‘इट टेक्स अ व्हिलेज टु रेझ अ चाइल्ड’ अर्थात, ‘बालकाच्या संगोपनात साऱ्या गावकुसाचा हातभार लागतो’. काय वाटले हे वाचून ? सत्तरी उलटलेल्या बहुतेकांना छान वाटले असणार ! पण त्याहून कमी वयाच्या व्यक्तींची प्रतिक्रिया मात्र वेगळी असू शकते.
आज संयुक्त कुटुंबपध्दतीचे अस्तित्व संपल्यागत परिस्थिती आहे. यामुळे आजी आजोबा तर नाहीच, पण काका काकू, लहान मोठे बहिण-भाऊ, शेजारचे काका काकू, वाड्यातले/ गल्लीतले लहान मोठे, सवंगडी, आदी सर्वजणांचा बालकाच्या संगोपनातला ‘अधिकार’ कधीचाच हिरावून घेतला गेला आहे. फ्लॅट संस्कृतीत राहणाऱ्या विभक्त कुटुंबांनी मुलांवर ‘बाहेरच्या’ कोणाही व्यक्तीची सावलीही पडू नये यासाठी घराची दारे बंद केली आहेत.
मुलांच्या संगोपनात घरातील लहान थोरांचाच सहभाग नाही, तिथे स्नेहीजनांचे काय ? थोरल्या बहिणभावंडानी धाकट्यांच्या अभ्यासात लक्ष घालावे किंवा शेजारच्या काका काकूंनी मुलांच्या गणिताची नौका ताळ्यावर आणावी हे सारे आता काळाच्या पडद्याआड गेले आहे. शाळेतील मार्गदर्शन अपुरे पडते म्हणून सुरू झालेली खासगी ‘शिकवणी’ प्रथा केव्हा हायफाय कोचिंग क्लासमध्ये रूपांतरित झाली हे कळलेच नाही. तंत्रज्ञानाच्या घोडदौडीमुळे हेही आता झपाट्याने बदलते आहे. करोनाच्या विळख्यात सापडलेल्या जगाने ॲानलाईन शिक्षणाची नवी वाट चोखाळलीच नाही तर स्वीकारलीही आहे. थोडक्यात, एका बाजूला एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास व आत्मकेंद्रित दृष्टिकोन व दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानाने उभे केलेले आव्हान या पार्श्वभूमीवर उद्याचे शिक्षण कसे असेल ? शाळा व महाविद्यालये असतील की नसतील ? असतील तर त्यांचे स्वरूप काय असेल ? असे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न समजून घेतानाच त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया.
जीवनाच्या सर्वच क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून येत आहेत. कोअर बॅंकिंग, एटीएम कार्ड, ॲानलाईन ट्रान्सफर , क्युआर कोड अशा अनेकानेक गोष्टींमुळे अर्थ व्यवहाराचे रूप बदलून गेले आहे. दूरसंचार क्षेत्रातील बदलांमुळे परगावी असणाऱ्याशी संपर्क साधण्यासाठी करावा लागणारा ट्रंककॅाल कधीचाच इतिहासजमा झाला आहे. बहुतांश प्रत्येक व्यक्ती आता मोबाईलधारी झाली आहे. ‘पुरी दुनिया मुठ्ठीमे’ आल्यामुळे केवळ संपर्क सोपा झाला आहे असे नाही, तर या जादूच्या दिव्यामुळे टेलीव्हिजनचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. सिंगल स्क्रीन सिनेमागृहे बंद पडल्यामुळे फर्स्ट डे फर्स्ट शो चे आकर्षण केव्हाच संपले आहे. ॲानलाईन शॅापिंगच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपारिक दुकाने व मॅालस् यांचे उद्या काय होणार असा प्रश्न उभा राहिला आहे. कौटुंबिक पातळीवरही असेच बदल घडत आहेत. संयुक्त कुटुंबे विस्थापित होऊन विभक्त कुटुंबे कधीचीच उभी राहिली आहेत. कॅान्ट्रॅक्ट मॅरेज, लिव्ह-इन रिलेशनशीप अशा विविध संकल्पनांमुळे नात्यागोत्याच्या कल्पनाच वेगाने बदलत आहेत. जेन-झी पुढची आव्हाने कोणती असणार आहेत याचा अंदाज घेणेही अवघड झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्राचे काय होईल ? शाळा व महाविद्यालयांचे स्वरूप आजच्यासारखे राहणार नाही, असे दिसते आहे. आजच राज्यातील अनेक शाळा व महाविद्यालयांपुढे अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे. राज्यातील शाळा सर्वसाधारणपणे तीन प्रकारच्या आहेत : शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित. यातील पहिल्या दोन प्रकारच्या शाळांपुढे मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत आहे. इंग्रजी माध्यमाचे आकर्षण हे एक प्रमुख कारण. सीबीएसई, आयसीएसई इत्यादी राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमाचे आकर्षण हेही महत्त्वाचे कारण. याचबरोबर असे अभ्यासक्रम अंमलात आणणाऱ्या शाळांमधील साधनसुविधा याचेही आकर्षण आहे. भव्य इमारती, विस्तीर्ण मैदाने, सुसज्ज प्रयोगशाळा, चांगली स्वच्छतागृहे, विद्यार्थी व शिक्षक यांचे यथायोग्य गुणोत्तर, इत्यादी गोष्टींनाही आता महत्त्व आले आहे.
असे असूनही शासकीय व अनुदानित शाळांसारखीच दारुण अवस्था विनाअनुदानित शाळांचीही येत्या काही वर्षात होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. एका बाजूला होमस्कूलिंग तर दुसऱ्या बाजूला अकॅडमी किंवा असेच काही नाव असलेल्या खासगी क्षेत्रातील संस्था फोफावत आहेत. कोचिंग क्लासचे हे नवे रूप ! इथे भरपूर मोठी रक्कम शुल्क भरून नोंदणी केल्यावर पुढचे सारे घरी बसूनच ॲानलाईन करायचे आहे. शाळा नाही, कोचिंग क्लास नाही, शाळासोबती नाहीत, शैक्षणिक सहली नाहीत, शैक्षणिक उपक्रम नाहीत; थोडक्यात, शाळा या संकल्पनेशी जोडलेले काहीच नाही, असे उद्याच्या शाळेचे स्वरूप असेल का ? पण या सगळ्या नकारघंटांचा आवाज बंद करून पुढील शिक्षणाची दारे सहजपणे उघडून देणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षांमधील यशाचे काय करायचे याचेही उत्तर शोधावे लागेल. शाळेशी जोडलेल्या अनेकानेक गोष्टींना हे उद्याचे विद्यार्थी मुकतील हे खरे असले तरी शालेय अभ्यासक्रमातील गणित, विज्ञान, भाषा, समाजशास्त्र (याच क्रमाने) या विषयांवरील प्रभुत्व त्यांचा उच्च शिक्षणाचा प्रवेश निश्चित करतील, या समजुतीचे काय करायचे हेही ठरवावे लागेल.
महाविद्यालयीन स्तरावर आजच गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत. विद्यार्थी संख्या रोडावते आहे. विद्यापीठांची वसतीगृहे रिकामी होत आहेत, महाविद्यालयांची वसतीगृहे कधीचीच नामशेष झाली आहेत. एके काळी महाविद्यालयांना विद्यापीठाची कायम स्वरूपी मान्यता मिळविण्यासाठी विद्यार्थी वसतीगृहे अनिवार्य असत हे आज कोणाला खरेही वाटणार नाही. पटावर विद्यार्थी नाहीत, वर्गात विद्यार्थी नाहीत, महाविद्यालय परिसरातही विद्यार्थी नाहीत, विद्यार्थी फक्त परीक्षा द्यायला येत आहेत, ही आजची परिस्थिती आहे. महाविद्यालयात आवश्यक तेवढे शिक्षक नियुक्त करण्यात आलेले नाहीत, यामुळेही विद्यार्थी महाविद्यालयात फिरकत नाहीत. किती काळ हे असे चालणार ? नवीन शिक्षण धोरणात कॅालेज क्लस्टर ची कल्पना मांडण्यात आली आहे. यानुसार चार पाच लहान महाविद्यालये एका छत्राखाली आणण्यात येणार आहेत. उच्च शिक्षणार्थींच्या हितासाठी हे होणार आहे, असे सांगितले जात असले तरी यामागे आर्थिक कारणे आहेत, तशीच इतरही अनेक कारणे आहेत.
एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान सहा टक्के शिक्षणावर खर्च व्हावेत अशी शिफारस सर्व शिक्षण आयोगांनी करूनही आजपर्यंत फार तर चार टक्केच देण्यात आले आहेत. अलीकडे तर हा आकडा जेमतेम अडीच टक्क्यांवर स्थिरावला आहे. शिक्षणाच्या वाढत्या खासगीकरणामुळे या पुढील काळात ही तरतूद अजून कमी होईल असे दिसते आहे. सर्वसामान्य परिस्थितीतील विद्यार्थ्यांना महागडे उच्च शिक्षण परवडणार नाही व ते या प्रक्रियेतून बाहेर पडतील असे दिसते आहे. यात सर्वात जास्त नुकसान विद्यार्थिनींचे होणार आहे. अजूनही आपल्याकडे मुलगा व मुलगी हा भेद केला जातो हे सत्य आहे. कॅालेज क्लस्टरमुळे घरापासून महाविद्यालय दूर गेले तर याचा पहिला फटका मुलींना बसेल व उच्च शिक्षण महाग झाले तर दुसरा फटकाही मुलींनाच बसेल. उच्च शिक्षण प्रक्रियेतून मुली मोठ्या प्रमाणात बाहेर पडतील.
राज्यातील उच्च शिक्षण प्रक्रियेला आता एका वेगळ्याच मार्गाने नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते आहे. उच्च शिक्षणाचा पारंपारिक मार्ग सोडून राज्यातील मुक्त विद्यापीठाकडे विद्यार्थी मोठ्या संख्येने वळत आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थी कमी होण्यामागचे हे एक कारण असू शकते. घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थी लहान मोठी नोकरी करत उच्च शिक्षण घेत असतील व त्यासाठी मुक्त विद्यापीठाची निवड करत असतील तर ते समजण्यासारखे आहे. पण आर्थिक निकड नाही व कुठेही कामधंदा नाही, अशाही विद्यार्थ्यांनी या मार्गाने जाणे अनाकलनीय आहे.
मानव्यविद्या व वाणिज्य शाखेतील बहुतांश अभ्यासक्रम महाविद्यालयात न जाताच पूर्ण करणे शक्य आहे असे समजले जाते. बहिस्थ (एक्स्टर्नल) विद्यार्थी म्हणून नोंदणी करून थेट परीक्षा देण्याची तरतूद आज बहुतांश विद्यापीठांच्या नियमावलीत आहे. राज्यातील सगळ्यात जुन्या व प्रतिष्ठित मुंबई विद्यापीठात अगदी अलीकडेपर्यंत बहिस्थ विद्यार्थी ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती, हे कोणाला खरेही वाटणार नाही. शिक्षण घ्यायचे असेल तर शाळा व महाविद्यालय गाठलेच पाहिजे ही कल्पना यामागे होती. आता हे सारे बदलणार असे दिसते आहे. ज्या अभ्यासक्रमांना प्रात्यक्षिके आवश्यक अशा अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, हत्यादींचे काय होईल, हा प्रश्नच आहे. आभासी जगातील आभासी प्रयोगशाळातून आभासी प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार असतील तर शिक्षणाच्या प्राथमिक उद्दिष्टांचे काय होईल ?
कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) क्षेत्रातील अलीकडच्या घोडदौडीमुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येणार आहेत. चॅटजीपीटी, परप्लेक्सिटी व इतर सर्व काही आजच्या युवा पिढीच्या अंगवळणी पडते आहे. उद्या यात आणखी कशाची भर पडेल हे सांगणे कठीण आहे. परीक्षा दालनात लॅाग टेबल किंवा साधा कॅलक्युलेटर नेण्यास प्रतिबंध असणारा काळ ज्यांनी पाहिला आहे, त्यांना हे सारेच अविश्वसनीय व अकल्पित वाटणे साहजिक आहे. परीक्षार्थींकडे आता मोबाईल आहे, हातावरील घड्याळात कॅलक्युलेटर आहेच पण चॅटजीपीटीही सहज उपलब्ध आहे. तशात ‘ओपन बुक’ परीक्षापद्धती येऊ घातली आहे. यामुळे मूल्यमापनाची सारी तंत्रे मुळातून बदलावी लागणार आहेत. आल्विन टॅाफलरने त्याच्या फ्यूचर शॉक (१९७०) या ग्रंथात भविष्यातील शिक्षणावर व्यक्त केलेले अंदाज बहुतांशी खरे ठरत आहेत : ‘The illiterate of the 21st century will not be those who cannot read and write, but those who cannot learn, unlearn and relearn…Adaptability is the new literacy…In a fast changing world the ability to evolve, discard outdated knowledge , and embrace the new is crucial.’ (संक्षिप्त अनुवाद : एकविसाव्या शतकात केवळ निरक्षर लोकच अडाणी ठरतील असे नव्हे, तर सातत्याने शिकता येत नाही, ज्यांना शिकलेल्यातले काय/कधी/ कशासाठी विसरून जायचे वा बाजूला ठेवायचे हे कळत नाही आणि पुन्हा नव्याने शिकण्याची ज्यांची इच्छा नसते ते अडाणी ठरतील. अनुकूलन हीच त्या जगातली नवी साक्षरता असेल!) विद्यार्थ्याची भूमिका जर एवढी आमूलाग्र बदलणार असेल तर शिक्षकालाही बदलावे लागेल, परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल.
उद्याचे शिक्षण आजच्यासारखे किंवा कालच्यासारखे राहणार नाही हे तर नक्कीच, पण ते अधिकाधिक तंत्रज्ञाननिष्ट होतानाच त्याचा मानवी चेहरा टिकवून ठेवेल अशी आशा व्यक्त करायला काय हरकत आहे ? ‘चितळे’ मास्तरांनी टाय घालून वर्गात येण्याची गरज नाही, पण टॅब घेऊन यायला काय हरकत आहे ? आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून , घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगातून काही न काही शिकण्याची वृत्ती चिरायू राहील असेच उद्याचे शिक्षण असेल अशी आशा धरायला काय हरकत आहे ?
harsh.kadepurkar@gmail.com
