘लॅन्सेट’सारख्या अनेक नामांकित जर्नल्समधून आपण केलेल्या कामाचे अहवाल प्रकाशितही केले. केवळ देशात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांसाठीच नाही तर कित्येक विकसनशील देशांसाठीही हे काम दिशादर्शक ठरले. पौगंडावस्थेतील आणि किशोरवयीन मुलामुलींसाठीचे त्यांचे काम खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.

हेही वाचा : विश्लेषण : मंकीपॉक्स आहे तरी काय?

अशा या संस्थेच्या संस्थापक सदस्यास- डॉ. अशोक दयालचंद यांना नोबेल पुरस्काराच्या तोडीचा समजला जाणारा अत्यंत मानाचा वर्ल्ड्स चिल्ड्रन प्राइझ फाउंडेशन’मार्फत दिला जाणारा ‘दी वर्ल्ड्स चिल्ड्रन प्राइझ २०२०’ हा पुरस्कार स्वीडनच्या राणीच्या हस्ते २३ मे रोजी स्टोकहोम येथे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार याआधी डॉ. नेल्सन मंडेला आणि त्यांच्या पत्नी ग्रेसा यांना देण्यात आला होता. या वर्षी जी नामांकने होती त्यात डॉ. अशोक दयालचंद यांच्यासह पाकिस्तानच्या मलाला युसूफझाई, घानाचे जेम्स कोफी अन्नान यांसारखे अत्यंत नामांकित लोक होते. या सर्वांमधून डॉ. अशोक दयालचंद यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड होणे ही भारतासाठी अत्यंत भूषणावह बाब आहे.

(लेखक मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत कार्यरत आहेत.)
bal.rakshase@tiss.edu

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2022 at 05:30 IST
ताज्या बातम्या