जयदेव पंचवाघ

सुमारे महिन्याभरापूर्वी संजय दामले नावाचा एक पस्तिशीतला तरुण आला होता. दोन आठवडय़ांपासून त्याला बसल्यावर किंवा उभं राहिल्यावर प्रचंड कंबरदुखी होऊन उजव्या पायातून कळ येत होती आणि मला भेटण्याच्या आदल्या दिवसापासून पोटरीतली कळ अगदी असह्य होण्यापर्यंत वाढली होती.

wife does not wear saree of my choice husband created ruckus matter reached police station couple goes for divorce
पत्नी आवडीची साडी नेसत नाही; कंटाळलेल्या पतीने लग्नानंतर ८ महिन्यातच मागितला घटस्फोट
pune rain marathi news, pune unseasonal rain marathi news
पुण्यात हलकापाऊस; दुचाकी घसरण्याच्या घटना
Trigrahi Yog
३० वर्षांनी ‘त्रिग्रही योग’ बनल्याने होळी २०२४ च्या आधी शनिदेव ‘या’ राशींना करणार श्रीमंत? लक्ष्मी कृपेने प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता
What is tax harvesting and what to be careful about
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग काय असतं? ते करताना काय काळजी घ्यावी?

संजय गेली आठ वर्षे सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करतो. मला वाटतं आजकाल १२ ते १४ तास बसून काम करणं हा तर त्या क्षेत्रातला नित्यनियमच झालेला आहे. मान, पाठ आणि कंबर एका विशिष्ट अवघडलेल्या स्थितीत ठेवून एक हात माऊसवर व दुसरा कीबोर्डवर स्थिरावून ही मंडळी डोळे व मेंदू संगणकाच्या स्क्रीनला ‘चिकटवून’ बसलेली असतात. किंबहुना त्यांना याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. अशा प्रकारच्या अनैसर्गिक आणि विचित्र ताणामुळे दोन मणक्यांमधील डिस्कच्या अंत:स्थित तंतूंवर ताण येऊन तिच्या अंतर्गत रचनेत फरक पडतो.

संजयच्या कमरेच्या मणक्यामधील चार आणि पाच नंबरच्या मणक्यातील चकती (डिस्क) घसरली होती. यालाच आपण ‘स्लिप्ड डिस्क’ म्हणतो. ही चकती मणक्याच्या पोकळीच्या आत शिरून उजव्या पायाकडे जाणाऱ्या नसेवर दाब आणत होती आणि म्हणूनच संजयला कमरेपासून पोटरीपर्यंत कळा व मुंग्या येत होत्या. कमरेच्या ‘एमआरआय’मध्ये हे चित्र अगदी स्वच्छपणे दिसत होतं. ‘एन्डोस्कोपिक डिस्केक्टॉमी’ या दुर्बिणीतून करण्याच्या शस्त्रक्रियेने त्याचं दुखणं गेलं आणि एका दिवसातच तो परत घरी गेला. परत जाण्याआधी या विषयाबद्दल अनेक प्रश्न त्याला होते.

किंबहुना गेल्या वर्षभरात अनेक वाचकांनी आपल्या दैनंदिन हालचाली, लकबी, बसण्याची पद्धत आणि एकूणच बैठय़ा जीवनशैलीची स्पाँडिलोसिस होण्यात किंवा डिस्क घसरण्यात परिणती होते का आणि यावर काही उपाय आहे का, असे प्रश्न वेळोवेळी विचारले जातात. आपल्या पाठीच्या कण्यातल्या मणक्यांमध्ये स्थित असलेल्या ‘डिस्क’बद्दल आपण काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली होती. बऱ्याच जणांना बहुतेक माहीत नसेल की डिस्कमधला दाब शास्त्रज्ञांनी तिच्यात ज्या सुईच्या प्रत्यक्ष टोकाला दाबमापक यंत्र लावलेलं आहे, अशी सुई घालून मोजलेला आहे. तोसुद्धा शरीराच्या विविध अवस्थांमध्ये. (उदा. बसणे, वाकणे, झोपणे इ.) ही माहिती सर्वाना असणं अत्यंत आवश्यक आहे, याचं कारण म्हणजे आपली सध्याची जीवनशैली आपल्याला ज्या गोष्टी करायला भाग पाडते त्यात हा दाब विचित्र पद्धतीने अनेक वेळेला वाढलेला असतो आणि या वाढण्याच्या प्रक्रियेमागचं कारण समजून घेतलं तर कदाचित बऱ्याच गोष्टी टाळता येतील.

‘डिस्क’ असते कुठे, दबते कशी?
कमरेच्या मणक्यामधल्या चकतीचं घसरणं आणि रोजचं अनेक तासांचं बैठं काम यांचा जवळचा संबंध आहे. ‘स्पाँडिलोसिस’ होण्याच्या प्रक्रियेचासुद्धा अनेक तास अवघडलेल्या अवस्थेत बसून काम करण्याशी संबंध आहे.कमरेच्या दोन मणक्यांमध्ये एक गादीप्रमाणे ‘कूर्चा’ असते यालाच आपण ‘डिस्क’ म्हणतो. मणक्याच्या हालचालीदरम्यान ‘शॉक अॅब्सॉर्बर’ व ‘बॉल बेअिरग’प्रमाणे काम करणारी ही गादी, दोन भागांची मिळून बनलेली असते. या गादीचा बाहेरचा भाग हा तंतूंच्या घट्ट विणीनं बनलेला असतो. मध्य भागात जेलीच्या घनतेचा मऊ भाग असतो. मणक्याच्या हालचालीदरम्यान हा भाग दबला जातो, पण भोवतीच्या घट्ट वेळेमुळे तो आपली जागा सोडत नाही. या मऊ भागाला ‘न्यूक्लिअस पल्पपोजस’ व घट्ट वेळेला ‘अॅन्युलस फायब्रोसस’ म्हणतात. ज्या वेळी आपण पुढे वाकून बसतो, पुढे वाकून जड वस्तू उचलतो, त्या वेळी हा न्यूक्लिअस मागे ढकलला जातो. त्यातला दाब वाढलेला असतो. कॉम्प्युटरवर काम करताना अनेक तास कंबर पुढे वाकलेल्या स्थितीत असते. कंबर, पाठ व मान यांना पोक आलेला असतो.

हात माऊस व कीबोर्डवर असल्याने हा पोक आणखी वाढतो. डिस्कमधला दाब वाढल्यामुळे त्याची बाहेरची घट्ट वीण उसवू किंवा फाटू लागते आणि मधल्या मऊ न्यूक्लिअसचा काही भाग या फाटलेल्या भागात घसरतो. ही ‘स्लिप्ड डिस्क’ची सुरुवात असते. या घसरण्यानं कंबरदुखी सुरू होते आणि त्यामुळे कंबरेचे स्नायू आकुंचन पावलेल्या अवस्थेत राहतात. यामुळे डिस्कमधला दाब अधिकच वाढतो आणि हे दुष्टचक्र चालू राहातं. सरतेशेवटी, डिस्कचा हा मधला मऊ भाग घट्ट वीण फाडून हळूहळू पूर्ण बाहेर येतो. बाहेर येऊन तो मणक्यातून पायाकडे जाणाऱ्या नसेवर जोरात दाब आणतो. त्यामुळे कंबरेपासून, कुल्ले, मांडीचा मागचा भाग, पोटरी व पावलात कळा येऊ लागतात. त्याबरोबर मुंग्या व बधिरपणासुद्धा जाणवू लागतो. ही स्थिती कमी न होता वाढत गेली तर पायांतली शक्ती कमी होते. डिस्कमधला दाब अनेक दिवस अशा चुकीच्या आणि खूप वेळेच्या बसल्यामुळे जर वाढत राहिला तर स्पाँडिलोसिसच्या प्रक्रियेला वेगानं सुरुवात होते.

अतिरिक्त ताणामुळे डिस्कची उंची कमी होत जाते आणि अशा वेळेला या भागात (दोन मणक्यांतील सांध्यांमध्ये व सभोवताल) अतिरिक्त कॅल्शियम जमा होत जातं. या कॅल्शियमच्या जमणाऱ्या पुटांमुळे मणक्याच्या आतल्या कॅनॉलचा आकार चिंचोळा होत जातो. कमरेच्या मणक्यामध्ये अशा वेळी नसांच्या संपूर्ण समूहावरच दाब येतो आणि ‘लंबर कॅनॉल स्टेनोसिस’चा आजार होतो. यात थोडं अंतर चालल्यावर मांडय़ा व पोटऱ्या भरून येणं, पायातली शक्ती कमी होणं, थोडा वेळ उभं राहिल्यावर पाय भरून येऊन बसावं लागणं, अशा प्रकारचा त्रास सुरू होतो. मानेच्या भागात हा त्रास सुरू झाला तर मान दुखणं, चालताना तोल जाणं, चप्पल निसटणं, हातांनी नाजूक व क्लिष्ट काम जसं की गुंडी लावणं, बक्कल सोडणं, नाडीची गाठ मारणं वगैरे करता न येणं.. पायातली शक्ती जाऊन चालणं बंद होणं वगैरे गोष्टी घडू शकतात. हा आजार जर असाच वाढत गेला तर शस्त्रक्रिया करावी लागते. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की मणक्याच्या बऱ्याच आजारांचे मूळ हे डिस्कच्या समस्येत असतं. म्हणूनच दोन मणक्यांमधल्या डिस्कचा दाब नेमका कसा बदलतो हे बघणं महत्त्वाचं आहे. स्पाइन क्लिनिकमध्ये येणारे बरेच लोक हे खूप वेळ बसून काम करणारे असतात. यात कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारे अनेक असतात; पण इतरही व्यवसायांतले लोक असतात.

प्रतिबंधक उपाय करता येतील का?
नेमका कोणत्या प्रकारे ऊठबस केली जाते, डिस्कमधला दाब कमी जास्त होतो यावर केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष खाली दिला आहे. कमरेच्या मणक्यातल्या डिस्कमधला दाब यात मोजला आहे.‘‘कापसाच्या घट्ट गादीवर उताणं झोपलेल्या अवस्थेत पंचवीस किलोग्रॅमपर्यंत हा दाब जातो. एका कुशीवर झोपल्यास ७५ किलोग्रॅम; सरळ उभं राहिल्यास १०० किलोग्रॅम; उभं राहून पुढे वाकल्यास दीडशे किलोग्रॅम; उभं राहिलेलं असताना पुढे वाकून जड वस्तू उचलताना २२५ किलोग्रॅम; मागे टेकून सरळ पाठ ठेवून बसल्यास १५० किलोग्रॅम, बसून पुढे वाकल्यास १८५ किलोग्रॅम आणि सर्वाधिक दाब हा बसलेल्या अवस्थेत पुढे वाकून जड वस्तू उचलताना.. जवळपास २७५ किलोग्रॅम इतका असतो.’’

या संशोधनावरून हे स्पष्ट दिसतं की ‘बसलेल्या’ स्थितीत डिस्कमधला दाब सर्वाधिक असतो.. आणि ही गोष्ट प्रकर्षांनं लक्षात ठेवायला हवी! पाठीत पोक काढून बसल्यास तर तो फारच वाढतो. खूप वेळ कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या व्यक्तीकडे पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, संपूर्ण पाठीला नकळत पोक आलेला असतो. मान पुढे वाकलेली असते, कंबर मागे जाते. या स्थितीतच डिस्कचा दाब खूप वाढलेला असतो.
यावर काय करावं? असा प्रश्न मला अनेक वेळेला विचारला जातो आणि मी जे उत्तर नेहमी देतो ते इथे पुढे देत आहे.

या समस्येवर हा व्यवहार्य तोडगा असू शकतो. खूप वेळ बसून काम करण्याआधी वीस मिनिटं झपझप चालून वॉर्मअप करावा. पोटावर झोपून अर्धा मिनिट सहज जमेल तेवढा भुजंगासन करावं आणि मग पाठ व कंबर सरळ ठेवून बसावे. खुर्चीचं सीट फार मऊ नसावं. पाठ सहज टेकली जाईल अशा प्रकारे स्थिती असावी. नकळत पोक येऊ नये म्हणून कमरेच्या मागे मध्यम आकाराची उशी घ्यावी. प्रत्येक अर्धा-पाऊण तासानं उठून थोडं चालून प्रथम ताडासन नंतर भुजंगासन व शेवटी पश्चिमोत्तानासन करावं (प्रत्येकी २० सेकंद) आणि पुन्हा बसून काम सुरू करावं. याचबरोबर नियमित पाठीचे व्यायाम करणं व वजन कमी ठेवणं उपयुक्त आहे. मणक्याचं ऑपरेशन झालेल्या व्यक्तींनासुद्धा याचा उपयोग होतो.खूप वेळ बसून काम करण्याची वेळ आल्यास अशा प्रकारे एक व्यायामाचा व आसनाचा छोटा कार्यक्रम चालू ठेवणं आजच्या युगात उपयुक्त ठरू शकेल.

(मेंदू व मणक्याचे आजार, नवीन संशोधन, भविष्यातील संभावना या विषयांसबंधी प्रत्येक आठवडय़ात लोकशिक्षण करणारे व्हिडीओ Dr Jaydev Panchwagh या यूटय़ूब चॅनेलवर पाहता येतील.)

लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत. brainandspinesurgery60@gmail.com