सरकारच्या कारभारावर टीका करणे हे कोणत्याही लोकशाही समाजात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण लोकशाही व्यवस्थेत सत्तेचा अंतिम स्रोत जनता असते आणि सरकार हे त्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम करत असते. त्यामुळे सरकारने केलेल्या दाव्यांची आणि प्रत्यक्षात घडणाऱ्या घटनांची तुलना करून त्याचे विश्लेषण करणे ही केवळ राजकीय टीका नसून लोकशाहीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेली बौद्धिक प्रक्रिया असते. अलीकडच्या काळात इंधन टंचाईच्या संदर्भात सरकारचे दावे आणि जनतेच्या अनुभवांमध्ये निर्माण झालेली तफावत ही अशाच प्रकारच्या विश्लेषणाची मागणी करते.

सरकार एकीकडे देशात इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे अनेक शहरांमध्ये गॅस सिलेंडरच्या वितरणामध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे दिसत आहे, उद्योगधंदे अडचणीत येत आहेत, खानावळी बंद पडत आहेत आणि सामान्य नागरिकांना रोजच्या जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या दोन गोष्टींमधील विसंगती ही केवळ प्रशासकीय अकार्यक्षमता दर्शवणारी नाही, तर ती माहितीच्या व्यवस्थापनातील आणि जनतेशी संवाद साधण्यातील गंभीर समस्येकडेही निर्देश करते.

पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी, सातारा अशा महाराष्ट्रातील औद्योगिक आणि व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांमध्ये गॅस सिलेंडरच्या वितरणातील अडचणींमुळे आंदोलन करण्याची वेळ आली आहे, ही बाब गंभीर नाही काय? उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्रे ही आधुनिक अर्थव्यवस्थेची कणा असतात. लहान खानावळी, चहाचे हातगाडे, मेस, भोजनालये आणि इतर छोटे व्यवसाय हे केवळ व्यापारी उपक्रम नसून हजारो लोकांच्या उपजीविकेचे साधन असतात. तसेच हजारो जीवांची क्षुधाशांती करणारी केंद्रे असतात. इंधनाच्या अभावामुळे अशा व्यवसायांना बंद करण्याची वेळ येते, तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्थेवर होतो. शहरातील खानावळी बंद पडल्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा गावाकडे परत जावे लागत आहे, ही घटना केवळ आर्थिक अडचणीचे लक्षण नाही तर ती सामाजिक परिणामांची साखळी दाखवते. शिक्षण, रोजगार, आणि स्थलांतर यासारख्या अनेक क्षेत्रांवर अशा टंचाईचा अप्रत्यक्ष परिणाम होतो.

या परिस्थितीतील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे सरकारकडून केले जाणारे दावे आणि प्रत्यक्षात दिसणारे वास्तव यांच्यातील तफावत. खरोखरच देशात इंधनाचा पुरेसा साठा असेल, तर स्थानिक स्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणात वितरणातील अडथळे का निर्माण होत आहेत? काही वेळा प्रशासन असे म्हणते की समस्या पुरवठ्याची नसून वितरण व्यवस्थेतील आहे. इतकी अकार्यक्षम वितरण व्यवस्था दोन-चार दिवसात निर्माण होत नाही ना की त्यामुळे अचानक उद्योगधंदे बंद पडावेत? मग इतके दिवस सरकार काय झोपले होते? याचा अर्थ त्यांनी या अकार्यक्षम वितरण व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले असे होत नाही काय? खरे तर इंधनाच्या आयातीवर परिणाम झाल्यामुळे इंधन टंचाई निर्माण झाली आणि त्यामुळे नागरिकांना मूलभूत गरजांसाठी रांगा लावाव्या लागत आहेत, हे गंभीर प्रशासकीय अपयशच ठरत नाही काय? कारण नागरिकांना प्रत्यक्षात कोणती समस्या आहे यापेक्षा त्यांना त्याचा सामना कसा करावा लागत आहे हे सरकारने समजून घेणे अधिक महत्त्वाचे असते.

ग्रामीण भागातील शाळांमध्ये गरीब मुलांना दिला जाणारा पोषण आहार हा अनेक कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम असतो. कारण त्यामुळे शाळा गळतीला आळा बसतो. अनेक मुलांसाठी शाळेत मिळणारा हा आहार दिवसातील सर्वात पौष्टिक अन्न असते. गॅस टंचाईमुळे हा कार्यक्रम अडचणीत येत असेल, तर त्याचा परिणाम थेट मुलांच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर होतो. अशा परिस्थितीत सरकारने त्वरित उपाययोजना करणे अपेक्षित असते. परंतु सरकारच समस्या नाकारण्याच्या भूमिकेत राहते, तेव्हा समस्या सोडवण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची बनते.

कोल्हापुरात पाईपलाईनद्वारे पुरवला जाणारा नैसर्गिक वायू बंद करण्यात आल्याची घटना देखील असे अनेक प्रश्न उपस्थित करते. शहरांमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यामागे मुख्य उद्देश असा असतो की, नागरिकांना आणि उद्योगांना सतत आणि स्थिर इंधन पुरवठा मिळावा. अशा प्रकारचा पुरवठा अचानक बंद केला जात असेल, तर त्यामागील कारणे स्पष्टपणे सांगितली जाणे आवश्यक असते. अन्यथा अफवा, असंतोष आणि अविश्वास निर्माण होणे अपरिहार्य ठरते. लोकशाही व्यवस्थेत पारदर्शकता ही केवळ नैतिक मूल्य नसून ती प्रशासनाच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असलेली अट आहे. या सर्व परिस्थितीमध्ये माहितीचे राजकारणही तितकेच महत्त्वाचे ठरते. आधुनिक राजकारणात सरकार अनेकदा जनमत व्यवस्थापनासाठी माहितीचे निवडक सादरीकरण करते. म्हणजेच स्वतःच्या सोयीच्या असलेल्या काही आकडेवारी किंवा घटनांना अधिक महत्त्व दिले जाते, तर काही गोष्टी दुर्लक्षित केल्या जातात. परंतु नागरिकांना त्यांच्या रोजच्या जीवनात प्रत्यक्ष अडचणींचा सामना करावा लागतो, तेव्हा अधिकृत दावे आणि वास्तव यांच्यातील अंतर स्पष्टपणे जाणवू लागते. अशा वेळी सरकारवरचा विश्वास कमी होऊ लागतो.

या इंधन टंचाईवर मात करण्यासाठी भारतीय ध्वज असलेल्या जहाजाला होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याची परवानगी मिळाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला असल्याचे सांगितले जाते, परंतु त्याला इराणकडून पुष्टी मिळत नसल्याचेही म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण अत्यंत संवेदनशील असते. सरकारने केलेल्या दाव्यांना संबंधित देशांकडून पुष्टी मिळत नसेल, तर त्याचा परिणाम केवळ देशांतर्गत राजकारणावरच होत नाही तर आंतरराष्ट्रीय विश्वासार्हतेवरही होऊ शकतो. परराष्ट्र धोरणात विश्वासार्हता ही अत्यंत महत्त्वाची असते, कारण तीच पुढील वाटाघाटी आणि सहकार्याची पायाभूत अट असते. लोकशाही व्यवस्थेत सरकारचे सर्वात मोठे भांडवल म्हणजे जनतेचा विश्वास. हा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सरकारने पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व या तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असते. जर सरकार सतत परिस्थितीपेक्षा वेगळे चित्र सादर करत असेल, तर काही काळासाठी ते राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, परंतु दीर्घकालीन दृष्टीने ते धोकादायक ठरते. कारण एकदा नागरिकांना असे वाटू लागले की सरकार त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे किंवा त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद साधत नाही, तर असंतोष वाढू लागतो.

इतिहासात असे अनेक प्रसंग आढळतात की, आर्थिक किंवा सामाजिक अडचणींमुळे निर्माण झालेला असंतोष राजकीय आंदोलनांमध्ये रूपांतरित झाला आहे. इंधन टंचाई, अन्नधान्याची कमतरता, बेरोजगारी, आणि महागाई यासारख्या प्रश्नांमुळे अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनआंदोलने झाली आहेत. त्यामुळे सरकारने अशा संकेतांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. लोकशाही व्यवस्थेत असंतोष हा अनिवार्यपणे वाईट असतोच असे नाही; उलट तो सरकारला आपल्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची संधी देतो. परंतु जर या असंतोषाकडे दुर्लक्ष केले गेले, तर तो अधिक तीव्र स्वरूप धारण करू शकतो. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत सर्वात महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे वास्तववादी आणि पारदर्शक संवादाची. काही कारणांमुळे तात्पुरती टंचाई निर्माण झाली आहे आणि ती दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, हे सरकारने स्पष्टपणे सांगितले तर नागरिक अधिक सहानुभूतीने परिस्थितीकडे पाहू शकतात. परंतु समस्या नाकारण्याची किंवा वेगळे चित्र सादर करण्याची प्रवृत्ती दीर्घकालीन दृष्टीने विश्वासघातासारखी वाटू शकते.

शेवटी, कोणत्याही सरकारची खरी कसोटी ही संकटकाळात होते. विकासाचे मोठे दावे करणे सोपे असते, परंतु सामान्य नागरिकांना रोजच्या जीवनातील मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो, तेव्हा सरकारच्या प्रशासनिक क्षमतेचे आणि नैतिक प्रामाणिकतेचे खरे मूल्यांकन होते. इंधन टंचाईच्या या प्रश्नाने केवळ पुरवठा व्यवस्थेतील समस्या उघड केल्या नाहीत, तर सरकार आणि नागरिक यांच्यातील विश्वासाच्या नात्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सरकारने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले नाही आणि जनतेच्या अनुभवांना मान्यता दिली नाही, तर वाढता असंतोष भविष्यात मोठ्या राजकीय परिणामांना कारणीभूत ठरू शकतो. लोकशाहीमध्ये सत्ता ही कायमस्वरूपी नसते; ती जनतेच्या विश्वासावर उभी असते. आणि तो विश्वास एकदा ढासळला की कोणतेही सरकार कितीही मजबूत वाटत असले तरी टिकून राहणे कठीण होते.

(लेखक समाजचिंतक आणि विज्ञान प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail.com