डॉ. एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, भारतीय हवामान विभाग
सध्या आपण दररोज वर्तमानपत्रे, चित्रवाणी वाहिन्या आणि समाजमाध्यमांतूनही ‘एल निनो’ हा शब्द वारंवार वाचत/ऐकत आहोत. ‘यंदा एल निनो सक्रिय होणार’, ‘मान्सूनवर (मोसमी पावसावर) त्याचा परिणाम होईल’, ‘‘एल निनो’मुळे पाऊस कमी पडू शकतो’ अशा चर्चा सुरू आहेत. हवामान आणि मान्सून यांच्याशी संबंधित प्रत्येक चर्चेत हा शब्द हमखास ऐकायला मिळतो. पण नेमका हा ‘एल निनो’ आहे तरी काय? तो कसा तयार होतो? आणि भारताच्या मान्सूनवर त्याचा एवढा प्रभाव का पडतो? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. 

‘El Niñ ol’  म्हणजे ‘लहान मुलगा’ किंवा ‘बाळ येशू’. या शब्दामागची कहाणीही खूप रंजक आहे. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर, विशेषत: पेरू या देशाच्या आसपास मासेमारी हा अनेक लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. सुमारे १६०० च्या दशकात तिथल्या मच्छीमारांना एक गोष्ट लक्षात येऊ लागली. काही वर्षांनी अचानक समुद्रातील माशांचे प्रमाण खूप कमी होत असे. मासेमारी घटायची, समुद्री पक्ष्यांची संख्याही कमी व्हायची आणि किनार्‍यावरील अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसायचा. तर काही वर्षी परिस्थिती अगदी उलट असायची – समुद्रात भरपूर मासे मिळायचे. विशेष म्हणजे हा बदल बहुतेक वेळा डिसेंबरमध्ये, म्हणजे ख्रिसमसच्या सुमारास जाणवत असे. स्थानिक लोक स्पॅनिश भाषा बोलत असल्यामुळे त्यांनी या उष्ण समुद्री परिस्थितीला ‘एल निनो’ असे नाव दिले. तर ज्या वर्षी समुद्रातील परिस्थिती थंड आणि अनुकूल राहायची, त्या अवस्थेला पुढे ‘ला निना’ म्हणजे ‘लहान मुलगी’ असे म्हणू लागले. आज जगभर प्रसिद्ध असलेले  ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ हे शब्द कोणत्याही प्रयोगशाळेत जन्माला आले नाहीत, तर साध्या मच्छीमारांच्या अनुभवातून निर्माण झाले.

पुढे हळूहळू वैज्ञानिकांना लक्षात आले की ही फक्त समुद्रातील बदलाची गोष्ट नाही. तिचा जगभरातील हवामानावर परिणाम होतो. भारतातही या गोष्टीचे महत्त्व एका मोठ्या संकटानंतर समजले. १८७७ मध्ये भारतात भीषण दुष्काळ पडला. लाखो लोक प्रभावित झाले. त्यानंतर मान्सूनचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याची गरज प्रकर्षाने जाणवली. भारतीय हवामान विभागाचे पहिले मुख्य अहवालकर्ता सर एच. एफ. ब्लॅनफोर्ड यांनी हिमालयातील हिमवृष्टीच्या आधारे पावसाचा अंदाज देण्याचे प्रयत्न सुरू केले. १८८२ ते १८८५ दरम्यान त्यांनी प्राथमिक अंदाज प्रसृत केले. त्या काळासाठी हे मोठे पाऊल होते. यानंतर भारतीय हवामान विभागाने दरवर्षी नियमित मान्सून अंदाज जाहीर करण्यास सुरुवात केली.

‘एन्सो’चा परिणाम

पुढे सर जॉन इलियट आणि विशेषत: सर गिल्बर्ट वॉकर यांनी या संशोधनाला अधिक वैज्ञानिक दिशा दिली. वॉकर यांनी जगभरातील हवेच्या दाबातील बदलांचा अभ्यास करताना ‘सदर्न ऑसिलेशन’ या महत्त्वाच्या हवामान-घटनेचा शोध लावला. पण खरी क्रांती १९६० च्या दशकात झाली. हवामान शास्त्रज्ञ जेकब जर्कनिस यांनी ‘एल निनो’ आणि ‘सदर्न ऑसिलेशन’ या दोन वेगळ्या मानल्या जाणार्‍या घटनांमधील संबंध स्पष्ट केला. त्यांनी दाखवून दिले की पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान आणि वातावरणातील हवेच्या दाबातील बदल हे एकमेकांशी जोडलेले आहेत. जेव्हा व्यापार वारे (दक्षिणोत्तर नसून पूर्वपश्चिम किंवा आडवे वाहणारे ट्रेड विण्ड्स) कमकुवत होतात, तेव्हा उष्ण पाणी पूर्व पॅसिफिककडे सरकते आणि महासागर-वातावरणामध्ये मोठे बदल सुरू होतात. यालाच पुढे ‘एन्सो’  ENSO-  El Niñ o Southern Oscillation  असे नाव देण्यात आले. १९८० पर्यंत वैज्ञानिकांना हे स्पष्ट झाले की ‘एन्सो’ ही पृथ्वीच्या हवामान व्यवस्थेतील अत्यंत प्रभावी प्रणाली आहे. मान्सून, दुष्काळ, अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा आणि जागतिक हवामानातील अनेक बदल ‘एन्सो’शी संबंधित असतात.

सध्या जग पुन्हा एकदा नव्या एल निनोकडे वाटचाल करत आहे. अनेक संशोधकांच्या मते हा आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली एल निनोंपैकी एक ठरू शकतो. अर्थात तो अजून सुरुवातीच्या अवस्थेत आहे आणि अंतिम परिणाम नेमका किती होईल हे पुढील काही महिन्यांत स्पष्ट होईल. पण जर सध्याचे अंदाज खरे ठरले, तर त्याचा परिणाम जगभर जाणवू शकतो. आज उपग्रह, महासागर निरीक्षण यंत्रणा आणि प्रगत हवामान मॉडेल्समुळे एल निनोवर सतत लक्ष ठेवता येते. शेती तंत्रज्ञानही सुधारले आहे. त्यामुळे पूर्वीसारखा अन्नधान्याचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. पण तरीही एल निनोमुळे अनेक अडचणी वाढू शकतात. उदाहरणार्थ, खतांचा तुटवडा, ऊर्जा दरवाढ आणि युद्धांमुळे आर्थिक ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत एल निनोमुळे दुष्काळ, उष्णतेच्या लाटा किंवा उत्पादनात घट झाली, तर त्याचा परिणाम अधिक गंभीर होऊ शकतो.

एल निनोची तीव्रता मोजण्यासाठी मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पाण्याचे तापमान पाहिले जाते. सामान्य एल निनोमध्ये तापमान साधारण १ अंश सेल्सिअसने वाढते. पण १९८२, १९९७ आणि २०१५ मधील शक्तिशाली एल निनो घटनांमध्ये ही वाढ २ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होती. त्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला होता. यंदा काही अंदाजांनुसार तापमान ३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते, जे अत्यंत दुर्मीळ मानले जाते.

पॉझिटिव्ह ‘आयओडी’चा दिलासा?

याच संदर्भात ‘आयओडी’ (इंडियन ओशन डायपोल) ही प्रणालीही महत्त्वाची ठरते. ‘आयओडी’ म्हणजे हिंदी महासागरातील एल निनोसारखीच एक हवामान प्रणाली. जेव्हा हिंदी महासागराच्या पश्चिम भागातील पाणी अधिक गरम आणि पूर्व भागातील पाणी अधिक थंड होते, तेव्हा ‘पॉझिटिव्ह ‘आयओडी’’ तयार होतो. अशा वेळी भारतात मान्सूनला मदत मिळते आणि पाऊस चांगला पडण्याची शक्यता वाढते. उलट ‘निगेटिव्ह ‘आयओडी’’ मध्ये पाऊस कमी होऊ शकतो. सध्या ‘आयओडी’ तटस्थ अवस्थेत आहे. पण काही जागतिक हवामान मॉडेल्सनुसार मान्सूनच्या उत्तरार्धात पॉझिटिव्ह ‘आयओडी’ तयार होऊ शकतो. जर तसे झाले, तर एल निनोचा परिणाम काही प्रमाणात कमी होऊन भारताला दिलासा मिळू शकतो. मात्र ‘आयओडी’चा अंदाज एल निनोपेक्षा कमी खात्रीशीर मानला जातो.

अलीकडचे मोठे एल निनो वर्ष म्हणजे २०१५. त्या वर्षी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पावसाची मोठी कमतरता जाणवली होती. २०१६ च्या उन्हाळ्यात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना रेल्वेने पाणी पुरवावे लागले होते. १९७२ चा दुष्काळही महाराष्ट्रासाठी कायम स्मरणात राहिलेला आहे. आजही गावातील वडीलधारी मंडळी त्या काळाच्या आठवणी सांगतात – रेशनवर मिळणारा लाल गहू, जनावरांचे झालेले नुकसान आणि ओस पडलेली शेती. मात्र आता परिस्थिती काही प्रमाणात बदलली आहे. हरितक्रांती, सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे अन्नधान्याचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता कमी झाली आहे. आज मुख्य चिंता अन्नधान्यापेक्षा पाण्याची अधिक असते.

हवामान विभागाच्या पहिल्या अंदाजानुसार यंदा देशात मान्सूनचा पाऊस सरासरीच्या सुमारे ९२ टक्के राहू शकतो. महाराष्ट्रात कोकण-गोव्यात ९३ टक्के, मध्य महाराष्ट्रात ९० टक्के, मराठवाड्यात ८८ टक्के  आणि विदर्भात ९१ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकूणच पाहता, यंदा एल निनोमुळे पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र पुढील काही महिन्यांत ‘आयओडी’ ची स्थिती कशी बदलते, यावरही बरेच काही अवलंबून असेल. त्यामुळे हवामान विभागाचे अंदाज, महासागरातील बदल आणि मान्सूनची प्रगती यावर सतत लक्ष ठेवणे गरजेचे ठरणार आहे.