सर्व प्रकारच्या निवडणुका मतदारयादीच्या आधारे घेतल्या जात असल्याने ती अचूक आणि अद्ययावत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मतदारयादीचे नियमित पुनरीक्षण करणे हे तिची अचूकता टिकवून ठेवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया अधिक विश्वासार्ह बनवण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ आणि मतदार नोंदणी नियम, १९६० (Registration of Electors Rules, 1960) मधील नियम २५ यांच्या आधारे मतदारयादीचे सखोल, संक्षिप्त किंवा मिश्र पद्धतीने पुनरीक्षण करता येते. यापैकी आयोगाने विशिष्ट परिस्थितीत राबविलेल्या प्रक्रियेला विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात Special Intensive Revision (एसआयआर) किंवा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण म्हणजेच Summary Revision (एसएसआर) असे संबोधले जाते. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण हे सामान्यतः दरवर्षी होत असते आणि विशेष सखोल पुनरीक्षण हे विशिष्ट कालावधीनंतर करण्याचा निर्णय निवडणूक आयोग घेत असतो. विशेष संक्षिप्त पुनरीक्षणामध्ये अस्तित्वात असलेल्या यादीमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या जातात. विशेष सखोल पुनरीक्षणात मात्र विद्यमान यादीची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला जात असतो. महाराष्ट्रात अखेरचे विशेष सखोल पुनरीक्षण हे २००२मध्ये झालेले होते.
एसआयआरचा कायदेशीर आधार
निवडणूक आयोगाला मतदार यादीची फेरतपासणी करण्याचा अधिकार आहे, याबद्दल फारसा वाद नाही; परंतु हा अधिकार आयोगाकडून कसा वापरला जात आहे, हा मुद्दा सध्या वादाचा विषय बनलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ अंतर्गत निवडणुकांवर देखरेख, त्यांचे संचालन आणि नियंत्रण करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. त्यास अनुसरून लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० अर्थात Representation of the People Act, 1950 मधील कलम २१ आयोगाला मतदार यादीचे संक्षिप्त पुनरीक्षण आणि आवश्यक असल्यास विशेष पुनरीक्षण करण्याची मुभा देते. या कायद्याच्या कलम २२ नुसार मतदार नोंदणी अधिकारी (Electoral Registration Officer-ERO) चुकीच्या नोंदी दुरुस्त करू शकतो, मृत किंवा स्थलांतरित व्यक्तींची नावे वगळू शकतो किंवा अन्य कारणांनी अपात्र ठरलेल्या व्यक्तींची नोंद रद्द करू शकतो. मतदार नोंदणी नियम, १९६० मध्ये पुनरावलोकन, घरोघरी जाऊन गणना करणे, दावे आणि हरकती, चौकशी आणि सुनावणी यांची रूपरेषा दिलेली आहे. परंतु अशा दुरुस्त्या करीत असताना एखाद्या मतदाराचा अधिकार बाधित होत असल्यास वरील कायद्यामध्ये त्याला वाजवी सुनावणीची संधी देण्याची तरतूद देखील करण्यात आलेली आहे.
याचा अर्थ एसआयआरमध्ये करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा तपशील कायदा व नियम यांत नमूद तरतुदीनुसारच आहे, यात शंका नाही. परंतु प्रश्न इतकाच आहे की, या अधिकाराच्या वापरात कायद्याचा उद्देश, अर्थ आणि नैसर्गिक न्यायाची तत्त्वे कितपत पाळली गेली?
एसआयआर म्हणजे पडताळणी की पात्रतेची फेरपरीक्षा?
मतदार नोंदणी नियम, १९६० मधील एसआयआरची संकल्पना पाहिली, तर तिचा भर निवडणूक आयोगाद्वारे मतदार यादीच्या पडताळणीवर आणि त्या आधारे सदर यादीच्या करण्यात येणाऱ्या पुनर्रचनेवर असल्याचे स्पष्ट होते. आयोगाचे अधिकारी घरोघर जाऊन मतदारांसंबंधी माहिती गोळा करून त्यांची पडताळणी करतील आणि त्याआधारे आवश्यक ती कारवाई करतील, असे या पडताळणीत अभिप्रेत असल्याचे दिसून येते. परंतु राजकीय निरीक्षकांच्या मते, आयोगाचे अधिकारी या प्रक्रियेशी तितकेसे प्रामाणिक राहिले नाहीत. बिहारच्या एसआयआर प्रक्रियेत बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी चौकशीदरम्यान मतदारांनी दिलेल्या माहितीच्या पुष्टीसाठी अतिरिक्त कागदपत्रे मागितलेली आहेत, अशा तक्रारी आलेल्या होत्या. असे करून आयोग जणू काही सांगत होता की, “प्रथम स्वतःची पात्रता सिद्ध करा; अन्यथा तुमचे मतदार असणेच संशयाच्या कक्षेत येऊ शकते.” यामुळे साधी पडताळणी आणि पात्रतेची पुनर्परीक्षा यांतील सीमा धूसर झाल्याचा आरोप करण्यात आला. मात्र निवडणूक आयोगाने हा आरोप फेटाळून लावला. आयोगाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही मतदाराचे नाव वगळण्याचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी योग्य ती प्रक्रिया पाळली जाते.
विद्यमान मतदारांची वैधता
एखाद्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत आधीपासून आहे. ती अनेक निवडणुकांत मतदान करत आली आहे. याचा अर्थ, ती वैध मतदार आहे, हे पूर्वी मान्य केले गेलेले आहे. अशा परिस्थितीत तिच्या मतदार असण्याचा अधिकार सामान्यतः वैध असल्याचे गृहीत धरणे आवश्यक आहे. हे गृहीतक नाकारण्यासाठी काही ठोस पुरावे असणे अपेक्षित असते. परंतु एसआयआर प्रक्रियेत अनेक मतदारांना स्वतःची पात्रता पुन्हा एकदा नव्याने सिद्ध करावी लागत आहे. त्यामुळे मतदारांच्या मतदार म्हणून असलेल्या अधिकाराची वैधता संशयास्पद मानून त्याची पुनर्तपासणी केली जात असल्याचा आभास निर्माण होत असल्यास त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
पुराव्यांच्या भाराचा प्रश्न
कायद्याच्या मूलभूत तत्त्वानुसार ‘पुराव्यांचा भार’ हा विद्यमान स्थिती बदलू इच्छिणाऱ्या पक्षावर असणे अपेक्षित असते. मतदारांचे मतदार यादीतील नाव ही एक विद्यमान कायदेशीर स्थिती आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे नाव वगळायचे असल्यास आयोगाने तिच्या पात्रतेवर संशय निर्माण करणारे ठोस पुरावे पुढे आणणे आवश्यक आहे. एसआयआर प्रक्रियेत अनेक मतदारांच्या अपात्रतेचे कोणतेही ठोस पुरावे न देता, त्यांच्याकडूनच स्वतःची पात्रता सिद्ध करण्याची अपेक्षा ठेवण्यात येत आहे. त्यामुळे पुराव्याचा भार आयोगाच्या अधिकाऱ्यांऐवजी मतदारांवर टाकण्यात आल्याची टीका करण्यात येत आहे. याच कारणामुळे अनेक कायदेतज्ज्ञांनी याला ‘reverse burden’ असे संबोधले आहे.
नोटीस, सुनावणी आणि नैसर्गिक न्याय
मतदाराचे नाव वगळण्यापूर्वी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २२ नुसार संबंधित तथ्यांची योग्य पडताळणी करणे आणि संबंधित व्यक्तीला सुनावणीची वाजवी संधी देणे आवश्यक आहे. या संदर्भातील प्रक्रियात्मक तरतुदी मतदार नोंदणी नियम, १९६० मधील नियम २१अ मध्येही नमूद करण्यात आल्या आहेत. सुनावणीचा अर्थ केवळ हरकत घेण्याची संधी असा नाही. त्यासाठी संशयित मतदाराला नोटीस दिली पाहिजे. त्यामध्ये कारणे सांगितली पाहिजेत. त्याचबरोबर संबंधित मतदारांना उत्तर देण्याची वाजवी संधी देणे आवश्यक आहे. तसेच सुनावणीनंतर करण्यात आलेल्या निर्णयाची लेखी माहिती त्या मतदाराला दिली जाणे अपेक्षित आहे. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे पालन करण्याच्या दृष्टीने देखील असे करणे अत्यावश्यक आहे. दुसऱ्या बाजूचे म्हणणे ऐका, हा न्यायाचा मूलभूत नियम आहे. प्रशासकीय सोय, वेळेची मर्यादा किंवा मोठ्या प्रमाणावरील कारवाई यासारखी कारणे पुढे करून आयोगाला नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे पालन करणे टाळता येणार नाही.
अधिकाराचा आणि अधिकाराच्या वापराचा प्रश्न
एसआयआरसंबंधीच्या चर्चेत अनेकदा दोन वेगळे प्रश्न एकत्र केले गेले. पहिला प्रश्न होता की, निवडणूक आयोगाला एसआयआर राबवण्याचा अधिकार आहे काय? त्याच्याशी जोडून दुसरा प्रश्न विचारला पाहिजे की, तो अधिकार वापरताना कायद्याच्या आणि राज्यघटनेच्या मर्यादा पाळल्या गेल्या काय? पहिल्या प्रश्नाचे उत्तर अर्थातच होकारार्थी आहे. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र अधिक गुंतागुंतीचे आहे. लोकशाहीमध्ये अधिकाराचा स्रोत जितका महत्त्वाचा असतो तितकेच महत्त्व तो अधिकार कशा पद्धतीने वापरला गेला आहे, यालाही आहे. वरील निरीक्षणांवरून आयोगाने आपले अधिकार लोकशाहीच्या तत्त्वाला अनुसरून वापरले, असे निर्विवादपणे म्हणता येणार नाही.
सर्वोच्च न्यायालय आणि एसआयआर
बिहार प्रकरणात न्यायालयाने आयोगाचा एसआयआर राबवण्याचा अधिकार मान्य केला, परंतु त्यावेळी काही मूलभूत प्रश्न मात्र अनुत्तरित राहिले. ते म्हणजे,-
१. विद्यमान मतदारांच्या वैधतेच्या गृहीतकाचे काय करायचे?
२. पुराव्याचे ओझे कोणावर पडणे अपेक्षित आहे?
३. सर्व वगळलेल्या मतदारांना वाजवी सुनावणी मिळाली का?
४. अंतिम यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी सर्व दावे आणि हरकती निकाली निघाल्या होत्या का?
५. मतदार यादीची शुद्धता आणि मताधिकाराचे संरक्षण या दोन उद्देशांमध्ये संघर्ष झाल्यास प्राधान्य कशाला दिले पाहिजे?
आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने वरील प्रश्नांच्या संदर्भात फारशी कठोर भूमिका घेतली होती असे दिसत नाही. कायद्याप्रमाणे निवडणूक आयोगाला मतदार यादीच्या पुनर्पडताळणीचे अधिकार आहेत, या मुद्द्याला न्यायालयाने सर्वाधिक महत्त्व दिले. या अधिकारांचा आयोगाने कसा वापर केला, याचे परीक्षण करण्याला न्यायालयाने आवश्यक तेवढे महत्त्व दिले, असे वाटत नाही. निवडणूक आयोगाने कायद्यानुसार नोटीस, हरकती आणि सुनावणीची काही यंत्रणा उपलब्ध करून दिली होती, हे सर्वोच्च न्यायालयाला पुरेसे वाटले असावे. परंतु या यंत्रणेने आपले काम कशा प्रकारे पार पाडले किंवा नाही हे पाहण्याची न्यायालयाला आवश्यकता वाटलेली दिसत नाही.
प्रश्न केवळ यंत्रणा अस्तित्वात होती का, हा नसून ती प्रत्यक्षात किती प्रभावी होती हा आहे. लाखो मतदारांच्या संदर्भात ही प्रक्रिया व्यवहार्य, सुलभ आणि परिणामकारक होती का? अंतिम यादीतून वगळलेल्या प्रत्येक मतदाराला वास्तविक आणि सुनावणीची वाजवी संधी मिळाली होती का, या प्रश्नांचे उत्तर लोकशाहीच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
लोकशाही व्यवस्थेत निवडणूक आयोगासारख्या संस्थांना अधिकार असतात; परंतु त्या अधिकारांच्या वापरामुळे नागरिकांच्या मूलभूत लोकशाही हक्कांवर परिणाम होत असेल, तर त्या वापराचे कठोर न्यायालयीन परीक्षण होणे आवश्यक असते.
शब्दशः अर्थ की घटनात्मक आत्मा?
कायद्याच्या मजकुराचा शब्दशः अर्थ लक्षात घेऊन न्यायालयाची भूमिका योग्य होती, असे अनेकांचे मत आहे. मात्र, राज्यघटना केवळ अधिकारांचे विवरण करणारा दस्तऐवज नसून, लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणारा दस्तऐवजही आहे. घटनात्मक न्यायशास्त्रामध्ये अनेक वेळा न्यायालये केवळ शब्दशः अर्थावर न थांबता संविधानाच्या मूलभूत मूल्यांकडे पाहतात. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार हा भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे मतदार यादी पुनर्पडताळणीची कोणतीही प्रक्रिया ही शक्य तितकी समावेशक असणे अपेक्षित आहे आणि बहिष्करण हा अपवाद असला पाहिजे.
सर्वोच्च न्यायालयानेदेखील या संदर्भात ‘मोठ्या प्रमाणावर वगळण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर समावेश’ हा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली होती. परंतु या दृष्टिकोनाचा आयोगाने एसआयआर प्रक्रियेत कितपत अवलंब केला होता, याची कठोर छाननी न्यायालयाने केली काय, हा एक चिंतनीय प्रश्न आहे. चुकीने एखाद्या अपात्र व्यक्तीचा समावेश होणे ही समस्या असू शकते; परंतु चुकीने एखाद्या पात्र नागरिकाला मतदानापासून वंचित करणे, ही लोकशाहीच्या दृष्टीने अधिक गंभीर समस्या असते.
सर्वोच्च न्यायालयाची सध्याची भूमिका
सर्वोच्च न्यायालयातील ५ ऑक्टोबर २०२६ च्या सुनावणीमध्ये मात्र निवडणूक आयोगाचा मनमानी कारभार समोर आल्याचे दिसत आहे. बिहार एसआयआरनंतर आयोगाने फॉर्म ६ ला एक डिक्लेरेशन जोडलेले असून त्यामध्ये एसआयआरमध्ये गाळलेल्या मतदारांनी स्वतःचे किंवा आपल्या नातेवाईकांची मागील एसआयआरमध्ये असलेली नावे व त्यांची माहिती देणे आयोगाला अपेक्षित आहे. एसआयआरच्या संदर्भात हे डिक्लेरेशन भरून देणे बंधनकारक आहे. त्याशिवाय फॉर्म ६ स्वीकारला जाऊ शकत नाही. यावरून आयोगाने आपल्या अधिकारात फॉर्म ६ मध्ये अप्रत्यक्ष दुरुस्ती केल्याचा अर्थ काढण्यात येत आहे. असा अर्थ मान्य झाल्यास, ही दुरुस्ती अनाधिकृत असल्याचे मान्य करावे लागेल. कारण फॉर्म ६ या वैधानिक फॉर्मची दुरुस्ती करण्याचा अधिकार आयोगाला असू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयालादेखील आयोगाने फॉर्म ६ ला अतिरिक्त डिक्लेरेशन जोडण्याची कृती मान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने या संबंधीच्या निर्णयाची माहिती घेण्याचे संकेत दिलेले आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, कोणत्याही सुधारित फॉर्म ६ ला आम्ही मंजुरी दिलेली नाही. त्यांनी असेही स्पष्ट केले आहे की, जेव्हा रेकॉर्ड सादर केले जाईल, तेव्हा यात कोणी फेरबदल केला आहे हे ते पाहणार आहेत.
तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयोगाच्या इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या मंजुरीशिवाय काही निर्णय घेतल्याचे आरोप सध्या चर्चेत आहेत. त्यावर एक याचिकादेखील करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेला अनुसरून आयोगाला आणि केंद्र सरकारला नोटीस देऊन उत्तर मागितलेले आहे.
निष्कर्ष:
मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्याच्या दृष्टीने मतदारयादी शुद्ध आणि अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने निवडणूक आयोगाला आवश्यक ते कायदेशीर अधिकारही आहेत. परंतु त्या अधिकारांचा वापर करताना पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार बाधित होणार नाही, याची काळजी घेणे ही आयोगाची घटनात्मक जबाबदारी आहे.त्यामुळे एसआयआर ची खरी कसोटी केवळ ‘आयोगाला हा अधिकार आहे काय?” ही नसून, “हा अधिकार वापरताना कायद्याची प्रक्रिया, नैसर्गिक न्याय आणि मताधिकाराचे संरक्षण यांचा योग्य समतोल राखला गेला काय?’ ही आहे. कारण अपात्र मतदारांना वगळणे गरजेचे असले, तरी एकाही पात्र नागरिकाला मतदानापासून वंचित ठेवणे हे लोकशाहीसाठी अधिक गंभीर संकट आहे.
harihar.sarang@gmail.com
