प्रा. मं. गो. राजाध्यक्ष

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

‘नेहरू सेंटर कलादालन’ येथे ‘मास्टर पेंटर’ मालिकेतील २८ वे कलाप्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनात ‘आठवणीतल्या हास्यरेषा’ या संकल्पनेअंतर्गत नामांकित व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे रसिकांना पाहता येणार असून, ते १ जानेवारीपर्यंत सर्व रसिकांसाठी खुले आहे.

तो काळ होता केवळ वाचनसंस्कृतीचा. मासिके, दिवाळी अंक, वृत्तपत्रे वाचनाचा आणि त्यामधून आपल्याला निखळ आनंद देणारी हास्यचित्रे पाहण्याचा… त्यांचा मनमुराद आनंद घेण्याचा. अगदी घरात बसून शिळोप्याच्या गप्पा माराव्यात तसा. यामध्ये जसे हास्यविनोद असत, तसेच राजकीय भाष्य करून एखाद्याचे व्यंग उघडे पाडल्याचेही पाहायला मिळत असे. आणि महाराष्ट्रात असे अनेक व्यंगचित्रकार होऊन गेले, ज्यांनी हे व्यंगचित्रांचे क्षेत्र समृद्ध केले आहे. तसे पाहिले तर व्यंगचित्रकला ही कोणत्या शाळेत शिकता येत नाही. त्यासाठी तुम्हाला मुळातच आवड लागते. ते केवळ सुंदर चित्र असून चालत नाही, त्यामध्ये कल्पकता हवी. नेमके मर्म पकडता यायला हवे. माणूस हा केवळ त्याच्यासारखा दिसून चालत नाही, तर त्यातील अंतरंग जाणवून दिले पाहिजे आणि त्यासोबत राजकारणाचा अभ्यासही हवा. आणि रोजच्या घडामोडीतून नेमके काय शोधायचे याचे तारतम्य हवे. शिवाय तुमची रेषा, त्यातील सफाई, अ‍ॅनाटॉमीचा अभ्यास, व्यक्तीच्या वाढत्या वयासोबत त्याच्यातील फरक दाखवण्याची किमया… या सर्व गोष्टी निष्णात व्यंगचित्रकाराला जमायला हव्यात.

एके काळी आपल्या कुंचल्याने मासिके, नियतकालिके गाजवलेले कलावंत व त्यांनी आविष्कृत केलेली कला आज बऱ्याच लोकांना ज्ञात नाही. कथांमधील गांभीर्य हलके करण्यासाठी मधे-मधे जी हास्यचित्रे पेरली जात असत, तीही आजमितीस कोणाच्या ध्यानीमनी नाहीत. आणि हे ध्यानात घेऊन वरळीच्या ‘नेहरू सेंटर कलादालन’ येथे अशा ख्यातनाम व्यंगचित्रकारांच्या दुर्मीळ कलाकृतींचे प्रदर्शन तेथील संचालिका नीना रेगे यांनी भरवले आहे. आजवर अशी अनेक कलाकारांची प्रदर्शने गेली २७ वर्षे त्या सातत्याने भरवत आहेत. आणि आता अठ्ठाविसावे प्रदर्शन हे महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांच्या ‘आठवणीतल्या हास्यरेषा’ या संकल्पनेअंतर्गत भरवले आहे. तसेच वरळीसारख्या आडवाटेला असलेल्या ठिकाणी ‘नेहरू सेंटर कलादालन’ उभारून ते यशस्वीपणे चालवून त्यांनी एक प्रकारे रसिकांना तसेच नवोदित कलाकारांना, व्यावसायिक कलाकारांना, कला विद्याथ्र्यांना एक प्रकारे मोलाचे साहाय्य केले आहे. आजवर शिल्पकार करमरकर, राजा रविवर्मा, आर. के. लक्ष्मण, प्रल्हाद धोंड, ग. ना. जाधव, गोपाळराव देऊसकर, सोलेगावकर, रवींद्र मेस्त्री, हळदणकर पिता-पुत्र, छायाचित्रकार मित्तर बेदी अशा नामांकित कलाकारांची या ‘मास्टर पेंटर’ मालिकेत चित्रे-शिल्पे-छायाचित्रे प्रदर्शित झाली आहेत. आणि याचे श्रेय संपूर्णपणे  नीना रेगे यांना जाते.

या प्रदर्शनामध्ये अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे कला-दिग्दर्शक वॉल्टर लँगहॅमर, तसेच चित्रकलेत त्यांचे शिष्य मानले जाणारे चित्रकार, इतिहासकार, नेपथ्यकार, नाटककार द. ग. गोडसे यांचीही त्या काळातील राजकीय व्यंगचित्रे येथे पाहायला मिळतात. लँगहॅमर हे त्या काळात मुंबईचे कलाविश्व आपल्याभोवती फिरवलेले व्यक्तिमत्त्व. त्यांच्या चित्रात व्यंगाचे मर्म असेच, शिवाय ड्रॉइंगमधील नैपुण्य… या दोन्ही अंगांनी त्यांची चित्रे सरस ठरतात. तीच गोष्ट गोडसे यांच्या चित्रांबद्दल सांगता येईल. त्यांचीही चित्रे रेषेची सफाई आणि साधलेले मर्म या दोन्ही अंगांनी सजलेली दिसतात. याचसोबत सुप्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल यांची व्यंगचित्रेदेखील आपणास मोहवितात. दीनानाथ दलाल म्हणजे सौंदर्यचित्रांचे बादशहा. पण त्यांनी व्यंगचित्रेही बरीच काढली आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी आपण दलालांपासून स्फूर्ती घेऊन व्यंगचित्रे काढण्यास सुरुवात केली असे सांगितले होते. प्रवाही रेषेतून त्यांची चित्रे मुक्त संचार करीत असतात. ‘आवाज’ या विनोदाला वाहिलेल्या दिवाळी अंकाच्या खिडकीचित्रांची सुरुवात दलालांनीच केली.

बाळासाहेब ठाकरे हे या युगातील म्हटले तर एकमेव व्यंगचित्रकार म्हणायला हवे. त्यांचे ड्रॉइंग, व्यक्तीची ओळख पटवणारा लाइकनेस, पाठमोरी व्यक्तीही ओळखता येईल असा बॅक पोट्र्रेटचा अभ्यास, अ‍ॅनाटॉमीचा शास्त्रशुद्ध अभ्यास, निरीक्षण शक्ती, ते म्हणत त्याप्रमाणे चित्रांमधील भाष्य कळण्याची क्षमता आणि चेहºयावरील भावाविष्कार- जो व्यंगचित्रकाराला आवश्यक असतो, या सर्व बाबींचा बारीकसारीक विचार करून केलेले निर्दोष रेखाटन आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची निगेटिव्ह-पॉझिटिव्ह स्पेसची जाण… यामुळे बाळासाहेबांची राजकीय व्यंगचित्रे ही कमालीची प्रसिद्ध पावली. पानभर लिहिलेल्या अग्रलेखाला बाळासाहेब आपल्या एका व्यंगचित्राद्वारे भुईसपाट करीत. बाळासाहेबांनी काढलेले आपले सुहास्य मुद्रेचे व्यंगचित्र पाहून पंडित नेहरू इतके खूश झाले, की त्यांनी त्यावर आपली स्वाक्षरी करून ते बाळासाहेबांना दिले. आणि केवळ याच व्यंगचित्रांच्या जोरावर बाळासाहेबांनी या देशातील सामर्थ्यवान अशी संघटना उभारली, हीच व्यंगचित्रांची ताकद आहे हे मानायला हरकत नाही. जोडीला त्यांचे कनिष्ठ बंधू श्रीकांत ठाकरे हेदेखील बाळासाहेबांच्या वळणाने जात होते. दोघांच्याही व्यंगचित्रात बरेच साम्य दिसत असे. कित्येकदा ओळखू येणार नाही इतके. पण पुढे श्रीकांतजी संगीताकडे वळले.

आर. के. लक्ष्मण हे ‘टाइम्स’चे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार. नेमके वर्म ओळखून त्यावर त्यांची टिप्पणी असायची. चित्र काढताना आजूबाजूच्या गोष्टी दर्शवून वातावरणनिर्मिती करण्यात त्यांची हातोटी होती. तसेच किर्लोस्कर या आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी काढलेले ‘किर्लोस्कर’ या दर्जेदार मासिकाचे स्वरूप देऊन नावलौकिकाला आणणारे शं. वा. किर्लोस्करदेखील याच काळातील. पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांच्याकडे चित्रकलेचे धडे गिरवून पुढे मुंबईला सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून कला शिक्षण घेतलेले शं. वा. कि. यांनी ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ मासिकांतून आपली व्यंगचित्रे प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. त्यांना थोडक्यात हास्यचित्रे म्हणावीत अशीच ती होती. यामध्ये त्यांनी निखळ आनंद देणारी हास्यचित्रे जशी काढली तशी त्यातून सुधारणेचा, बुवाबाजीविरोधी, हुंड्याच्या अनिष्ट प्रथा… असे संदेश देणारीही हास्यचित्रे काढली. ‘लग्नमंडपातील विनोद’,  ‘टाकांच्या फेकी’ अशी नंतर त्या व्यंगचित्रांची पुस्तकेही त्यांनी प्रकाशित केली. त्यांच्या ‘टाकांच्या फेकी’ या पुस्तकाला प्रा. ना. सी. फडके यांनी टिप्पणी लिहिली आहे. वास्तववादी चित्रकार म्हणून किर्लोस्कर यशस्वी होतेच, पण व्यंगचित्रकाराला लागणारी शोधक वृत्ती, निरीक्षण शक्ती, निर्भेळ विनोद क्षमता या गोष्टीही त्यांच्याकडे होत्या. शंकररावांनी विनोदी, कौटुंबिक, गंभीर अशा सर्वच विषयांवर चित्रे काढली. पण आपल्या व्यंगचित्रांमधून त्यांनी कधीही कोणाला झोंबेल अर्शी टगलटवाळी केली नाही.

वसंत सरवटे यांच्या व्यंगचित्रांनी तसेच त्यांच्या अर्कचित्रांनी स्वत:चे असे एक वलय निर्माण केले आहे. कोठेही कला शिक्षण न घेता केवळ स्वत:च्या हिमतीवर चित्रकार बनलेले सरवटे यांनी संपूर्ण प्रकाशन व्यवसायावर आपला ठसा उमटवला. स्वत:ची शैली निर्माण केली. त्यांची चित्रे ही दृश्यचित्रे म्हणूनदेखील ओळखली जात असत. एवढी वातावरणनिर्मिती ते आपल्या चित्रांतून करीत. तीच गोष्ट ते एखाद्यााचे कॅरिकेचर करीत तेव्हा त्याच्या सर्व लकबींसहित ती व्यक्ती ते आपल्या रेषांनी साकारीत. साहित्याचाही त्यांचा अभ्यास होता- ज्यामुळे त्यांची बोधचित्रे सकस होत असत. श्याम जोशीदेखील हास्यचित्रे आविष्कृत करीत असत. हिंदुस्थान थॉम्प्सन येथे जाहिरातीचे काम करणाऱ्या जोशींनी अनेक बालवाङ्मयासाठी आपली हास्यचित्रे रेखाटली आहेत. त्यांच्या चित्रांतील गोडवा हा पाहणाऱ्याला मोहित करणारा असे. श्रीलंकेच्या दौऱ्याच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर एका सैनिकाने रायफलच्या दस्त्याने हल्ला केला, त्या वेळी जोशींनी काढलेले चित्र अत्यंत बोलके होते. एका राष्ट्रप्रमुखाला सैनिकी सलामी देत असताना सर्व सैनिक शिस्तीत उभे आहेत व त्याच सैनिकांची मागील बाजू दाखवली होती तेव्हा त्या सर्वांचे हात बांधून ठेवले होते. अर्थातच या चित्राला पारितोषिक मिळाले. बाळासाहेबांच्या चित्रांची आठवण होईल अशी राजकीय व्यंगचित्रे रेखाटली ती विकास सबनीस या उमद्या व्यंगचित्रकाराने. बाळासाहेबांचा पगडा विकास यांच्यावर पुरेपूर होता. अगदी मोजक्या व हुकमी रेषेत ते आपली चित्रे आविष्कृत करीत असत. काही काळ त्यांनी ‘मार्मिक’साठी व्यंगचित्रे काढली आहेत.

हरिश्चन्द्र लचके हे नावदेखील त्या काळात अनेक मासिके, दिवाळी अंक गाजवणारे ठरले. अगदी मोजक्या रेषेतून मानवी व्यक्तिमत्त्वे दाखवून त्यातून चुटके सांगावेत अशा तऱ्हेचे मोकळे विनोद त्यांच्या चित्रांतून पाहायला मिळर्त. किंबहुना मासिक हातात आल्यावर कित्येकदा वाचक त्यातील लचक्यांची चित्रे आधी पाहात व नंतर अंक वाचत. वाचकांच्या मनावर लचके यांच्या व्यंगचित्रांचा एवढा पगडा होता; आणि व्यंगचित्रांचे प्रसंगही रोजच्या सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे. या प्रदर्शनात या सर्व कलावंतांबरोबरच जोडीला वसंत गवाणकर, वसंत हळबे, बाळ राणे, प्रभाकर ठोकळ आदी व्यंगचित्रकारही असणार आहेत. अर्थात हे प्रदर्शन म्हणजे मागच्या पिढीतील व्यंगचित्रकारांची आठवण आणि सध्याच्या व्यंगचित्रकारांची ओळख असा अनोखा सोहळा असणार आहे.

rajapost@gmail.com