पीटर फ्रँकोपॅन यांचे ‘द अर्थ ट्रान्स्फॉर्मड’ हे ताजे पुस्तक केवळ पर्यावरणाच्या अंगाने नव्हे तर हवामान, वातावरण या संदर्भात मानवी इतिहास कसा पाहाता येईल; हे सांगते.  हा  पृथ्वीशी मानवाच्या असलेल्या संबंधाचा इतिहास आहे. फ्रँकोपॅन यांच्या अन्य पुस्तकांप्रमाणेच हेही पुस्तक माहितीने ओतप्रोत.. पण भाषा सामान्य वाचकालाही कळेल अशी! आपल्या पृथ्वीचे वय किमान साडेपाच अब्ज वर्षे असल्याचे सांगितले जाते. फ्रँकोपॅन यांचा भर पृथ्वी बदलत कशी गेली, ‘ट्रान्सफॉर्म’ कशी झाली, यावर आहे. त्यामुळे जीवसृष्टीच्या वाढीने गती घेतल्यापासून पुढल्या काळाचा हा इतिहास, मानवी हस्तक्षेपाचे वर्णन अधिक करतो. त्या ओघात मानववंशशास्त्रीय माहितीदेखील मिळत जाते.

‘सुमारे तीन अब्ज वर्षांपूर्वी प्रवाळसदृश जीवांच्या वाढीसाठी पृथ्वीच्या सागरपृष्ठांवर पुरेसा ऑक्सिजन तयार झालेला होता. हे घडले त्याचे कारण रासायनिक क्रिया, उत्क्रांती, सायनोबॅक्टेरियांची मोठय़ा प्रमाणावर वाढ, भूकंप आणि लाव्हारसाचे उत्पात, किंवा पृथ्वीच्या परिवलनाची गती मंदावणे या पाचांपैकी काहीही (किंवा पाचही एकत्र) असू शकतात.’ अशी वाक्ये  कदाचित विज्ञानविषयक लिखाणात शोभणार नाहीत. पण उत्क्रांती कशी झाली, प्रवाळ आधी कुठे आढळले याच्या तपशिलात इथे फ्रँकोपॅन यांना जायचेच नसून त्यांचा भर आहे तो ऑक्सिजनची उपलब्धता वाढणे, यावर! वातावरणीय बदल आणि स्थलांतर यांचा संबंध कीटक, प्राणी यांच्यातही शोधला गेला आहे, याची उदाहरणे देणाऱ्या या पुस्तकात पुढे मानवी स्थलांतर आणि अनुकूल वा प्रतिकूल वातावरण यांचा संबंध कसकसा येत गेला हेही सविस्तर मांडले गेले आहे. मानव शिकारीसह शेतीसुद्धा करू लागला, वस्त्या वसत गेल्या आणि इसवी सनापूर्वी ३५०० ते २५०० या हजार वर्षांत शहरे/ नगरेही वसली, याला पाण्याची विश्वासार्ह उपलब्धता हे मोठे कारण होते. मात्र मानवी संस्कृतीचा विकास जसजसा होऊ लागला तसतसे निसर्ग आणि मानव यांच्या नात्याचे नियमही मानवानेच केले.

peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

‘पहिला लिखित कायदा’ म्हणून परिचित असलेल्या ‘हमुराबी शिलालेखा’ने इसवी सनापूर्वी १९०० व्या वर्षी ‘दुसऱ्याच्या आवारातील झाडे तोडणे, नुकसान करणे’ यालाही शिक्षा होईल असा उल्लेख केला होता! धर्म आणि निसर्ग, वातावरण, पृथ्वी वा विश्वाची उत्पत्ती यांचाही आढावा या पुस्तकातील एका प्रकरणात आहे. वेद आणि उपनिषदांमधील निसर्गवाचक उल्लेखांमागचा विचार, बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञानातील निसर्ग-मानव संबंध यांसाठी पाच पाने लिहिली आहेत. भारताचा उल्लेख पुढेही अनेकदा येतो. गंगेच्या काठाने झालेला कृषी आणि नागर संस्कृतीचा विकास, ईस्ट इंडिया कंपनीतर्फे सतराव्या शतकात येथे आलेल्या ब्रिटिशांना हवामानाचा झालेला त्रास, दुष्काळ.. यांचा आढावा येतो. पण तितक्याच विस्ताराने आफ्रिका, पश्चिम आशिया, युरोप येथील माणसांनी त्या-त्या प्रदेशांतील वातावरणाला दिलेल्या प्रतिसादांच्या गोष्टी हे पुस्तक सांगते. अतिव्याप्त- ‘मेटा’ इतिहास सांगण्याचा या पुस्तकाचा प्रयत्न आहे. त्यातून लक्षात राहातो, तो लेखकाचा अभ्यासू स्वभाव.  इतरांनी केलेली निरीक्षणे आणि अनुमाने यांचा गोषवाराच लेखकाने मांडला आहे. पण त्यासाठी काटेकोर संदर्भाची निवड केली गेल्यामुळे हे पुस्तक वाचनीय ठरते.