ॲड. राजा देसाई
मानव जात आणि महात्मे यांचं नातं मोठं विचित्र असावं. एका फ्रेंच विचारवंतांचं मानलं जाणारं सुंदर वचन आहे : ‘जिवंत संतांचा छळ केला जातो तर मृत संतांची पूजा!’ गांधींचं भाग्य एक प्रकारे थोर; त्यांना जिवंतपणीच महात्मेपण लाभलं तर मृत्यूनं त्यांचं संतत्व अधिकच प्रेरणादायी बनवलं! अशी जीवनं कालजयी असतात : (‘फाळणी’-) पराभवासारख्या कालिक संकल्पनांना तिथे स्थान नाही. गांधींच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी जगातील पीडितांच्या नेत्यांनी अहिंसात्मक लढ्यासाठी गांधींकडूनच प्रेरणा घेतल्याचं स्वत:च सांगून ठेवलं आहे. भारताच्या हृदयातून ते अधिकाधिक ओठांपुरतेच उरत असताना जगाला (संयुक्त राष्ट्रे) मात्र त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याचं मोल वाटलं.
थोरामोठ्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या विचार-वचनांच्या जंत्रीची जरुरी नसते; त्यांच्या एखाद्या वचनाच्या आरशात स्वत:ला व समाजस्थितीला तपासण्याचा तटस्थ, प्रामाणिक प्रयत्न किती होतो हे महत्त्वाचं. निसर्गातील बदल, विज्ञान/तंत्रज्ञान यांचा विकास व त्यातून येणारी नवनवीन सेवा/साधनं यांच्याबरोबरच माणसाची विचार करण्याची कमीजास्त शक्ती याचाही त्यात अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. त्या बदलांतून व्यक्ती तसंच समूहांसमोर अंतहीनपणं नवनव्या समस्या व संघर्ष निर्माण होत असतात.
माणूस/समूह त्रस्तच नव्हे तर असाहाय्यही होतात व त्यांची उत्तरं शोधतात. माणूस आज त्या अवस्थेकडे चालला आहे. कालप्रवाहापेक्षा वेगळा वा अगदी अत्यंत विरुद्ध वाटणाराही विचार मांडणाऱ्या व त्या प्रवाहांविरुद्ध पोहणाऱ्या तुरळक व्यक्ती मानवी जीवनाला वेगळी, उच्च स्तराची दिशा/आकार देतात ज्याला आपण संस्कृती म्हणतो. गांधी हे यातलं एक थोर कृतिशील नाव. ‘वसुधैव कुटुंबकम्’चा प्रवास न सोडताही भारतीय राष्ट्रवादाचा आधार तपासणं आज गरजेचं झालं आहे व त्यासाठी गांधी-स्मृतिदिनाइतका योग्य दिवस कोणता असणार?
पण बदलत्या काळाला गांधी लागू (रिलिव्हंट) आहेत का हा प्रश्न उरतोच. काळ आज वाऱ्याच्या वेगानं व सर्वच दृष्टींनी उलट दिशेनं बदलतोय, भारतातच नव्हे जगभरच. आणि हे अर्थकारणापुरताच नव्हे तर वंश, धर्म, राष्ट्र इत्यादींच्या अस्मितांसंदर्भातही. असं काही होणारच नाही कारण ‘मानवी समाजाचा प्रवास हा सतत अधिकाधिक उदार होण्याच्या एकाच दिशेनं होत राहील’, असं विसाव्या शतकातील आदर्शवादाला वाटलेलं दिसतं तो स्वप्नाळूपणा होता की त्यात जीवन-समजाच्या समग्रतेचा अभाव होता? इतिहासात काय दिसतं? रामायण/महाभारतातील युद्धांच्याही फार पूर्वीपासूनच ते विसाव्या शतकातील दोन्ही महायुद्धांपर्यंत माणसाला युद्धाकडे ओढणाऱ्या वृत्ती वा विविध अस्मिता जशाच्या तशा आहेत की नाही? आजही जगात अनेक रक्तरंजित संघर्ष सुरू आहेत वा भविष्यासाठी त्याची नवनवीन बीजं पेरली जात आहेत. आणि तरीही जीवनांत आदर्श डोळ्यासमोर असण्यातच माणूसपण आहे. युगायुगांतील एखादंच कलिंग युद्ध एखाद्याच अशोकाला जन्माला घालतं हे खरं पण त्यासाठीही तत्पूर्वी बुद्ध होऊन जावे लागतात : ती गांधींची भूमिका आजच्या काळातही कोण हिरावून घेणार?
असो. प्रत्येक वस्तू-सेवांचा माणूस जेवढा जास्तीत जास्त उपभोग घेईल तेवढी कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही अधिक प्रगत होईल हा विचार आता जगभर प्रतिष्ठित झाला आहे. (ही टीका नव्हे; हे अटळ वास्तव!) अर्थांगापुरता का होईना पण विसाव्या शतकावर प्रभाव टाकणारा ‘समता’ हा केवळ शब्दही आता कोशात उरला तरी नशीब! असं का होतं याचंही उत्तर गांधींनी दिलं आहे : ‘एकाही व्यक्तीच्या अमर्याद वासनेला पृथ्वीही अपुरी पडेल’!
जीवनाचं दुसरं महत्त्वाचं अंग म्हणजे धर्म, वंश, भाषा, राष्ट्र इत्यादींमधील अस्मिता-संघर्षांचं. आज त्या आगीत तेल ओतण्याचं काम आता अगदी चोख कोणी करीत असेल तर तो नव्या युगातील सातवा रिपु : ‘व्होट’-रिपु ! भारतात धार्मिक दुरावाच नव्हे तर अख्खं राजकीय/सामाजिक पर्यावरणच वैर/द्वेषभावानं उतू जात आहे. राष्ट्रीय ऐक्यावरही त्याचा ताण येत आहे. ‘भारत आपला सृष्ट्यैकाचा धर्म सोडील तर त्याला कोणीही वाचवू शकणार नाही’, हा आहे स्वामी विवेकानंदांचा इशारा. उलट आज इथं धर्म अधिक सत्ताकारणाच्या साठमारीत लोकशाहीचा आत्मा असलेला संवादही पूर्णत: गायब झाला आहे. उलट जळी स्थळी काष्ठी पाषाणी सत्ताचक्षूंना ईश्वराऐवजी ‘राष्ट्रद्रोह’ दिसत आहे.
यातून राष्ट्र बाहेर येण्याचा मार्ग काय? ‘चांगलं’ सत्ताकारण? अनुभवांती त्याच्या मर्यादांचं दर्शन पुरेसं घडलं आहे. स्वातंत्र्योत्तर काही दशकं ते ‘चांगलं सत्ताकारण’ आपण अनुभवलंही मग आज इतकी वाईट परिस्थिती का आली? स्वातंत्र्य लढ्याचा काळ हा त्यागाचा होता; आताचं सत्ताकारण हे मूलत: भोगाचं झालं आहे. त्यातूनही काही लोककल्याण होतं पण ते सत्ता टिकवण्याच्या वा मिळवण्याच्या मार्गात अडचण येणार नाही वा मदतरूप होईल एवढंच! सत्तेद्वारे अगदी धर्म-अस्मितातृप्ती हाही भोगच.
मग कोणत्याही भोग-स्पर्धेत ‘यशासाठी काहीही’ हाच हळूहळू ईश्वर बनत जातो. तेच आज धर्माधिष्ठित सत्ताकारणातही होत आहे. याच अस्मितेपोटी सत्ता-संरक्षणाधारे अनेक वाईट व अन्यायपूर्ण घटना घडत आहेत. रोज नवनवे मंदिर-मस्जिद वाद निर्माण होत आहेत. या साऱ्याविषयी वा एकंदरीतच हिंदू धार्मिकतेसंबंधी आता दिसणारा राजकारणी/समाजकारणींतील ‘निधर्मी सन्नाटा’ त्यांच्या कालपरवापर्यंतच्या ‘प्स्यूडो’ दृष्टीची वा अपराधबोधाची पावती असेल पण ही सर्व परिस्थिती ना राष्ट्रैक्याच्या हिताची ना हिंदू-धर्माच्या. आणि (मौनापेक्षाही विचार-अहंकारावरही मात करणारी) ‘चुकीची कबुली आत्मविकासाला मदत करते’ गांधी. पण इथे आत्मविकास कोणाला हवाय : धर्मींनाच नकोय तिथे निधर्मींची काय कथा?
उलट ‘सोमनाथ’निमित्तानं इथं नुकतीच (धर्म) विजिगिषुत्वाची घोषणा सत्ता-धर्माच्या सर्वोच्च पीठावरून झाली. कोणत्याही धर्माचं विजिगिषुत्व त्याच्या प्राणात असतं. निसर्गात अनुस्यूत असलेला ‘स्वत्व-रक्षण’ भाव व त्यातून अस्मिता-संघर्ष या वास्तवावर गीता आदर्शवादी पांघरूण न घालता मार्ग दाखवते : ‘भूतमात्रात जो पाहे भाव एक सनातन!’ हाच मोक्ष! ‘माझ्या जीवनापेक्षा माझं हिंदू धर्मावर अधिक प्रेम आहे’ म्हणणाऱ्या गांधींसाठीही हिंदू धर्म-प्राण कोणता? ‘इतर धर्मांनी मनुष्यमात्राचं बंधुत्व सांगितलं; हिंदू-धर्मानं प्राणिमात्राचं’! कारण? ‘ईशावास्यमिदं सर्वं’ (चराचरात ईश्वर) या ईश उपनिषदांतील एका श्लोकात हिंदू धर्माचा सर्व अर्थ आला; बाकी सारं वाङ्मय त्यावरची टिप्पणी! हे कोणाला केवळ भावनात्मक वाटत असेल तर पाहा ‘सर्व धर्म सत्य आहेत’ म्हणणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे शब्द: ‘धर्म जर विज्ञानाला सामोरा जायला तयार नसेल, तर त्याचं मरण जेवढ्या लौकर ओढवेल तेवढ्या लौकर मानव जातीचं कल्याण होईल!’
‘कारणाशिवाय परिणाम नाही’ हे तर विज्ञान. जशी कोणत्याही परिस्थितीला कारणं असतात तशीच ती मधून मधून सर्व प्रकारच्या समूह अस्मिता उफाळून येण्यालाही. असं प्रतिक्रियेचं नवं युगही आपला काळ घेतच असतं. परिस्थितीतील (खरा/भासित) इतिहासाचा वाटा आपण बदलू शकत नाही. कोणताही समूह जसा बरावाईट आहे तसा तो का झाला याची भौतिक तसेच (रूढार्थानं) भौतिकेतर कारणं शोधणं व त्याआधारित मार्गानं समाजाला सौहार्दाकडे नेणं हा विवेकवाद आहे; कोणालाही कोणतीही बरीवाईट विशेषणं लावून त्यातून पुन्हा समूह-अस्मिता दृढ होण्यापलीकडे फारसं काही साधत नाही. हीच तर अस्मितेची ‘माया’!
अस्मितेवरील जखमांची प्रतिक्रिया हा निसर्ग आहे, पण मर्यादा सुटून धर्म सत्ताकारणाच्या ताब्यात गेला की तो त्या वाघावरून खाली उतरू शकत नाही. ‘धर्महीन राजकारण हे आत्म्याचा घात करणारा मृत्यूचा सापळा आहे’. यातील गांधींचा धर्म हृदयाच्या संपूर्ण शुद्धतेत आहे. सत्ताकारण ही तर अशुद्धतेची मॅरेथॉन झाली आहे. म्हणूनच गांधींचा विचार हा लोकशक्ती बांधणीचा होता. समाजावर संयम, नैतिकता, सहिष्णुता यांचा प्रभाव नसेल आणि तरीही सत्ताकारण शुद्ध/सहिष्णू राहील हे कसं शक्य आहे? समाजाचं त्यासाठी निरंतर शिक्षण करीत राहण्याचं काम सत्ताकारण करील? ‘सत्यच ईश्वर आहे व माझं राजकारण मोक्षासाठी!’ -गांधी. सत्याची सोपी व्याख्या काय? ‘जे एकत्वाप्रत नेते ते सत्य व तोच माझा ईश्वर, ते ईश्वरच माझं राजकारण. मी विश्वाचा आहे. धार्मिक उन्माद माणसाला पशू बनवतो. अतिरेकी राष्ट्रवाद मला मान्य नाही! द्वेष माणसाचा अध:पात करतो’ विवेकानंद. पाहा, धर्माचा प्राण हृदयांत उतरला की शब्दही किती आश्चर्यकारक सारखे उतरतात!
आणि ‘शतकांच्या परदास्यातूनही हिंदू धर्म टिकून आहे तो सहिष्णुतेमुळेच! सत्य-धर्म स्वसमर्थ असतो, त्याचा विनाश होऊ शकतच नाही. विज्ञानही आज वेदान्ताच्या सृष्टीविचाराच्या दिशेनंच जात आहे’ हे विवेकानंद तर ‘हिंदू धर्माच्या सनातन सत्यानंच त्याला जिवंत ठेवलं आहे. आज तो जर्जर झाला असेल पण एक दिवस असा उजाडेल की तो आपल्या या अंगभूत सामर्थ्याच्या तेजानं जगाला कधी नव्हे एवढं दिपवून टाकेल!’ हे गांधी. आणि तरीही सत्तेद्वारे आपल्या सत्य-धर्माचं रक्षण कधी नव्हे ते आताच होऊ लागलं आहे असं अत्यंत सुशिक्षितांसहित सामान्य धार्मिकांना वाटणं हे हिंदू-धर्मावरचंच मोठं संकटच नव्हे का?
rajadesai13 @yahoo.com

