डॉ. अक्षय देवरस
एल निनो आणि मान्सून म्हटलं की राज्यासह देशातील अनेकांच्या मनात एकच भीती निर्माण होते; ती म्हणजे दुष्काळाची. ३० सप्टेंबर रोजी नैऋत्य मान्सूनचा ऋतू संपला, आणि शेवटी ज्याची भीती होती, तसंच यंदा घडलं. यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसावर एल निनोचा मोठा प्रभाव पडला असून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांसमोर दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या मान्सूनच्या अधिकृत कालावधीत देशात सरासरीपेक्षा सुमारे १३ टक्के कमी पाऊस झाला, तर महाराष्ट्रात ही तूट सुमारे १९ टक्के आहे. मराठवाड्यात ४० टक्के, विदर्भात २३ टक्के, मध्य महाराष्ट्रात ११ टक्के, तर कोकण आणि गोव्यात १४ टक्के कमी पाऊस झाला आहे.
जिल्हानिहाय चित्र आणखी चिंताजनक आहे. सोलापुरात सरासरीपेक्षा ५८ टक्के, बीडमध्ये ५१ टक्के आणि नंदुरबारमध्ये ३९ टक्के कमी पाऊस झाला. नेहमीच भरपूर पावसासाठी ओळखल्या जाणार्या कोकणातील सिंधुदुर्गातही पावसाची तूट ३६ टक्के आहे. पुणे, मुंबई परिसराचा काही भाग, नाशिक आणि गोंदिया वगळता जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परिणामी किमान २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे, आणि जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कुठे ना कुठे दुष्काळाची परिस्थिती आहे. काहींच्या मते, यंदाची परिस्थिती १९७२च्या मान्सूनसारखी किंवा त्याहूनही अधिक गंभीर आहे. कारण खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, पिण्याच्या पाण्याची आणि चार्याची टंचाई निर्माण झाली आहे आणि रब्बी हंगामासाठी शेतकर्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
मग यंदाच्या पावसाचं वैशिष्ट्य काय? एल निनोमुळे मान्सूनवर इतका परिणाम का झाला? यंदाचा दुष्काळ १९७२ सारखा गंभीर आहे का? आणि यापूर्वीच्या एल निनो वर्षांमध्ये महाराष्ट्रात काय परिस्थिती होती? अशा प्रकारचे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील.
सोप्या भाषेत सांगायचे तर दर दोन ते सात वर्षांनी प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय पूर्वेकडील भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा लक्षणीय वाढते. समुद्र आणि वातावरणातील परस्परसंवादामुळे या स्थितीचा परिणाम जगभरातील हवामानावर, त्यात भारतीय मान्सूनवरही होतो. या स्थितीला एल निनो म्हणतात. एल निनो आणि महाराष्ट्रातील मान्सूनच्या पावसामध्ये निश्चितच संबंध दिसून येतो. १९७१झ्र्२०२० हा सरासरीचा कालावधी धरल्यास, १९५१ ते २०२५ या ७५ वर्षांमध्ये महाराष्ट्रात ३७ वर्षे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यापैकी १९ वर्षे एल निनोची होती. म्हणजे या कालावधीत एल निनोच्या वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता निम्म्याहून अधिक होती. या शतकातील निवडक एल निनो वर्षांकडे पाहिल्यास २००६ वगळता इतर वर्षांमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या वर्षांमध्ये राज्यात सरासरीच्या तुलनेत १२ टक्के पावसाची घट दिसते. मात्र यंदाचे चित्र काहीसे वेगळे आहे.
मराठवाड्यातील नेहमीची पावसाची तूट कायम असली, तरी यंदा विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाने मोठी ओढ दिली. दुसरीकडे नाशिक परिसरात सरासरीपेक्षा सुमारे ३३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. आपल्याला आठवत असेल तर जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह नाशिक आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला होता. काही भागांत भूस्खलनाच्या घटनाही घडल्या. त्यापूर्वी जूनमध्ये मान्सूनचे उशिरा झालेले आगमन, विदर्भात १५ जूननंतर ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदले गेलेले कमाल तापमान आणि एकूणच विक्रमी पावसाची तूट यामुळे सर्वांची चिंता वाढली होती. खानदेशातील काही भाग तर संपूर्ण महिना कोरडा गेला होता.
जुलैमध्ये पावसाचा लपंडाव सुरू झाला. महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर पुन्हा पावसात घट पाहायला मिळाली. मात्र, जुलैच्या अखेरीस बंगालच्या उपसागरातून आलेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ, राज्याच्या उत्तर भागातील काही क्षेत्रे तसेच मुंबईसह कोकणात परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली. मात्र, त्यानंतर ऑगस्टमध्ये पाऊस जणू काही गायबच झाला आणि अनेक भागांत सप्टेंबरमध्येही अशीच परिस्थिती कायम राहिली. अगदी शेवटच्या टप्प्यात काही भागांत वादळी पाऊस झाला, तर एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व विदर्भाला काहीसा दिलासा मिळाला. परंतु, सुमारे २६ सप्टेंबरपासून पावसाने पुन्हा पाठ फिरवली. त्यामुळे सध्याची परिस्थिती अशी आहे की, मान्सूनने अधिकृतपणे राज्यातून माघार घेतलेली नसली, तरी प्रत्यक्षात त्याने महाराष्ट्रातून माघार घेण्यास सुरुवात केली आहे.
यंदाच्या मान्सूनची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पावसाचे दिवस कमी होणे आणि दीर्घ कोरडे कालखंड. जून ते सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रात सरासरी केवळ ४० दिवस पाऊस झाला आणि राज्याच्या जवळपास ९३ टक्के क्षेत्रात पावसाचे दिवस सरासरीपेक्षा कमी राहिले. हवामान विभागानुसार एका दिवसात किमान २.५ मिमी पाऊस झाला तर तो ‘पावसाचा दिवस’ मानला जातो. मागील काही एल निनो वर्षांशी तुलना केली तर २०२३ मध्ये सुमारे ४६, २०१८ मध्ये ४४, तर २००२ मध्ये ४१ पावसाचे दिवस होते. यंदा मात्र अनेक भागांत दीर्घ कोरडे कालखंड पाहायला मिळाले. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत सलग सुमारे ५९ दिवस दररोज २.५ मिमीपेक्षा कमी पाऊस झाला. २०२३ मध्ये हा कालावधी ५६ दिवस, २०१८ मध्ये ६५ दिवस, तर १९७२ मध्ये तब्बल ७८ दिवस होता. म्हणून यंदाची परिस्थिती १९७२ सारखी आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. त्या वर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा सुमारे ३७ टक्के कमी पाऊस झाला होता. यंदाची तूट त्यापेक्षा कमी आहे. मात्र २०१५ नंतर प्रथमच राज्यात इतकी मोठी पावसाची तूट आणि दीर्घ कोरडे कालखंड दिसत आहेत. यंदा बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्रणालींचा अपेक्षित फायदा अनेक भागांना झाला नाही आणि त्यामुळे विदर्भासह राज्यातील इतर भागांमध्येही पावसाची कमतरता राहिली.
महाराष्ट्रासाठी मान्सून हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे. मान्सूननंतर बंगालच्या उपसागरात निर्माण होणारी चक्रीवादळे, उत्तर भारतात येणारे पश्चिमी विक्षोभ ( ही२३ी१ल्ल ऊ्र२३४१ुंल्लूी२) आणि इतर वादळी पावसाच्या घटना हे पाण्याचे दुय्यम स्रोत आहेत. म्हणजेच, मान्सून राज्यातून माघार घेतल्यानंतर साधारणपणे महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात आणि सर्वदूर पाऊस पडत नाही की ज्यामुळे दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल. अर्थात, याला काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ, २०२५ च्या मे महिन्यात झालेला मुबलक पाऊस किंवा २०१३ ते २०१५ या कालावधीत उन्हाळ्यात झालेला वादळी पाऊस. मात्र, ऑक्टोबरपासून पुढील वर्षीच्या जूनपर्यंत अशा पावसाच्या घटना किती आणि कुठे घडतील, हे सध्या सांगणे शक्य नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत दुष्काळाचा सामना करण्याची तयारी करण्याशिवाय दुसरा ठोस पर्याय दिसत नाही.
डॉ. अक्षय देवरस
वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ,
रिडींग विद्यापीठ, इंग्लंड
akshay.deoras@reading.ac.uk
