हवेतील अतीव प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडलेली जगातील पहिली व्यक्ती म्हणजे लंडनमधली अवघ्या नऊ वर्षांची एला. पुढच्या काळात प्रदूषणामुळे अशा पद्धतीने कुणीही दगावू नये, यासाठी तिची आई रोझामंड १४ वर्षांहून अधिक काळ लढत होती. वैयक्तिक दु:खाला व्यवस्थात्मक उत्तर शोधणार्या या संघर्षाविषयी येत्या पर्यावरण दिनानिमित्त (५ जून) विशेष लेख.
दक्षिण लंडनच्या लुईशॅम भागातील ‘माउंट्सफिल्ड उद्यान’ हे तिथल्या सुमारे चार हजार सार्वजनिक उद्यानांपैकी एक. या ३० एकर उद्यानाच्या मध्यभागी एका छोट्या मुलीचा ब्राँझचा पुतळा आहे. त्याखाली लिहिलं आहे, ‘एला रॉबर्टा एडू किस्सी डेब्रा. मृत्यू- वयाच्या नवव्या वर्षी. हवेतील अतीव प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडलेली जगातील पहिली नोंद. शिल्पकार- हॅना स्ट्यूअर्ट.’
या पुतळ्यासमोरच्या बाकावर बसलेल्या एलाच्या आई – रोझामंड, प्रस्तुत लेखकाला सांगतात, ‘एलाचा जन्म २००४ चा. ती जन्मत: गुटगुटीत आणि निरोगी होती. उत्साही आणि आनंदी एला या अनेक खेळांत रमून जाई. वाचन, वाद्य वाजवणे, गाण्यांना चाल लावणे, गाणे यामुळे नाटक आणि नृत्य नाटकांत अनेकदा मुख्य भूमिका साकारायची. दुसरीत असताना, एलाला अचानकच जोरदार खोकला सुरू झाला. तो कोणत्याही औषधांना जुमानत नव्हता. काही दिवसांनी ती खोकून खोकून बेशुद्ध पडली. जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करून दुसर्या दिवशी तिला घरी सोडण्यात आलं. एका आठवड्यानंतर पुन्हा एकदा ती खोकून बेशुद्ध पडली आणि तीन दिवसांनी शुद्धीवर आली. त्यानंतरची दोन वर्षं अपस्मार (एपिलेप्सी) पासून ते सिस्टिक फायब्रॉसिसपर्यंत अनेक तपासण्या झाल्या. त्यातून तिला तीव्र ॲलर्जी आहे, असं निदान करण्यात आलं. तिला दोन वर्षांच्या काळात ३० वेळा आपत्कालीन रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. तिच्या नवव्या वाढदिवसानंतर काही दिवसांत, १५ फेब्रुवारी २०१३ रोजी दम्याच्या प्राणघातक झटक्यामुळे एला गेली. त्या प्रमाणपत्रात ‘तीव्र श्वसन अपयशामुळे मृत्यू’ अशी नोंद केली होती.
ब्रिटनच्या कायद्यानुसार आकस्मिक मृत्यूची कारणं स्पष्ट होत नसतील किंवा तो मृत्यू सार्वजनिक आरोग्याशी संबंधित असेल, तर मृत्यू चौकशी अधिकारी त्याची सखोल चौकशी करू शकतो. त्यानुसार एलाच्या मृत्यूची पहिली चौकशी २०१४ मध्ये झाली. त्यात डॉक्टरांनी मुख्यत: जीर्ण आणि अतीव दम्यामुळे श्वसनक्रिया ठप्प पडून मृत्यू झाल्याचं सांगितलं.
रोझामंड बाईंनी स्थानिक वर्तमानपत्रात एलाचं आजारपण आणि मृत्यूवर लेख लिहिला. तो वाचून एका रहिवाशाने त्यांना सुचवलं, ‘एला मरण पावली, त्या रात्रीच्या वायू प्रदूषणाची पातळी तपासा.’ तोपर्यंत वायू प्रदूषण हे दम्याचं कारण असू शकेल, अशी शक्यता कोणत्याही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली नव्हती.
लंडनमधील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक हा नेहमी ६० पर्यंत असतो. ही हवा आरोग्यदायी मानली जाते. दक्षिण लंडनच्या लुईशॅममध्ये प्रामुख्याने गरीब आणि कष्टकरी वर्ग राहतो. रोझामंड यांच्या घरापासून केवळ २५ मीटर अंतरावरून वर्तुळाकार रस्ता जातो. त्यामुळे तिथे २४ तास वाहनांची गर्दी असते. रोझामंड यांनी हवेच्या गुणवत्तेचा तपास सुरू केला. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या २००५ च्या मानकानुसार एका घनमीटर हवेमध्ये नायट्रोजन-डाय-ऑक्साइडची कमाल मर्यादा ४० मायक्रोग्रॅम एवढी होती. ल्यूईशॅम भागात हे प्रमाण खूपच जास्त होतं.
त्या वेळी साउथॅम्प्टन विद्यापीठातील वैद्यकीय संशोधक प्रो. डॉ. स्टीफन होलगेट हे ‘वायू प्रदूषणाचे आरोग्यावरील परिणाम’ यावर संशोधन करत होते. डिझेल धूर, सूक्ष्म घन कण (पी. एम.२.५ मायक्रोग्रॅम) आणि नायट्रोजन- डाय- ऑक्साइड यांच्यामुळे होणार्या श्वसनरोगांकडे ते विशेष लक्ष देत होते. रोझामंड यांचा लेख वाचून होलगेट यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मते, त्या परिसरातील वायू प्रदूषणामुळे एलाचा भयानक दमा बळावत गेला आणि ती मरण पावली. हे ऐकून, एलाची आजारपणं, तिला रुग्णालयात दाखल केलेल्या तारखांना वायू प्रदूषणाच्या पातळीची सखोल माहिती रोझामंड घेऊ लागल्या. तसंच एलाच्या मृत्यूची नव्याने चौकशी व्हावी, यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी झटू लागल्या. यातूनच त्यांच्या साथीला ब्रिटनमधील प्रसिद्ध मानवाधिकार व पर्यावरणविषयक कायदेतज्ज्ञ बॅ. जॉसलिन कॉकर्न आल्या. एलाची कहाणी ऐकून रोझामंड यांच्याकडे, अनेक तज्ज्ञ, संशोधक, अभ्यासक आणि संस्था यांचा ओघ सुरू झाला.
प्रो. होलगेट यांच्या नेतृत्वाखालील चमूने २०१६ मध्ये ‘रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स’साठी ‘आपला प्रत्येक श्वास आणि वायू प्रदूषणाचे आजन्म परिणाम’ हा महत्त्वपूर्ण अहवाल तयार केला. या अहवालातून ‘इंग्लंडमध्ये वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सुमारे ४० हजार मृत्यू होतात.’ हे स्पष्ट झालं. असे भक्कम वैज्ञानिक पुरावे जमा झाल्यानंतर रोझामंड यांनी दुसरी चौकशी मंजूर करण्यासाठी अर्ज केला.
नऊ दिवस चाललेल्या चौकशीच्या अखेरीस १६ डिसेंबर २०२० रोजी मृत्यू चौकशी अधिकारी फिलीप बार्लो ऐतिहासिक निकाल देताना म्हणाले, ‘एला ही २०१० ते २०१३ या काळात नायट्रोजन- डाय-ऑक्साइड आणि सूक्ष्म कणांच्या जास्त पातळीच्या सान्निध्यात होती. या प्रदूषणाचा मुख्य स्रोत त्या भागातील वाहतूक हाच होता. अत्याधिक वायू प्रदूषणामुळे एलाला दमा झाला, तो वाढत गेला आणि तिचा मृत्यू झाला.’ या अहवालात बार्लो यांनी स्पष्ट सूचना केल्या. ‘राष्ट्रीय स्तरावर सूक्ष्म कणांसाठी ठरवलेल्या मर्यादा जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांपेक्षा खूप जास्त आहेत. लोकांमध्ये वायू प्रदूषणाबद्दलची जागरूकता कमी आहे. हवेच्या गुणवत्तेचं मापन वाढवून राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावर ती माहिती उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. वैद्यकीय आणि शुश्रूषा शिक्षणात वायू प्रदूषण आणि आजार यांचा समावेश केला पाहिजे.’ हा अहवाल इंग्लंडच्या पर्यावरण, वाहतूक, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या विभागांना पाठवण्यात आला.
दरम्यान, प्रो. होलगेट यांच्या संशोधनामुळे जगाच्या विचारांची दिशा बदलून गेली. ते इंग्लंड सरकारचे ‘स्वच्छ हवा मोहिमे’चे प्रमुख सल्लागार झाले. इंग्लंडने नाईटहूड हा सर्वोच्च सन्मान (सर हा किताब) देऊन गौरव केला. जागतिक आरोग्य संघटनेने त्यांची सल्लागारपदी नेमणूक केली. इतकेच नाही तर २००५ साली केलेल्या वायू प्रदूषण मानकांमध्ये लक्षणीय बदल केला. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या २००५ च्या मानकानुसार, फुप्फुसांमधून थेट रक्तात प्रवेश करू शकणार्या २.५ मायक्रोग्रॅमच्या अतिसूक्ष्म कणांची मर्यादा २४ तासांत एका घनमीटर हवेत २५ मायक्रोग्रॅम एवढी होती. ती २०२१ मध्ये १५ मायक्रोग्रॅम करण्यात आली. तर एका घनमीटर हवेमध्ये नायट्रोजन- डाय-ऑक्साइडची कमाल मर्यादा ४० मायक्रोग्रॅम एवढी होती. ती १० मायक्रोग्रॅम एवढी केली.
या निकालामुळे एलाच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयामध्ये सरकारविरुद्ध नागरी दावा दाखल करून २ लाख ९३ हजार १५६ पौंडांची भरपाई मागितली. हा दावा पैशांसाठी नाही, तर सरकारला जबाबदार धरण्यासाठी होता. २०२४ च्या ऑक्टोबर महिन्यात, इंग्लंडच्या सरकारने समझोता करताना, रोझामंड यांना रक्कम जाहीर न करता नुकसानभरपाई दिली. (‘लोकरंग’, २२ डिसेंबर २०२४) एलाच्या स्मरणार्थ रोझामंड यांनी तिच्या दहाव्या वाढदिवशी ‘एला रॉबर्टा फॅमिली फाउंडेशन’स्थापन केली आहे. त्यातून त्या दक्षिण लंडनमधील दमाग्रस्त मुलांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आवाहनामुळे इंग्लंडमधील पालकांनी ‘भविष्यासाठी पालक’ (पेरेंट्स फॉर फ्युचर) ही संस्था स्थापली आहे. ती जागरूकता वाढवण्यासाठी शाळा-कॉलेजं-विद्यापीठं ते कलादालनांपर्यंत अनेक कल्पक उपक्रम हाती घेत आहे. ड्रायडन गुडविन यांचे संसदेसमोरील सेंट थॉमस हॉस्पिटलवर एलाचं २५ फुटांचं चित्र, लंडनमधील टेट मॉडर्न, नॅशनल आर्ट गॅलरी आदी कलादालनात एला आणि वायू प्रदूषणावरील अनेक चित्रकारांची चित्र प्रदर्शनं असे त्यांचे स्वरुप आहे. ‘फुप्फुसांसाठी माता!’ या मोहिमेत कित्येक माता पालक शाळांजवळील वाहन प्रदूषणामुळे मुलांच्या फुप्फुसांवर होणारे परिणाम समजावून सांगतात. शाळांजवळील रस्त्यांवरील वाहतूक कमी कशी करता येईल, याचे पर्याय सुचवतात. जनजागृती आणि धोरणात्मक दबाव निर्माण करण्यासाठी पुढे सरसावणार्या माता वाढत आहेत.
ही सर्व मंडळी इंग्लंडमध्ये ‘एला कायदा’ मंजुरीसाठी पाठपुरावा करत आहेत. त्यातील तरतुदी ‘स्वच्छ हवा हा मूलभूत मानवी हक्क म्हणून मान्य करणं, जागतिक आरोग्य संघटनेच्या हवा गुणवत्तेच्या निकषांना कायदेशीर स्वरूप देणं. प्रदूषणासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनांना जबाबदार धरणं आणि प्रदूषणग्रस्त समुदायांचे संरक्षण करणं.’ अशा काळानुरूप आहेत.
एलाच्या कुटुंबाने दाखल केलेल्या दाव्यातील समझोत्याचा एक भाग म्हणून २०२४ च्या फेब्रुवारीमध्ये लंडनचे महापौर सादिक खान यांनी ‘मी, ग्रेटर लंडन ॲथॉरिटीच्या वतीने एलाची आई रोझामंड यांची आणि कुटुंबीयांची माफी मागतो. यापुढे कोणत्याही मुलाला एलाप्रमाणे त्रास सहन करावा लागू नये यासाठी, मी लंडनची हवा स्वच्छ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहीन. ‘एला कायदा’ मंजूर व्हावा यासाठी मी पराकाष्ठा करणार आहे.’ अशी जाहीर कबुली दिली.
जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे, ‘सध्या जगातील ९९ टक्के लोकसंख्या हवेच्या प्रदूषणाला सामोरी जात असून त्यामुळे दरवर्षी सुमारे ७० लाख अकाली मृत्यू होत आहेत. हा भविष्यातील संकटाचा प्रश्न नसून हा आजच्या काळातील प्रश्न आहे. प्रदूषित हवा आपलं हृदय, फुप्फुसं, मेंदू आणि रक्तवाहिन्यांवर करत असलेल्या गंभीर परिणामांविषयी आहे. याची जाणीव होऊन जगभरातील बालक आणि पालकांमध्ये वायुप्रदूषणाबाबत जागरूकता वाढत आहे. पोर्तुगाल, ब्राझील, अमेरिका, नेदरलँड्स, नॉर्वे, कोलंबिया आयर्लंड आणि कॅनडा आदी राष्ट्रांतील मुलांनी वायुप्रदूषणाच्या समस्येसाठी आपापल्या सरकारांवर खटले दाखल केले आहेत. याच काळात एकट्या रोझामंड यांच्या ‘शुद्ध हवेच्या शत्रूंसंगे…’या बहुआयामी अभियानाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. जागतिक आरोग्य संघटनेने कोलंबियामध्ये २०२५ साली ‘वायुप्रदूषण आणि आरोग्य’ परिषद आयोजित केली होती. त्यात त्यांचा ‘स्वच्छ हवेचा दूत’ असा सन्मान केला गेला. त्यानंतर त्यांना ‘स्वच्छ हवे’साठी होणार्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय परिषदेचं कायमस्वरूपी निमंत्रण दिलं गेलं आहे. त्या देश-विदेशात जाऊन सांगत आहेत, ‘स्वच्छ हवेत श्वास हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. तो त्यांना मिळालाच पाहिजे. मुलाचा वर्ण, वंश, वर्ग व स्थळ या बाबींमुळे त्यात यत्किंचितही फरक पडता कामा नये.’
प्रस्तुत लेखकाबरोबरची ही बातचीत उरकून रोझामंड या माता पालकांच्या सभेला गेल्या. जाताजाता त्यांनी दिल्लीतील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अरविंदकुमार यांचं संशोधन आणि जनजागृतीचा उल्लेख केला. डॉ. अरविंदकुमार म्हणतात, ‘फुप्फुसात सूक्ष्मकण जमा झाल्यानंतर ते कधीही बाहेर काढता येत नाहीत. दूषित हवेमुळे दिल्लीकरांची फुप्फुसं अजिबात धूम्रपान न करता पूर्ण काळवंडत आहेत. दिल्ली ‘दम्याची राजधानी’ झाली आहे. वायुप्रदूषण ही ‘कोविड’सारखीच वैद्यकीय आणीबाणी आहे. फुप्फुसांच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण चक्रावून टाकणारं आहे. भारतात तो साथीसारखा पसरण्याची भीती वाटते.’
भारताच्या सर्वोच्च न्यायालयात दिल्लीतील आठ महिन्यांचे अर्जुन गोपाल व आरव भंडारी आणि १६ महिन्यांची झोया राव भसीन या बाळांच्या वतीने २०१५ मध्ये ‘स्वच्छ हवेसाठी’ याचिका दाखल करण्यात आली होती. २०१९ साली सहा वर्षांच्या लिसीप्रिया कांगुजमने वायुप्रदूषणाच्या विरोधात संसदेसमोर आठ दिवस उभं राहून निषेध व्यक्त केला होता. २०२५ च्या नोव्हेंबर महिन्यात शुद्ध हवेच्या मागणीसाठी शेकडो मुलं आणि तरुण दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले होते. तेव्हा जन्मलेल्या बाळालासुद्धा प्राणवायू देण्याची गरज भासली होती.
आपल्या लोकशाहीच्या चारही स्तंभांना कधी तरी बालकांची दया येईल, अशी आशा !पर्यावरण अभ्यासक
atul.deulgaonkar@gmail.com
