विजय पांढरीपांडे
इलॉन मस्क यांनी नुकतेच भविष्य वर्तवले आहे की येत्या काही वर्षांत विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयांत जाणार नाहीत! कारण कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक सर्जरी ही इतकी प्रभावी अचूक उत्कृष्ट असेल की मानवी डॉक्टरची गरजच भासणार नाही! तसाही एमबीबीएसच्या शिक्षणाला बराच वेळ लागतो. पदवी पाच वर्षे, पदव्युत्तर तीन वर्षे, त्यापुढे सुपर स्पेशालिटी आणखी काही वर्षे… म्हणजे स्थिर होण्यात अर्धे तारुण्य खर्च होते. हेच काम मानवापेक्षाही चांगले, अचूक, अधिक प्रभावीरीत्या, तेही कमी खर्चात, तंत्रज्ञानाचा उपयोग करून होणार असेल तर वैद्यकीय शिक्षण घेण्याची, त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची गरजच उरणार नाही.

हेच तत्त्व शिक्षणाच्या इतर शाखांसाठी लागू होऊ शकते. आता पदवी घ्यायची तर विद्यापीठाने आखून दिलेला अभ्यासक्रम, अर्धवट ज्ञान असलेले इच्छाशक्ती गमावलेले निरुत्साही प्राध्यापक, कंटाळवाण्या निरर्थक परीक्षा, या चक्रातून जावे लागते. त्यापेक्षा घरबसल्या ऑनलाईन शिक्षण उत्तम दर्जाचे मिळते. शिवाय ज्यात स्वारस्य आहे तेच विषय, हवे तितकेच, हव्या त्या वेळात शिकण्याचे, पुन्हा उजळणी करण्याचे स्वातंत्र्य असते. इथेही ऑनलाईन प्रमाणपत्र मिळू शकते. विद्यापीठाच्या किचकट नियमांचे, लाल फितीच्या थंड कारभाराचे काटेरी कुंपण नसते. शिवाय कमी वेळात खूप शिकता येते. तेही जगातील उत्तम शिक्षकांकडून. यूट्यूबवर असे अनेक शिकवणारे व्हिडिओ उपलब्ध आहेत. मी स्वतः ते बघितले आहेत. त्यातून नव्याने मला स्वतःला बरेच काही शिकायला (तेही सत्तरी नंतर!) मिळाले आहे. त्यामुळे एकूणच विद्यापीठाची गरज, प्राध्यापकांची गरज यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रत्यक्ष अनुभव, प्रयोगशाळेतील शिक्षण यावरदेखील तोडगे सहज निघतील.

सध्या तसेही उमलती पिढी, त्यांचे पालक सगळेच त्रस्त आहेत. स्पर्धा वाढली. शाळा महाविद्यालयांचे शिक्षण प्रचंड प्रमाणात महाग झाले. शिवाय ट्युशनची गरज. त्यात पाण्यासारखा वाया जाणारा पैसा, वेळ. यातून भविष्याची, उत्तम नोकरीची शंभर टक्के खात्री नाहीच. आरक्षणाचे अडथळे आहेत काही वर्गासाठी. भ्रष्टाचार आहे जागोजागी. मग यावर उपाय काय?

शाळा महाविद्यालयांच्या भानगडीत न पडता घरी शिकणे. कुणी म्हणेल प्रत्येकाला हे शक्य आहे का? ग्रामीण भागातील मुलांचे काय? त्याचे उत्तर सोपे. उत्तम बँडविड्थ असलेले हाय स्पीड इंटरनेटचे जाळे अन् एक स्मार्टफोन एवढे पुरे. स्मार्ट फोन तसाही प्रत्येकाच्या हातात दिसतोच आहे. तशीच गरज पडल्यास दोघे तिघे एकत्र शिकू शकतात. घरच्या टीव्ही पडद्यावर बघू शकतात. हळूहळू भाषेचीदेखील सवय होईल वारंवार ऐकल्यावर. आपली भाषा आपण आई-वडिलांकडूनच शिकतो घरच्या घरी.

अनेकांच्या मनात एआय, एमएल, रोबोट, नॅनो टेक्निक याबद्दल शंका, भीती, संभ्रम आहेत. पण या गोष्टींचे वादळ आता टाळता येणार नाही हे निश्चित. जसे आपण करोनाला मिळून मिसळून सामोरे गेलो काही वर्षांपूर्वी, तसेच या नव्या सगळ्यांनाच सध्या संभ्रमित करणाऱ्या आव्हानाला तोंड द्यावे लागेल. त्याच्याशी जुळवून घ्यावे लागेल. पण आंधळेपणाने नव्हे तर डोळसपणे. म्हणजे स्वतःची बुद्धी गहाण न ठेवता, विवेकाने विचार करून यापुढे निर्णय घ्यावे लागतील.

माणूस, निसर्ग, त्यांचे अंगभूत गुणधर्म, वृत्ती प्रवृत्ती हे तसेच ठेवावे लागेल. त्यात छेडछाड करता येणार नाही, पण कितीही झाले तरी ही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवनिर्मित आहे. ती पुढे स्वयंचलित असेल, स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी, स्वतःहून नवे शिकणारी असेल, पण तरीही ती मानवनिर्मित आहे. त्यामुळे नैतिकतेच्या भूमिकेतून चांगले वाईट आपले आपल्यालाच ठरवायचे आहे. आपलीच मुले मोठी झाली की ती स्वतःचे निर्णय स्वतःच घेऊ लागतात. तुमच्या हातातून निसटतात. त्यावेळी आपलेच संस्कार उपयोगी पडतात कुठे ना कुठे, अशी आपली श्रद्धा आहे. ती अगदीच अनाठायी नाही. शेवटी अगदी पाषाण युगापासून आपल्या मानवजातीत झालेली स्थित्यंतरे वेगवेगळ्या स्वरूपाची, आव्हानात्मक अशीच होती. त्यातून आपण तावून सुलाखून बाहेर आलोच की! आताही हे एआय, एमएल, रोबोटिक्स वगैरेंचे आव्हान आपल्याला त्याच सामर्थ्याने पेलावे, आत्मसात करावे लागेल.

संगणक आलेत म्हणून आपण आपली स्मरणशक्ती गमावली नाही. चुली शेगड्या जाऊन गॅस आल्याने स्वयंपाकात, भुकेत फरक नाही पडला. आपण पत्रे लिहायला विसरलो पण मोबदल्यात शेकडो हजारो मैल दूरच्या नातेवाईंकाशी समोरासमोर असल्यासारखे व्हिडिओद्वारे बोलतोच की! काळानुसार प्रत्येक व्यवहाराचे स्वरूप बदलले आहे, पण मुळातला व्यवहार बदलला नाही. अन् तो बदलणारदेखील नाही.

त्यामुळे इलॉन मस्क काहीही म्हणो… शिकणे, शिकवणे, नवे आत्मसात करणे, जुने विसरणे, कोऱ्या पाटीवर नवा अध्याय लिहिणे ही काळाची गरज आहे आता.

vijaympande@yahoo.com