प्रा. डॉ. बाळ राक्षसे
कर्जाचा वाढता भार, उत्पन्नातील अस्थिरता आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव हे शेतकरी आत्महत्या या प्रश्नाचे आर्थिक पैलू आहेत; पण त्याबरोबरच सामाजिक एकाकीपणा, कौटुंबिक ताण, सामाजिक-सांस्कृतिक दबाव आणि मानसिक आरोग्य समस्या यांचाही त्यात महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे शेतकरी ज्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक परिस्थितीत जगतो, तिचाही विचार केला पाहिजे.

आज १० सप्टेंबर, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे नमूद केले गेले आहे. महाराष्ट्रातही विदर्भ आणि मराठवाडा विभागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले असून, या प्रदेशाला आत्महत्याप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांपैकी बहुतांश शेतकरी अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी आहेत.

एकूण कार्यरत भूधारणांपैकी अशा अल्प व सीमांत भूधारकांचे प्रमाण ८५.०१ टक्के आहे. प्रस्तुत लेखाचा उद्देश शेतकरी आत्महत्यांची कारणे आणि त्याचा उपाय यावर लक्ष केंद्रित करणे हा आहे. येथे एक महत्त्वाचा मुद्दा सर्वांच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे की, कृषी मजूर आणि शेतकरी/ कास्तकार यांच्या आत्महत्यांना सरसकट ‘शेतकरी आत्महत्या’ असे संबोधणे योग्य नाही. या दोन्ही सामाजिक- आर्थिक गटांमध्ये मूलभूत फरक आहेत आणि आत्महत्यांच्या कारणांचे विश्लेषण करताना हा फरक स्पष्टपणे लक्षात घेतला पाहिजे.

आत्महत्या ही बहुआयामी आणि अत्यंत गुंतागुंतीची सामाजिक घटना आहे. शेतकर्‍यांमधील आत्महत्यांचे सर्वंकष आकलन करण्यासाठी विविध स्तरांवर कार्यरत असलेल्या गुंतागुंतीच्या घटकांना समजून घेणे आवश्यक आहे. या घटकांचा अभ्यास करण्याचे दोन संभाव्य मार्ग आहेत.

पहिला मार्ग म्हणजे प्रत्यक्ष पद्धतीने मानस-सामाजिक घटकांचा अभ्यास करणे. यासाठी काही अभ्यासांमध्ये सर्वेक्षण आणि मुलाखतींच्या पद्धतींचा वापर करण्यात आला आहे. काळे, (२०११), दास (१९९८), मोहंती (२००१) आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था (२००५) यांच्या अभ्यासांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्येशी संबंधित मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जोखमीच्या घटकांचे अधिक चांगले आकलन करून दिले आहे. या अभ्यासांमध्ये शेतकर्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांकडून माहिती संकलित करण्यात आली.

या अभ्यासांनुसार कुटुंबातील शेतकर्‍याची भूमिका किंवा स्थान (उदा. कुटुंबप्रमुख असणे), तथाकथित सामाजिकदृष्ट्या तळच्या स्तरातील जात, कमी शैक्षणिक पातळी, गरिबी, वय आणि विभक्त/ लहान कुटुंबाची रचना हे मानसिक तणावाशी संबंधित महत्त्वाचे घटक असल्याचे आढळून आले आहे. बोंबले आणि लुंगडिम (Bomble and Lhungdim) (२०२०) यांच्या अभ्यासात शेतकर्‍यांमधील मानसिक तणावाची नोंद करण्यात आली आहे. या अभ्यासात ५८ टक्के शेतकर्‍यांनी मानसिक आरोग्याशी संबंधित तणाव असल्याचे सांगितले. 

डुर्खाईम (Durkheim)  यांच्या ‘सुसाईड’ या अभिजात समाजशास्त्रीय ग्रंथातून असे दिसून येते की, वर उल्लेख केलेल्या मानसिक परिणामांना केवळ वैयक्तिक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून न पाहता समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते. मोहंती (२०१३) यांनी वरील घटकांचे चिकित्सक विश्लेषण करताना असे नमूद केले आहे की, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांमधील निराशा आणि हताशेमागे शेतीच्या उत्पन्नातील घट आणि कर्जबाजारीपणा हे घटक असले तरी, त्यांची मुळे वाढत्या सामाजिक एकाकीपणात आणि व्यक्तिवादात आढळतात. असा दृष्टिकोन स्वीकारल्यास शेतकरी हा केवळ आर्थिक उत्पादन करणारा घटक नसून एक सामाजिक व्यक्ती म्हणून आपल्याला समजतो. बदलती सामाजिक व्यवस्था, सांस्कृतिक घटक आणि राज्याची धोरणे यांचा त्याच्या जीवनावर कसा परिणाम होतो, हे या दृष्टिकोनातून समजून घेता येते. 

अप्रत्यक्ष परिणाम समजून घेण्याचा दुसरा मार्ग म्हणजे उपलब्ध संशोधनाच्या निष्कर्षांचे विश्लेषण करून अप्रत्यक्ष परिणामांचा शोध घेणे. दांडेकर (२००५), मिश्रा (२००६) आणि नारायणमूर्ती (२००६) यांसारख्या बहुतेक अभ्यासांच्या निष्कर्षांचे विश्लेषण केले असता, शेतकर्‍यांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती निर्माण करणारे प्रमुख घटक आर्थिक स्वरूपाचे असल्याचे दिसते. त्यानुसार उत्पादन खर्चाच्या तुलनेत पिकांना मिळणारा अपुरा भाव; कर्जबाजारीपणा; अनिश्चित मान्सूनमुळे होणारे पीकअपयश; उत्पन्नातील अस्थिरता या घटकांमुळे शेतकर्‍यांचा स्वाभिमान, आत्मविश्वास आणि आशावाद कमी होऊ शकतो आणि त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. 

शेतकरी ही एक सामाजिक व्यक्ती आहे आणि त्यामुळे तिला व्यापक सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेच्या संदर्भात समजून घेणे आवश्यक आहे. विवाहव्यवस्था, हुंडा, कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतरचे विधी, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, अनपेक्षित वैद्यकीय खर्च तसेच मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबतची जागरूकता आणि उपलब्ध मानसिक आरोग्य सेवा या बाबींचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. हे घटक शेतकर्‍यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करणारे संयुक्त किंवा पूरक घटक म्हणून कार्य करू शकतात. 

प्रतिबंधासाठी उपक्रम आणि धोरणे

शेतकरी आत्महत्यांच्या समस्येच्या संदर्भात सरकारने अनेक अभ्यास केले असून, त्यातून तीन महत्त्वपूर्ण अहवाल प्रकाशित झाले आहेत. त्यातून कर्जमाफी योजना, कर्जमुक्ती पॅकेज आणि उत्पन्नाचे विविधीकरण यांसारख्या उपाययोजना पुढे आल्या. या अहवालांमध्ये आर्थिक घटकांना महत्त्व देण्यात आले; परंतु शेतकरी समुदायातील मानस-सामाजिक समस्यांचा किंवा या समस्यांचा आर्थिक परिस्थितीशी असलेल्या गुंतागुंतीच्या परस्परसंबंधाचा पुरेसा अभ्यास करण्यात आलेला नाही. 

परिणामी, भारत सरकारच्या अहवालांमधून सहकारी बँकांच्या माध्यमातून कुटुंबांना सक्षम करणे, संस्थात्मक कर्जव्यवस्था मजबूत करणे आणि आर्थिक दरी कमी करणे यांसारख्या अर्थव्यवस्था-केंद्रित उपाययोजना सुचवण्यात आल्या. मात्र, या उपाययोजनांची अंमलबजावणी आणि त्यांचे परिणाम अपेक्षित पातळीवर झालेले दिसत नाहीत. परिणामी, शेतकरी कुटुंबांमधील आत्महत्येचा धोका कमी झाल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत (काळे, २०१४).

आतापर्यंत सरकारने केलेल्या उपाययोजनांचा मुख्य भर आर्थिक भार कमी करण्यावर राहिला आहे. मात्र इतर मानसशास्त्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा धोरणात्मक आणि सातत्यपूर्ण पद्धतीने पुरेसा विचार झालेला नाही. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन स्थापन केले. या मिशनच्या माध्यमातून आत्महत्याप्रवण भागांतील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार, विविध कारणांमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणारी सुमारे चार लाख शेतकरी कुटुंबे असल्याचे आढळून आले.

२१ नोव्हेंबर २०२२ रोजी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण (नॅशनल सुसाईड प्रीव्हेंशन स्ट्रॅटेजी- एलएसपीएस) जाहीर केले. या धोरणाचे उद्दिष्ट २०२० हे आधारभूत वर्ष मानून २०३० पर्यंत आत्महत्यांमुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करणे हे आहे.

विविध राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांचा सध्याच्या धोरणांमध्ये समावेश आहे; मात्र, या विविध कार्यक्रमांमध्ये शेतकरी आत्महत्यांसाठी स्वतंत्र आणि स्पष्ट धोरणात्मक भूमिका निश्चित केलेली दिसत नाही. परिणामी, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न सध्याच्या राष्ट्रीय धोरणांमध्ये तुलनेने कमी प्राधान्याचा विषय ठरतो.

समुदाय-आधारित प्रारूपांची भूमिका

शेतकर्‍यांमधील आत्महत्येच्या समस्येच्या मुळाशी असलेल्या विविध संदर्भांचा गुंतागुंतीचा परस्परसंबंध समजून घेण्यासाठी तसेच आत्महत्या प्रतिबंधक धोरणे आणि उपाययोजनांच्या यश-अपयशाचे विश्लेषण करण्यासाठी समुदाय सहभागाचा दृष्टिकोन आणि सामाजिक- परिसंस्थात्मक प्रारूप ही सर्वाधिक व्यावहारिक आणि प्रभावी प्रारूपे ठरू शकतात. ही प्रारूपे केवळ व्यक्ती किंवा सरकारी धोरणांवर लक्ष केंद्रित न करता, शेतकर्‍याच्या भौतिक, सामाजिक आणि समुदायाच्या पर्यावरणाला केंद्रस्थानी आणतात. त्यामुळे आत्महत्या प्रतिबंधाचा दृष्टिकोन अधिक सर्वंकष होतो.

जगभरात अशा समुदाय-आधारित दृष्टिकोनांना अलीकडच्या काळात वाढती मान्यता मिळत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २०१८ मध्ये ‘अ कम्युनिटी एंगेजमेंट टूलकिट’ नावाचे मार्गदर्शक प्रकाशित केले. या मार्गदर्शकामध्ये समुदाय सहभाग हा तळागाळापासून वरच्या दिशेने होणारी प्रक्रिया असल्याचे अधोरेखित करण्यात आले असून, जगभरातील त्याच्या यशस्वी वापराची दखल घेण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटने (२०१८) नुसार,

 कॅनडाच्या मानसिक आरोग्य आयोगाने आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम समजून घेण्यासाठी समुदायाच्या सहभागावर आधारित दृष्टिकोन यशस्वीपणे स्वीकारला आहे. जपानने २०१७ मध्ये स्वीकारलेल्या आत्महत्या प्रतिबंधक धोरणामध्ये समुदाय सहभागाच्या प्रारूपावर भर देण्यात आला आहे.

भारतामध्ये शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी अशा स्वरूपाची धोरणात्मक अंमलबजावणी स्पष्टपणे आढळून येत नसली, तरी इतर क्षेत्रांमध्ये भारत सरकार आणि केरळ, ओडिशा आणि मध्य प्रदेश या राज्य सरकारांनी समुदाय सहभागावर आधारित काही नावीन्यपूर्ण प्रारूपे राबविली आहेत. त्याशिवाय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील ग्राम आरोग्य, स्वच्छता आणि पोषण समित्या; कुटुंबश्री मिशन; वनहक्क कायदा, २००६ अंतर्गत ग्राम वन समित्या इत्यादी. याशिवाय, भारतात आणि जगभरात समुदाय सहभागावर आधारित प्रारूपांच्या यशस्वीतेला मार्गदर्शन करणारे आणि आत्महत्या प्रतिबंधासाठी त्यांचा पाया मजबूत करणारे संशोधन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.

अशा प्रकारे, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न केवळ आर्थिक किंवा वैयक्तिक मानसिक आरोग्याच्या समस्येपुरता मर्यादित न ठेवता, त्याकडे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, मानसिक आणि समुदायाच्या संदर्भांचा परस्परसंबंध असलेल्या बहुआयामी सामाजिक समस्येच्या रूपात पाहणे आवश्यक आहे. समुदायाला आत्महत्या प्रतिबंधाच्या प्रक्रियेत सक्रिय भागीदार बनविल्यास स्थानिक समस्या, जोखीम घटक आणि उपलब्ध संसाधने अधिक प्रभावीपणे ओळखता येऊ शकतात आणि स्थानिक गरजांशी सुसंगत प्रतिबंधात्मक उपाययोजना विकसित करता येऊ शकतात.

संचालक, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर

bal.rakshase@tiss.ac.in