भावना शंकर शहारे
लहान मूल प्रश्न विचारत असतं, तेव्हा ते फक्त कुतूहल व्यक्त करत नसतं, तर ते जग समजून घेण्याचा प्रयत्न करत असतं. आकाश निळं का, पाऊस पडतो कसा, झाडं बोलतात का असे प्रश्न मोठ्यांना अगदी साधे वाटतात. पण त्या प्रश्नांमागे मुलाचं विचारविश्व असतं. त्या विचारांना जर योग्य वेळी प्रतिसाद मिळाला, तर मूल शिकत जातं. आणि जर ते प्रश्न थांबवले गेले, तर शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया तिथेच खुंटते.

आपल्यापैकी बहुतेकांनी हे अनुभवलेलं आहे. लहानपणी प्रश्न विचारणारी मुलं हळूहळू शांत होत जातात. कारण त्यांना सतत सांगितलं जातं “जास्त प्रश्न विचारू नकोस”, “शांत बस”, “हे मोठ्यांचं काम आहे”, “तुला कशाला कळायला हवं?” या वाक्यांतून मुलांच्या मनात एक संदेश रुजतो – प्रश्न विचारणं चूक आहे. मग ती मुलं ऐकायला शिकतात, पण विचार करायला विसरतात. खरं तर विचार करणं ही माणसाची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि त्या विचारांची सुरुवात प्रश्नांपासूनच होते. म्हणूनच शिक्षण म्हणजे फक्त अक्षरओळख, गणित, परीक्षा आणि गुण इतकंच नसून विचार करायला शिकवणं ही त्याची खरी ओळख आहे.

रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे की, शिक्षण जर मोकळं नसेल, तर ते मुलांच्या नैसर्गिक वाढीला अडथळा ठरतं. शांतिनिकेतनमध्ये त्यांनी मुलांना प्रश्न विचारण्याची, निसर्ग पाहण्याची, अनुभव घेण्याची मोकळीक दिली. त्यांचा विश्वास होता की मूल जेव्हा स्वतः पाहतं, विचार करतं, तेव्हाच त्याचं खरं शिक्षण होतं. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आज मुलांच्या आयुष्यात अभ्यासक्रम, स्पर्धा, परीक्षा, शिकवणी यांचं ओझं वाढत चाललं आहे. शिकणं म्हणजे काय हेच मुलं विसरत चालली आहेत. मुलांना विचारायला वेळ नाही, कारण अभ्यास पूर्ण करायचा आहे. प्रश्न विचारायला जागा नाही, कारण अभ्यासक्रम मोठा आहे. परिणामी मुलं पाठांतर करतात, पण समजून घेत नाहीत.

जॉन ड्यूईसारख्या शिक्षणतज्ज्ञांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की शिक्षण म्हणजे आयुष्याची तयारी नव्हे, तर शिक्षण हेच आयुष्य आहे. म्हणजेच शिक्षण वर्गातल्या चार भिंतींत मर्यादित नसून, रोजच्या जगण्यातून ते घडत असतं. पण त्यासाठी मुलांना प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य हवं.

आपल्या देशात गिजुभाई बधेकांनी आणि ताराबाई मोडक यांनी बालशिक्षणाबद्दल जे विचार मांडले, ते आजही तितकेच लागू पडतात. गिजुभाई बधेका म्हणायचे की मुलं खेळातून, अनुभवातून शिकतात. ती जेव्हा काही पाहतात, तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न उभे राहतात. आणि ते प्रश्न जर आपण ऐकून घेतले, तर शिकणं आपोआप घडतं. ताराबाई मोडक यांनी आदिवासी भागांत काम करताना पाहिलं की मुलं त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातून खूप काही शिकतात. शेत, जंगल, पाणी, प्राणी, माणसं- या सगळ्यांतून मुलं निरीक्षण करतात, तुलना करतात, प्रश्न विचारतात. पण औपचारिक शिक्षणात ही प्रक्रिया थांबते. कारण तिथे सगळं ठरलेलं असतं – काय शिकायचं, कधी शिकायचं, कसं शिकायचं.

घरातही अनेकदा मुलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातं. पालक थकलेले असतात, कामात गुंतलेले असतात. मुलगा किंवा मुलगी काही विचारायला आली की, “नंतर”, “आता नाही”, “तू खूप विचार करतोस” असं म्हणणं सोपं जातं. पण हेच क्षण मुलांच्या मनावर खोल परिणाम करतात. कारण त्यांना वाटतं की त्यांचे विचार महत्त्वाचे नाहीत. पालकांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत असायलाच हवीत, असं नाही. पण “मला माहिती नाही, आपण शोधूया” एवढं जरी म्हटलं, तरी मुलांच्या मनात शिकण्याची आग पेटते. मुलं बघतात की मोठी माणसंही शिकत असतात. त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याची भीती राहत नाही.

आज मुलांच्या आयुष्यात मोबाइल फोन आणि स्क्रीनचं प्रमाण वाढलं आहे. त्यातून माहिती मिळते, पण विचाराला चालना मिळत नाही. कारण स्क्रीन उत्तरं देतो, पण प्रश्न विचारायला लावत नाही. स्क्रीन बघणारी मुलं शांत असतात, पण त्यांच्या मनात काय चालू आहे हे कळत नाही. पण एखाद्या गोष्टीवर चर्चा झाली, संवाद झाला, तर विचारांची देवाणघेवाण होते. शाळांमध्येही आता विचार करण्यावर भर देण्याची गरज आहे. शिक्षकांनी फक्त धडा पूर्ण करण्यावर लक्ष न देता, मुलांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे. “छान प्रश्न आहे” हे वाक्य एखाद्या मुलाच्या आयुष्याला दिशा देऊ शकतं. कारण त्या एका वाक्यातून मुलाला कळतं की त्याचा विचार महत्त्वाचा आहे. आपल्या समाजात आज आज्ञाधारकपणाला जास्त महत्त्व दिलं जातं, विचारशीलतेला कमी. पण आजच्या बदलत्या जगात फक्त ऐकणारी माणसं चालणार नाहीत. स्वतः विचार करणारी, परिस्थिती समजून घेणारी, प्रश्न विचारणारी माणसं लागणार आहेत. कामाच्या ठिकाणीही आता फक्त सांगितलेलं करणं पुरेसं नाही. नवनवीन प्रश्न सोडवण्याची क्षमता हवी.

शेतकरी पीक बदलताना प्रश्न विचारतो, कारागीर काम सुधारताना प्रश्न विचारतो, उद्योजक नवा मार्ग शोधताना प्रश्न विचारतो. म्हणजेच प्रश्न विचारणं हे फक्त शिक्षणापुरतं मर्यादित नसून, उपजीविकेचाही भाग आहे. ही सवय लहानपणापासून लागली, तर ती आयुष्यभर उपयोगी पडते. आजचा काळ माहितीचा आहे, पण समजुतीचा नाही. सगळं कळतं, पण समजत नाही. कारण विचार करण्याएवढा वेळ नाही. म्हणूनच मुलांनी विचार करा शिकणं ही काळाची गरज आहे. आणि त्याची सुरुवात प्रश्न विचारण्यापासूनच होते. मुलांना प्रश्न विचारायला शिकवणं म्हणजे त्यांना बंडखोर बनवणं नाही, तर त्यांना समजूतदार बनवणं आहे. प्रश्न विचारणारी मुलं अंधानुकरण करत नाहीत. ती गोष्टी तपासून पाहतात, समजून घेतात, मग निर्णय घेतात. हीच लोकशाहीची खरी ताकद आहे.

असा समाज घडवायचा असेल, जिथे लोक विचार करतात, संवाद साधतात, विविध दृष्टिकोन समजून घेतात, तर त्याची सुरुवात शाळेत आणि घरातच करावी लागेल. मुलांच्या प्रश्नांना जागा दिली, तरच उद्याचे नागरिक जागरूक होतील. मुलांच्या मनात प्रश्न असणं हे त्यांचं मन जिवंत असल्याचं लक्षण आहे. त्या प्रश्नांना दाबलं, तर तो जिवंतपणा हळूहळू मावळतो. पण त्या प्रश्नांना उत्तरं शोधायला मदत केली, तर ती मुलं स्वतःचा मार्ग शोधायला शिकतात. शिक्षणाचं खरं काम म्हणजे मुलांना विचार करायला शिकवणं. उत्तरं देणं नाही, तर प्रश्न विचारण्याची ताकद देणं. कारण उत्तरं काळानुसार बदलतात, पण प्रश्न विचारण्याची सवय आयुष्यभर साथ देते. आज आपल्याला अशी पिढी घडवायची आहे जी फक्त शिकलेली नाही, तर समजूतदार आहे. जी फक्त काम करणारी नाही, तर विचार करणारी आहे. आणि हे सगळं शक्य आहे, जर आपण मुलांना प्रश्न विचारण्याएवढं मोकळं वातावरण दिलं तर. म्हणून मुलांनी प्रश्न विचारले, तर त्यांना थांबवू नका. त्यांचं ऐका. त्यांच्या प्रश्नांमागचं कुतूहल समजून घ्या. कारण त्या प्रश्नांमधूनच त्यांचं भविष्य आकार घेत असतं.

शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की, प्रश्न विचारणारी मुलं म्हणजे उद्याच्या समाजाची आशा आहे. त्यांचं कुतूहल जपणं ही आपली जबाबदारी आहे. कारण विचार करणारी मुलं घडली, तरच विचार करणारा समाज उभा राहील.

(लेखिका मुक्तांगण एज्युकेशन ट्रस्टमध्ये प्रकल्प समन्वयक आहेत.)