चित्रपटसृष्टीत २५ वर्षांहून अधिक काळ मोलाचे योगदान देणाऱ्या संगीतकार मदनमोहन यांची जन्मशताब्दी येत्या २५ जूनपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त…

डॉ. नीता पांढरीपांडे

Loksatta editorial Horrific Murder In Vasai Boyfriend Stabs Girlfriend To Death With Iron Spanner
अग्रलेख: लक्षणाची लक्तरे..
US Saudi Arabia Agreement on Dollars for Oil World economy
‘पेट्रो डॉलर्स’ बासनात; पुढे काय?
representation of women in the lok sabha after general elections 2024
अग्रलेख: राणीचे राज्य…
patna high court
अग्रलेख : ‘आबादी…’ आबाद?
loksatta editorial about indira gandhi declared emergency in 1975
अग्रलेख : असणे, नसणे आणि भासणे!
Loksatta editorial A unilateral ceasefire proposal by Russian President Vladimir Putin Ukraine
अग्रलेख: मतैक्याचे मृगजळ..
lal killa India alliance responsibility in parliamentary work after lok sabha election results 2024
लालकिल्ला : सुंभ जळाला तरी पीळ कसा जाईल?
massive crowd gathered for team india world cup victory parade
अग्रलेख: उन्माद आणि उसासा

चित्रपट संगीतरसिकांमध्ये गझलसम्राट नावाने ओळखल्या जाणाऱ्या मदनमोहन यांनी १९५० ते ७५ या अडीच दशकांत चित्रपटात गझलांना प्रस्थापित केले आहे. गझल गायनासाठी त्यांची पहिली पसंती लतादीदींना होती. दोघांनी मिळून चित्रपटसृष्टीला सुंदर गझला दिल्या आहेत. मदनमोहन यांनी चित्रपटातील प्रसंगाला अनुरूप चाल आणि त्या चालीला अनुरूप आवाज हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम केले. ‘अदालत’ चित्रपटात एकापेक्षा एक सुंदर गझल रचना करून त्यांनी इतिहास रचला. नर्गिस, प्रदीपकुमार यांच्यासारखे कसलेले अभिनेते, लतादीदींचा आवाज आणि मदनमोहन यांचे संगीत… प्रत्येक गझल त्या त्या प्रसंगाशी अक्षरश: एकजीव झालेली वाटते.

‘जाना था हमसे दूर’ शब्द उच्चारताना दूर गेलेल्या व्यक्तीचा निर्माण झालेला आभास अप्रतिम आहे. हे कसब मदनमोहन यांनी उत्कृष्ट सादर केले आहे. लतादीदींनी तितक्याच भावूकतेने ही गझल गायली आहे. त्यांच्या आवाजातून प्रतारणेचे दु:ख सुंदरपणे व्यक्त झाले आहे.

‘उनको ये शिकायत है की हम कुछ नही कहते’मध्ये दीदींच्या आवाजातून हृदयस्पर्शी भाव निर्माण होतात. ‘घर से चले थे हम तो खुशी की तलाश मे, गम राहो मे खडे थे वही साथ हो लिये’ म्हणताना दीदींच्या आवाजात दर्द आहे. दुसऱ्या कोणत्याही आवाजात या गझलांची कल्पनादेखील करता येत नाही. कोणत्याही गाण्याला संगीत देताना गाण्यातील त्या त्या रसाचा पूर्ण परिपोष साधलेला मदनमोहन यांच्या संगीतात आढळतो.

हेही वाचा >>>संविधान बदल आणि इतर खरीखोटी कथानके…

याच चित्रपटातील आणखी एक गझल ‘युं हसरतों के दाग’मधील ‘खुद दिल की दिल से बात हुई और रो लिये’ म्हणताना दीदींच्या आवाजातील वेदना माणूस अनुभवतो. प्रियकराच्या सुखासाठी, त्याच्या आनंदासाठी प्रेयसी काट्यावर झोपायला तयार आहे. या भावना व्यक्त करताना दीदींच्या गळ्यातून निघालेला प्रत्येक शब्द जवळचा वाटतो. जे काही मनातून उमलून येते ते हृदयाला स्पर्श करते.

यापूर्वी एकाच चित्रपटात अशा अनेक सुंदर गझल रचना कधीच आल्या नव्हत्या. एक वेगळेच वलय आणि प्रसिद्धी या चित्रपटाने संगीतकार मदनमोहन यांना मिळवून दिली. या गझलांमधून संगीतकाराच्या सर्जनक्षमतेने चकित व्हायला होतं. गझलेचं सौंदर्य अतिशय नजाकतीने खुलवून मदनमोहन यांनी आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

मदनमोहन यांच्यामध्ये शब्दांच्या आधारे आशयाचे विविध तरंग निर्माण करण्याची विलक्षण क्षमता होती. त्यांच्या रचनेत गाण्याच्या आशयाबरोबर संगीत रचना हातात हात घालून आपले अस्तित्व दाखवते, म्हणूनच दोघांचा फार सुरेख मेळ घालून गाणे रसिकांसमोर येते तेव्हा रसिक एकरूप होतो. मदनमोहन यांनी आपल्या संगीताद्वारे गझलचे पावित्र्य जपले आणि गझलला एक नवीन आयाम दिला. त्यांनी आपल्या प्रतिभेचे मनोज्ञ दर्शन घडवले.

मदनमोहन यांचे उर्दू भाषेवर प्रभुत्व होते, त्यामुळे त्यांनी दिलेल्या चालींवर उर्दू संगीताचा बाज होता. त्यांच्या चाली अत्यंत कठीण असत. शब्दार्थाच्या पलीकडील तरल संवेदनेच्या विश्वात नेणाऱ्या दीदींच्या अलौकिक सुरांसाठी मदनमोहन गझलांना कठीण चाली लावीत आणि त्यातील बारकावे समजून घेऊन लतादीदी पूर्ण ताकदीने गात. अशीच एक ‘वह कौन थी’ चित्रपटातील ‘जो हमने दास्तां अपनी सुनाई, आप क्यूँ रोये’ ही विरह व्यक्त करणारी ही गझल मनात कालवाकालव करून जाते. गाण्याचे सूर थेट काळजात शिरतात. आत्मिक संघर्ष हाच या गझलेचा प्राण आहे. गाण्यातील भावना रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे अचूक काम मदनमोहन करतात. चित्रपट कथेशी एकरूप होऊन गाण्याच्या प्रकृतीनुसार चपखल चाली बांधण्यात ते माहीर होते. प्रत्येक गायकाची योग्यता ओळखून त्यांनी त्यांच्याकडून उत्तमोत्तम गाणी गाऊन घेतली.

हेही वाचा >>>‘पेट्रो डॉलर्स’ बासनात; पुढे काय?

मदनमोहन यांच्या गाण्यात भारून टाकण्याची शक्ती होती. गाणे न समजणाऱ्या रसिकांवर देखील त्यांच्या गझलांनी मोहिनी घातली होती. १९६४ मध्ये ‘गझल’ चित्रपट आला. त्यात महफिलीतील ‘नगमा ओ शेर की सौगात किसे पेश करूं’ ही गझल अतिशय लोकप्रिय झाली. भीमपलासी रागातील स्वर, त्यातील शुद्ध कोमल स्वरांची पकड आणि विस्ताराची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. साहिल लुधियानवी, मदनमोहन आणि लतादीदी या तिघांनी साकारलेली ही गझल अत्यंत सुमधुर अशीच आहे. ही गझल अवर्णनीय अशा संगीतामध्ये बांधून मदनमोहन यांनी साहिरच्या शब्दांना पूर्ण न्याय दिलेला आहे.

गाण्यातील शब्दांना योग्य संगीतात देऊन ते गायिकेच्या गळ्यातून परिणामकारकपणे गाऊन घेण्याचे कसब संगीतकाराचे असते. ते काम मदनमोहन यांनी उत्कृष्टपणे निभावले होते. १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या जहाँआरा चित्रपटातील गझल ‘वो चूप रहे तो मेरे दिल के दाग जलते है’ मधील ‘जो होठ सी भी लिये, तो सितम ये किस पे किये/ खामोशियों से तो दिल और दिमाग जलते हैं।’ ही अतिशय भावुक, जीव ओतून म्हटलेली गझल हृदयात खोल रुतते. नैराश्य, एकटेपणा, प्रेमभंग या सगळ्याचा एकत्रित होणाऱ्या प्रभावी परिणामांना दीदींच्या आवाजामुळे गहिरेपण प्राप्त होते. गाण्यातील भाव व्यक्त करण्याची त्यांची क्षमता अलौकिक आहे.

मदनमोहन यांना सतार, व्हायोलिन, सरोद आणि सारंगी ही वाद्यो अधिक प्रिय होती. यमन, भैरवी, झंझोटी, दरबारी राग त्यांना अधिक आवडत. आपल्या संगीत रचनेत पाश्चात्त्य संगीताचा उपयोग करून त्यांनी आपले संगीत अधिक मधुर बनविले होते.

‘दस्तक’ चित्रपटातील ‘हम है मता- ए-कूचा- ओ बाजार की तरह’ मध्ये उस्ताद राईस खां साहेबांची सतार अतिशय लाजवाब आहे. मदनमोहन यांच्या गझलांमध्ये अनेकदा त्यांची सुंदर सतार ऐकायला मिळते. या सतारीच्या आर्तस्वराने गझलेला चार चाँद लावले आहेत. मजरूह सुलतानपुरींनी या गझलेत स्त्री जीवनाला व्यापक आयाम दिला आहे. या गझलेतील शब्द उच्चारांच्या आणि स्वरांच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक असून दीदींनी ते मोठ्या ताकतीने पेलले आहेत. त्यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्यामुळेच मदनमोहन यांनी अतिशय अवघड अशी चाल गझलेला दिली आहे. दु:खात बुडलेला प्रत्येक शब्द आणि नायिकेच्या भरभरून वाहणाऱ्या जखमा, आठवणी, ते दु:ख, तिची पीडा आवाजातून व्यक्त करीत दीदींनी ही गझल अजरामर केली आहे. दीदी म्हणतात- ‘अनेक संगीतकारांनी मला गाणी दिली पण मदनभैयाने मला संगीत दिले’. या एका वाक्यानेच मदनमोहन यांची महानता स्पष्ट होते. ‘दिल की राहें’ चित्रपटातील ‘रस्म- ए- उल्फत को निभाये तो निभाये कैसे’ ही वेदनेची गझल लतादीदींनी गायलेल्या सर्वोत्कृष्ट गझलांपैकी एक आहे. यात उस्ताद राईस अली खान साहेबांनी वाजवलेले सतारीचे सुंदर तुकडे आहेत.

चित्रपटातील नायिका, चित्रपटाच्या विषयातील वैविध्य, त्यातील अनेकरंगी भाव, पण संगीतकार आणि गायिकेचा स्वर मात्र तोच. मदनमोहन आणि लतादीदींच्या संगीत आणि स्वरातून सौंदर्य, नाद, धुंदी, चैतन्य, दु:ख, उदासी प्रकट होते. संगीताच्या या अफलातून मिलाफातून या दोघांनी चंदेरी विश्व निर्माण केले आणि वर्षानुवर्षं रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.