यशवंत मनोहर

आपण सर्वच लोक एका क्रांतिकाफिल्याचे अविभाज्य भाग आहोत. या काफिल्याच्या मागे अंधार आहे आणि या काफिल्याच्या पुढे सर्वांना माउलीच्या मायेने पोटाशी घेणारे उजेडाचे साम्राज्य आहे. आपण संघटित नसल्याने आपल्या वर्तमानाची वाताहत झाली असली तरी आपल्या माणुसकीसाठी निरंतर झगडणारी मेहरगड, मेलूहापासूनची आठनऊ हजार वर्षांची साम्यवादाची सेक्युलर परंपरा आहे. सिंधुश्रमणसंस्कृती, लोकायत, बुद्ध, धम्मप्रिय अशोक, बृहद्रथ, बसवण्णा, शिवराय, फुले, सावित्रीमाई, शाहूराजे, बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान ही आपल्या मुक्तिपरंपरेची झगमगती सूर्यमाला आहे. भावंडांनो, तत्त्वज्ञानिकदृष्ट्या आपण जगातले सर्वश्रेष्ठ तालेवार लोक आहोत. जगातील शहाणपणाचा हा अनन्य ठेवा आपल्या पाठीशी दीपस्तंभासारखा उभा आहे.

sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
prakash ambedkar, manoj jarange patil, maratha reservation, vanchit bahujan aghadi, politics, maharashtra,
आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा समाजाने निवडणुका लढवाव्या; प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला
maharashtra govt presents interim budget for 2024 25 with revenue deficit of rs 9734 cr
Budget 2024: संकल्पात भक्ती, तुटीची आपत्ती, लेखानुदानात देवस्थाने, स्मारकांसाठी भरीव तरतूद; आर्थिक स्थिती सावरण्याचे आव्हान
Sharad pawar devendra Fadnavis (1)
“मनोज जरांगे शरद पवारांची स्क्रिप्ट वाचतायत”, फडणवीसांच्या आरोपांवर पवार म्हणाले, “मी आंतरवालीला जाऊन…”

साहित्यिक ही सर्व परस्परविरोधी हितसंबंधांच्या अतीत असलेली सर्वांच्या समान हितसंबंधांचीच भूमिका असते. ही भूमिका सहजसाध्य नसते. ही भूमिका सद्विवेकमयच भूमिका असते. ही जात, धर्म, गट, वंश, वर्ण या विघटनशील भूमिकांच्या निर्मूलनानंतर जन्माला येणारीच भूमिका असते. सर्व भूमिकांच्या चौकटी अस्ताला जातात आणि एक चौकटविहिन भूमिका जन्माला येते. या भूमिकेचे नाव साहित्यिक हेच असते. ही साहित्यिकाची चौकटविहीनताच विघातक चौकटींवर भाष्य करू शकत असते. अशा साहित्यिकाच्या प्रतिभेने मग सर्व भिंतीच उद्ध्वस्त केलेल्या असतात. हे मन सर्वव्यापीच झालेले असते. सर्वमयता हेच या मनाचे अस्तित्व झालेले असते. साहित्यिक जीवनाचे सत्य मांडतो. म्हणजे तो जीवनाचे वा त्याच्या भोवतीच्या वास्तवाचे वर्णन करीत नाही. तो जीवनाचे मर्म मांडतो म्हणजे जीवनाचे आहे तसे चित्र काढत नाही. तो जीवनातील परस्परविरोधी प्रवृत्तींच्या संबंधाचे मूल्यन मांडत असतो. हे जीवनाचे, त्यातील माणसांच्या संबंधांचे अर्थनिर्णयनच असते. तो या अर्थाने जीवनाचे निःपक्षपाती सत्यच सांगत असतो. तो कोणत्याच जातीची, धर्माची वा समूहाची बाजू वा पक्ष मांडत नसतो. तो सर्वहिताय सत्याची आणि सर्वसलोखामय सौंदर्याचीच बाजू मांडत असतो. या वर्गातीत सत्याच्या आणि सौंदर्याच्याच बाजूचा तो असतो.. ही त्याची बाजू विश्वसौहार्दाचीच असते. साहित्यिक ही सर्व भूमिकातीत पण सर्वमय भूमिकाच असते. ही भूमिका साहित्यिकाला जाती-धर्माच्या कोणत्याही दुकानात मिळत नाही. समाजातील जातींनी, वर्णांनी आणि धर्मांनी घडवलेल्या त्याच्यातील चौकटबद्ध संस्कारांशी संग्राम करूनच आणि त्यांचा पराभव करूनच त्याला ती मिळवावी लागते. समाजात जाती असतील पण जात असणारा माणूस साहित्यिक होत नसतो. समाजात वर्ण, वर्ग वा धर्म असतील पण वर्ण, धर्म वा वर्ग यांच्या सीमा उल्लंघून जात्यतीत, धर्मातीत, वर्णातीत वा वर्गातीत झालेला माणूसच साहित्यिक होत असतो. हे झाल्याशिवाय त्याला साहित्यिक या भूमिकेची प्राप्ती होत नाही.

हेही वाचा >>>नवीन धोरण तरी वाळूमाफियांचे कंबरडे मोडेल?

ज्याला असत्य सांगण्याची आणि अप्रामाणिक असण्याची सवय जडलेली असते त्याला कधीही साहित्यिकपणाशी संबंध जोडता येत नाही. सत्तेपुढे गोंडा घोळण्याची, सत्तेला शरण जाण्याची आणि अन्यायाचे समर्थन करण्याची सवय ज्याला झालेली आहे त्याला साहित्यिक असता येणे शक्यच होत नाही. साहित्यिक स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि अधिकाधिक जिवंत करण्यासाठी सततच संघर्ष करतो, आव्हानांशी सतत सामना करतो. त्याच्या जीवनातील संघर्ष आणि संग्राम त्याला सतत सतेज आणि अन्वर्थकच करतात. आव्हाने साहित्यिकाला अधिक कणखर आणि भेदक करतात.. त्याचे जिवंतपण अधिक प्रखर करीत असतात. आव्हानांपासून पळणे म्हणजे जीवनापासून पळणेच असते. जीवनातील द्वंद्वांकडे पाठ फिरवून कोणालाही यथार्थ साहित्याची निर्मिती करता येत नाही. आव्हानांकडे पाठ फिरविणे वा द्वांकडे कानाडोळा करणे हे जीवनापासून दूर जाणेच असते आणि जीवनापासून दूर जाणे हे मग साहित्यापासूनही दूर जाणेच असते. असे लोक साहित्यिक होत नाहीत. शब्द आणि शब्दांची वाक्ये लिहिणारे लोक लेखक होतात. असे लेखक आणि साहित्यिक या दोन रचितांमध्ये खूप अंतर असते. भूमिका न घेणारा एक माणूस शब्द जुळवतो तर भूमिका घेणारा दुसरा माणूस साहित्यिक होतो. साहित्यिक या संज्ञेचा अर्थच सदसद्विवेक हा होतो. या भूमिकेच्या पोटीच खरे साहित्य निर्माण होते.

आजचा काळ विलक्षणच आहे. दारे खिडक्या दिसत नाहीत असा हा काळ आहे. नवनव्या धोक्यांची दररोज नवनव्याने उत्पादने होत आहेत. खूप माणसे शरीरानेही मारली जातात पण त्यापेक्षाही कितीतरी माणसांच्या मनांच्या हत्या केल्या जात आहेत. यापूर्वीच्या काळात प्रश्न नव्हते असे नाही पण आजच्या इतके पराकोटीचे अवघड नव्हते असेच म्हणावे लागेल.. दर नवा दिवस नवेच प्रश्न घेऊन उगवतो आहे. बहुजनांच्या महामानवांचे अवमान करण्याचे नवनवे प्रयत्न केले जात आहेत. निकडीच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याची दुष्ट मोहिमच राबविली जात आहे. स्त्रियांविषयी बाबांपासून राजकारणातील जबाबदार माणसेही असभ्य बोलतच असतात. राजकारण्यांच्या भाषेने तर नैतिकतेच्या सर्व मर्यादांचे पार उल्लंघनच केले आहे. नव्या पिढ्यांपुढे हे सर्वच प्रकार कोणते आदर्श ठेवत आहेत ? विद्यापीठात, मंत्रालयामध्ये सत्यनारायण होतात. गणेश अथर्वशीर्ष विद्यापीठात अभ्यासासाठी ठेवले जाते. ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या कोबाड गांधींच्या पुस्तकाच्या अनुवादाला जाहीर झालेला पुरस्कार शासनाने मागे घेतला. आज या सर्व वातावरणात साहित्यिकांनी अधिक जबाबदार व्हायला हवे. साहित्यिकांनी आपल्या स्वातंत्र्याचे मोल जपायलाच हवे. साहित्यिकांनी समाजाला त्याच्या स्वातंत्र्याच्या आणि न्यायाच्या मार्गातील धोके समजावून सांगायलाच हवेत.

शोषकांविरुद्ध सर्व शोषित, सर्वजितांविरुद्ध सर्वहारा, चैतन्यवादी विरुद्ध इहवादी असा वैचारिक आणि वर्गीय संघर्ष आपल्याला का शक्य होत नाही? अशी वर्गरचना आपल्याला का शक्य होत नाही? ती होऊ नये ही कोणाची योजना आहे? त्यामुळेच मला वाटते की अन्यायग्रस्तांची केवळ माणूस हीच एकमेव अस्मिता वर्गीय पातळीवर उभी राहिली तरच एका आमूलाग्र परिवर्तनाला प्रारंभ होऊ शकतो.

भावंडांनो, आपल्या विविधतेची आपण जपणूक करूच, पण ही विविधता भौतिक पातळीवरची आहे हे भानही आपण ठेवू. ही भौतिकतेची विविधता कायम ठेवून आपण नैतिकदृष्ट्या एकसंध राहू. आपल्याला, आपल्या भौतिकतेला एकत्र सांधणारे आणि तिचे नियंत्रण करणारे तत्त्व सर्वांचे समान ऐहिक हित हेच असावे. हेच आपले सलोखातत्त्व आहे असे आपल्याला वाटले पाहिजे. सर्व शोषितांना एकत्र गुंफणारे हेच सर्वानुकंपा तत्त्व आहे. हे वर्गीयभानच आहे. हे वर्गीय भान शोषितांमध्ये निर्माण होत नसेल तर त्याचे दोन अर्थ संभवतात. एक अर्थ अन्यायग्रस्त लोकच शोषणसत्ताकाचे संरक्षण आणि संवर्धन करीत आहेत हा आणि स्वतः दासच त्यांचे दास्य संपण्याच्या विरोधात आहेत हा दुसरा ! त्यामुळेच प्रत्यक्ष जीवनातील शोषितांचे समूह आणि साहित्यातील त्यांचे प्रवाह यांचे एकसंधत्व आपण कसे निर्माण करतो यावरच जीवनातील लोकशाहीचे आणि साहित्यशाहीचेही भवितव्य अवलंबून आहे. या प्रयत्नात विविधता किंवा संमिश्रता ही भौतिकतेपुरती ठेवावी लागेल आणि या विविधतेला एकजीवतेचे सूत्र देणाऱ्या संवर्धनशील संस्कृतीची रचना करावी लागेल. एवढेच शोषितांच्या हाती आहे आणि हे त्यांना करावेच लागेल. हे शक्य आहे. हे शक्य झाले तरच सर्व शोषित लोक वर्गीय पातळीवर एकजूट होऊ शकतात. ही वर्गीयताच जातींचे, धर्मांचे आणि अस्मितांचे विभाजकभान क्रमाने क्षीण करीत जाईल. हे क्षीण होणारे भान एक दिवस नष्ट होईल आणि विखुरलेला हा सर्व शोषित बहुजन समाज एक ध्येयवर्ग, एक विचारवर्ग आणि अपूर्व असा क्रांतिवर्ग होईल. यावेळी निर्माण होईल तीच खरी साहित्यशाही असेल. या शोषितांच्या मनांची हीच नवी निर्मितीही असेल.

हेही वाचा >>>‘ईडी’ची व्याप्ती वाढली, विश्वासार्हतेचे काय?

बहुजनांमधील सर्व समूहांना वैदिक शोषणसत्ताकाने वेगवेगळ्या जातींमध्ये, धर्मामध्ये आणि गटांमध्ये विभागून ठेवले आहे. या मुळच्या एकसंध बहुजनसमाजाच्या फाळण्याच आहेत. आज तर द्वेष हाच समाज, शिक्षण, साहित्य आणि राजकारण यांचा धर्म झालेला आहे. तो आपसूक झाला आहे असे नाही. तो तसा केला गेला आहे. भोवतीचे जीवन आज जातींच्या आणि धर्मांच्या घायाळ बेटांसारखे झाले आहे. ही बहुजनांच्या विलगीकरणाचीच तरतूद वैदिक परंपरेने करून ठेवलेली आहे. या पातळीवर आणि संदर्भात आपण साहित्यप्रवाहांचा विचार करायला हवा. आपल्या देशात अनेक राज्ये आहेत पण त्यांच्या भौतिक विविधतांना आणि संमिश्रतेला जपत आपले संविधान त्यांना एकतेच्या, सलोख्याच्या आणि सौहार्दाच्या सूत्रात बांधते. याला आपण आपली शहाणी संविधानशाही म्हणतो, भारत हा आपला देश अनेक राज्यांचा मिळून बनलेला आहे. ही राज्ये वेगवेगळी, त्यांची भौतिक व्यक्तिमत्त्वे वेगवेगळी आणि तपशीलही वेगवेगळे पण या सर्व राज्यांना एकत्र बांधणारे आणि एकसंध ठेवणारे सूत्र आपली संविधानशाही देते. राज्यांमध्ये असे एकमयतेचे सुंदर नाते असते. तसेच साहित्यप्रवाहांमध्येही असायला हवे असे मला वाटते. ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य, भटक्याविमुक्तांचे साहित्य, महानगरीय साहित्य, मार्क्सवादी साहित्य, गांधीवादी साहित्य, आंबेडकरवादी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, ख्रिस्ती साहित्य, विज्ञान साहित्य, जनसाहित्य असे वेगवेगळे साहित्यप्रवाह मराठी साहित्यात आहेत. त्यांचे भौगोलिक, सामाजिक तपशील, इतरही सर्व भौतिक तपशील भिन्न भिन्न आहेत. हा तपशीलभेद आणि ही संमिश्रता अपरिहार्यही आहे. आवश्यकही आहे. ते तर जीवनाचे सौंदर्यच आहे. त्या त्या भौतिक तपशिलाच्या सामग्रीद्वाराच साहित्यिक आपले जीवनाकलन मांडत असतो. त्यातून तो समाजातील द्वंद्वे प्रकाशित करीत असतो. पण त्या त्या समूहांमधील भिन्न तपशिलांचा मर्मार्थ साहित्यिकांच्या मनातील मूल्यदृष्टी वा प्रमाणदृष्टीच ठरवत असते. या सर्वच प्रवाहांमधील साहित्यिकांच्या जीवनाभिरुचीचे निश्चित प्रमाणशास्त्र असते आणि हे प्रमाणशास्त्र आपल्या संविधानशाहीतच आहे… आपल्या सर्व विविधतांना एकत्र गुंफणारे हे सूत्र आहे. हे ऐक्यसूत्र आहे. त्यामुळे आपल्या सर्वच साहित्यप्रवाहांना देशाच्या राज्यांप्रमाणेच एक अखंड प्राप्त व्हावी आणि ती अधिक गडद व्हावी असे मला वाटते. म्हणजे जीवनसंदर्भाचे वेगळेपण कायम ठेवून आपण एकमय असू शकतो. असे सर्वच साहित्यप्रवाहांमधील प्रतिभावंतांना वाटायला हवे. आज या एकमयतेची कधी नव्हे इतकी गरज आहे असे मला नम्रपणे वाटते. संविधाननिष्ठ तरुणच संविधानभारत घडवू शकतात…

भारतात तरुणतरुणींची संख्या ७० टक्क्यांच्या आसपास आहे. पण ही क्रांतिकारी ताकद आज धर्माच्या सापळ्यात अडकवली जात आहे. नवे विज्ञान आणि माहितीतंत्रज्ञान आज जगाची मानसिकता नव्याने घडवत आहे. यावेळी जातींच्या धर्माच्या आणि मूलतत्त्ववादांच्या पिंजऱ्यात तरुणाईने सापडू नये. त्यांची पावले वैज्ञानिक जगाबरोबर आणि विकसनशील विश्वासाबरोबर पडायला हवीत. त्यांच्या आधुनिक आणि वैज्ञानिक पंखासाठी त्यांनीच आता नवे शहाणे गगन निर्माण करायला हवे. या पिढीला आइन्स्टाइनच्या आणि स्टीफन हॉकिंगच्या हाका ऐकायला याव्यात. त्यांच्या बुद्धिवादाला आणि समतेला साद घालणारे फुले, शाहू, आंबेडकरांचे निरामय स्वप्न त्यांना प्रकर्षाने ऐकायला यायला हवे. तरुणांनो, भारत तुमचा आहे. त्याची संविधानशाही तुमची आहे. त्याचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार तुम्हालाच आहे. देशापेक्षा आणि संविधानापेक्षा कोणताही पक्ष मोठा नाही. देशातील सर्व यंत्रणा तुमच्या विकासासाठी राबवल्या जायला हव्यात. २५ नोव्हेंबर १९४९ च्या संविधान सभेतील भाषणात आपले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेफरसनचा हवाला पुढीलप्रमाणे दिलेला आहे. अमेरिकेच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार जेफरसन म्हणतात, “प्रत्येक पिढी बहुसंख्याकांच्या इच्छेप्रमाणे स्वतःला बांधून घेण्याचा अधिकार असलेल्या एका स्वतंत्र राष्ट्राप्रमाणे आहे. येणाऱ्या पिढीला कोणी बंदिस्त करू शकत नाही, जसे दुसऱ्या राष्ट्रातील लोकांना करता येत नाही. भावी पिढीला बदलविता येणार नाही असे कायदे आपण केले आणि ते भावी पिढीवर लादले तर वास्तवात हे जग मेलेल्यांचे असेल, जिवंत लोकांचे असणार नाही.” जेफर्सनची ही भूमिका मांडण्यामागे बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश पुढच्या पिढ्यांचे विचारस्वातंत्र्य अबाधित राहावे हाच होता. सर्व तरुणाईने हे स्वातंत्र्याचे निरोप उराशी कवटाळूनच पुढे जायला हवे. तुम्ही वाहते आणि संवर्धनशीलच असावे हे सांगणारे बाबासाहेब तुम्हाला तुमचे महानायकच वाटायला हवेत. तरुणतरुणींनो तुम्ही दैववादी, शब्दप्रामाण्यवादी आणि पोथीवादी होऊ नका. स्वतंत्र बुद्धीचे भारतीय नागरिक तुम्ही व्हा. आपल्याला कुणाकडे गहाण टाकू नका. या तुमच्या बुद्धीच्या स्वातंत्र्याला तुमचे खरे मानवी अस्तित्व माना. तुम्ही मनात आणाल तेच देशात घडेल. ज्या दिशेने तुम्ही बघाल त्या दिशेने देश बघेल. ज्या दिशेने तुम्ही चालाल त्याच दिशेने देश जाईल. तुम्ही मनात आणाल तोच देशाच्या सन्मानाचाच विचार होईल. तुम्ही निर्णय घ्या. विज्ञाननिष्ठ व्हा. चिकित्सक व्हा. मानवतावादी व्हा. स्वतःची या दृष्टीने सतत नवरचना करा. आपला देश या तुमच्या नवरचनेनेच संपन्न होईल. तुमच्या हातात आणि डोक्यात संविधानशाही रुजली आणि प्रखर झाली तर देशातले जातींचे, वर्णांचे, वर्णांचे, भेदभावाचे आणि मूलतत्त्ववादाचे सर्वच प्रश्न संपून जातील. तुम्ही फक्त मनात घ्या आणि या आपल्या देशाचे कर्तबगार धनी व्हा.

हेही वाचा >>>न्यायालयांवरचा ताण कमी करण्यासाठी मध्यस्थी या पारंपरिक पर्याायाचा विचार केला जावा; कायदेमंत्रीही करत आहेत तसा कायदा करण्याचा विचार…

बहुजनांच्या साहित्यिकांनी पूर्ण तरुणाईला आणि एकूणच समाजाला ही क्रांतीनीती सांगावी. साहित्यिकांनी जळते प्रश्न लोकांपुढे अंथरावेत. समाजाच्या पायाखाली काय जळत आहे ते लोकांना समजावून सांगावे. अरिष्टांच्या चाहुली प्रथम साहित्यिकांना लागतात. ते काळाचे संदर्भ, काळाच्या यातना आणि काळापुढील धोके लक्षात घेऊन वर्तमानकाळाच्या पुढचे सुरक्षित भवितव्य लोकांपुढे प्रत्ययकारी पद्धतीने ठेवू शकतात. म्हणूनच साहित्यिकांनी समाजाला अंतर्मुख करणारे, जबाबदारीचे भान देणारे आणि विधायक विचार करायला लावणारे साहित्य निर्माण करावे. प्रत्येकच काळाला साहित्यिकांनी मूल्यांचे युद्ध मानायला हवे आणि या युद्धात त्यांनी सर्वांच्या हिताची छावणी गौरवाने निवडायला हवी. लोकायत, बुद्ध, सॉक्रेटिस, रसेल, सार्त्र, जॉन ड्युई, आइन्स्टाइन, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर आणि आपले संविधान यांचे सर्वमानवसमभावाचे निरोप त्यांनी सर्वच लोकांपर्यंत निष्ठापूर्वक पोचवावेत. भोवतीच्या अनेकांनी त्यांच्या मनांचे संतुलन गमावलेले आहे. या काळात साहित्यिकांनी भावनिक, भाषिक आणि वैचारिक समतोल जन्माला घालणारे साहित्य निर्माण करायला हवे.. कोसळणाऱ्या आणि नव्याने कोसळण्याची तयारी करणाऱ्या संकटांची पूर्वसूचना साहित्यिकांनी लोकांना द्यायला हवी. त्या संकटांमुळे कोणत्या उलथापालथी होऊ शकतात, समाजाच्या सभ्यतेचे कोणते आणि कसे नुकसान होऊ शकते ते सर्व कळकळीने त्यांनी समाजाला समजावून सांगायला हवे. सत्य काय, असत्य काय, लोकांना लुबाडणारे कोण आणि त्यांना सममूल्यतेची हमी देणारे कोण हे समजावून सांगायला हवे. साधूंच्या वेशातील मारेकऱ्यांची उद्दिष्टे साहित्यिकांनी समजाच्या पुढे उलगडून दाखवायला हवीत.

नव्याने लिहिणाऱ्या साहित्यिकांना मी कळकळीने हे सांगेन की प्रेते निर्माण होतील, गुलाम निर्माण होतील आणि स्वाभिमानशून्यता निर्माण होईल असे साहित्य लिहू नका. सत्तेचे मांडलिक, सत्तेचे तळवे चाटणारे, कणा नसलेले मिंधे लोक निर्माण होतील असे साहित्य निर्माण करू नका. ‘ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ असे मानणारी मने निर्माण करणारे साहित्य लिहू नका. प्रश्नांना भिडणारी आणि निकराने लढणारी माणसे निर्माण होतील असे साहित्य निर्माण करा. संभ्रमित माणसे निर्माण होतील, लुळीपांगळी आणि बधीर मने निर्माण होतील असे साहित्य निर्माण करू नका. भयभीत माणसे, असहिष्णु माणसे, असत्य बोलून सत्याची बेअब्रू करणारी माणसे निर्माण होतील असे साहित्य लिहू नका.

माणसांना गोठवणारे साहित्य लिहू नका. माणसांमधील उमेदी मरून जातील असे साहित्य लिहू नका. स्वप्न बघायला घाबरणारी माणसे निर्माण होतील असे साहित्य निर्माण करू नका. लोकांच्या मनातील स्वप्ने मरून जातील. लोकांचे कणे गहाळ होतील आणि डोकी विझून जातील असे साहित्य निर्माण करू नका. आपण साहित्यिक आहोत. नवे जीवन निर्माण करणारे, विद्रूपतेच्या विरोधात सौंदर्याचा पर्याय निर्माण करणारे आणि संविधानशाहीला अभिप्रेत माणुसकीचे साम्राज्य निर्माण करणारे आपण साहित्यिक आहोत. तुमच्यात अमाप ताकद आहे त्या ताकदीवर अन्याय करू नका प्रतिभावंतांनो! साहित्यिशाहीच्या शिल्पकारांनो, तुमच्या सर्वच निर्मितीचे शीर्षक सर्वांना समान न्याय, बंधुता आणि भगिनीता हेच असावे यासाठी निर्वाण मांडा.

हेही वाचा >>>भारत जोडो यात्रा’ राजकीय नसेलही, पण तिने केलेली मशागत काँग्रेसला नवे बळ देईल का?

माझ्या प्रतिभावंत भावंडांनो, माणूस हरणार नाही आणि हरवून जाणार नाही. असेच साहित्य लिहायची प्रतिज्ञा आपण करा. कितीही प्रतिकूल परिस्थिती आडवी आली तरी माणसे तिचा पराभव करण्यासाठीच उठाव करतील असाच शब्द आम्ही लिहू असा निर्धार करा. आपण गोरगरिबांना न्याय देणारा पर्यायी समाज, पर्यायी राजकारण आणि पर्यायी साहित्य निर्माण करू शकतो या विश्वासाने तुम्ही सतत धगधगत असायला हवे. माणसांना ताठ करणारे, त्यांना ठामपणे उभे करणारे आणि त्यांच्यात क्रांतीच्या ज्वाला निर्माण करणारे साहित्य आपण त्यांना द्यायला हवे. स्थितिशीलतेला विघातक ठरवणारे साहित्य निर्माण करता येण्यासाठी आपणच प्रथम विषमतासत्ताकाला आणि शोषणसत्ताकाला नाकारणारा विधायक पर्याय घेण्याची गरज असते. प्रतिभावंत भावंडानो, आपण उगवलो की असत्याचा कलकलाट मावळतोच! आपण भरती झालो की बेबंदशाहीला ओहोटी लागतेच, आपले कणे पूर्ण पोलादाचेच असायला हवेत कारण ठिसूळ आणि शरणार्थी कणे दैववादाच्या तालावर सहज नाचायला लागतात. स्वाभिमानाला पारखे कणे राजकीय आणि वाङ्मयीन सत्ताकांच्या तुकड्यांसाठी सहज लाचार होतात. प्रतिभा जेव्हा स्वतःला विकण्याचा धंदा सुरू करते तेव्हा ती प्रतिभा उरतच नाही. ठिय्यावरील मजूर होते. मजूर प्रतिभा मग मालक सांगेल तेवढेच काम करीत राहतात. या परतंत्र प्रतिभा मग समाजातील लोकांच्या मनांना लाचारी शिकवित फिरत राहतात.

भावंडांनो पेटत्या गगनात आपणाला उडायचे आहे याचे भान ठेवा. जबाबदारीची मान खाली जाईल असे काही लिहू नका. आपल्याला फुले- शाहू-आंबेडकरांचे पंख फुटावेत यासाठी जिवापाड प्रयत्न करा, आपली प्रतिभा उगवते ते क्षितिज संविधानाचेच आहे की नाही याची खात्री करून घ्या. आपला शब्द नवनव्याने उजेडाचा होतो की नाही, याची सतत शहानिशा करा आणि मगच लिहा. माणुसकी आणि मानवी हक्क या शब्दांची भीती घेतलेल्या मनांमध्ये तुमच्या शब्दांना निर्भयतेची लागवड करायला पाठवा. गोरगरिबांचे जगणे निरर्थक करणाऱ्या योजना मोकाट सुटलेल्या आहेत. या वेळी अगतिक लोकांचे जगणे अर्थपूर्ण करणाऱ्या शब्दांचे तुम्ही निर्माण करा. बाबासाहेब म्हणतात त्या शेटजी-भटजींच्या हितसंबंधांचे मनोरे उंच करण्यासाठी आपल्या साहित्याचा वापर होणार नाही याची डोळ्यात तेल घालून काळजी घ्या.

आज उन्मत्त अतिभांडवलशाहीने आणि मूलतत्त्ववाद्यांनी माणूसकीचीच क्रूर थट्टा चालवलेली आहे. अशावेळी माणूस तुटणार नाही, त्याच्या वाट्याला मेलेले जगणे येणार नाही आणि तो आपला मानवी स्वाभिमान निर्माण करण्यासाठी योद्धा होईल, असेच साहित्य आपण निर्माण करायला हवे.