केतन पाठक
यंदाचे एल-निनो वर्ष आणि अधिक मास या दोन्हीच्या निमित्ताने दरम्यानच्या काळात समाजमाध्यमांवर झालेली चर्चा वाचून सहज कुतूहल जागे झाले. या दोघांचा परस्पर काही संबंध आहे का, हे तपासून पाहिले पाहिजे, असे वाटले. यासाठी वेळ कमी मिळणार हे ठाऊक होते, त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करायचे ठरविले आणि जे काय चित्र पुढे आले, ते मांडण्याचा हा छोटेखानी प्रयत्न… यासाठी दोन एआय प्लॅटफॉर्म वापरले. ‘चॅट-जीपीटी’ आणि ‘क्लाऊडे’. या अभ्यासातून एक लक्षात आले की, ‘क्लाऊडे’ अधिक स्मार्ट आहे. आता विषय पुढे नेण्यापूर्वी अधिक मास, एल-निनो या दोन्ही संकल्पना समजून घ्या.

अधिक मास : सौर वर्ष हे ३६५ दिवसांचे असते आणि चंद्रवर्ष ३५४ दिवसांचे. यात एका वर्षांत ११ दिवसांचा फरक पडतो. असा हा तीन वर्षांचा फरक जमा होऊन एक महिन्यांचा होतो, त्यालाच ‘अधिक मास’ म्हणतात. अधिक मास दर चौथ्या वर्षी येतो. आता ही झाली मराठी कालगणना. असाच एक प्रकार इंग्रजी कॅलेंडरमध्ये होतो. त्याला आपण ‘लीप इअर’ असे म्हणतो. हेही दर चौथ्या वर्षी येते आणि त्यावर्षी फेब्रुवारी महिना हा २९ चा येतो. २०२४ हे लीप वर्ष होते.

एल-निनो : प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठ तापमानातील बदलांमुळे निर्माण होणारा हवामान बदल म्हणजे एल-निनो. साधारणत: दोन ते सात वर्षांनी येणारी स्थितीे. याचा मान्सूनवर विपरित परिणाम होतो.

असो, तर या अभ्यासासाठी १९५१ ते २०२६ असा ७६ वर्षांचा कालखंड निवडला. या ७६ वर्षांत एकूण २८ वर्ष अधिक मासाचे होते, २२ वर्ष एल-निनोची होती आणि अधिक मास तसेच एल-निनो असे दोन्ही एकत्र असलेली एकूण १२ वर्ष होती.

यातही अधिक मास जर ज्येष्ठ महिना असेल तर हा प्रभाव अधिक असतो का, असाही एक प्रश्न मनात होता. तोही विचारून पाहिला.

‘क्लाऊडे’ने दिलेली निरीक्षणे पुढीलप्रमाणे :

 हे खूप महत्त्वाचे लोकनिरीक्षण आहे, त्याचे खगोलीय कारण असे : अधिक ज्येष्ठ म्हणजे ज्येष्ठ महिना लांबतो, म्हणजे मान्सूनपूर्व उष्ण काळ आणखी वाढतो. ज्येष्ठात सूर्य कर्कवृत्ताकडे जात असतो. हा उष्णतेचा कळस. तो अधिक दिवस राहिला तर कोरडेपणा वाढतो.

 अधिक मास आणि एल-निनो एकत्र आल्यास

२०१५  मध्ये अधिक आषाढ आणि तीव्र एल-निनो एकत्र :            

दुष्काळी वर्ष

२०१८  मध्ये अधिक ज्येष्ठ आणि सौम्य एल-निनो : सुमार पाऊस

२०२६ मध्ये अधिक ज्येष्ठ आणि सुपर एल-निनो : दुष्काळाचा अंदाज

अधिक ज्येष्ठ/आषाढ हा मान्सूनच्या आधी, सुरुवातीला आल्यास पावसावर जास्त परिणाम आणि अधिक श्रावण/भाद्रपद मान्सून मध्यात म्हणजे तुलनेने कमी परिणाम.

 अधिक मास आणि एल-निनो एकत्र असलेल्या १२ वर्षांपूर्वी केवळ पाच वर्ष ही सामान्य पावसाची आहेत, तर सात वर्ष ही कमी पावसाची आहेत. कमी पावसाची वर्ष ही १९७२, १९८७, २००२, २०१५, २०१८, २०१३ आणि अपेक्षित असे २०२६ ही वर्षे आहेत. यातील अधिक भाद्रपदाची दोन, अधिक श्रावणाची दोन, अधिक आषाढाचा 1 आणि अधिक ज्येष्ठाची यावर्षीसह दोन वर्ष आहेत. म्हणजे जवळजवळ ५५ टक्के परिस्थितीत एल-निनो आणि अधिक मास आहे.

 पारंपरिक निरीक्षण : अधिक ज्येष्ठात पाऊस उशीरा येतो, हे आधुनिक हवामानशास्त्राशी जुळते. खगोलिय कालगणना आणि हवामान यांचा हा नैसर्गिक समन्वय आपल्या पूर्वजांनी अनुभवातून जाणला होता. अधिक ज्येष्ठात पाऊस उशीरा येतो, हे ७५ वर्षांच्या आकडेवारीने सिद्ध होते. परंपरेतील निरीक्षणे आणि आधुनिक हवामानशास्त्र यांचा संयुक्त अभ्यास हे नवीन संशोधनक्षेत्र ठरु शकते.

 यंदा अधिक ज्येष्ठ १७ मे ते १५ जून या काळात होता. ज्येष्ठ एकादशीची रिमझिम उशिरा. असे यापूर्वी १९६९, १९८४, १९९९, २००८, २०१८ या वर्षांत झाले. २०१६ मध्ये ज्येष्ठ संपला १५ जूनला आणि महाराष्ट्रात मान्सून आला २३ जूनला. हे तंतोतंत जुळले आहे. २००२ ला २४ टक्के, २००४ ला १८ टक्के, १००९ मध्ये १८ टक्के आणि २०१५ मध्ये ९ टक्के कमी पाऊस आला आहे.

आता या दोन्हीचा संगम साधून या पावसाळ्याबाबतचे अंदाज विचारले. त्यावर एआयने दिलेले उत्तर असे:

कोकणात सामान्य ते चांगला पाऊस, मध्य महाराष्ट्र, पुण्यात सामान्य ते कमी पाऊस पण, जुलैनंतर सुधारणा शक्य, मराठवाड्यात कमी ते दृष्काळसदृश्य, विदर्भात उशिरा आणि कमी पाऊस. घाटमाथ्यात तुलनेने बरा पाऊस. एकूणच जून-जुलैत उशिरा व तुटपुंजा, ऑगस्टमध्ये मध्यम, सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस लवकर जाण्याची शक्यता. केवळ अभ्यास हाच यामागचा हेतू.

हवामान विषयात अभ्यास करणारी मंडळी आणि पारंपारिक निरीक्षण करणारे तज्ञ यांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम सल्लागार