scorecardresearch

‘किंचित’ सेनेपेक्षा ‘बाळासाहेबां’ची शिवसेना वरचढ ठरेल!

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीकडे सगळ्याच पक्षांचे लक्ष लागले आहे. गेल्या सहा महिन्यांमधील राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांनी या निवडणुकीमधील औत्सुक्य आणखी वाढवले आहे.

ashish shelar

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीकडे सगळ्याच पक्षांचे लक्ष लागले आहे. गेल्या सहा महिन्यांमधील राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांनी या निवडणुकीमधील औत्सुक्य आणखी वाढवले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेची ताकद किती, या निवडणुकीतील आव्हाने काय असतील आणि निवडणुकीत कोणते मुद्दे असतील यावर ‘लोकसत्ता’च्या‘लोकसंवाद’मध्ये मनमोकळय़ा गप्पा,मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांच्याशी..

महापालिकेत १५० हून अधिक जागा जिंकणार..
भाजपने लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले होते. त्या वेळी त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युती महापालिकेसह सर्व निवडणुका लढविणार असून महापालिकेसाठी १५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय स्तरावर प्रवास योजना असून केंद्रीय मंत्र्यांवर काही मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी देशातील १४७ जागांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. मुंबईतील सहाही जागा युतीने जिंकाव्यात, या दृष्टीने सध्या आम्ही तयारी करीत आहोत. सध्या पाच जागा युतीकडे असून दक्षिण मुंबई ठाकरे गटाकडे आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठीही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मंत्री व ज्येष्ठ नेत्यांच्या मतदारसंघातील प्रवास योजना सुरू केली असून काही मंत्री व आमदारांनी अतिरिक्त एका मतदारसंघाची बांधणी करावी, अशी रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकारण वळणावळणाचे झाले आहे आणि त्या दृष्टीने आम्ही तयारी करीत आहोत. अमित शहा यांनी पक्षाध्यक्ष असताना बूथ स्तरापर्यंत संघटना बांधली, त्या पद्धतीनेचआम्ही काम करीत आहोत.

खेळात अजून रंग भरायचे आहेत
महापालिका निवडणूक भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीतच लढणार असून भाजपचा महापौर होईल आणि तो युतीचाच असेल. निवडणूक सारिपाटाच्या खेळात अजून रंग भरायचे आहेत, त्यामुळे युतीमध्ये अद्याप जागावाटपाची चर्चा सुरू झालेली नाही. सर्व काही आताच उघड करता येणार नाही. युतीतील दोन्ही पक्षांचा पक्षविस्ताराचा कार्यक्रम गतीने व समन्वयाने सुरू आहे. अजून बरेच रंग या चित्रात येतील. भाजपच्या दृष्टीने बाळासाहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना असून आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासारखे मित्राला दगाफटका करणारे नाही. त्यामुळे त्यांचे आमदार आमच्या पक्षात आणावेत किंवा भाजपचे आमदार त्यांच्याकडे जावेत, असे आम्हाला वाटत नाही. ज्यांच्या मनात पाप असते, त्यांच्या मनात ही भीती असते. अशा बातम्या केवळ प्रसिद्धीमाध्यमांमध्ये आहेत. अन्य पक्षातून येणारा एखादा नेता दोघांपैकी कोणाकडे अधिक सोयीचा होईल, याबाबत काही व्यक्तींबाबत समन्वय व चर्चा होऊ शकते.

भाजप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही
आदित्य ठाकरे यांनी २०१४ मध्ये कोणाला विचारून १५२ ची घोषणा केली होती? कोणत्या बैठकीत हे ठरले होते? भाजपने २०१४ मध्ये युती तोडली नाही. एका जागेसाठी युती तुटली, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत कोणी युती तोडली? शिवसेना गेली २५ वर्षे युतीत सडली, असे नेस्को मैदानात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. युतीत सडले, स्वतंत्र लढले, निवडणुकीत पडले, पुन्हा यू टर्न घेतला आणि सत्तेत आले. वैचारिक स्वैराचाराचे जिवंत उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे. आता त्यांनी वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेतल आहे. त्यांनी काय करावे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रतिक्रिया काय आल्या आहेत? त्यांच्या मनात आले, म्हणून त्यांनी वंचितला बरोबर घेतले. आम्हीही हे खूप भोगले आहे. एका मोठय़ा लक्ष्याकडे नजर ठेवून आम्ही कधीही भाष्य केले नाही. भाजप हा विचारसरणी असलेला पक्ष आहे, अन्य काही पक्षांप्रमाणे ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, सोनिया गांधी यांची काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस अशी अनेक उदाहरणे देशात आढळतील. आमच्या पक्षाच्या विचारसरणीबरोबर उभ्या राहणाऱ्या लोकांना एकत्र आणायचे आणि त्याचा पक्षाला फायदा होणार असेल, तर त्यात अडचण काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्याख्येनुसार दोन प्रकारची वर्गवारी आहे. जे आज आपल्याबरोबर आहेत आणि जे उद्या येणार आहेत. काही व्यक्ती पक्षात येण्याने अडचणी असू शकतील किंवा ते येणे सोयीचे नाही, असे असू शकेल. पण ‘किंचित’ शिवसेना आणि वंचित आघाडी ही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ आहे. ही विचारांची युती असती, लोकशाही वाचविण्यासाठी आणि हुकूमशाही विरोधातील असती, तर ती एक वर्षांपूर्वी किंवा ते सत्तेत असताना किंवा लोकसभा निवडणुकीच्या वेळी का केली नाही? हा संधिसाधूपणा आहे. महापालिका निवडणुका जिंकण्यासाठीचा हा निर्णय आहे. मराठी मुस्लिमांना बरोबर घेईन, असे म्हणताना मुस्लिमांवर एक डोळा ठेवायचा व त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहायचे आणि वंचितबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. हे नाते भाजपच्या भीतीपोटी आहे.

पंतप्रधान मोदी म्हणजे लोकमान्य-लोकशक्ती
लोकशाही वाचवायची, म्हणजे काय? पंजाबमध्ये आप जिंकला, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस जिंकली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकाव्यात, असा प्रचार आम्ही करायचा का? आमचे नेते भाजप जिंकावा, असाच प्रचार करणार. एक व्यक्ती, एक पक्ष अशी घोषणा देत त्यांनी देशातील नागरिकांना विनंती केली आणि देशभरात ३० कोटी राष्ट्रध्वज लावले गेले, घरोघरी दिवे लावले, असे गेल्या ५० वर्षांतील एक तरी उदाहरण दाखवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सहन करता येत नाही, म्हणून लोकशाहीला धोका, देशात हुकूमशाही, देशात ठोकशाही अशी ओरड केली जाते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला लोकमान्यता आहे आणि त्यांच्याबरोबर लोकशक्ती आहे, हेच वास्तव आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेना डाकू
शिवसेना आणि भाजप युती असतानाच्या काळातील संबंधांची चर्चा करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कालखंड आणि उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ असा विचार करावा लागेल. १९८० च्या दशकात देशात काँग्रेसविरोधातील राजकारण, हिंदूत्वाची विचारसरणी घेऊन संघविचारांबरोबर काम करणाऱ्यांची आवश्यकता आणि अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व आणि प्रमोद महाजन यांचे प्रयत्न हा युतीचा एक टप्पा होता. बाळासाहेबांबरोबर भाजपचे सौहार्द होते. विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिवसेनेचा उमेदवार होता आणि दुसरा उभा करण्यासाठी त्यांची मते भाजपपेक्षा अधिक होती. पण भाजपने विनंती केल्यावर बाळासाहेबांनी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या नंदू साटम यांना परत बोलाविले. मैत्रीमध्ये ही दिलदारी होती. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात भाजपबरोबर वेगळे वर्तन सुरू झाले. त्यांनी प्रमोद महाजन यांनाही अडीच-तीन तास ताटकळत थांबविले होते. प्रत्येक गोष्टीत गणित बघणे, हा त्यांचा अप्पलपोटेपणा होता. पहिल्या टप्प्यात राजकारणाची गरज आणि विचारसरणीमुळे युती होती. उद्धव ठाकरे यांच्या कालखंडात आम्ही आमचे मुद्दे प्रकर्षांने मांडत होतो.

आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व गांभीर्याने घ्यावे असे नाही. पण महापालिकेत २५ वर्षे सत्ता असताना उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केलेले एक तरी काम किंवा प्रकल्प सांगावा. मी याबाबत कोणत्याही व्यासपीठावर चर्चेला तयार आहे. ब्रिमस्टोवेड प्रकल्प, सांडपाणी प्रकिया प्रकल्प, महापालिका शाळांमध्ये संगणकीकरण, सिमेंट काँक्रीटचे रस्ते अशी कोणतीही कामे पूर्ण झाली नाहीत. आरोग्य खात्यात ५१ हजार पदे रिक्त आहेत, रुग्णालयात औषधे नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात पालिकेच्या सॅप यंत्रणेत भ्रष्टाचार आहे, क्रॉफर्ड मार्केट एक रुपयात विकले जात आहे, तुरटी खरेदी प्रक्रियेबाबत मी, खासदार गोपाळ शेट्टी व अन्य भाजप नेत्यांनी आवाज उठविला होता. डाकूंपेक्षा चोर बरे, यासाठी आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला होता. पण नंतर तेच डाकू झाले आहेत. युती सरकारच्या काळातही त्यांच्या एकाही मंत्र्याने मुंबईत काम केले नाही. नितीन गडकरी यांनी ५२ उड्डाणपूल बांधले, पश्चिम द्रुतगती मार्ग सहापदरी झाला, वरळी वांद्रे सी लिंकचे श्रेय गडकरींना जाते. मुंबईत १९९० च्या दशकात अंडरवल्र्डचा धुमाकूळ सुरू होता.

गिरणीमालकांचे खून होत होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी टोळीयुद्ध संपविले. उपनगरी रेल्वे गाडय़ांमधून प्रवास करणाऱ्या सुमारे ७० लाख प्रवाशांना होणारा त्रास पाहून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू केली. शिवसेनेला आपल्या सत्ताकाळात केलेली कामे दाखविता येत नाहीत, त्यामुळे भाजप मुंबई तोडणार, पालिकेच्या पैशांवर डोळा, असे भावनिक मुद्दे उद्धव ठाकरे मांडत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईला सुरक्षा दिली. आमचा त्यांच्याबरोबर चांगला संवाद होता. शहराच्या विकासाबाबत आम्ही मांडलेले मुद्दे बाळासाहेब ऐकत होते आणि सकारात्मक पद्धतीने मार्ग काढत होते. भ्रष्टाचाराबाबत सजगपणे भूमिका घेत होते. बाळासाहेब भाजपला कमळाबाई म्हणून हिणवत होते. त्याबाबत मात्र आमचा आजही आक्षेप आहेच. पण उद्धव ठाकरे ऐकत नव्हते.

चौकीदार म्हणून काम केल्याने ठेवी सुरक्षित
भाजपने चौकीदार म्हणून काम केले, म्हणून महापालिकेच्या मुदत ठेवी सुरक्षित राहिल्या आहेत. शिवसेनेमुळे महापालिकेच्या ठेवींमध्ये वाढ झाली नाही. सत्ताधाऱ्यांचे मित्र आणि बगलबच्च्यांनी केलेल्या मागण्यांमुळे बिल्डरांसाठी ५० टक्के प्रीमियम माफ करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्यांना १८ हजार कोटी रुपये गेले. त्यामुळे सर्वसामान्यांना कोणताही लाभ झाला नाही आणि जागांच्या किमती कमी झाल्या नाहीत. मुद्रांक शुल्क हा राज्य सरकारचा विषय आहे. पण हॉटेलमालक, बारमालक, दारू आदींसाठी सवलती त्यांच्या काळात दिल्या गेल्या. तुम्ही महापालिकेच्या तिजोरीवर साप म्हणून बसलात, तर आम्हाला चौकीदार म्हणून राहावेच लागेल. महापालिकेचा निधी बँकेत मुदत ठेवीत ठेवण्यासाठी नसून विकासकामांसाठी आहे, ही पंतप्रधान मोदी यांची भूमिका अतिशय योग्यच आहे. महापालिका ही वित्तीय संस्था नाही. पण त्यांचे प्रशासन, लेखापरीक्षण वित्तीय संस्थेप्रमाणे असले पाहिजे, शिस्त व मानांकन असले पाहिजे. एवढय़ा ८० हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवींच्या बळावर आम्ही पुढील पाच वर्षांत आठ लाख कोटी रुपयांची कामे करून दाखवू. त्याबाबतचा दृष्टिकोन व संकल्प सर्वापुढे मांडून जनसहभागातून कामे करून दाखवू. भावनात्मक आवाहन करण्यापेक्षा कामे दाखवून मते मागावीत, असे मुंबईकरांना वाटत आहे. मुंबईतील रस्त्यांसाठी २२ हजार ५०० कोटी रुपये दुरुस्ती व खड्डे बुजविण्यावर खर्च झाले. त्यामुळे आम्ही सिमेंट काँक्रीट रस्ते करण्याचा निर्णय घेतला. त्याची कामे एल अॅण्ड टी आणि अन्य चांगल्या कंपन्यांना देण्यात आली आहेत. ‘ठग्ज ऑफ वासेपूर’ या कंत्राटदारांच्या टोळीला त्याची कामे न मिळाल्याने तडफड व्यक्त होत आहे. पण मुंबईकर आगामी निवडणुकीत आम्हाला संधी देतील आणि आम्ही त्याचे सोने करून दाखवू, असा मला विश्वास आहे. पंतप्रधान मोदी यांनीही केंद्र, राज्य सरकार या डबल इंजिन सरकारबरोबरच महापालिकेतही या सर्वाबरोबर सुयोग्य ताळमेळ असलेल्यांची सत्ता हवी, असे म्हटले आहे.

सरसकट रात्रजीवनास विरोध
आदित्य ठाकरे यांनी प्रस्तावित केल्यानुसार मुंबईत सरसकट रात्रजीवन सुरू करण्यास भाजपचा विरोध आहे. निवासी भागात इमारतींखाली असलेली हॉटेल, पब, बार रात्रभर सुरू ठेवल्यास तेथील रहिवाशांना प्रचंड त्रास होईल. त्यामुळे निवासी भागाव्यतिरिक्तच्या भागात आणि रहिवाशांच्या संमतीने रोजगारपूरक व्यवसाय सुरू ठेवण्यास आमचा पाठिंबा आहे. अनिवासी भागात किंवा कोणाला त्रास होणार नसेल, तर रात्री मॉल सुरू राहावेत, असे आमचे म्हणणे आहे.

पक्षाने मला भरपूर दिले
मला पक्षाने भरपूर काही दिले आहे. तिसऱ्यांदा मुंबई अध्यक्षपद दिले, असे उदाहरण कुठे आहे? पक्षाने मला कॅबिनेट मंत्रीपद दिले होते. यापुढेही पक्षाला माझ्यासाठी योग्य वाटेल ती जबाबदारी मला मिळेल. पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारीन. नेत्यांच्या कामाचे मूल्यमापन करणारी यंत्रणा पक्षात आहे. कोणावरही अन्याय होऊ नये, याची काळजी घेतली जाते.

मेट्रो प्रवास प्रतिष्ठेचा हे रुजविणार
उपनगरी प्रवाशांचे हाल कमी करण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यांवरची गाडय़ांची गर्दी कमी करण्यासाठी मेट्रो सुरू करण्यात आली.
मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कार्यकाळात एसी टू डीसी रूपांतरण, फलाटांची उंची वाढविणे, सरकते जिने, मोबाइल अॅपवर तिकिटे, सीएसटीचा पुनर्विकास, वांद्रेसह काही रेल्वे स्थानकांचा विकास आदी अनेक कामे झाली. सात वर्षांची तुलना ७० वर्षांशी होऊ नये. अजून अनेक कामे व्हायला हवीत, याबाबत कोणाचेही दुमत नाही. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनेने विरोध केला. वीज कंपनीचा नफा परिवहनासाठी दिला नाही, तर बेस्ट परिवहन सेवा मरेल, यासाठी कायद्यात दुरुस्ती केली. मुंबई-गोवा महामार्गाचे कामही मार्गी लावले असून काही तक्रारींचे निवारण झाले पाहिजे. उपनगरी गाडय़ांसाठी नवीन बनावटीचे रेक्स आणले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मेट्रो मार्गाच्या लोकार्पणासाठी आले असताना आम्ही प्रवास केला. तेव्हा गाडीने प्रवास हेच प्रतिष्ठेचे लक्षण वाटता कामा नये, मेट्रो प्रवासही प्रतिष्ठेचा वाटला पाहिजे. त्यासाठी मीही मेट्रोने प्रवास करून जनजागृती करणार आहे.

शरण आलेल्यांनी दात दाखवू नये
उद्धव ठाकरेंच्या पक्षातील आमदार-खासदार मोदींच्या नावावर जिंकून आले. त्यांच्यात िहमत होती, तर २०१९ मध्ये मोदींना, नाही तर मला मते द्या, असे का म्हटले नाहीत? विधानसभेसाठी २०१४ मध्ये आणि २०१७ च्या महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढून आपटले. त्यानंतर शरण आले. अशांनी आम्हाला दात दाखवू नयेत.

आमिष व सक्तीच्या धर्मातरास विरोध
वैयक्तिक प्रेमप्रकरणात पडू नये किंवा त्यासाठी धर्मातराचे स्वातंत्र्य आहे, असे माझे व्यक्तिगत मत आहे. पण योजना किंवा कट करून, लग्नाचे आमिष दाखवून धर्मातर होत असेल, तर त्याला विरोध आहे. चित्रपट किंवा अन्य काही विषयांवर प्रतिक्रिया देऊ नयेत, अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनीही पक्षातील नेत्यांना दिल्या आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपबाबत कायदा करावा, असे भाजपने कधीही म्हटलेले नाही.

आमची लढत ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबरच
प्रत्येक निवडणूक वेगळी असते आणि त्यातील आव्हाने व मुद्दे वेगळे असतात. आम्ही उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे अहंकाराने बोलणार नाही. यंदाच्या निवडणुकीचा पट २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे नसल्याने त्याप्रमाणे सोंगटय़ा टाकणार नाही. महाराष्ट्रात सध्या ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे, त्याप्रमाणे आयुधे वापरू. आमची मुख्य लढत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबरच आहे. मात्र त्यांच्याबरोबर निवडणुकीपर्यंत कोण व किती राहतील, हे माहीत नाही. महापालिका निवडणुकीला आम्ही विलंब लावत आहोत, असा आरोप ठाकरे करीत आहेत. त्यांनी आमच्या बापजाद्यांचा उल्लेख केला. पण महाविकास आघाडी सरकार होते, तेव्हा तुम्ही उशीर का केला? निवडणुका वेळेत घेण्याची जबाबदारी राज्य सरकार म्हणून त्यांचीही होती. उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते समीर देसाई, राजू पेडणेकर कोणत्या पक्षाचे आहेत? तुम्ही न्यायालयात जाणार, उशीर करणार आणि दुसऱ्यांचे बापजादे काढणार? त्यांनी याचिका मागे घ्याव्यात, २२७ प्रभागांनुसार निवडणुका होऊ दे, उद्याही निवडणुका जाहीर झाल्या, तरी लढविण्याची आमची तयारी आहे. आम्ही २०१७ मध्येही जिंकू, असे म्हटले होते. पण तेव्हा माझ्यावर विश्वास नव्हता. मुंबईतील मतदारांना आश्वस्त करणारे, भुरळ घालणारे आणि त्यांच्या भविष्याची चिंता करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आमच्याकडे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही गतीने निर्णय घेत आहेत. त्यामुळे ‘किंचित’ सेनेपेक्षा बाळासाहेबांच्या शिवसेनेची कामगिरी वरचढ राहील, असा मला विश्वास आहे. मुंबई, तेलंगणा आणि अन्य राज्यांतही मोदींचा चेहरा पाहून लोक मत देतात. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत पंतप्रधान मोदी व फडणवीस यांचा चेहरा जनतेपुढे ठेवून आम्ही निवडणूक लढवू.

किंचित शिवसेना पक्ष कुठला आहे, त्यांचे निवडणूक चिन्ह कोणते, अध्यक्ष कोण आहे?
मनसेबरोबर युतीची चर्चा नाही, त्यांच्यावर अन्याय करू नका.
राज ठाकरे मोकळय़ा मनाचे, उद्धव ठाकरेंप्रमाणे तुसडे नाहीत.
शब्दांकन : उमाकांत देशपांडे

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 03:13 IST